नमस्कार 🙏 ओठावरलं गाणं या सदरात सर्व रसिक श्रोत्यांचं मन:पूर्वक स्वागत.
आज ३१ ऑगस्ट! भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थी म्हणजेच आजच्या दिवशी आपल्या लाडक्या गणरायाला वाजतगाजत घरी घेऊन यायचा दिवस. त्याच्या आगमनाचे वेध आपल्याला खरंतर खूप दिवस आधीच लागलेले असतात.
लोकमान्य टिळकांनी एका ध्येयाने प्रेरित होऊन गणेशाच्या या उत्सवाला सार्वजनिक उत्सवाचं स्वरूप दिलं. स्वातंत्र्योत्तर काळानंतर घरोघरी आणि सार्वजनिक रित्याही गणेशोत्सव मंडळातील कार्यक्रमाचं स्वरूप बदलत गेलं तरीही तेवढ्याच उत्साहाने आजही भाद्रपद महिन्यात घरोघरी, तर गणेशोत्सव मंडळांतर्फे काही ठिकाणी माघ महिन्यातही सार्वजनिक गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात येतो.
घरोघरी तसंच सार्वजनिक गणेशोत्सवात आज विराजमान झालेल्या गणेशाच्या आकर्षक मूर्तींचं स्वागत आणि आपल्याला सर्वांना गणेशचतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !
आजच्या दिवसानिमित्त “ओठावरलं गाणं” या आपल्या सदरात पाहू या कविवर्य शांताराम नांदगावकर यांनी लिहिलेलं, गणेश स्तुती करणारं एक गाणं ज्याचे शब्द आहेत-
“प्रथम तुला वंदितो कृपाळा | गजानना गणराया”
कोणतंही काम, शुभ कार्य, शुभविवाह, सत्यनारायणाची पूजा किंवा महापूजा, असं काहीही जरी असलं तरी मनोभावे आपण गणेशाची पूजा करून, पूजा सांगणाऱ्या गुरूजींतर्फे किंवा देवळात जाऊन विवाह पत्रिका गजाननासमोर ठेवून “कार्य सिद्धीस नेण्यास तू समर्थ आहेस” असं सांगून मनोभावे त्याला पुन्हा एकदा आवाहन करतो आणि नंतरच आपल्या कोणत्याही कार्याला आपण सुरूवात करतो. गजमुख असलेल्या, गणांचा अधिपती असलेल्या आणि बुध्दीची देवता म्हणून पूजेचा पहिला मान नेहमीच ज्या गणेशाला दिला जातो त्याच्यासमोर आपल्या मनातील हेच मूक भाव शांताराम नांदगावकर यांनी अचूक शब्दात व्यक्त केले आहेत.
विघ्नविनाशक, गुणीजन पालक
दुरित तिमिर हारका
चिंतामणी तू अष्टविनायक
तूच तुझ्यासारखा
वक्रतुंड ब्रम्हांडनायका
विनायका प्रभूराया
गजानना, आम्हा पृथ्वीवासियांचा तूच खरा तारणहार आहेस. दुर्दैवाने जर एकापाठोपाठ एक संकटांची मालिका आमच्या आयुष्यात सुरू झाली तर अर्थातच काय करावं म्हणजे या संकटातून सुटका होईल हे आमच्या बुध्दीला उमगत नाही. अशा वेळेस या आपदांच्या ढगांमुळे आपली या संकटातून मुक्तता होत नाही असे नैराश्याचे विचार मनात येत असतानाच, साक्षात बुध्दीची देवता अशी तुझी आश्वासक मूर्ती आमच्या डोळ्यासमोर आशेचे किरण घेऊन उभी रहाते. या आशेच्या किरणांमुळे आणि तुझ्या कृपेने, संकटांवर मात करण्याचा आमचा प्रयत्न यशस्वी ठरतो. नांदगावकरांनी योजलेल्या “दुरित तिमिरहारका” या दोन शब्दातून आपल्या मनातल्या भावना समर्थपणे प्रकट झाल्या आहेत. अष्टविनायक यात्रा करून तुझ्या आठ निरनिराळ्या रूपांचं जसजसं दर्शन होत जातं तसतशी निद्रिस्त अवस्थेत असलेली आमची बुध्दी तुझ्या शुभाशिर्वादाने जागृतावस्थेत येऊ लागते, मन शांत आणि स्वस्थ होतं. प्रत्यक्ष चिंतामणीचं दर्शन झाल्यानंतर संकटांच्या काट्याकुट्यांनी अडलेला मार्ग आपोआपच मोकळा होत जातो. मातृत्व भावनेने आपल्या भक्तांच्या कल्याणासाठी सदैव तत्पर असणाऱ्या ब्रह्मांड नायकाला कोटी कोटी प्रणाम.
