तेरे बिना ज़िंदगी से कोई…
गीत : तेरे बिना ज़िंदगी से कोई
चित्रपट : आंधी (१९७५)
दिग्दर्शन : गुलज़ार
गीतकार : गुलज़ार
संगीतकार : आर. डी. बर्मन
कलाकार : सुचित्रा सेन, संजीव कुमार
गायक : लता मंगेशकर आणि किशोर कुमार
आजचे मला भावलेले गाणे हे माझ्या काही सर्वात आवडत्या गाण्यांपैकी एक आहे, “तेरे बिना ज़िंदगी से कोई शिकवा तो नहीं.” (https://youtu.be/8-HnmVg0-O8)
“आँधी” मधील हे गाणे आपल्याला काही मिनिटात या सिनेमाची पूर्ण झलक दाखवून जाते. सबकुछ गुलजार असणारा हा चित्रपट आणि त्या हिमनगावरचा सोनेरी मुकूट म्हणजे हे गाणे !
माझ्या एका मैत्रिणीची फर्माईश होती की या सिनेमातल्या एका तरी गाण्यावर मी लिहावे ! सगळीच गाणी खूप आवडती आणि वेगवेगळ्या कारणासाठी भावलेली ! त्यामुळे या चित्रपटातील एक गाणे निवडणे खूप अवघड !
माझ्यासारखेच तुमचेही होत असेल ना ? अर्थात्, या चित्रपटातील गाणी न आवडणारी व्यक्ती मी आजतागायत पाहिलेली नाही, हे ही तितकेच खरे !
गुलजार यांचे कुशल दिग्दर्शन, सुचित्रा सेन-संजीव कुमार यांचा सशक्त अभिनय, गुलजारच्या कवितांची जादू, आर.डी. बर्मन यांनी रचलेल्या जबरदस्त गाण्यांच्या साउंड ट्रॅकसाठी आंधी आजही लक्षात आहे. चारच गाणी आहेत, त्यातली तीन क्लासिक गाणी !
लता दीदी-किशोरदा यांच्या आवाजातले हे द्वंद्व गीत जितके संजीव कुमार-सुचित्रा सेनचे आहे तितकेच ते या दोन गायकांचेही आहे. जेव्हा गीताचे शब्द आपल्या कानांवर पडत असतात तेव्हा समोर जरी अभिनेते असले तरी लता-किशोर यांचे अस्तित्व जाणवल्या वाचून राहत नाही. निदान माझा तरी हा अनुभव आहे.
काही गाणी अशी असतात की आपण अभिनयात इतके बुडून जातो की कोण गात आहे, कोण संगीतकार, कोण गीतकार, सगळ्याचा विसर पडतो. आणि काही गाणी या गाण्यासारखी असतात जिथे गायक, गायिका, गीतकार, संगीतकार, कोणाचाही विसर पडत नाही. आणि त्याच वेळी समोरचा सशक्त अभिनय तुम्हाला तिथे पूर्णपणे खिळवून ठेवतो. अशी क्लासिक गाणी once in a lifetime घडत असतात!
लता-किशोर यांचे युगुलगीत म्हणजे खाणीतून काढलेले एक रत्न असते ! आणि विशेषतः “तेरे बिना जिंदगी से कोई” हे गाणे खेद व हरवलेल्या प्रेमाची कोमल तितकीच उत्कट अभिव्यक्ती आहे. कोणत्याही भारदस्त शब्द संग्रहाविना हे गाणे तुम्हाला थेट प्रश्न करते: तुमचे ज्याच्यावर प्रेम आहे त्याशिवाय जगणे याला जीवन मानले जाऊ शकते का ? महत्त्वाकांक्षा की कौटुंबिक सुख ? दोन्ही एकत्र मिळू शकेल का ? इथे कोणतीही बाजू न घेता फक्त या प्रश्नाचे अनेक कंगोरे उलगडून दाखवले आहेत.
भारदस्त आहे तो अभिनय, संजीव कुमार आणि सुचित्रा सेन यांचा. संजीव कुमार सारख्या तगड्या अभिनेत्याला तितक्याच ताकदीने टक्कर देत, सुचित्रा सेन यांचा काकणभर सरसच अभिनय या चित्रपटात, खास करून या गाण्यात आपल्याला बघायला मिळतो.
