मराठीचा अभिमान बाळगणाऱ्या, जाती निर्मूलन, स्त्री पुरुष समानता आदी बाबींचा पुरस्कार केलेल्या सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी यांच्या अष्टशताब्दी जन्म वर्षा निमित्ताने आज, २९ ऑगस्ट पासून ३१ ऑगस्ट पर्यंत अखिल भारतीय महानुभाव साहित्य संमेलन नाशिक येथे होत आहे. या तिन्ही दिवशी भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
या निमित्ताने मराठी विद्यापीठ स्थापनेचे महत्व विशद करणारा विशेष लेख….
महानुभावांनी ८०० वर्षांपूर्वी मराठीला राजसिंहासनावर बसविले. मराठीचा आद्यग्रंथ ‘लीळाचरित्र’ आणि आद्यपद्य ‘धवळे’ निर्मितीचा मान महानुभावांकडे आहे.
हे साहित्य श्रीक्षेत्र रिद्धपूर ता. मोर्शी, जि. अमरावती येथे निर्माण झाले. प्राचीन, ऐतिहासिक, पौराणिक आणि खऱ्या अर्थाने मराठी साहित्याची ‘गंगोत्री’ रिद्धपूर ठरते. अष्टशताब्दी निमित्त या नगरीत ‘मराठी विद्यापीठ’ स्थापन करून अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याचा मार्ग सुकर करण्यासाठी ही अतिशय योग्य वेळ आहे.

विद्यापीठांची परंपरा :
महाराष्ट्रातील विद्यापीठांची परंपरा इ.स. १८५७ पासून अस्तित्त्वात आहे. मुंबई विद्यापीठाच्या स्थापनेपासून उच्च शिक्षणाची सुरुवात महाराष्ट्रात झाली. इ.स. १९२३ ला नागपूर विद्यापीठ, इ.स. १९४८ ला पुणे विद्यापीठ तर मराठवाडा विद्यापीठ इ.स. १९५६ मध्ये स्थापन झाले.
सुमारे ८० वर्षांपासून मराठी विद्यापीठाची मागणी सुरू आहे. पुणे विद्यापीठ निर्मितीवेळी इतिहास संशोधक, कुलगुरू दत्तो वामन पोतदार यांनी मराठी विद्यापीठाची भावना व्यक्त केली होती.
विद्यापीठ शिक्षण आयोग :
भारत सरकारने डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या विद्यापीठ शिक्षण आयोगाने (१९४८-४९) उच्च शिक्षणासाठी माध्यम भाषा म्हणून स्थानिक भाषांची निवड करू द्यावी, अशी शिफारस केली होती. नंतर वेगवेगळ्या राज्यांत त्या-त्या भाषेचे संवर्धन करण्यासाठी स्वतंत्र विद्यापीठांची स्थापना झाली.
दक्षिणेतील विद्यापीठांत स्वभाषा :
इंग्रजीच्या अतिप्रेमाने स्व-संस्कृतीचा विध्वंस होतो आहे, हे तामिळनाडूने ओळखले. तामिळ भाषा जपूण ज्ञानसंपन्न व आधुनिक करण्यासाठी निर्णायक पावले उचलली. तामिळला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त करून घेतला. मग तामिळ व्यतिरिक्त इंग्रजीसह अन्य भाषांच्या माध्यमांच्या शाळांमध्ये तामिळ ही पहिली भाषा म्हणून इयत्ता पहिली ते दहावी सक्तीने शिकवण्याचा कायदा केला.
तामिळच्या सर्वांगीण उन्नतीसाठी १९८१ ला ‘तामिळ भाषा विद्यापीठ’ तंजावरला, आंध्रने १९८५ ला ‘तेलुगू विद्यापीठ’ तर कर्नाटकाने हम्पी येथे १९९१ साली ‘कन्नड विद्यापीठ’ स्थापले. आपल्या राज्यात १९९७ मधे रामटेक येथे ‘संस्कृत विद्यापीठ’ तर वर्धा येथे ‘हिंदी विद्यापीठ’ झाले. लहानशा केरळने २०१२ ला ‘मल्याळी विद्यापीठ’ निर्माण केले.