सिध्दीविनायक तूच अनंता
शिवात्मजा मंगला
सिंदूरवदना विद्याधीशा
गणाधीपा वत्सला
तूच ईश्वरा साह्य करावे
हा भवसिंधू तराया
गजानना, तुला कोणत्या नावाने बोलवायचं हेच कधी कधी आम्हा पामरांना समजत नाही. मूर्ती वेगवेगळ्या असल्या तरी गणपती या नावानेच तू आम्हाला जास्त परिचित आहेस. सिध्दीविनायक हे तुझं नावही आमच्या चांगलंच परिचयाचं आहे. मंगल कार्याच्या वेळेस, एखाद्या मंगल घटिकेला शिवपुत्र मंगलमूर्तीची आम्हाला हमखास आठवण येतेच येते. सर्व गणांचा अधिपती म्हणून तर तुझी ख्याती आहेच त्याशिवाय चौसष्ट कलांचा अधिपती असा तू विद्येची देवता म्हणूनही पूजनीय आहेस. तुझी शोडषोपचारे पूजा झाल्यानंतर हळद, कुंकू, बुक्का, सिंदूर, केवडा, जास्वंदीच्या फुलांचा हार यांनी सजलेली आणि आकर्षित मखरात विराजमान झालेली तुझी मूर्ती पाहिल्यावर मायेनं भरलेल्या तुझ्या डोळ्यातल्या मायेचा नव्याने प्रत्यय येत रहातो. हा भवसागर यशस्वीपणे तरून जाण्यासाठी आम्हाला तुझ्या आशिर्वादाची, कृपादृष्टीची आत्यंतिक गरज आहे.
गजवदना तव रूप मनोहर
शुक्लांबर शिवसुता
चिंतामणी तू अष्टविनायक
सकलांची देवता
रिद्धी सिद्धीच्या वरा दयाळा
देई कृपेची छाया
हे शिवशंकराच्या पुत्रा, हे बुध्दीच्या देवते धूम्रवर्णीय पीतांबर नेसलेली तुझी नयन मनोहर मूर्ती पाहून मन समाधानानं शांतावतं. तुझ्याकडे पहाताना आमच्या सांसारिक दु:खांचा काही क्षण तरी आम्हाला विसर पडतो. आमच्या गृहदेवता तुला प्रिय असलेल्या मोदकांचा नैवेद्य दाखवतात. रिद्धी सिद्धींची आणि तुझी कृपादृष्टी आमच्या जीवनात सदैव रहावी, समस्त मानवजातीला सद् बुध्दी लाभावी म्हणून मनोभावे आम्ही सर्वजण आज तुझी प्रार्थना करतो.
अनिल अरूण यांनी “अष्टविनायक” चित्रपटासाठी संगीतबद्ध केलेलं हे गाणं ज्येष्ठ गायक पं. वसंतराव देशपांडे यांनी आपल्या धारदार आणि अनुराधा पौडवाल यांनी आपल्या मुलायम आवाजातून आपल्या ह्रदयापर्यंत पोचवलं आहे.

– लेखन : विकास मधुसूदन भावे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
खूपच सुंदर.
धन्यवाद विराग 🙏
फार छान
धन्यवाद गौरव 🙏
खूप सुंदर ❤️❤️
धन्यवाद राधा मॅडम 🙏