संजीव कुमारना या चित्रपटासाठी फिल्मफेअर सर्वश्रेष्ठ अभिनेता पुरस्कार प्राप्त झाला होता तर सुचित्रा सेन यांना फिल्मफेअर सर्वश्रेष्ठ अभिनेत्री पुरस्कार मिळाला होता.
६ एप्रिल १९३१ रोजी अविभक्त बंगाल प्रांतातील पाभना जिल्ह्यात [जो सध्या बांगला देशात विलीन झाला आहे] हेडमास्तर असलेले वडील दासगुप्ता यांच्या घराण्यात जन्माला आलेली ही “रमा” पुढे लग्नानंतर “सुचित्रा सेन” बनली आणि त्यानंतरच तिने बंगाली चित्रपटातून काम करण्यास सुरुवात केली आणि बंगाली सिनेसृष्टी काबीज केली. त्यांनी ६० पैकी ३० चित्रपट, बंगाली चित्रपटाचे सर्वात आघाडीचे अभिनेता उत्तम कुमार यांच्यासोबत केले. त्यांचे बहुतांशी चित्रपट भावना प्रधान होते.
सुचित्रा सेनचा आँधी हा चित्रपट सोबतीला संजीवकुमारसारखा चतुरस्त्र अभिनेता असल्याने साऱ्या भारतात गाजला….. पण ’आंधी’ हा त्यांचा शेवटचा हिंदी चित्रपट ठरला. आंधीच्या अगोदरच त्यांचे पती, आदीनाथ सेन यांचे अमेरिकेत निधन झाले होते. दुर्दैवाने विवाहानंतर केवळ चार वर्षातच दोघे वेगळे झाले होते. त्यानंतर त्या एकट्याच राहात होत्या. एकुलती एक मुलगी, मुनमुन सेन स्वतंत्र आयुष्य जगत होती. त्यामुळेच की काय सुचित्रा सेन यानाही संसाराची विरक्ती आली असावी आणि “आंधी” नंतर त्यानी केवळ दोनच बंगाली चित्रपट केले व १९७८ मध्ये शांतपणे चंदेरी दुनियेचा निरोप घेतला व स्वत:ला रामकृष्ण मिशनच्या कार्यात गुंतवून घेतले. सार्वजनिक जीवनात त्या कुणालाच “अभिनेत्री” या नात्याने त्यानंतर भेटल्या नाहीत. आजारपणाच्या काळात त्या एकाकीच होत्या. १७ जानेवारी २०१४ ला आधी फुफुसाचा आजार आणि मग हृदयविकाराच्या झटक्याने या महानायिकेचा अंत झाला.
हे वाचल्यावर मला वाटले की इतका एकाकीपणा सोसल्यामुळेच की काय त्यांचा अभिनय वास्तववादी होता. दुःख भोगल्याशिवय जसे एखाद्या कवीच्या लेखणीतून काळजाला ठाव घालणारे काव्य कागदावर उतरत नाही, तसेच काहीसे अभिनयाचेही असावे कदाचित !
तरीही मी म्हणेन सुचित्रा सेन यांच्या सारखे कणखर व्यक्तिमत्त्व सिनेसृष्टीत सापडणार नाही. एका मागोमाग एक हिट्स देणाऱ्या या दिग्गज अभिनेत्रीने ऐन प्रसिद्धीच्या शिखरावर असताना केवळ एक चित्रपट (प्रोणॉय प्राशा) फ्लॉप झाला म्हणून चित्रपटातून असा काही संन्यास घेतला की नंतर, लोकांसमोर येणे नको म्हणून राष्ट्रपतींच्या हस्ते मिळणारा दादासाहेब फाळके पुरस्कार सुद्धा नाकारला ! त्यांनी राज कपूर यांचे व्यक्तिमत्त्व पटत नाही, म्हणून त्यांच्यासोबत चित्रपट करण्यास नकार दिला. इतकी तत्त्वनिष्ठ आणि प्रतिभावान अभिनेत्री संपूर्ण दुनियेत सापडणार नाही !
