२१ ऑगस्ट या ‘विश्व कविता दिनाचे औचित्य साधून इंदूर येथील पत्र-सारांश प्रतिष्ठान या सांस्कृतिक संस्थेने आयोजित केलेल्या प्रथम ‘कालिदास वृत्त-छंद संवर्धन पुरस्कार उपक्रमाला विविध राज्यांतून तसेच जर्मनी, अमेरिका, कॅनडा येथील नव्या-जुन्या रसिक प्रतिभावंतांनी प्रचंड प्रतिसाद दिला.

महत्त्वाची बाब म्हणजे या उपक्रमात सहभागी झालेल्या एकूणच कविता, वृत्त-छंदांचे गाढे चिंतक, मर्मज्ञ कवी स्वामी श्री. निश्चलानंद यांनी मन:पूर्वक वाचून निकाल दिला तो असा–
प्रथम व एकमेव विजेत्या:
सौ.भारती-बिर्जे- डिग्गीकर, मुंबई. रु.५०००/-
तद्वतच त्यांच्या कवितेच्या जवळपास पोचलेल्या दोघांना श्री.अमेय पंडित, पुणे व सुश्री. हर्षदासुंठणकर, बेळगांव यांना प्रत्येकी रु.१०००/- चा विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला.

विशेष म्हणजे संयोजक श्री श्रीकृष्ण बेडेकर यांचे ७८ वर्षांचे वय लक्षात घेता, त्यांनी कुठलाही जाहीर पुरस्कार वितरण समारंभ आयोजित न करता, पत्र-सारांश प्रतिष्ठानकडून विश्व कविता दिन, रविवार, दि. २१ऑगस्ट २०२२ रोजी पुरस्काराच्या तिन्ही रकमा वरील विजेत्यांच्या बँक खात्यात जमा केल्या आहेत.
या स्पर्धेविषयी श्री बेडेकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, पहिल्याच वर्षी मिळालेला प्रतिसाद पाहून मनोमन खात्रीच पटली की; आपल्या अति प्राचीन वृत्त-छंदात्मक काव्य परंपरेची मुळं आमच्या रक्तात किती खोलवर रुजली आहेत. कारण सर्व दुरून जुन्या विविध वृत्त-छंदांतील भरपूर कविता आल्या.सध्या आधुनिकतेच्या व संकुचिततेपोटी भारतीय कवितेत निपजलेल्या तथाकथित स्व-च्छंदतेच्या झंझावातात सापडून मुळातल्या आशयघन, स्वरचिंब, कर्णमधुर कवितेच्या गळ्याला नख लावण्याचे प्रयत्न पराकोटीला पोचले असताना; प्रतिष्ठानच्या या उपक्रमाच्या माध्यमातून वृत्त-छंदात्मक कवितेला फुटलेली ही पहाट-पालवी पाहता काहींचे हृदय परिवर्तन होऊन, नवनव्या अभ्यासकांची, नवागत कवि-कवयत्रींची तसेच तहानेल्या श्रोत्यांची अभिरुची अधिकच समृध्द होईल.
या वर्षी मिळालेला प्रतिसाद पाहून पुढील वर्षीही हा उपक्रम राबविण्याचा श्री बेडेकर यांचा मनोदय आहे.
– टीम एनएसटी. ☎️ 9869484800
स्तुत्य पुरस्कार 🙏