राजकीय व आर्थिक बळ उभारून भाषिक अस्मितेची जोड देत ही विद्यापीठे अल्पावधीत विकसित झाली. आज सर्व क्षेत्रात दक्षिणेतील राज्ये अग्रणी आहेत. त्यामागे स्वभाषा पारंगतता हेही एक प्रमुख कारण आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे.
मराठी विद्यापीठाची मागणी फार जुनी :
मराठी विद्यापीठाची मागणी ८० वर्षांपूर्वी झालेल्या साहित्य संमेलनातून करण्यात आली होती. त्यानंतर २००६ ला सोलापूर, २००७ नागपूर, पुणे, २००९ ला महाबळेश्वर, सांगली, चंद्रपूर, ठाणे, घुमान यासह विश्व साहित्य संमेलनात अमेरिका, युरोप, सिंगापूर आणि ५ सप्टेंबर २०१५ रोजी अंदमान येथेही ही मागणी केल्या गेली. जगभर पोहोचलेल्या मराठी भाषेचे स्वतंत्र विद्यापीठ नसावे, ही मोठी शोकांतिका आहे.
समितीच्या मसुद्यात उल्लेख :
राज्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त १० ऑगष्ट २००९ रोजी सांस्कृतिक धोरण समिती गठीत करण्यात आली होती. मराठी भाषेचा विकास आणि संवर्धनासाठी ही समिती होती. भाषाविषयक धोरणासाठी डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या अध्यक्षतेखाली भाषा सल्लागार समिती आहे. समितीने २०१४ ला मसुदा राज्यासमोर ठेवला आहे. त्यात मराठी भाषा विद्यापीठाची आवश्यकता असल्याचे प्रस्तावित मसुद्यात नमूद केलेे.
जागतिकीकरणाचे मराठी भाषेवरील परिणाम, भविष्यातील आव्हाने यांना सामोरे जाण्यासाठी विद्यापीठ स्थापन होणे महत्त्वपूर्ण आहे. विद्यापीठाचे काम चार प्रकारे अपेक्षित असून, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक समावेश आहे. विद्यापीठाचा कारभार मराठीत देवनागरी लिपीत करण्याचे स्पष्ट केले. मराठी भाषकांसाठी रोजगार निर्मिती करू शकतील, असे अभ्यासक्रम असावेत.
मराठी विद्यापीठ असे असावे :
मराठी विद्यापीठ हे मूलतः उच्च संशोधन, भाषाशास्त्राचा सखोल अभ्यास करणारे व ज्ञान-रोजगाराची भाषा करण्यासाठी कार्यक्रमावर भर देणारे विद्यापीठ असावे.
ते कसे असावे वा असेल हे गेली तीस वर्षे कार्यरत व निरंतर प्रगतिपथावर असणाऱ्या तामिळ विद्यापीठाच्या उदाहरणाने स्पष्ट करता येईल. सदर विद्यापीठात कला, पांडुलिपी विज्ञान, तामिळ विकास, विज्ञान आणि भाषा असे विभाग आहेत. त्यातील तामिळ विकास विभाग पाहिला तर सामाजिक शास्त्रे व विज्ञान विषयाचे अध्ययन व अध्यापन तामिळ भाषेत व्हावे, यासाठी तो निर्माण झाला आहे.
विज्ञान शाखेत उद्योग व भूगर्भ शास्त्र, संगणक शास्त्र, स्थापत्य शास्त्र आणि पर्यावरण शास्त्र विभाग असे अनेक विभाग आहेत. म्हणजेच विज्ञान विभागाचे शिक्षण तामीळ भाषेत व्हावे हे या विद्यापीठाचे प्रमुख ध्येय आहे.
मल्याळी विद्यापीठाने विज्ञान,तंत्रज्ञान, मानव्यशास्त्र, सामाजिक शास्त्रे आदींचे पदव्युत्तर शिक्षण मल्याळीमध्ये देण्याचे प्रमुख उद्दिष्ट नि:संदिग्ध नमूद केले आहे.