हिंदी चित्रपट सृष्टीत कृष्ण धवल काळात जे लावण्याचे सोहळे गाजले त्यात सुचित्रा सेन यांचा महत्वाचा चेहरा होता. कॅमेराला भुरळ पाडणारे ते बोलके डोळे केवळ त्या व्यक्तिरेखेच्याच नव्हे तर आपल्याही हृदयाची ठाव घेतात. त्यांच्या अभिनयाचा खरा आविष्कार बंगाली चित्रपटातून झाला असला तरी त्यांनी केलेल्या मोजक्या हिंदी चित्रपटांनीही त्यांच्या अभिनय आणि सौंदर्य स्मृतींचा विसर पडू दिला नाही. सौदर्याला गुढत्वाची किनार लाभली तर ते अधिकच आकर्षक होते, त्याला अभिजातपणाचा स्पर्श होतो. कोलकात्यामधील दुर्गापूजेच्या वेळी मूर्ती घडविणाऱ्यांनी देवीचा चेहरा सुचित्रा सेन यांच्यावर बेतला होता, यावरून त्यांचे तेज लक्षात यावे !
असेच तेजोवलय आँधी या चित्रपटाचे नायक संजीव कुमार यांचे ! हिंदी चित्रपटसृष्टीचा एक अभिनेता ज्याची कामगिरी अतुलनीय होती, पडद्यावरील ज्याची छोटीशी भूमिकाही दमदार असायची, सुपरस्टार दिलीपकुमारही ज्याचे कौतुक करायचे, तो कुणासारखा नव्हता आणि कोणीही त्याच्यासारखा होऊ शकले नाही, असा तो मनाने प्रेमळ, मित्रांचा मित्र, ज्याला प्रेमाने बॉलिवूड म्हणायचे… केम छो हरी भाई…तेच आपले संजीव कुमार !
संजीव कुमार (९ जुलै १९३८ – ६ नोव्हेंबर १९८५) यांना बॉलिवूड हरीभाई म्हणायचे. सूरत मधल्या मध्यम वर्गीय कुटुंबात जन्मलेल्या त्यांचे खरे नाव हरिहर जेठालाल जरीवाला होते. नावाप्रमाणेच देवासारखा दिलदार हा माणूस. शत्रुघ्न सिन्हा आणि यांची घट्ट मैत्री! एकदा शत्रुघ्न सिन्हा यांना १० लाख रुपयांची गरज असताना, संजीव कुमारनी लगेच काढून दिले आणि जमेल तेव्हा परत कर म्हणाले. दुर्दैवाने त्यानंतर काही दिवसातच संजीवजी यांचे अमेरिकेत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
प्रेमाच्या बाबतीत मात्र हा दिलदार माणूस कमनशिबी होता. अनेकदा प्रेमात पडून देखील ते आजन्म अविवाहित राहिले. अमिताभच्या प्रेमात असलेल्या जया भादूरी यांनी त्यांना सेटवरच राखी बांधली तर हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्या येण्याने संजीव कुमार यांचा लग्नाचा प्रस्ताव नाकारला. अभिनेत्री सुलक्षणा पंडित सोबत संजीव यांच्या प्रेमप्रकरणाची चर्चा देखील खूप होती. परंतु संजीव सुलक्षणासोबत लग्न करू शकले नाहीत. संजीव यांच्या मृत्यूनंतर सुलक्षणा डिप्रेशनमध्ये गेल्या होत्या आणि त्यांनी लग्नच केले नाही.
संजीवजींनी लग्न न करण्यामागे एक खास कारण होतं. त्यांच्या कुटुंबातील मोठा मुलगा दहा वर्षांचा झाला की, त्याच्या वडिलांचा मृत्यू होत असे. हा योगायोग होता की अंधश्रद्धा ते ठाऊक नाही. पण संजीव कुमार यांच्या आजोबा आणि वडिलांसोबत तसेच दोन भावांसोबतही हेच घडलं होतं. संजीव कुमार जेव्हा १० वर्षांचं झाले तेव्हा त्यांच्या वडिलांचे निधन झालं. संजीव कुमार यांच्या मनात ही भीती घर करून बसली होती. त्यामुळे त्यांनी लग्न न करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आपल्या मोठ्या भावाच्या मुलाला दत्तक घेतलं, पण हा दत्तक पुत्र १० वर्षांचा होताच, दुर्दैवानं संजीव कुमार यांचाही मृत्यू झाला. मृत्यूची भीती त्यांना कायम छळायची. मी लवकर जाणार, असं ते आपल्या जवळच्यांना नेहमी म्हणत आणि झालंही तसंच. उण्यापुऱ्या वयाच्या ४७ व्या वर्षी ते सर्वांना सोडून गेलेत.
