वह जब याद आये ….
गीत : वह जब याद आये
चित्रपट : पारसमणी (१९६३)
दिग्दर्शन : बाबूभाई मिस्त्री
गीतकार : असद भोपाली
संगीतकार : लक्ष्मीकांत-प्यारेलाल
कलाकार : गीतांजली, महिपाल
गायक : मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर
काही दिवसांपूर्वी म्हणजेच ३१ जुलैला रफी साहेबांची पुण्यतिथी झाली. त्या दिवशी एका व्हॉट्सॲप समूहात त्यांच्या स्मरणार्थ हे गाणे पाठवले गेले होते. ते ऐकून मी थेट विविध भारतीच्या एखाद्या शो मध्ये पुन्हा गेल्यासारखे वाटले. आज का कोणास ठाऊक पुन्हा तेच गाणे ऐकावेसे वाटले.
लहानणापासून अनेक वेळा रेडीओवर ऐकलेले हे गाणे मी कसे काय कधी टीव्ही वर पाहिले नाही याचे मात्र आश्चर्य वाटून गेले ! आणि मी हा सिनेमा देखील बघितला नव्हता. खरे तर हा कदाचित लहान मुलांना आवडण्यासारखा चित्रपट होता. राजकुमार – राजकुमारी, त्यांचे प्रेम, ते मिळवण्यासाठी राजकुमार बरीच आव्हाने पेलतो अशी गोष्ट. पण माझा हा चित्रपट बघायचा लहानपणी राहूनच गेला.
चित्रपटाची कथा रोचक आहे. पारस (महिपाल) हा सेनापतीचा मुलगा असतो. त्याचे जहाज समुद्रात वादळात अडकते आणि तो हरवतो. पारस नंतर एका गरीब गावकऱ्याला सापडतो, जो त्याला स्वतःचा मुलगा म्हणून वाढवतो. पारस मोठा होतो आणि एक कुशल तलवारबाज तसेच गायक बनतो. एके दिवशी, तो राजकुमारीला भेटतो (गीतांजली) आणि तिच्या प्रेमात पडतो. त्याची कीर्ती राजवाड्यात पोहोचते आणि सम्राट त्याला गायनासाठी बोलवतो. त्याच्या गायनाने खूश होऊन सम्राट त्याला इच्छा असेल ते मग म्हणतो आणि पारस राजकन्येचा हात मागतो. संतप्त होऊन सम्राट पारसला शिक्षा करण्याचा निर्णय घेतो, पण पारस पळून जातो. पराभूत झालेला सम्राट लग्नाला तयार होतो. मात्र पारसला पारसमणी नावाचे दुर्मिळ रत्न शोधण्यास सांगतो, कारण त्याला असा शाप मिळालेला असतो की त्याच्या मुलीचे लग्न होताच तो सम्राटाचा शेवटचा दिवस असेल. पारसला पारसमणी सापडला तर सम्राटाचे प्राण वाचू शकतात आणि तरच पारस राजकन्येशी लग्न करू शकतो. पारसमणी हे एक काल्पनिक रत्न आहे जे धारण करणाऱ्याला कायम तरुण ठेवते. पारस हे मान्य करतो आणि बहिण आणि भावासोबत शोधायला निघून जातो.
पारस शोध घेत घेत एका गुहेत जातो. इथून चित्रपट ईस्टमॅन कलरमध्ये आहे. विविध जादुई प्राणी आणि ज्वालामुखी, लावा यांच्याशी लढा देत पारस माया नगरीतल्या चेटकिणीला भेटतो, जी शूर पारसच्या प्रेमात पडते. त्याला विश्वासात घेऊन, ती त्याला तिचे खरे स्वरूप दाखवते, जी एक वृद्ध स्त्री आहे. चेटकीण त्याला पारसमणी दाखवते, जे ती एका विशाल कोळ्यासारख्या प्राण्याला मारल्यानंतर मिळवते. लवकरच म्हाताऱ्या चेटकिणीचाही अंत होतो. पारस आणि त्याची भावंडे त्यांच्या राज्यात परत जातात, जिथे काही महत्त्वपूर्ण लढाईनंतर, तो त्याचे वडील सेनापतीला भेटतो आणि राजकन्येशी विवाह करतो.
चित्रपटाचा नायक, महिपाल (महिपाल सिंग किंवा महिपाल भंडारी) (२४ डिसेंबर १९१९- १५ मे २००५) हा जोधपूर, राजस्थान येथे एका श्रीमंत घराण्यात जन्मलेला एक भारतीय अभिनेता होता. १९५० आणि १९६० च्या दशकातील अनेक प्रसिद्ध हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले. ते सहा वर्षाचे असताना आई वारली आणि सांभाळ आजी – आजोबांनी केला, कारण त्यांचे वडील धंद्यासाठी कलकत्त्याला राहत असत. त्यांचे आजोबा एक खूप चांगले चित्रकार, लेखक आणि कवी होते. त्यांनी खेळाच्या माध्यमांतून छोट्या महिपालला खूप गोष्टी शिकवल्या. लहानपणी ते आपल्या आजोबांसोबत रामलीला बघायला जायचे. तेव्हाच त्यांनी अभिनेता बनायचे ठरवले.
