शिकागोतील फॅशन आऊटलेटस् माॅल आणि हायफाय पंडीत
अमेरिकेतील एक वैशिष्ट्य सांगायचे म्हणजे प्रत्येक गोष्टीतील अति भव्यता ! भव्यतेच्या ध्यासातूनच त्यांनी
मोठमोठ्या संस्था उभारून आपले वैभव जगापुढे ठेवले आहे.
आज राहुलने आम्हाला त्याच्या बफेलो ग्रोव्हच्या घरापासून 65 कि.मी.दूर असलेल्या शिकागोतील फॅशन आऊटलेट माॅल मध्ये काही खरेदी साठी, विशेषत: कपडे घेण्यासाठी नेले. हे अंतर आम्ही पंचेचाळीस मिनिटात पूर्ण केले. जाताना सुंदर इमारती, त्या ठिकाणी पाणी अडवा आणि पाणी जिरवा यासाठी निर्माण केलेले तलाव, हरितभरीत हिरवळीवर कलात्मक रित्या लावलेल्या फुलांचे ताटवे, हे पाहात गेल्याने थोडा उशीरच झाला होता.
या फॅशन आऊटलेट माॅल ची निर्मिती वीस वर्षांपूर्वी करण्यात आली. शिकागो परिसरात बांधण्यात आलेला हा पहिला परिपूर्ण डिझायनर आऊटलेट माॅल आहे. या ठिकाणी 130 प्रकारची निरनिराळी स्टोअर्स आहेत ती सुध्दा खुप मोठ्या साईजची. यावरून तुम्ही या माॅलच्या भव्यतेची, विशालतेची कल्पना करू शकता. या माॅल साठी 5,30,000 चौरस फूट जागेचा वापर करण्यात आला आहे. सारी रचना वास्तुविशारदानी आपले सारे कौशल्य पणाला लावून कलात्मक पणे केली आहे.
सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 7 पर्यंत हा माॅल उघडा असतो. करोनाच्या काळात येथील वेळेत खुपच कपात केलेली आहे. हा माॅल टी.एस.ए.या कंपनी प्रमाणित द्वारा चालविण्यात येतो.
उषाने तिच्या आवडीनुसार लेडीज गारमेंटसची, तर माझ्यासाठी राहुलने गरम जॅकेट, चेतन करीता टी शर्ट घेतले. इतर विभागात जाईपर्यंत वेळ संपल्याने सर्व स्टोअर्स धडाधड बंदही झाले.
येथे स्थानिक कलाकारांच्या कलात्मक वस्तुचा, त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय कलाकारांच्या कलाकृती, पेंटींग्ज, फॅशन संबंधित बाबींचे प्रदर्शने आयोजित केले जातात. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळतो. येथे ललनांचे फॅशन शो, तसेच संगीताचे कर्णमधुर कार्यक्रमही आयोजित केले जातात.
हा फॅशन आऊटलेट माॅल ओहारे आंतरराष्ट्रीय विमानतळापासून फक्त पंधरा मिनिटाच्या अंतरावर आहे. तेथून डाऊन टाऊन मध्ये जाण्यासाठी नियमित शटल सेवाही उपलब्ध आहे.
या आऊटलेट माॅल मध्ये प्रत्येक स्टोअर्स मध्ये कोणत्या प्रकाराची मटेरियल मिळते. त्याची व्यवस्थित माहिती दिलेली असते. ह्या संपुर्ण माॅलच्या स्टोअर्सना भेट देण्यास किती दिवस लागतील याचा हिशोब करीतच आम्ही तेथून बाहेर पडलो.
अमेरिकेत हिंदु मंदिरांची काहीच कमतरता नाही. येथील शाभ्मर्क एरियात मराठी लोकांची, त्यापेक्षाही गुजरातींचीही संख्या जास्तच आहे. येथील पटेल स्टोअर्स मध्ये सर्वच गोष्टी उपलब्ध होतात. पुजेचे साहित्य, नारळ, सुपारी ते ग्रोसरी, सणानुसार लागणारे भारतीय परंपरेनुसार ड्रेस इतकेच काय नलींचे साड्यांचे दुकानही तेथे आहे. आपण मुंबईतल्या गुजर बहुल भागातच आहोत असेच फिलिंग येते.
येथील हनुमान मंदिर प्रसिद्ध आहे. हनुमानाची उंच मुर्ती विशेष आकर्षण आहे. तशी अनेक मंदिराची रेलचेल आजूबाजूलाच आहे. याठिकाणी एक तरुण जोडपे भेटले. त्यांनी हात जोडून नमस्कार केला. कोणत्या धार्मिक विधी साठी पंडीत हवाय याची चौकशी केली. मला ते एकदम इंटरेस्टिंग वाटले. त्यांनी हातामध्ये त्याचे व्हिजिटिंग कार्ड ठेवले.
या कार्डमध्ये नामकरण, शाॅवरबाथ, सत्यनारायण कथा, वास्तुशांती, नवग्रह शांती, वास्तुदोष निवारण, जन्मकुंडली, सर्व प्रकारचे मुहूर्त, लग्न गुणतालिका जुळते कि नाही ? नसल्यास त्यावरील उपाय योजना, लग्न विधीचे सर्व प्रकार, लग्न लावणे, त्यानंतर मृत्यू संबंधित सर्व विधी आणि जोडीला ज्योतिष शास्त्राचा तो अभ्यासक असल्याने प्रत्येक अडचणीवरील मार्गदर्शकही होता. एका माणसाच्या अंगी किती गुणवत्ता ठासून भरली होती ? मी त्याने दिलेल्या कार्डकडे आणि त्याच्याकडे आळीपाळीने सस्मित नजरेने पाहात होतो. अधिक चौकशी अंती तो आणि त्याची सहाय्यक धर्मपत्नी दोन्ही उच्च विद्याविभूषित, शिकागोतील आय.टी.सेल मध्ये काम करीत होते.
तिशी, पस्तीशी मधील जोडपे होते. येथे धार्मिक विधी पार्टटाईम लोकसेवा भावनेतून भरपूर अमेरिकेन डाॅलर घेऊन ते दोघेजण करीत होते. असे अनेक पंडीत तेथे उपलब्ध होते. लोक नवीन कार घेतली कि तिला सुरक्षतेची कवचकुंडले अमेरिकेतील देवांकडून घालायला उत्साहाने येत होती. हे ऐकून आणि पाहून “मेरा भारत महान” याची प्रचिती मला तात्काळ आली. हे उच्च श्रेणीतील पंडीत गुजरातच्या अहमदाबाद मधील होते. असो.
जाता जाता आम्ही स्वामीनारायण मंदिर पाहाण्यास जाणार होतो. ते पण भव्यदिव्य मंदिर आहे. स्वामीनारायण मंदिरे निटनेटकी, भव्य असतात आणि त्यांचे व्यवस्थापनही उत्तम असते. पण वेळेअभावी ते शक्य झाले नाही.
क्रमशः

– लेखन : डाॅ.भास्कर धाटावकर
निवृत्त पुराभिलेख संचालक. महाराष्ट्र शासन
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800