श्री. म माटे. म्हणजे एक प्रज्ञावंत-प्रतिभावंत-
समाजशिल्पी प्राध्यापक ही त्यांची ओळख कधीही विसरता येणार नाही. त्यांची आज जयंती आहे. (जन्म २ सप्टेंबर १८८६) त्या निमित्ताने त्यांचे प्रेरणादायी स्मरण…
पुण्याला “ऑक्सफर्ड ऑफ द इस्ट” असे म्हणतात. कारण पुण्यातील शिक्षणाचा दर्जा आंतरराष्ट्रीय स्तरावरही अनेक वेळा सिद्ध झालेला आहे. याचे कारण पुण्याला लाभलेला उत्कृष्ट शिक्षकांचा, प्राध्यापकांचा वारसा. मग ते शिवाजी मराठा संस्थेतील बाबुराव जगताप असोत वा नुमविचे पु. ग.सहस्रबुद्धे असोत. महाविद्यालयीन विश्वात तर श्री.के.क्षीरसागर, रा श्री जोग, अनुराधाताई पोतदार अशी अनेक मंडळी होती.
याच नामावलीतील एक नाव म्हणजे श्री. म. माटे सर. केवळ चांगले शिक्षक म्हणून नव्हे तर एक समाजशिल्पी व्यक्तिमत्व म्हणून ते आजही आठवत राहतात. माझे वडील कॉलेजच्या दिवसातील तेथील आठवणी आम्हाला अधून मधून सांगत असत. तेंव्हा पासून हे नाव माझ्या स्मरणात आहे.
शाळेत असताना ‘उपेक्षितांचे अंतरंग’ हा धडा आम्हाला होता तो यांनीच लिहिला होता. वयाच्या चाळीशी नंतर यांचा लेखन यज्ञ सुरु झाला. संशोधन, संकलन, चरित्रे, वैचारिक, तत्त्वचिंतनात्मक, इतिहासमंथन, चालू घडामोडी, निबंध, ललितलेख अशा विविध घाटात १० हजारहून अधिक पाने एवढा मजकूर लिहिला. आपल्या अनुभवाच्या मुशीतून तयार झालेले विचार धन त्यांनी वाचकांच्या स्वाधीन केले. १९४३ मधे सांगली इथं भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांना मिळाले.
विदर्भात जन्म. सातारा पुणे इथे शिक्षण. रँग्लर परांजपे, गो .चिं भाटे यांच्यासारखे गुरु त्यांना लाभले. त्यांच्या जीवनप्रवासात एक ठळक नोंद करण्यासारखा मुद्दा म्हणजे त्यांनी अस्पृश्यता निवारणाचे केलेलं काम. ‘अस्पृश्यांचा प्रश्न’ या ग्रंथात त्यांची उदार दृष्टी तर दिसतेच शिवाय केवळ पुस्तकी समाजसेवा न करता थेट रस्त्यावर ते उतरले. पददलितांचे डोळे पुसणारा हा समजशिल्पी खऱ्या अर्थाने १०० % सोन्याचा माणूस या योग्यतेचा होता.
वैचारिक लेखन हा त्यांच्या कारकिर्दीतील मानबिंदू असला तरी त्यांनी लिहिलेल्या कथा भल्याभल्या समीक्षकांनी नावाजल्या. १९३५–४६ या कालखंडात पुण्याच्या सर परशुरामभाऊ महाविद्यालयात ते इंग्रजीचे व मराठीचे प्राध्यापक होते. प्राध्यापक म्हणून त्यांची कारकीर्द अत्यंत यशस्वी झाली. भाषेचे प्राध्यापक असल्यामुळे कथा लेखन हे शिवधनुष्य आहे ही त्यांना कल्पना होती. पण त्यांच्याकडील अनुभवाचे संचित आणि पारदर्शक सामाजिक दृष्टी यामुळे या कथा जिवंत झाल्या, रसरशीत झाल्या.
विशेषतः ‘कृष्णाकाठचा रामवंशी’ आणि ‘तारळखोऱ्यातील पिऱ्या’ या कथा त्यांनी जवळून पाहिलेल्या हाडामाणसांच्या जीवनकहाण्या होत्या.
काँटिनेंटलने काढलेल्या “उपेक्षितांचे अंतरंग” या पुस्तकात त्या वाचायला मिळतात . भाषेचा जन्म आणि विकास या संबंधीचा त्यांचा रसवंतीची जन्मकथा’ हा ग्रंथ आजही अभ्यासकांना साद घालतो. या प्राध्यापकांची विज्ञाननिष्ठाही कमालीची होती. त्याचा व्यासंग अफाट होता. ‘विज्ञानबोध’ या ग्रंथ हे त्याचंच एक फलित. याला २०० पानी प्रस्तावना लिहून, ४० च्या दशकात वैज्ञानिक दृष्टिकोनाचा जागर त्यांनी केला तो अतिशय महत्वाचा आहे.
श्री. म माटे. यांचे विचार, लेखन, कार्य आजही प्रेरणादायी आहे. त्यांना विनम्र अभिवादन.
– लेखन : डॉ केशव साठये. पुणे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
माहितीपूर्ण आणि वाचनीय लेख.