भास्कर भट, सुरेश देशपांडे आणि मी आम्ही तीघेही नाटकाशी संबंधित असल्याने आश्रमशाळेतील मुलांना मेकप व ड्रेपरी करून कार्यक्रमासाठी तयार करण्याची जबाबदारी आम्ही स्वीकारली होती. सुरेश व मी मुलांना मेकप करायचा आणि भास्करनी मुलांना ड्रेसअप
करायचे असे ठरले. आम्ही तीघेही कामाला लागलो. मुलांना मेकप करण्यासाठी फेसपावडर आणि शाळेतील शिक्षक व मुलांनी तयार केलेले पानाफुलांपासूनचे नैसर्गिक रंग उपलब्ध होते ते शिक्षकांनी आम्हाला आणून दिले. दवाखान्यातून आम्ही व्हॅसलीन बोलावून घेतले, त्यात फेसपावडर खलली आणि मेकप साठी लागणारे फौंडेशन तयार करून घेतले. प्रथम फौंडेशन नंतर पावडर, आणि नैसर्गिक रंग यांचा वापर करून मी व सुरेशने एका मागे एक विद्यार्थी मेकप करून तयार केले, भटांनी मुलांना कपडे घालून छान तयार केले. शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी सर्व विद्यार्थ्यी मेकप व आवश्यक कपडे घालून प्रथमच तयार झाले असल्याने खूपच खूष होते आणि छान दिसत होते.
स्टेज समोर एका बाजूला मा. बाबांची कॉट आणि त्यांच्या बाजूला साधनाताईं व आमटे कुटुंबीयांची बसण्याची व्यवस्था केली होती तर दुसऱ्या बाजूला सर्व पाहुण्यांना बसण्यासाठी खुर्च्या होत्या.
मध्यभागी पुढे सर्व विद्यार्थी व त्यांच्या मागे जमलेली आदिवासी मंडळींची बैठक व्यवस्था केली होती. बाबा, साधनाताई, आणि सर्व कुटुंबीय कार्यक्रमासाठी आपापल्या जागेवर बसले.
आम्ही पूजन केलेल्या स्टेजचा पडदा उघडला आणि आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी त्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करायला सुरुवात केली. आमटे कुटुंबीय, सर्व पाहुणे, विद्यार्थी व त्यांचे पालक कार्यक्रम पाहण्यासाठी समोर बसलेले असल्याने कार्यक्रम सादर करणाऱ्या मुलांचा हुरूपही वाढला होता, त्यामुळे एका मागे एक कार्यक्रम रंगत गेले. मुलांचे हे कार्यक्रम तीन साडेतीन तास चालले, आणि शेवटी बाबा व साधनाताईंनी सर्व मुलांचे व शिक्षकांचे भरभरून कौतुक केले आणि तो कार्यक्रम संपन्न झाला. आम्ही सर्वजण आमच्या निवास व्यवस्थेच्या ठिकाणी पोहोचलो पण आदिवासी मंडळी मात्र आनंद व्यक्त करीत शेकोटी करुन भोवताली फेर धरून नाचू लागली.
दुसऱ्या दिवशी दुपारी ‘ओंकार काव्य दर्शन’ हा माझा शालेय कार्यक्रम आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसमोर सादर करायचे ठरले होते. चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी आश्रमशाळांच्या कार्यक्रमांची सुरुवात त्या कार्यक्रमाने होणार होती. आम्ही सर्वजण सकाळीच तयार होऊन बाबांना भेटायला गेलो. चहापाणी झाल्यावर गप्पांच्या ओघात बाबा मला म्हणाले, “विसुभाऊ, तुझा शालेय कार्यक्रम बालभारतीच्या क्रमिक पुस्तकातील कवितांचा आहे त्यामुळे तो मुलांना समजेल पण पुस्तकाबाहेरच्या कविता मात्र मुलांना समजणार नाहीत. कारण त्यांची मातृभाषा ‘गोंडी’ आहे. दुसरे असे की त्यांचे त्यांच्या मातृभाषेवर प्रचंड प्रेम असल्याने तू एखादी कविता गोंडी भाषेत तयार करून सुरुवातीला ऐकवलीस तर ती मुले खूष होऊन तुझा संपूर्ण कार्यक्रम मनापासून ऐकतील.!” नंतर त्यांनी प्रभू नावाच्या व्दिभाषी शिक्षकांना बोलावून घेतले आणि माझ्या संग्रहात असलेली एक कविता मला गोंडीत भाषांतर करून द्यायला सांगितली.
प्रभू सरांनी एक कविता गोंडीत भाषांतर करून दिली. ती कविता प्रथम सादर करून नंतर माझा शालेय कार्यक्रम हेमलकसा आदिवासी आश्रमशाळेत मी सादर केला. तेथील शिक्षक, विद्यार्थी यांना माझा शालेय कार्यक्रम अतिशय आवडला शिवाय बाबा, साधनाताई व आमटे कुटुंबीय सुद्धा माझ्या कार्यक्रमावर बेहद्द खूष झाले. स्वतः मा.बाबाआमटे यांनी माझा सन्मान केला. इतकेच नव्हे तर त्यादिवशी रात्री सर्व कुटुंबीय आणि जमलेल्या पाहुण्यांसाठी ‘कुटुंब रंगलंय काव्यात’ हा माझा एकपात्री कार्यक्रमही आयोजित करून सेवेची संधी दिली. माझ्या संग्रहात असलेली कोल्हापूरच्या विजया कुलकर्णी यांची बालकविता प्रभू सरांनी गोंडीत भाषांतर करून दिली, तिचे एक कडवे वाचकांना आवडेल, याची खात्री वाटते.
‘हात पहा हात, कसे गोरे गोरे पान ।
काळे काळे केस माझे, पहा किती छान ।।’
“कई हूड की हूड नावा, पांढरी पांढरी आकी ।
कारे कारे केलकू नावा, हूड बेचून बेस.।।”

– लेखन : प्रा.विसुभाऊ बापट, दादर, मुंबई
(सादरकर्ते – कुटुंब रंगलंय काव्यात)
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️9869484800