शालेय ‘ओंकार काव्य दर्शन’ व कुटुंब रंगलंय काव्यात हा एकपात्री कार्यक्रम यावर बाबा, साधनाताई आणि सर्व आमटे कुटुंब अतिशय खूष झाले होते. त्यामुळे माझी सर्व मित्र मंडळी विशेष खूष झाली होती.
दुसऱ्या दिवशी सकाळी निरोप घेण्यासाठी आम्ही सारे बाबांच्या खोलीत गेलो. मी त्यांचा निरोप घेऊन निघणार असल्याने त्यांनी सर्व आमटे कुटुंबीयांना बोलावून घेतले. नाश्ता, चहा घेवून झाल्यावर मी मा. बाबा आमटेंना म्हणालो, “बाबा, मी आपले ‘ज्वाला आणि फुले’ हे पुस्तक वाचलेले आहे. आपल्या कविता सुद्धा चांगल्या असतात.
मी माझ्या वहीत कवींच्या हस्ताक्षरात कविता संकलित करून कवींच्या नावासह माझ्या एकपात्री कार्यक्रमात त्या कविता सादर करीत असतो, हे आपण जाणताच.! तरी आपण आपली एक कविता माझ्या वहीत लिहून द्यावीत, ही विनंती आहे.!” माझ्या या विनंती नुसार बाबांनी मला लिहून दिलेली “क्रांतीची पावले” ही त्यांची कविता आमच्या वाचकांसाठी देत आहे.
“क्रांती ही सीतेसारखी आहे…
तिची पावले वनवासी
रामाची साथ करीत असतात.
पण तो मर्यादित पुरुषोत्तम
जेंव्हा राज्यातून होतो
तेंव्हा ती
पृथ्वीच्या पोटात गडप होते.!!”
आशिर्वाद म्हणून मिळालेली ही कविता घेऊन आम्ही सर्व आमटे कुटुंबीयांचा निरोप घेऊन हेमलकसा सोडले आणि चंद्रपूरला परतलो. ‘लोकबिरादरी प्रकल्पाच्या आदिवासी आश्रमशाळेत” सादर केलेल्या शालेय शालेय कार्यक्रमामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व ३६ आदिवासी आश्रमशाळांमध्ये कार्यक्रम सादर करण्याचा मला वस्तुपाठ मिळाला होता. नंतर मित्र सुरेश देशपांडेंनी प्रयत्न करून जिल्ह्यातील सर्वच आदिवासी आश्रमशाळांचे पत्ते मिळवले. त्या आदिवासी भागात फिरण्यासाठी जिल्हा पत्रकार संघाकडून मला एक पत्रकाराचे कार्ड मिळाले होतेच.! गोंडी भाषेत भाषांतर करून घेतलेले बालगीत प्रथम सादर करून नंतर बालभारतीच्या पाठ्यपुस्तकातील कविता सादर करीत ‘कविता म्हणजे काय.?’ हे विद्यार्थ्यांना समजावून सांगणारा ‘ओंकार काव्य दर्शन’ हा शालेय कार्यक्रम मी सादर करायचा आणि सर्व आदिवासी भागात सुरेशने माझ्या सोबत रहायचे, असे सर्व पत्रकार मित्रांच्या सल्यानुसार आम्ही ठरवले.
जारावंडीच्या आदिवासी आश्रमशाळेत शालेय कार्यक्रम सादर करण्यासाठी आम्ही पाच सहा किलोमीटर पायपीट करूनपोहोचलो तेंव्हा दुपारचे बारा वाजून गेले होते. मुख्याध्यापक रहात होते त्या घरी त्यांनी आमचे स्वागत केले. आपण ज्याप्रमाणे चहा देतो त्याप्रमाणे ते आदिवासी बांधव ताडी देऊन आपले स्वागत करतात. आपण जर ताडी घेतली नाही तर त्यांचा अपमान वाटून ते नाराज होतात, असे त्या मुख्याध्यापकांनी आम्हाला सांगितले म्हणून आम्ही ताडी घेतली. ताडी प्रथमच घेतल्याने त्रास सुरू झाला, डोकं दुखायला लागलं, गरगरायला लागलं. म्हणून शेजारी असलेल्या ओढ्यातील करंजीच्या झाडाच्या सावलीत थोडावेळ झोप काढल्यानंतर बरं वाटलं. आम्ही आंघोळी करून फ्रेंश होऊन कोरा चहा घेतला आणि कार्यक्रम सादर करण्यासाठी शाळेत गेलो. रात्री आठ वाजता गॅसबत्तीच्या प्रकाशात मी माईक शिवाय गोंडी कवितेने कार्यक्रम सुरू केला.
वातावरण फार छान होते, त्यामुळे सगळीच सोय नसताना माझा कार्यक्रम चांगलाच रंगला. तेथील एकूणच नैसर्गिक वातावरणात सुरू केल्याने मुक्त विद्यापीठाच्या शाळेची कल्पना माझ्या डोक्यात आली म्हणून मी कवी मित्र अनंत भीमनवार यांची एक बालकविता सादर करून तो कार्यक्रम संपवला.
“छप्पर, भिंती, खडू, फळ्याविण, अशी असावी शाळा ।
पुस्तक, पाटी नको नसाव्यात अभ्यासाच्या वेळा ।।धृ.।।
किलबिलणाऱ्या पक्षांसंगे, मुक्त प्रार्थना गावी,
चिंचा,पेरू, कैऱ्यांची पण, रोज हजेरी घ्यावी,
हातामधले पेरू बघुनी, पोपट व्हावे गोळा,
पुस्तक, पाटी, नको नसाव्या आंब्याच्या वेळा ।।१।।
वेगवेगळी फुले खुडूनी, बेरीज करुनी घ्यावी ,
झाडावरले पक्षी उडवित वजाबाकी मांडावी,
फळ्याऐवजी आकाशातील,मेघच घ्यावा काळा
छप्पर, भिंती,खंडू,फळ्याविण, अशी असावी शाळा।।२।।
क्रमशः

– लेखन : प्रा.विसुभाऊ बापट, दादर, मुंबई.
(सादरकर्ते-कुटुंब रंगलंय काव्यात)
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
आज जुन्या आठवणींना उजाळा मिळाला…विसुभाउंबरोबर सिरीयल केली होती श्रोत्यांना मंत्रमुग्ध करत खिळवून ठेवण्याची कला छान अवगत आहे.. ..