जिथे प्रेमात कमनशिबी होते, तिथे अभिनय क्षेत्रात आणि पुरस्कारात ते आघाडीवर होते.
“नया दोन नयी रात” या चित्रपटासाठी खुद्द दिलीप कुमार यांनी संजीव कुमारच्या नावाची शिफारस केली होती, कारण नऊ रस सादर करण्याची ताकद केवळ त्यांच्यात होती. वयाच्या २० व्या वर्षी त्यांना एका वृद्धाच्या भूमिकेत पाहून दस्तुरखुद्द पृथ्वीराज कपूर थक्क झाले होते ! ११ फिल्मफेअर नॉमिनेशन, ५ फिल्मफेअर अवॉर्ड, अनेकानेक नाट्य-चित्रपट संबंधी अवॉर्ड त्यांना मिळाले होते.
संजीव कुमार आज आपल्यात नसले तरी ते अभिनयाच्या रूपाने कायम चाहत्यांच्या हृदयात आणि आठवणींमध्ये जिवंत आहेत. त्याची साधी शैली आणि सुंदर अभिनय येणाऱ्या प्रत्येक पिढीसाठी आदर्श उदाहरण आहे.
प्रसिद्ध गीतकार गुलजार दिग्दर्शित, आंधी हा चित्रपट १९७५ मध्ये प्रदर्शित झाल्यानंतर बराच वाद निर्माण झाला. आंधी रिलीज झाल्यानंतर लगेचच, पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी जाहीर केलेल्या राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात चित्रपटाच्या नायिकेचे श्रीमती गांधींशी अयोग्य साम्य असल्याच्या कारणास्तव सरकारने “आंधी” वर बंदी घातली होती. काही काळानंतर काही दृश्ये पुनर्चित्रीत करून एका अतिरिक्त दृश्य (ज्यामध्ये नायिका तिच्या वडिलांना सांगते की ती इंदिरा गांधींना आदर्श मानते) समाविष्ट करून तो रिलिझ केला गेला.

हिंदी लेखक कमलेश्वर यांच्या काली आंधी नावाच्या कादंबरीपासून प्रेरणा घेऊन, आंधी (१९७५) हा चित्रपट बनवला गेला. जे.के. (संजीव कुमार) भारतातील निसर्गरम्य ठिकाणी हॉटेल व्यवस्थापक असतो. एके दिवशी तो एका राजकारण्याच्या आरती नावाच्या मुलीला वाचवतो. दोघेही प्रेमात पडून लग्न करतात. आरतीच्या वडिलांची या लग्नाला नापसंती असते. आरती (सुचित्रा सेन) तिची राजकीय महत्त्वाकांक्षा आणि वैयक्तिक आयुष्य यात समतोल साधण्याचा प्रयत्न करते. परंतु वाद विकोपाला गेल्यावर शेवटी नवरा आणि मुलीला सोडून राजकारणाचा रस्ता निवडते. नऊ वर्षानंतर अचानक निवडणूक दौऱ्यावर असताना तिची पतीशी भेट होते. ती ज्या हॉटेलमध्ये रहात असते, त्याचा तो मालक असतो. फ्लॅशबॅकच्या कलात्मक वापराद्वारे हे आपल्याला समजते.

त्यांच्या अनपेक्षित पुनर्मिलनानंतर, आरती आणि जे.के. त्यांच्या भूतकाळातील आठवणींना उजाळा देताना या गाण्यात दिसतात. त्यांना जाणवते की आपल्यात अजूनही प्रेम शिल्लक आहे. पण भूतकाळात कितीही मन रमले तरी वर्तमानकाळ नाकारता येत नाही आणि थांबवावे म्हटले कितीही तरी कालचक्र थांबवता येत नाही !