महिपालला शालेय जीवनापासूनच संगीत, नाटक आणि नृत्यात रस होता. जसवंत कॉलेजमधून उत्तीर्ण झाल्यावर ते जोधपूरच्या मारवाडी फिल्म मेकिंग कंपनीशी जोडले गेले. मग महिपाल (तेव्हाच्या) बॉम्बेला गेले, पण तिथला चित्रपट नजराना (१९४२) अपयशी ठरला. नंतर दिग्गज चित्रपट निर्माते व्ही. शांताराम यांनी त्यांची दखल घेतली.
महिपाल यांनी कवितेकडे असलेला सर्जनशील कल वापरला आणि चित्रपटांसाठी गीतलेखन सुरू केले. १९४२ ते १९५० च्या काळात त्यांनी अनेक चित्रपट केले. महिपालला होमी वाडिया यांच्या श्री गणेश महिमा (१९५०) या चित्रपटात मीना कुमारी सोबत पहिला मोठा ब्रेक मिळाला. होमी वाडियांनी पुढे अनेक चित्रपटात ही जोडी घेतली. हा चित्रपट यशस्वी झाला आणि महिपाल यांनी पौराणिक आणि धार्मिक शैलीतील चित्रपटांमध्ये स्वतःला नायक म्हणून स्थापित केले.
पारसमणी, जबक, कोब्रा गर्ल, जंतर मंतर, अलीबाबा आणि ४० चोर, अलाद्दीन और जादूई चिराग, यासारख्या अरेबियन नाइट्स थीमवर आधारित चित्रपटांमध्ये काम केले. तसेच संपूर्ण रामायण, गणेश महिमा, वीर भीमसेन, जय संतोषी मां यासारखे हिंदू पौराणिक चित्रपट केले.
“तू छुपी है कहाँ मे तडपता यहाँ” आणि “आधा है चंद्रमा रात आधी” मधील प्रमुख गाण्यांमुळे ते प्रसिद्ध झाले. व्ही.शांताराम यांनी नवरंग (१९५८) मध्ये घेतले. तो सुपरहिट ठरला आणि त्याने महिपालना स्टारडम मिळवून दिले. अरेबियन नाईटस् च्या कथांवर आधारित चित्रपटांमुळे महिपाल हे आखाती प्रदेशातही खूप लोकप्रिय स्टार होते. जय बाबा अमरनाथ (१९८३) हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता.
वैयक्तिक आयुष्यात ते खूप शांत स्वभावाचे आणि अतिशय चांगले होते. तबस्सुम टॉकीज या आपल्या शो मध्ये तर तबस्सुम यांनी त्यांची या शब्दांत तारीफ केली होती की त्यांचा जन्म तर झाला होता कलियुगात, पण ते होते सत्ययुगातले. त्यांनी १३० चित्रपट केले आणि त्यातल्या १०८ चित्रपटात ते हिरो होते, तरी कधीही टॉपच्या हिरोंमध्ये त्यांची गणना झाली नाही. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की या संत माणसाला त्याची अजिबात खंत नव्हती! काम करावे आणि बाजूला व्हावे, मग त्याचे जे फळ मिळेल ते मिळो, या उक्तीला ते प्रत्यक्ष जगले.
बहुतेक वेळा पतिव्रता असल्याचे स्त्रियांबद्दल सांगितले जाते. पण गंमत म्हणजे महिपालजी स्वतःला पत्नीव्रता म्हणून घेण्यात गर्व मानीत. त्यांचे त्यांच्या पत्नीवर नितांत प्रेम होते आणि ते जगाला सांगायला ते घाबरत नव्हते. लक्षात घ्या तो काळ २१व्या शतकाचा नव्हता. टॉपच्या हिरोंच्या गणतीत भले ही ते नसले तरी पत्नीसाठी ते नक्कीच टॉपचे हिरो असणार, याची एक स्त्री म्हणून मी नक्कीच ग्वाही देऊ शकते!
पत्नी, अक्कल कुंवर आणि मुली, शुशीला जैन आणि निर्मला ओसवाल असा त्यांचा परिवार. दोन्ही मुलींची लग्ने झाल्यावर ते मुंबईला मरीन ड्राइव्हवर रहात होते, तिथे रोज सकाळ संध्याकाळ आपल्या पत्नी सोबत फिरायला जायचे. पण १५ मे, २००५ ला जेव्हा ते फिरून घरी आले तेव्हा ८६ च्या आयुला त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला.
