“रक्तदान हे जीवनदान” हे ब्रीद पुणे येथील सामाजिक कार्यकर्ते मदन लाठी यांनी प्रत्यक्षात कृती करून दाखवून दिले आहे.
श्री लाठी यांनी पहिले रक्तदान 1983 साली त्यांच्या महाविद्यालयाच्या एन एस एस कॅम्प मध्ये केले. अगोदर त्यांची घाबरणूक झाली होती. परंतु ती घाबरणूक त्यांनी त्याच दिवशी घालवून संकल्प केला की संधी मिळेल तेव्हा आणि रक्तदान करीत राहु.
पण नोकरी निमित्ताने ग्रामीण भागात रहावे लागल्याने ते काही वर्षे रक्तदान करू शकले नाहीत. मात्र
2001 नंतर त्यांच्या रक्तदानास नियमित सुरुवात झाली. जळगाव, शिर्डी, नागपूर आदी ठिकाणी त्यांनी रक्तदान केले. पुढे पुणे निवासी झाल्यावर ते रक्तदान करीत आहेत.
14 जून 2019 रोजी रक्तदाता दिनी तत्कालीन केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी त्यांचे कौतुक करून “लोकांना रक्तदानासाठी प्रवृत्त करीत चला” असा संदेश दिला.
लॉकडाऊनच्या काळातही ते रक्तदान करीत राहिले. सप्टेंबर 20 मध्ये लाठी दांपत्य करोना पॉझिटिव्ह झाले. त्यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या जिजामाता रुग्णालयात भरती करण्यात आले. त्याचवेळी त्यांनी संकल्प केला की आपण जर जगलो तर प्लाजमा दान करून लोकांना जीवनदान देऊ. त्यामुळे बरे झाल्यावर त्यांनी पहिला प्लाजमा 7 नोव्हेंबर 2020 रोजी देऊन पुढे वेळोवेळी तो दिला.
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार दर तीन महिन्यांनी किंवा प्रसंग परत्वे ते रक्तदान करीत असतात. या त्यांच्या थोर कार्याबद्दल त्यांचा अनेक ठिकाणी सत्कार झाला आहे.
श्री लाठी यांची दुसरी ओळख म्हणजे, त्यांना ज्या ज्या व्यक्तींचे संपर्क क्रमांक मिळतात, त्यांचे ते शक्य असल्यास समक्ष भेटून किंवा विविध माध्यमातून वाढ दिवस, पदोन्नती, अन्य काही यश, अशा प्रसंगी शुभेच्छा देऊन त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. त्यांचे जीवन हाच सर्वांसाठी एक संदेश आहे.

– लेखन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800