तुम्हाला माहीत आहे का की हे गाणे १९७०च्या दशकात दुर्गा पूजा अल्बमसाठी आर.डी. बर्मन यांनी रचलेल्या एका बंगाली गाण्यावर आधारित आहे ? स्वत: संगीतकाराने गायलेले हे गाणे “जेते जाते पटे होलो देरी” अवश्य ऐका! (https://youtu.be/0Ic-twQDcl0) जेव्हा गुलजार यांनी आर.डी. बर्मन यांना बंगाली गीतकार गौरीप्रसन्ना मुझुमदार यांच्यासोबत या गाण्यावर काम करताना ऐकले, तेव्हा त्यांना हे गाणे इतके आवडले की त्यांनी त्या चालीवर हिंदी गीत लिहिले जेणेकरून ते आंधीमध्ये समाविष्ट करता येईल.
गुलजार साहेब दिल्लीतील अकबर हॉटेलमध्ये या चित्रपटाची स्क्रिप्ट लिहीत होते, तिथे जेके नावाच्या वेटरने त्यांची उत्कृष्ट सेवा केली होती. कृतज्ञता आणि पोचपावतीचे प्रतीक म्हणून, गुलजार साहेबांनी त्याला वचन दिले की त्यांच्या स्क्रिप्टच्या नायकाचे नाव जेके असेल.
पंचमदा आणि गुलजार यांचे हे सगळ्यात संस्मरणीय गाणे आहे. पण या गाण्याच्या दरम्यान त्यांच्यात काही मतभेद झाले होते. जेव्हा गुलजार यांनी “नौ बरस लंबी थी, ना ?” हा या गाण्याच्या अंतरामधील संवाद लिहिला, तेव्हा आर.डी. बर्मन खूश नव्हते. गुलजार यांनी तसे एका मुलाखतीत सांगितले:
“आम्ही मुखड्यासाठी मूळ धून ठेवली आणि त्याने (पंचमने) अंतरासाठी वेगळी चाल लावली. पण जेव्हा मी गीतात काही संवाद टाकले तेव्हा पंचमने मला खडसावले, “’तुम्हाला सूर आणि तालाची कल्पना आहे का ? तुम्हाला हव्या त्या ठिकाणी तुम्ही तुमचा संवाद टाकता. हे असे चालणार नाही !”‘ पण तरी आम्ही ते केले !”
त्यांनी नक्कीच काहीतरी बरोबर केले असणार, कारण हे गाणे हिंदी चित्रपट संगीताच्या सर्वात मौल्यवान निर्मितींपैकी एक म्हणून अमर झाले आहे.
अनंतनाग, काश्मीर जवळील मार्तंड सूर्य मंदिर येथे या गाण्याचे चित्रीकरण केले आहे. विस्कटलेल्या संसाराच्या पाऊलखुणा गुलजारनी या गाण्यात या पुरातन वैभवशाली वास्तूचे विखुरलेले भग्नावशेष पार्श्वभूमीवर वापरून अतिशय परिणामकारकरित्या दाखवले आहेत.

हे गाणे नायक नायिकेच्या मुखी नसून त्यातून ते फक्त आपला विचार मांडत आहेत. हातातून रेती निसटून गेलेली असताना हाताला चिकटलेल्या काही वाळूच्या कणांना जतन करू पाहण्याचा जणू एक निष्फळ प्रयत्न असतो !
गाण्याच्या आधी ते दोघे भेटतात आणि दोघंही काही न बोलता तिथे फेरफटका मारत असतात. इथे आरती देवीची साडी भरपूर मोठी फुले असलेले आहे. तिच्या मनात उत्पन्न होणाऱ्या भावनांची एक झलकच आहे जणू! फिरता फिरता सांजावतं. हवेतला गारठा वाढतो तसा तो आपला कोट तिच्या अंगावर पांघरतो. ती गहीवरल्या नजरेने त्याच्याकडे पाहते.