त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नीला त्यांचे हे गाणे राहून राहून आठवत असेल…”वोह जब याद आये, बहुत याद आये…”
या गाण्यातली नायिका, गीतांजली (१९४७-२०१९) ही एक भारतीय अभिनेत्री होती जिने जवळपास सहा दशकांच्या प्रसिद्ध कारकिर्दीत, तेलुगू, तमिळ, मल्याळम आणि हिंदी यांसारख्या अनेक भाषांमधील ५०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. नृत्यांगना म्हणून त्यांचा पहिला चित्रपट १९६० मधला “राणी रत्नप्रभा” हा आहे. एन.टी.आर.ने १९६१ मध्ये सीताराम कल्याणम या चित्रपटातून १४ वर्षीय मणीला रूपेरी पडद्यावर नायिका म्हणून आणले.
त्यांचे जन्मनाव मणी होते. त्या काळच्या ब्रिटिश इंडिया मधील मद्रास प्रेसिडेन्सीमध्ये जन्म झाला. पारसमणी चित्रपटाच्या वेळी, मणी हे नाव या शीर्षकात आधीपासूनच असल्याने, चित्रपट निर्मात्याने त्यांचे नाव गीतांजली असे ठेवले.
चार मुली आणि एका मुलाच्या कुटुंबातील, गीतांजली यांनी प्रथम चार वर्षांच्या असताना रंगमंचावर बहिणीसोबत शास्त्रीय नृत्य सादरीकरण केले. त्यानंतर कधीच मागे वळून पाहिले नाही.
त्या अतिशय शांत आणि समाधानी होत्या. चित्रपटसृष्टीतील त्यांच्या प्रवासाचा त्यांना अभिमान होता. त्या लहानपणापासूनच सक्रिय आणि उत्साही होत्या.
चित्रपटात काम करण्यासाठी या भाग्यवान मुलीला वडिलांचा पूर्ण पाठिंबा होता. अजूनही जेव्हा स्त्री भ्रूणहत्या आजूबाजूला घडताना आपण बघतो, तेव्हा त्या काळातल्या या बापाला साष्टांग दंडवत घालावसा वाटतो.
छोट्या मणीने तिच्या पहिल्या चित्रपटापासूनच चार शिफ्टमध्ये काम करायला सुरुवात केली आणि ती सतत वेगवेगळ्या शहरांमधून प्रवास करत होती. यामुळे तिला स्वयंपाक शिकता आला नाही आणि लग्न होईपर्यंत तिने स्वयंपाकघरात पाऊल ठेवले नाही. या गोष्टीची वृद्धापकाळात देखील त्यांना खंत वाटत होती. स्त्री सुलभ स्वभावाला अनुसरून त्यांना सर्व प्रसंगांसाठी वेषभूषा करून, दागिने घालून छान तयार व्हायला आवडायचे.
त्या ४० वर्षे मद्रासमध्ये राहिल्या आणि त्यांनी प्रत्येक कलाकाराशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवले. अभिनेता रामकृष्णाशी लग्न केल्यानंतर त्यांनी अभिनय सोडला, कारण रामकृष्णला चित्रपटांपासून दूर जाण्याचा शब्द त्यांनी दिला होता. त्या निर्णयाचा नंतर मात्र पश्चाताप झाला. म्हणून त्यांनी अनेक प्रसंगी महिला कलाकारांना त्यांच्या करिअरच्या शिखरावर असताना लग्न न करण्याचा सल्ला दिला.
एन.टी.आर. त्यांच्या साठी गुरू, वडील यांच्या स्थानी होते. त्यांच्या पहिल्या चित्रपटादरम्यान, एन.टी.आर. यांच्या घरी त्यांच्या मुलींसोबत त्या खूप खेळायच्या. आयुष्याच्या उत्तरार्धात राजकारणातही झोकून दिले ते एन.टी.आर. यांच्यासाठीच.
गीतांजलीजींच्या पहिल्याच चित्रपटात सीतेची भूमिका ही यशाची पहिली पायरी ठरली. एन.टी.आर., ए.एन.आर., शिवाजी गणेशन आणि राजकुमार यांच्यासह त्या काळातील प्रमुख अभिनेत्यांसोबत अभिनय केला. सहकलाकार रामकृष्ण यांच्याशी त्यांनी लग्न केले, ज्यांच्यासोबत त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले. तमन्ना अभिनीत ‘दॅट इज महालक्ष्मी’ हा गीतांजलीजींचा शेवटचा चित्रपट ठरला.