थोडक्यात, इंग्रजीसोबत आपल्या राज्याच्या भाषेत सर्व शाखांचे शिक्षण देण्यासाठी व सक्षम पर्याय निर्माण करण्यासाठी ही विद्यापीठे निर्माण झाली. वैज्ञानिक संकल्पनांचे आकलन मातृभाषेत अधिक नेमके व सहजतेने होते, हे सर्वमान्य आहे.
मातृभाषेतच उच्चशिक्षण :
आपले भाषिक धोरण, उत्तम इंग्रजीसह आपली मातृभाषा, असेच असले पाहिजे. उद्या नजीकच्या भविष्यात ज्यांना इंग्रजी माध्यमांच्या शाळेत विविध कारणांमुळे शिक्षण घेता येत नाही किंवा इंग्रजी जड जाते, त्यांना विज्ञान, वाणिज्य, विधी, व्यवस्थापन, वैद्यक व अभियांत्रिकी असे सर्व अभ्यासक्रम मातृभाषेत शिकायचा पर्याय ही भाषिक विद्यापीठामुळे मिळणार आहे.
मराठी विद्यापीठ हे सर्व शाखांचे उच्च शिक्षण व संशोधन मराठीत ऐच्छिक पद्धतीने उपलब्ध करून देईल. ज्यांना इंग्रजी शिक्षणाची संधी आर्थिक व सामाजिक कारणामुळे मिळाली नाही त्यांनाही इंग्रजीचा अडसर पार करून आपल्या मायमराठीत पदव्युत्तर स्तरापर्यंत दर्जेदारपणे शिकता येईल व संशोधनही करता येईल.
त्याच बरोबर मराठी समृद्ध करणे, अनुवाद केंद्राच्या माध्यमातून जगातील अधिकाधिक भाषांमधले साहित्य व विज्ञान- तत्त्वज्ञानादी साहित्य आणणे, मराठीचे साहित्य व संशोधन हिंदी, इंग्रजीसह विविध भारतीय व परकीय भाषेत नेणे, लोकसाहित्य, लोक कला व बोली भाषा अभ्यास, प्राचीन ज्ञानाचे संशोधन असे अनेक उपक्रम प्रस्तावित मराठी विद्यापीठ राबवू शकेल.
आद्यग्रंथ निर्मितीस्थळी व्हावे विद्यापीठ :
मराठी भाषेतील आद्यग्रंथ ‘लीळाचरित्र’ लिखाणस्थळ वाजेश्वरी स्थान रिद्धपुरात आहे. महानुभाव पंथाचे संस्थापक सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींचे शिष्य पं. श्रीम्हाइंभट्ट, श्रीनागदेवाचार्य यांनी येथे लिहिला. केशिराजबासांनी पंथाचा विचार पुढे नेला. त्याचदरम्यान सिद्धांतसुत्रे, सूत्रपाठ, दृष्टांत, प्रमेय-ग्रंथ अशी ग्रंथसंपदा निर्माण झाली.
आद्य कवयित्री महदाईसांंनी ‘धवळे’ रचले. शिशूपाल वध, रुक्मिणी स्वयंवर या काव्यरचानाही रचल्या. म्हणून मराठीची ‘गंगोत्री’ रिद्धपूर संबोधल्या जाते.
अष्टशताब्दी अवतरणदिनाच्या निमित्ताने संधी :
मराठी भाषेचे विद्यापीठ अजुनही स्थापन होऊ शकले नाही, ही उणीव भरून काढण्यासाठी विद्यापीठ’ निर्मितीची घोषणा व्हावी, अशी अपेक्षा तमाम मराठीप्रेमी बाळगुण आहेत. सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी यांचे हे अष्टशताब्दी वर्ष आहे. त्यानिमित्ताने
शासनाने रिद्धपूर येथे मराठी विद्यापीठ निर्मितीस मंजुरी द्यावी. आपली मराठीबद्दलची आस्था पाहता, अशी आशा बाळगायला तूर्ततरी काही हरकत दिसत नाही.
– लेखन : हरिहर पांडे. नागपूर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
