चित्रपट सृष्टीतील थोर कलाकारांच्या कले बरोबरच त्यांच्या माणूसपणाची माहिती देणाऱ्या डॉ. राजू पाटोदकर लिखित ‘चंदेरी सितारे’ या पुस्तकाचे नुकतेच पुणे येथे शानदार प्रकाशन झाले.
रंगभूमी व्यावसायिकदृष्ट्या लोकप्रिय होण्यास रंगभूमीचे स्टार निर्माण व्हावेत त्यामुळे रंगभूमी अधिक समृद्ध होईल, असे प्रतिपादन ज्येष्ठ चित्रपट नाट्य कलावंत अंजन श्रीवास्तव यांनी या पुस्तकाचे प्रकाशन करताना केले. समारंभाच्या अध्यक्षस्थानी चित्रपट समीक्षक श्रीनिवास बेलसरे तर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ निवेदक सुधीर गाडगीळ, पुणे पत्रकार संघाचे अध्यक्ष स्वप्नील बापट, नावीन्य प्रकाशनचे नितीन खैरे होते.
चित्रपट सृष्टी तसेच पत्रकारितेच्या आठवणी जागवताना अंजन श्रीवास्तव म्हणाले, प्रेक्षकांमुळे कलावंतांना ओळख मिळते. रंगमंच एक अशी बाब आहे जिथे नक्कीच आपली ओळख निर्माण होते. अशा यशस्वी कलावंतांवर ‘चंदेरी सितारे’ सारखी पुस्तके प्रकाशित व्हावीत असेही ते म्हणाले. हे पुस्तक हिंदी भाषेतही प्रकाशित व्हावे, अशी सूचना करुन पुस्तकास शुभेच्छा दिल्या.
सुधीर गाडगीळ यावेळी बोलताना म्हणाले, ‘चंदेरी सितारे’ या पुस्तकाचे लेखक तथा पुणे विभागाचे माहिती उपसंचालक डॉ. राजू पाटोदकर यांनी आपली प्रारंभीची पत्रकारिता प्रामुख्याने सिनेक्षेत्रात केली. सिनेपत्रकारिता करतांना त्यांनी अनेक कलाकारांच्या मुलाखती घेतल्या. महान अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातील सामाजिक आशयावर त्यांनी पीएचडी केली. ही महत्वाची बाब आहे, असेही त्यांनी सांगितले.
डॉ. पाटोदकर यांनी आपल्या मुलाखतींद्वारे पडद्यावरील कलाकार पडद्याबाहेर काढण्याचे काम केले आणि ते पुस्तकरुपी उतरविले अशा शब्दात श्री. बेलसरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
आपल्या पुस्तकाविषयी बोलताना डॉ. पाटोदकर म्हणाले, पुस्तकात वर्णन केलेल्या 25 पैकी 20 कलावंतांना मी प्रत्यक्ष भेटलेलो असून त्यापैकी काहींबरोबर अभिनयही केलेला आहे. ते कलाकार म्हणून जसे मोठे आहेत त्याप्रमाणेच माणूस म्हणूनही मोठे असल्याचे मी अनुभवले आहे.
या प्रसंगी या पुस्तकाचे प्रकाशक नितीन खैरे, कार्यक्रमाचे सूत्रसंचालक धनंजय कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला निवृत्त माहिती संचालक श्रध्दा बेलसरे, निवृत्त माहिती उपसंचालक वर्षा शेडगे, स्टेज आर्टिस्ट आणि म्युझिशीयन डॉ. गिरीश चरवड, जनसंपर्क तज्ज्ञ भूपेंद्र मुजुमदार, विविध कलावंत, पत्रकार, मान्यवर, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘चंदेरी सितारे’ परिचय
शासकीय अधिकाऱ्याने लिखाणासाठी आपल्या व्यस्त दैनंदिन जबाबदाऱ्यातून वेळ काढणे ही वेगळीच बाब आहे.
डॉ. पाटोदकर यांनी लिहिलेले सिनेसृष्टीतील दिग्गज कलावंतांवर लिहिलेले लेख विविध वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले आहेत. त्यातील निवडक 25 कलाकार, दिग्दर्शकांचे चरित्र या पुस्तकात आहे.
या कलावंतांची स्वभाव वैशिष्ट्ये, संवेदनशीलता, साधेपणा आदींबाबतचे विविध अनुभव आहेत.
दादासाहेब फाळके यांनी ‘राजा हरिश्चंद्र’ या पहिल्या सिनेमाच्या निर्मितीसाठी केलेले अथक प्रयत्न आणि भारतातील चित्रसृष्टीची रोवलेली मुहूर्तमेढ, पहिला सिनेस्टार राजेश खन्ना यांच्या जीवनप्रवासाचे ‘जिंदगी एक सफर है सुहाना’ असे केलेले वर्णन, डॉ. जब्बार पटेल यांची महानता, त्यांचा ‘सिंहासन’ हा चित्रपट आणि त्यातील मुख्यमंत्र्यांची अफलातून भूमिका बजावलेले अरुण सरनाईक, ग्रामीण प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे सहृदयी दादा कोंडके, लोकप्रिय खलनायक ते चरित्र अभिनेता असा प्रवास केलेले प्राण, पडद्यावरील खल नायक पण प्रत्यक्ष जीवनातील मोठे सामाजिक कार्यकर्ते निळू फुले यांच्या निसर्गप्रेमाचे, वनौषधींविषयक ज्ञानाची माहिती असे अनेक किस्से या पुस्तकात वाचायला मिळतील.
– टीम एनएसटी. ☎️ 9869484800
🌹अभिनंदन 🌹