कॅन्सरने पती गमावल्यानंतर त्या काही काळ त्या डिप्रेशनमध्ये गेल्या. आपला मुलगा अभिनेता म्हणून यशस्वी होताना पाहायचा होता पण तसेही झाले नाही.
अभिनय क्षेत्रात आवडीप्रमाणे काम करून, प्रेमविवाह करून, नंतर टीव्ही वर काम करून, आणि हैदराबादमध्ये वरिष्ठ आणि समकालीन लोकांसोबत वेळ घालवून त्यांनी एक परिपूर्ण आयुष्य जगले. आपल्या आजारपणाला कधीही आपल्या आयुष्यावर ताबा घेऊ न देणाऱ्या आपल्या आईला “आनंदी आत्मा” म्हणून त्यांचा मुलगा आणि अभिनेता आदिथ श्रीनिवास याने आईबद्दल उद्गार काढले. “तिची रुपेरी पडद्यावर सीता म्हणून ओळख झाली आणि तिच्यात देवीचे सर्व गुण होते. ती इथल्या प्रत्येकासाठी आईसारखी होती,” नरेश म्हणाला.
हृदयविकाराच्या झटक्यासाठी उपचार सुरू असताना रात्री उशिरा यांनी अखेरचा श्वास घेतला. इंडस्ट्रीने ३१ ऑक्टोबर, २०१९ ला एक दिग्गज प्रतिभावान अभिनेत्री गमावली आहे जी तिच्या ग्लॅमर, कामगिरी आणि प्रेमळ वर्तनासाठी प्रसिद्ध होती.
हा चित्रपट लक्ष्मीकांत-प्यारेलाल या संगीतकार जोडीचा एकत्र संगीतबद्ध केलेला पहिला स्वतंत्र चित्रपट आहे. निव्वळ २६ आणि २३ वर्षाचे होते तेव्हा. याआधी त्यांनी अनेक संगीतकारांसोबत स्वतंत्रपणे तसेच एकत्र काम केले होते. हा चित्रपट लक्ष्मीकांत-प्यारेलाल, लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्यातील दीर्घ नातेसंबंधाची सुरुवात देखील ठरला.
लक्ष्मीकांत शांताराम कुडाळकर आणि प्यारेलाल रामप्रसाद शर्मा यांचा हा चित्रपट होता. या चित्रपटातील गाण्यांनी या चित्रपटाला प्रचंड हिट बनवले. चित्रपटांत महिपाल आणि गीतांजली यांच्यापेक्षा पारसमणी चित्रपटाचे यश या संगीतकारांचे अधिक होते, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
लक्ष्मीकांत शांताराम पाटील कुडाळकर यांचा जन्म लक्ष्मीपूजन, दिपावलीच्या दिवशी ३ नोव्हेंबर १९३७ रोजी झाला. बहुधा म्हणून त्यांचे नाव लक्ष्मीकांत ठेवले गेले. लहान असतानाच त्याचे वडील वारले. कुटुंबाच्या गरीब आर्थिक परिस्थितीमुळे ते त्यांचे शैक्षणिक शिक्षण देखील पूर्ण करू शकले नाहीत. लक्ष्मीकांतच्या वडिलांचे मित्र संगीतकार होते. त्यांनी लक्ष्मीकांत आणि त्याच्या मोठ्या भावाला संगीत शिकण्याचा सल्ला दिला. त्यानुसार लक्ष्मीकांत मेंडोलिन वाजवायला शिकले आणि त्याचा मोठा भाऊ तबला वाजवायला शिकला. सुप्रसिद्ध मेंडोलिन वादक हुसेन अलीच्या सहवासात त्याने दोन वर्षे घालवली. काही पैसे मिळवण्यासाठी त्यांनी भारतीय शास्त्रीय वाद्य संगीत मैफिली आयोजित करणे आणि सादर करणे सुरू केले. पुढे, १९४० च्या दशकात, त्यांनी बाल मुकुंद इंदोरकर यांच्याकडून मेंडोलिन आणि हुस्नलाल (हुसनलाल भगतराम फेम) यांच्याकडून व्हायोलिन शिकले. लक्ष्मीकांतने बाल कलाकार म्हणून भक्त पुंडलिक (१९४९) आणि आंखे (१९५०) या चित्रपटांमधून आपल्या चित्रपट कारकिर्दीला सुरुवात केली आणि काही गुजराती चित्रपटांमध्येही अभिनय केला.