ती मनात म्हणते –
तेरे बिना ज़िन्दगी से कोई
शिकवा तो नहीं, शिकवा नहीं
शिकवा नहीं, शिकवा नहीं
तुझ्याशिवाय जगण्याबद्दल माझी काही तक्रार नाही रे… खरंच अजिबात तक्रार नाही. तुझ्या विरहात जगण्याचा मार्ग मीच तर स्वीकारला होता…
तेरे बिना ज़िन्दगी भी लेकिन
ज़िन्दगी तो नहीं, ज़िन्दगी नहीं
ज़िन्दगी नहीं, ज़िन्दगी नहीं
तेरे बिना ज़िन्दगी से कोई
शिकवा तो नहीं..
पण तरीही तुझ्याशिवाय जगणे हे जीवन नाही. तुझ्याशिवाय सख्या या आयुष्याला काही अर्थ नाही. आणि यातला विरोधाभास हा आहे की तू सोडून माझी या आयुष्याकडे दुसरी कुठली तक्रार ही नाही ! कारण आज कळतंय की माझी या आयुष्याकडून तुझ्याखेरीज काही अपेक्षाच नव्हती रे ! आणि आता हे समजले आहे पण वेळ निघून गेली आहे.
काश ऐसा हो
तेरे क़दमों से चुन के मंज़िल चलें
और कहीं दूर कहीं (x २)
असे वाटते, तुझ्यासोबत चालत, तुझ्या पावलांनीच आपल्यासाठी एक नवीन गंतव्य शोधावे. थकलिये मी आता एकटी नवीन नवीन जगण्यासाठी उद्दिष्टे शोधून. आता असे वाटते की तूच ठरवावे आपण कुठे जायचे आणि बस तुझ्या पावलांवर पाऊल टाकून मी सगळा भार तुझ्यावर टाकून निवांतपणे तुझ्या मागे यावे. आणि तू मला न्यावेस दूर…कुठेतरी, कुठेतरी दूर.
जणू तिच्या मनातले ओळखून तिचा हात धरून जेके तिला आपल्यापाशी बसण्याची खूण करतो आणि ती ही अलगदपणे एक पायरी सोडून खाली त्याच्यापाशी बसते. दिग्दर्शनाचा एक उत्तम नमूना म्हणावा लागेल. महत्त्वाकांक्षी व्यक्तिमत्त्व असलेल्या आरती मधील हळुवार, नवऱ्याच्या आधारासाठी कुठेतरी चाचपडणारी स्त्री एका छोट्याशा कृतीतून गुलजार यांनी दाखवली आहे.
तुम गर साथ हो
मंज़िलों की कमी तो नहीं
तू जर माझ्या पाठीशी असशील तर मी पंख पसरून आभाळाकडे झेप घेऊ शकते आणि सगळी स्वप्ने पूर्ण करू शकते. कितीही दूरचा पल्ला गाठायचा असला किंवा कितीही अशक्यप्राय स्वप्ने पूर्ण करायची असली तरी, तू जर साथ असशील तर माझ्यासाठी हे आकाश ठेंगणे आहे !
या दोन ओळींमध्ये सुचित्रा सेन यांनी जणू अख्खा चित्रपट खाऊन टाकला. एका बाजूने आधार शोधणारी स्त्री, एका बाजूने आधार असल्याची जाणीव असणारी स्त्री, एका बाजूने सगळे मिळवणारी स्त्री, एका बाजूने सगळे मिळवूनही रिक्त झालेली स्त्री, तरीसुद्धा अजून एका बाजूने त्याच्यासोबत भविष्याची स्वप्ने रंगवणारी स्त्री आणि हे काही खरे होणार नाही याचे भान येऊन खंतावणारी त्याची प्रिया, एकाच वेळी झरझर चेहरा आणि नजरेतल्या छटा बदलत सुचित्रा सेन आपल्यासमोर अख्खा चित्रपट उभा करतात, असे वाटून जाते. उगीच नाही त्यांना पद्मश्री (१९७२), बंगा विभूषण (२०१२) आणि मॉस्को आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टीवल पुरस्कार आणि असंख्य इतर पुरस्कार दिले गेले. आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय अभिनेत्री होती सुचित्रा सेन !
