होत लेकरू लहान
माय संगे खेळू लागली
उभ्या आयुष्याची स्वप्ने
त्यात बघुही लागली..
झालं लेकरू ते मोठं
बोबड बोलाया लागलं
अले माझ्या राजा म्हणत
माय सुखावू लागली
लेकरू निघालं शाळेला
माय सोडाया निघाली
काय कमी नाही लेकरा
माय म्हणुही लागली
शिकवाया लेकराला माय
कष्ट कराया लागली
चिमटा पोटाला काढून
लेकरास भरवू ही लागली
लेकरू शिकून सवरून
मोठं मानाचं हो झालं
कष्टानं मोठं केलं लेकराला
अभिमानानं माय म्हणाया लागली
लेकराला मिळाली संधी
परदेशात हो जायाची
दगड काळजावर ठेऊन त्यानं
घेतली परवानगी त्या मायेची
दिस असच हो गेलं
दिस लेकराचा जायचा हो आला
आसवं डोळ्यात राखून
मायेनं भरला शिदा लेकराचा
लेकरू जायला निघालं
मायेचं उर भरून आलं
सोडाया लेकराला
सारं गाव एक झालं
लेकरू निघूनही गेलं
माय तिथंच थांबली
लेकरू गेल्या वाटेकडं
माय बघतच राह्यली
दिस असंच हो गेलं
माय खंगावत गेली
निरोप धाडा लेकराला
माय असं म्हणू लागली
लेकराचा आला हो सांगावा
नको करू माय घाई
तुला जवळ गाव सारा
मी लवकर येईन
कित्ती धाडावा निरोप
लेकरू येईनास झालं
आता माय म्हणांया लागली…
लेकरू परदेशाच हो झालं
मी ह्याला उगीच मोठं केलं
दिस असच हो गेलं
माय खाटाला लागली
नीट दिसेनासं झालं
नस थांबाया लागली
पुन्हा धाडला निरोप
माय शेवटाला आली
कधी भेटणार नाही
कर लेकरा तु घाई
लेकरू धावतच आलं
मायेला कुशीत घेतली
बघितलं मायेनं लेकराला..
रहा सांभाळून लेका म्हणत
माय लेकराच्या कुशीत थंड झाली
माय कुशीत लेकराच्या….माझी माss य.. ये माझी माय
त्यानं फोडला हंबरडा
जवळ आहे माय आता
पण उशीर झाला होता
माय असूनही कुशीत
मायेच्या प्रेमाला मुकला होता
म्हणून म्हणतो..
गगनात फिरावे…
आकाशाशी बोलावे..
यशस्वी व्हावे…
पण फिरूनी
मायेच्या कुशीत
माय असतानाच यावे..
माय असतानाच यावे..

– रचना : मनोज कुलकर्णी. धर्माबाद, जिल्हा (नांदेड)
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800