प्यारेलाल रामप्रसाद शर्मा (जन्म ३ सप्टेंबर, १९४०) हे प्रसिद्ध ट्रम्पेटर पंडित रामप्रसाद शर्मा (बाबाजी) यांचे सुपुत्र, ज्यांनी त्यांना संगीताची मूलभूत शिकवण दिली. त्यांनी वयाच्या ८ व्या वर्षी व्हायोलिन शिकण्यास सुरुवात केली आणि दररोज ८ ते १२ तास सराव केला. अँथनी गोन्साल्विस नावाच्या गोव्यातील संगीतकाराकडून ते व्हायोलिन वाजवायला शिकले. अमर अकबर अँथनी चित्रपटातील “माय नेम इज अँथनी गोन्साल्विस” हे गाणे श्री. गोन्साल्विस (चित्रपटात लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांचे संगीत होते) यांना श्रद्धांजली म्हणून मानले जाते. वयाच्या १२व्या वर्षी, त्याच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती खालावली. म्हणून रणजीत स्टुडिओसारख्या स्टुडिओमध्ये वाद्ये वाजवून पैसे कमवावे लागले. त्यांचा भाऊ गोरख शर्मा यांनी पुढे लक्ष्मीकांत प्यारेलाल या जोडीने संगीतबद्ध केलेल्या विविध गाण्यांसाठी गिटार वाजवले.
अन्नू कपूर यांना नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी नमूद केले आहे की ते अत्यंत निपुण व्हायोलिनवादक आणि पाश्चात्य संगीताचे तज्ञ होते. प्यारेलाल यांनी पाश्चिमात्य देशात आपले नशीब आजमावण्याचा विचार केला आणि त्यांना एका नामांकित गटासह नियमित ऑर्केस्ट्रा वादक बनायचे होते. पण लक्ष्मीकांत यांनी त्यांना परावृत्त केले आणि मग त्यांनी भारतीय चित्रपटासाठी संगीतातला दोघांचा अद्भुत प्रवास सुरू केला.
लक्ष्मीकांत दहा वर्षांचे असताना, त्यांनी एकदा रेडिओ क्लब, कुलाबा येथे लता मंगेशकरांच्या मैफिलीत मेंडोलिन वाजवले. त्यांच्या वादनाने लता दीदी इतक्या प्रभावित झाल्या की मैफिलीनंतर स्वतः जाऊन त्यांच्याशी बोलल्या.
लक्ष्मीकांत आणि प्यारेलाल यांची भेट मंगेशकर कुटुंबातर्फे चालवल्या जाणाऱ्या सुरेल कला केंद्र या मुलांसाठी असलेल्या संगीत अकादमीमध्ये झाली. त्यांची आर्थिकदृष्ट्या गरीब पार्श्वभूमी लक्षात आल्यानंतर, लतादीदींनी त्यांच्या नावांची शिफारस नौशाद, सचिन देव बर्मन आणि सी. रामचंद्र यांसारख्या संगीत दिग्दर्शकांकडे केली. समान आर्थिक पार्श्वभूमी आणि वय यामुळे लक्ष्मीकांत आणि प्यारेलाल चांगले मित्र बनले. ते रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये बरेच तास घालवायचे, कधी एकमेकांसाठी काम शोधायचे आणि संधी मिळेल तेव्हा एकत्र वाजवायचे.
प्यारेलाल अनेकदा बॉम्बे चेंबर ऑर्केस्ट्रा आणि परमज्योती अकादमीमध्ये जात असत, जिथे ते गुडी सीरवाई, कुमी वाडिया, मेहली मेहता आणि त्यांचा मुलगा, जुबिन मेहता यांच्या कंपनीत आपली कौशल्ये विकसित करीत. लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांना दिले जाणारे पैसे कमी होते, म्हणून त्यांनी मद्रास (आता चेन्नई) येथे जाण्याचा निर्णय घेतला. पण, तिथेही तीच कथा होती. म्हणून, ते परतले.
एकदा प्यारेलाल यांनी भारत सोडून व्हिएन्ना येथे सिम्फनी ऑर्केस्ट्रा मध्ये वादन करण्यासाठी जुबिनप्रमाणेच युरोपला जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, लक्ष्मीकांतच्या सांगण्यावरून ते स्वदेशी राहिले. त्या काळी लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्या काही सहकाऱ्यांमध्ये पंडित शिवकुमार शर्मा (संतूर) आणि पंडित हरिप्रसाद चौरसिया (बासरी) यांचा समावेश होता.
लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी १९५० च्या दशकातील जवळजवळ सर्व नामांकित संगीत दिग्दर्शकांसोबत काम केले (ओ.पी. नय्यर यांचा अपवाद वगळता). १९५३-१९६३, त्यांनी कल्याणजी-आनंदजींचे सहाय्यक म्हणून काम केले. त्यांनी सचिन देव बर्मन (जिद्दी) आणि त्यांचा मुलगा राहुल देव बर्मन (छोटे नवाब) यांच्यासह अनेक संगीत दिग्दर्शकांसाठी संगीत संयोजक म्हणून काम केले.