तेरे बिना ज़िन्दगी से कोई
शिकवा तो नहीं, शिकवा नहीं,
शिकवा नहीं, शिकवा नहीं
इथे दोघांचेही कपडे वेगळे दिसत आहेत. त्यामुळे कदाचित भेटण्याची ही दुसरी संध्याकाळ असावी. त्याच मंदिराची दुसरी बाजू जेके दाखवत असावा. आणि संवाद पण नीट बघितले तर लक्षात येईल की तो आपल्या परीने तिला सांगतोय की दुसऱ्या बाजूने म्हणजेच माझ्या बाजूने विचार कर. गैरसमजाची धूळ साफ करून बघितले तर सगळे कसे स्वच्छ, स्पष्टपणे दिसेल तुला. कुठेतरी त्याला अजूनही आशा असते की तिला थांबावेसे वाटेल… तिलाही जाणवते त्याच्या मनात चाललेली उलघाल. इथे बघा मंदिराचा पूर्ण रुपी उभा असलेला भाग दाखवला आहे. तिची शाल देखील पांढरी आहे. कुठेतरी आशा पल्लवित होण्याची ही चिन्हे दिग्दर्शकाने आपल्याला दाखवली आहेत.
जेके : सुनो आरती ये जो फूलों की बेलें नजर आती हैं ना ये दरअसल अरबी में आयतें लिखी हुई हैं। इन्हें दिन के वक़्त देखना। बिल्कुल साफ़ नज़र आती हैं। दिन के वक़्त ये पानी से भरा रहता है। दिन के वक़्त ये जो फ़व्वारे हैं ना…
आरती : क्यूँ दिन की बात कर रहे हो कहाँ आ पाऊँगी मैं दिन के वक़्त ?
जेके : ये जो चाँद है ना इसे रात के वक़्त देखना.. ये रात में निकलता है
आरती : ये तो रोज़ निकलता होगा…
जेके : हाँ लेकिन कभी कभी अमावस आ जाती है। वैसे तो अमावस पन्द्रह दिन की होती हैं… पर इस बार बहुत लम्बी थी…
आरती : नौ बरस लंबी थी ना….
पाणावलेल्या डोळ्यांनी ती एक आवंढा गिळते आणि पुढच्याच क्षणाला लता दीदी मनातून कोसळलेली आरती आर्त स्वरात उभी करतात! त्याच्या खांद्यावर डोके ठेवून, त्याच्यापासून आपले अश्रू लपविण्याचा विफल प्रयत्न करीत ती म्हणते –
जी में आता है
तेरे दामन में सर छुपा के हम
रोते रहें, रोते रहें (x 2)
मला तुझ्या कुशीत येऊन भरपूर रडून घ्यावेसे वाटत आहे, माझ्या सगळ्या भावनांना मोकळी वाट करून द्यावीशी वाटतेय. तुला सोडून जगलेल्या प्रत्येक क्षणी माझे मन मला खात आले आणि ते ओझे सहन होत नाहीये. सगळे काही तुला सांगून आज अगदी रिक्त व्हावेसे वाटतेय. इतकी वर्षे रोखून ठेवलेले अश्रू आज तुझ्यासमोर ओघळू द्यावेसे वाटतेय.
तेरी भी आँखों में
आँसुओं की नमी तो नहीं
पण तुझेही डोळे पाणावले की काय ? नेहमी प्रमाणे माझ्यासाठी आजही हळवा झालास तू…! आज कळतंय मला काय गमावलं आणि काय कमावलं! तुला ते कदाचित आधीच कळले असावे, म्हणून तर इतक्या सहजपणे माझे दुःख समजून घेतोयेस!
यावर तो तिची स्थिती समजून घेत तिला म्हणतो –
तेरे बिना ज़िन्दगी से कोई
शिकवा तो नहीं, शिकवा नहीं
शिकवा नहीं, शिकवा नहीं
तेरे बिना ज़िन्दगी भी लेकिन
ज़िन्दगी तो नहीं, ज़िन्दगी नहीं,
ज़िन्दगी नहीं, ज़िन्दगी नहीं
भेटीची तिसरी संध्याकाळ. जवळजवळ रात्र झालेली असते. चंद्रोदय होतो. सुंदर चांदणं पडलेलं असतं.
