नमस्कार 🙏
“ओठावरलं गाणं” या सदरात सर्व रसिक श्रोत्यांचं मन: पूर्वक स्वागत. जनकवी पी सावळाराम, राजा बढे, मंगेश पाडगावकर, वसंत बापट यांच्याप्रमाणेच सुंदर सुंदर गाणी ज्यांनी दिली, त्यामधे कवयित्री वंदना विटणकर यांचंही नाव घ्यावं लागेल. आज पाहू या ज्येष्ठ कवयित्री वंदना विटणकर यांनी लिहिलेलं एक विरह गीत ज्याचे शब्द आहेत –
अंतरंगी रंगलेले गीत झाले पोरके
दु:ख माझे हे मुके
दोन मनांच्या अंतर्मनाचं मीलन म्हणजे यशस्वी प्रेमाची पोचपावती अशी साधी, सोपी व्याख्या असली तरी बरेच वेळा यशाच्या शिखरावर जाणाऱ्या या दोन प्रेमिकांपैकी एकजण कोणीतरी प्रेमाच्या या आणाभाका विसरून दुसऱ्या व्यक्तीला प्रेमभंगाच्या खोल दरीत ढकलून युगानुयुगासाठी हाती घेतलेला हात सोडून निघून जातो. गाण्यातील या तरूणीच्या बाबतीतही असाच काहीसा प्रकार घडला असावा. म्हणूनच ती म्हणते आहे कि इतके दिवस तुझ्या आश्वासक साथीने मनात रूजलेलं हे प्रितीचं झाड मधेच वठल्यासारखं झालं आहे. सुरात रंगलेलं हे प्रितीचं गाणं आज अचानकपणे पोरकं झालंय. मात्र माझं हे दुःख या जगापासून लपवून ठेवावं लागत आहे. कितीही भळभळती जखम झाली असली तरी ते दु:ख मला जगापासून लपवून ठेवावं लागतं आहे आणि ते मुकाट्याने हूं का चूं न करता मला एकटीला भोगावं लागतं आहे, कुणालाही ते शेअर करता येत नाही.
बहरलेल्या मीलनाचे सूर होते लागले
चित्र मोहक नंदनाचे लोचनांनी पाहिले
उघडता परी नेत्र केवळ भोवती दाटे धुके
रोज रोज होणाऱ्या आपल्या भेटी गाठी, लटकी भांडणं, तुला यायला उशीर झाला कि माझं तुझ्यावर खोटं खोटं रागावणं आणि मला आलेला राग घालवण्यासाठी तू कधी अगोदरच माझ्यासाठी घेऊन आलेला गजरा हळूच पुढे करणं, गजरा नसेल तेंव्हा मला मिठीत घेऊन माझी समजूत घालणं, हे सारं काही माझ्या इतकं अंगवळणी पडत चाललं होतं की या मनोमीलनाचं स्वप्न प्रत्यक्षात येणार आणि इंद्राचं नंदनवन म्हणजेच स्वर्ग माझ्यापासून काही अंतरावर आहे असं वाटून मी डोळे उघडले आणि समोरच्या दाट धुक्यात ते तरल स्वप्न पूर्ण विरघळून गेलं.
बंध सारे तोडूनी मी घेतली होती उडी
अमृताने नाहली रे उत्सवाची ती घडी
त्या स्मृतींचा कैफ लेवूनी आज हसती हुंदके
प्रेमाच्या या राज्यात तूच मला हाताला धरून घेऊन गेलास आणि मागचा पुढचा काही एक विचार न करता, जग काय म्हणेल याची पर्वा न करता, केवळ तुझ्यावर विश्वास ठेवून या प्रीतसागरात उडी घेतली होती. त्यावेळेस मात्र तो एक क्षण म्हणजे मला आयुष्यातील परमोच्च सुखाचा वाटला होता. जणु काही काही प्रेमाच्या अमृतधारांच्या वर्षावाने हा देह चिंब भिजला होता. तो आठवणींचा कैफ आजही या मनाला धुंदफुंद करतो आहे आणि या आठवणीमुळे प्रेमभंगाचं दु:ख हलकं होऊन हुंदके देतानाही मला हसू येतं आहे.
तव स्मृतींचा कोष बसला विश्व माझे व्यापुनी
सहज तू गेलास अदया सर्व धागे जोडूनी
क्षणभरी उमलून फुलते स्वप्न नवथर लाडके
तू जरी आता मला विसरून गेला असलास, माझ्यापासून दूर निघून गेला असलास तरीसुद्धा आपल्या भेटी आणि सहवासाच्या कित्येक आठवणींचा स्मृतिकोष आता माझं अवघं विश्व व्यापून राहिला आहे. तू मात्र जणू काही घडलंच नाही, असं भासवत अगदी लिलया एखाद्या शिकाऱ्यानं पारध करून निघून जावं इतक्या सहजतेने सर्व पाश तोडून निघून गेलास. पण तुझ्या आठवणींच्या कोषात मी इतकी गुरफटून गेले कि आपण दोघांनीही रंगवलेलं सुखी संसाराचं गोड स्वप्न पुन्हा एकदा डोळ्यासमोर येऊन हुलकावणी देऊन गेलं.
वंचनेची यातना रे दे मला तू लाखदा
मजवरी केलीस प्रीती सांग हे परि एकदा
क्षण सुखाच्या मोहराचे फिरून होतील बोलके
तू माझ्या प्रेमाची वंचना करून आणि मला प्रेमभंगाच्या खाईत लोटून निर्दयपणे माझ्यापासून अगदी सहजपणे दूर झालास. तू लाख वेळा जरी मला ही प्रेमभंगाची शिक्षा देवून माझी वंचना केलीस तरीही मला चालेल पण फक्त एकदाच मला सांग कि तू माझ्यावर मनापासून प्रेम केलंस म्हणून…..बस्स तेवढं मला पुरेसं आहे. तुझ्या या कबुलीमुळे तुझ्या संगतीत घालवलेले सोनेरी सुखाचे क्षण पुन्हा एकदा मोहरून बोलके होतील.
ज्येष्ठ संगीतकार अनिल मोहिले यांनी गाण्यातील भाव अचूकपणे ओळखून संगीतबद्ध केलेलं हे गाणं गाताना कृष्णा कल्ले यांनीही आपल्या आवाजातून तेच भाव आपल्यापर्यंत पोचवले आहेत.

– लेखन : विकास मधुसूदन भावे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800