लक्ष्मीकांत-प्यारेलाल आणि आर.डी. बर्मन खूप चांगले मित्र होते. लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी स्वतंत्रपणे संगीत देण्यास सुरुवात केली तरी ते मित्रच राहिले. आर.डी.बर्मन यांनी त्यांच्या दोस्तीच्या दोन गाण्यांसाठी माऊथ ऑर्गन वाजवले. आर.डी. बर्मन यांचे संगीत असलेल्या तेरी कसम (१९८२) मधील “दिल की बात” गाण्याचे संगीतकार म्हणून लक्ष्मीकांतने एकदा पाहुण्यांच्या भूमिकेत भूमिका साकारली होती.
या अशा गोष्टी वाचल्या की आजकालच्या जमान्यातल्या गळा कापू स्पर्धेची कीव वाटायला लागते.
लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्या एकूण सहा गाण्यांनी पारसमणी चित्रपटाची शोभा वाढवली. चित्रपटाचे भाग्य उंचावणारी ही सहा गाणी होती : हसता हुआ नूरानी चेहरा (लता – कमल बरोत), मेरे दिल में हल्की सी (लता), उई मां उई मां यह क्या हो गया (लता), सलामत रहो सलामत रहो (रफी), वह जब याद आए (लता – रफी), चोरी चोरी जो तुमसे मिली (लता – मुकेश).
लता – रफी यांचे हे लक्ष्मीकांत – प्यारेलाल सोबतचे पहिलेच ड्यूयेट (duet) गाणे. राग यमन कल्याण वर आधारित हे गाणे, लता दीदींच्या सुंदर आलापाने सुरू होते, त्यानंतर व्हायोलिन छेडले जातात आणि मग येतो रफी साहेबांचा अप्रतिम आवाज. या गाण्यामधील मोहम्मद रफी साहेबांचे व्होकल टेक्सचर, मॉड्युलेशन आणि नोट्सची नियंत्रित हाताळणी अभूतपूर्व आहे. सतार आणि तबला यांची सुंदर ६०च्या दशकातली मेलडी. वाह!
मोहम्मद रफी साहेबांबद्दल बोलायला इतके आहे की कित्येक लेख लिहिले तरी त्यांचे जीवनकार्य त्यात सामावणार नाही. त्यांच्या सारखा दिलदार माणूस, त्यांच्या सारखा हिरा या पृथ्वीवर पुन्हा होणे नाही. तीच कथा लता दीदींच्या बाबतीत आहे. काय आणि किती बोलावे हे आज खरंच मला कळत नाहीये.
या दोघांच्या बाबतीत एक घडलेली घटना मात्र नक्की सांगावीशी वाटते. या सिनेमाच्या आसपासच्या काळात लता आणि रफी यांच्यात रॉयल्टी वरून समस्या निर्माण झाली होती.
१९६२-६३ मध्ये, लता मंगेशकर यांनी रॉयल्टीमध्ये पार्श्वगायिकांच्या वाट्याचा मुद्दा उपस्थित केला. अग्रगण्य पुरुष पार्श्वगायक म्हणून रफीचे स्थान ओळखून, चित्रपटाच्या निर्मात्याने निवडक संगीतकारांना मान्य केलेल्या ५% गाण्याच्या रॉयल्टीमधून अर्धा वाटा मागण्यासाठी त्यांनी पाठिंबा द्यावा अशी लता दीदींची इच्छा होती.
मात्र रफी साहेबांनी त्यांची बाजू घेण्यास नकार दिला. त्यांच्या मते, चित्रपट निर्मात्याच्या पैशावरचा त्यांचा दावा गाण्यासाठी मान्य केलेली फी दिल्याने संपतो. रफीजींनी असा युक्तिवाद केला की निर्माता आर्थिक जोखीम घेतो आणि संगीतकार गाणे तयार करतो, म्हणून गायकाचा रॉयल्टीच्या पैशावर कोणताही दावा असू नये.
लतादीदींनी वाटत होते की गायकाच्या नावामुळेच रेकॉर्ड विकले जातात. या मतभिन्नतेमुळे पुढे दोघांमध्ये मतभेद झाले. “तसवीर तेरी दिल में” (माया, १९६१) च्या रेकॉर्डिंग दरम्यान, लतादीदींनी गाण्याच्या एका विशिष्ट उतार्यावरून रफीशी वाद घातला. संगीत दिग्दर्शक सलील चौधरी यांनी लतादीदींची बाजू घेतल्याने रफी यांना ती गोष्ट खटकली.