तो म्हणतो –
तुम जो कह दो तो
आज की रात चाँद डूबेगा नहीं
रात को रोक लो (x 2)
हे प्रिये, आज रात्री तू म्हणालीस तर चंद्रही मावळणार नाही. थोडक्यात काय तर तू एकदा बोलून तर बघ, तू म्हणशील ते मी करायला तयार आहे, मी तुला कायमचे माझ्यापाशी थांबवायला तयार आहे.
पण जसे या रात्रीला थोपवणे तुझ्याच हातात आहे, तसेच इथे राहणेही तुझाच निर्णय असेल. तू म्हणालीस तर ही रात्र कधीच संपणार नाही आणि आपण कायम या चंद्राच्या शीतल प्रेमाच्या छायेत असेच न्हाऊन निघत राहू! ही रात्र सरण्या पासून थांबव प्रिये !
रात की बात है
और ज़िन्दगी बाकी तो नहीं
पण त्याला सत्य परिस्थितीची जाणीव आहे. आपल्याकडे फक्त आजची रात्र आहे, उर्वरित आयुष्य एकत्र सामायिक केले जाणार नाही याची त्याला पूर्ण कल्पना आहे. इथे पुन्हा एकदा दिग्दर्शनाचा सुंदर नमुना आहे. तिची काठ पदराची साडी देखील ती तिच्या बंदिस्त, समाजाने आखलेल्या नियमांच्या मार्गावरून पदभ्रमण करण्याचे सूतोवाच करत आहे. नेमक्या या दोन ओळींच्या वेळी ते दोघे दोन भग्नावशेष असलेल्या खांबांपाशी येऊन थांबतात. जणू भूतकाळ आणि भविष्यकाळ या दोन खांबाच्या वर्तमानकाळात सामावून राहिला आहे !
तेरे बिना ज़िन्दगी से कोई
शिकवा तो नहीं, शिकवा नहीं
शिकवा नहीं, शिकवा नहीं
तेरे बिना ज़िन्दगी भी लेकिन
ज़िन्दगी तो नहीं, ज़िन्दगी नहीं
ज़िन्दगी नहीं, ज़िन्दगी नहीं
तेरे बिना ज़िन्दगी से कोई
शिकवा तो नहीं
या गाण्यानंतर जेके सोबतच्या रात्रीच्या भेटींबद्दल अफवा पसरल्यानंतर, आरती देवीने लोकांसमोर खुलासा केला की ती तिच्या विभक्त पतीलाच भेटत होती, ज्याला लोक सेवेसाठी त्यांनी सोडले होते. आजही असाच समाज सत्य परिस्थिती न जाणता पटकन स्त्रीवर आरोप करायला तत्पर असतो. (फोटो)
आंधी जितका राजकीय, सामाजिक आणि वैयक्तिक पातळीवर ७० च्या दशकात वैध होता, तितकाच आजही तो वैध आहे. चित्रपटाच्या शेवटी आरतीने तिची निवडणूक जिंकली असली तरी, हा विजय आंबट गोडच म्हणावा लागेल. कारण ती त्या काळातील एका दुर्दैवी वास्तवाशी झुंजत राहते: व्यावसायिक यश आणि घरगुती आनंद एकत्र मिळणे महिलांसाठी दुर्मिळच !
सरतेशेवटी, एकच म्हणेन की या दिग्गजांनी केवळ एक गाणे तयार केलेले नाही, तर त्यांनी भावनांचा समुद्र निर्माण केला, जो आजतागायत श्रोत्यांना जाणवत आहे आणि जाणवत राहील !

– लेखन : तनुजा प्रधान, अमेरिका.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ +91 9869484800
ऑंधी चित्रपटातलं माझंही हे आवडतं गाणं…लतादीदी -किशोरकुमार यांच्यासाठी, संजीवकुमार, सुचित्रा सेन यांच्यासाठी आणि संगीतकार राहूलदेव बर्मन यांच्यासाठीही …. सुंदर रसग्रहण
ऑंधी चं आई चित्रपटातलं माझंही हे आवडतं गाणं…लतादीदी -किशोरकुमार यांच्यासाठी, संजीवकुमार, सुचित्रा सेन यांच्यासाठी आणि संगीतकार राहूलदेव बर्मन यांच्यासाठीही …. सुंदर रसग्रहण