शिकागो : सुवर्ण महोत्सवी महाराष्ट्र मंडळ
सातासमुद्रापार आलेल्या शिकागोतील मराठी बंधू आणि भगिनींनी एकत्रित येऊन 1969 साली
महाराष्ट्र मराठी मंडळाची स्थापना केली. पन्नास वर्षापूर्वी इवलसं रोपटे लावले आणि त्याचा वेलू आज गगनात गेला आहे.
गेल्याच वर्षी 2021 मध्ये त्याचा सुवर्ण महोत्सव माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत धुमधडाक्यात तीन दिवसांच्या भरगच्च कार्यक्रमात पार पडला. यावेळेची मराठी जनांची उपस्थितीही लक्षणीय होती. यावेळी मंडळाच्या यशस्वी वाटचालीचा इतिहास स्मरणिका रूपाने प्रकाशित करण्यात आला.
‘सही रे सही’ हे लोकप्रिय नाटक सादर करण्यास भरत जाधव आणि कलाकार मंडळीना येथे आमंत्रित करण्यात आले होते. त्याचा सेट येथील हरहुन्नरी सदस्यांनी तयार करून दिला होता.
या मंडळातर्फे प्रामुख्याने गणेशोत्सव, शिवजयंती, महाराष्ट्र दिन, स्नेहसंमेलन इत्यादी कार्यक्रमांची वर्षभर रेलचेल असते. प्रत्येक जण आप आपल्यावर सोपविण्यात आलेली जबाबदारी कर्तव्य भावनेतून पार पाडत असतात. हे सर्वच कार्यक्रमाचे आयोजन शनिवार, रविवार शिवाय शक्य नसते. एकदा कार्यक्रम ठरला कि लोक लांब लांबून, त्याठिकाणी ड्राईव्ह करून येत असतात.
मराठी जनांना मराठी भाषेच्या धाग्यानी एकत्र आणून आपली संस्कृती जपणे व जतन करणे हेच ध्येय ठेवून मंडळाचे कार्य सुरू झाले ते आजतागायत एक दिलाने, नियोजन आणि शिस्तबद्ध पध्दतीने चालू आहे. हे सर्वच सदस्य आनंदाने आपली नि:शुल्क सेवा देत असतात.
शिकागोत महाराष्ट्र मराठी मंडळा मार्फत 2014 पासून अधिकृत सरकारची मान्यता घेऊन मराठी शाळा सुरू करण्यात आली आहे. शाळेची स्वतंत्र इमारत आहे. 114 विद्यार्थ्यी शाळेच्या पटावर आहेत. असेच प्रयत्न इतर ठिकाणी मंडळ करीत आहे.
या महाराष्ट्र मराठी मंडळा तर्फे इतिहास संशोधन मंच स्थापन झाला असून त्याचेही कार्य उल्लेखनीय असेच आहे.या शिवाय एक विशेष बाब म्हणजे मराठी भाषा गौरव दिनाचे आयोजन करून मायबोलीवरील आपले प्रेम, आस्था निर्माण निष्ठा व्यक्त करीत असतात. असे हे शिकागोतील महाराष्ट्र मराठी मंडळ सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करून पुढील यशस्वी वाटचाल करीत आहेत.
क्रमश:..

– लेखन : डाॅ.भास्कर धाटावकर.
निवृत्त पुराभिलेख संचालक, महाराष्ट्र शासन
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800