लतादीदींनी जाहीर केले की ती यापुढे रफीसोबत गाणार नाही, तेव्हा परिस्थिती आणखीनच बिघडली. संगीत दिग्दर्शक जयकिशन यांनी नंतर दोघांमध्ये समेट घडवून आणला. इतके घडून सुद्धा या चित्रपटात दोघांनी व्यावसायिकता सांभाळत अतिशय उत्कृष्ट गायन केले. इतके सुंदर दोघांचे या गाण्यात ट्युनिंग होते की पडद्यामागे अशा काही घटना घडल्या असतील याची यत्किंचितही शंका कोणाला येणार नाही. महान कलाकारांचे हेच तर लक्षण आहे!
शिवाय या दोघांमध्ये यावरून कायमचे काही वैर वगैरे झाले असे नाही. त्यांना एकमेकांच्या टॅलेंटबद्दल खूप आदर आणि सन्मान होता. तरी रफी साहेब लता दीदींबद्दल कुठेही काहीही बोलले नाहीत, कुठल्याही मुलाखतीत नाही की कुठल्या लेखात नाही, हे थोडे आश्चर्यकारक वाटले! कदाचित माझ्या वाचनात आले नसावे, असेच असणार. पण लता दीदी मात्र रफी साहेबांचे खूप कौतुक करायच्या. त्या तर म्हणायच्या की रफीसाब इतके कुशल गायक होते की ते आपल्या आवाजातून कोणताही मूड तयार करू शकत होते. रफी साहेब, लता दीदींचे बंधू, हृदयनाथ मंगेशकर यांच्या खूप जवळचे होते. खरं तर, हृदयनाथ यांनी लहान असताना ‘बैजू बावरा’मध्ये रफी साहेबांसोबत युगुल गीत गायले होते.
मोहम्मद रफी साहेबांनी आणि लता दीदींनी हे गाणे गाताना असे वाटते की जणू त्यांनी स्वतःला नायकाच्या आणि नायिकेच्या जागी ठेवून गाणे गायले. गायकाला कोणतेही पात्र समजून घेऊन, ते गाणे कोणत्या परिस्थितीत पडद्यावर उमटणार याची जाणीव ठेवून, त्या सहवेदनेने ते गाणे आवश्यक असते. तरच श्रोत्यांच्या मनावर त्याचा अपेक्षित परिणाम होतो. या बाबतीत रफी साहेब आणि लता दीदी दोघेही कसलेले गायक असल्याने कधीच मागे पडले नाहीत. खरे गायक नेहमी त्यांच्या हृदयातून गातात आणि ते नेहमी तुमच्या हृदयाला स्पर्श करतात.
हे गाणे ऐकताना प्रत्येक माणसाला, ज्याने आपल्या प्रिय व्यक्तीला गमावले आहे किंवा त्याच्यापासून दुरावले आहे, त्याला वाटेल की आपल्याच मनातले शब्द आणि आपल्याच मनातली आर्तता इथे या गीतात आणि या सुरात उमटत आहे. मोहब्बत म्हटले की आपल्यासमोर प्रियकर अथवा प्रेयसी हेच येते. पण माझ्यासाठी हे गाणे ऐकले की माझी आई समोर येते. कदाचित आईच्या एवढे आपल्यावर ना कोणी प्रेम करते ना आपण कोणावर इतके प्रेम करतो. जितकी वर्षे ती होती, तिचे भरभरून मला प्रेम मिळाले हे माझे भाग्यच आहे. पण कधीही तिची आठवण आली की खूप खूप आतून काहीतरी पिळवटून निघते असेच वाटते. या गीतातील प्रत्येक शब्दंशब्द खरा आहे, सच्चा आहे. असद भोपालींच्या लेखणीतून उतरले तरी मला काय आणि तुम्हाला काय, खूप खोलवर आपल्याच भावना सांगणारे हे गीत आहे, असे वाटल्याशिवाय राहत नाही.
हे गाणे चित्रपटात तेव्हा येते जेव्हा पारस पारसमणी शोधत एका गुहेत शिरतो आणि त्याला राजकुमारीचा भास होतो. ती गाऊन आपल्याला साद देते आहे असे वाटून तो तिच्यापाशी जातो, पण ती असतेच कुठे तिथे ? तिचा विरह सहन न होऊन तो हे गीत गाऊ लागतो. त्याच्या हृदयाने छेडलेल्या ताना राजकुमारी पर्यंत पोचतात आणि ती त्याला प्रतिसाद देत देत त्याच्या सुरात सूर मिसळून गाते.
(लता)आ ओ ओ ओ ओ
(रफी)
वो जब याद आए बहुत याद आए
वो जब याद आए बहुत याद आए
ग़म-ए- ज़िंदगी के अँधेरे में हमने
चिराग-ए-मुहब्बत जलाए बुझाए
वो जब याद आए बहुत याद आए
आपल्या प्रिय व्यक्तीची जेव्हा आठवण येते ना, तेव्हा मी म्हटले तसे खूप खूप आतून खोलवर ती आठवण वर येते. असे वाटते की तिच्या/त्याच्या नसण्याने आयुष्यात दुःख सोडून काहीच उरले नाहीये. या अंधारमय आयुष्यात जर एखादा आशेचा किरण असेल तर ती त्या व्यक्तीची आठवण. ती आठवण जणू एखादा जादूचा दिवा आहे, जो आठवण येताच आनंदाने तेवतो, पण काही क्षणातच दुराव्याचे दुःख त्यावर आपले आच्छादन घालून त्याला विजवून टाकतो. काय करणार? त्या व्यक्तीची आठवणच इतकी तीव्र असते की काही आपल्या हातात राहतच नाही.
(रफी)
आहटें जाग उठीं रास्ते हँस दिए
थामकर दिल उठे हम किसी के लिए
कई बार ऐसा भी धोखा हुआ है
चले आ रहे हैं वो नज़रें झुकाए
वो जब याद आए बहुत याद आए
कधी कधी वाटते की तिचे पदरव ऐकून माझ्याकडे येणारे रस्तेसुद्धा आनंदून हसू लागले आहेत! मग मी कसे बरे मागे राहणार? तिच्या चाहुलीने माझे थुईथुई नाचणारे हृदय घेऊन आतुरतेने तिच्यासाठी सज्ज व्हावेसे वाटते. किती तरी वेळा (इथे प्रियकराला) असे वाटले की ती (प्रेयसी) येतेय (लाजत, मुरडत) आणि मग कळते की तो निव्वळ माझ्या मनाचा खेळ होता! माझ्याच आठवणींनी माझ्याशी केलेली प्रतारणा होती!
(लता)
वो जब याद आए बहुत याद आए
गम ए जिंदगी के अंधेरे में हमने
चिराग ए मुहब्बत जलाए बुझाए
वो जब याद आए बहुत याद आए
(लता)
दिल सुलगने लगा अश्क बहने लगे
जाने क्या क्या हमें लोग कहने लगे
मगर रोते रोते हँसी आ गई है
ख्यालों में आके वो जब मुस्कुराए
वो जब याद आए बहुत याद आए
त्या आठवणींनी हृदयात धुमसणारी आग अश्रूंच्या वाटे बाहेर पडू लागली. लोक काय काय बोलू लागले, अगदी प्रेमात वेड लागले असे म्हणू लागले. पण आता त्याची पर्वा नाही. खरं सांगू, विरहात आता अवस्था वेड्यासारखीच तर झाली आहे. हसता हसता रडू येते. आणि जेव्हा मनातल्या मनात वाटते की माझी प्रिय व्यक्ती हसते आहे, तर नकळत रडता रडता माझ्या चेहऱ्यावर हसू तरळते. तुझ्या तीव्र आठवणींचा तर हा परिणाम आहे.
(रफी)वो जुदा क्या हुए ज़िन्दगी खो गई
(लता)शम्मा जलती रही रोशनी खो गई
(रफी)बहुत कोशिशें कीं मगर दिल ना बहला
(रफी)कई साज़ छेड़े कई गीत गाए
(लता)वो जब याद आए बहुत याद आए
(रफी)वो जब याद आए बहुत याद आए
माझी प्रिय व्यक्ती दूर काय गेली, माझे आयुष्यच अर्थशून्य झाले. मी जिवंत तर आहे, प्राणज्योत नावाला तेवत आहे, त्यातला जिवंतपणा जणू हरवला आहे. खूप प्रयत्न केला या मनाला समजावण्याचा, वेगवेगळे सूर छेडून अर्थात विविध गोष्टींमध्ये मन रमावण्यचा प्रयत्न केला, पण काहीच उपयोग झाला नाही. तुझी आठवण तरीही येतच राहिली आणि तीव्र वेदना प्रत्येक वेळी होतंच राहिली.
या चित्रपटात, कथेबद्दल किंवा अभिनयाबद्दल फारसे काही कमी नव्हते. मात्र तांत्रिक कमतरतांमुळे चित्रपटात आजकालच्या जमान्यात जसे हवे असतात तसे इफेक्ट्स दिसत नाहीत. मात्र त्या काळी जे अशा काल्पनिक चित्रपटांत अपेक्षित गुण होते, ते मनोरंजनाच्या दृष्टीने पूरक असल्याने हा चित्रपट यशस्वी ठरला. जरी आजच्या मल्टिप्लेक्सच्या प्रेक्षकांना कदाचित तो आकर्षक वाटला नाही, तरी हा एक चित्रपट असा होता, जो त्याच्या संगीतासाठी आणि बहुतेक आता-विसरलेल्या कलाकारांच्या सुगम कामगिरीसाठी चित्रपटांच्या इतिहासात ताठ मानेने उभा राहिला.

– लेखन : तनुजा प्रधान. अमेरिका.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800