आठ दिवस झाले तिची चिडचिड जरा जास्तच वाढली होती . गौरी गणपतीचा सण म्हणून बाहेर शिक्षणासाठी असलेली तिन्ही मूल घरी आली होती .खरतर आनंद व्हायला हवा .एरवी ती, सासू आणि नवरा तिघेच घरी , नवरा कामानिमित्त दिवसभर बाहेर त्यामुळे घरात दोघीच अस म्हणणं वावग ठरणार नाही . मग मूलं आल्यावर किती आनंद व्हायला हवा पण तिची चिडचिड होत होती . अस का व्हावं ? तिला मनात प्रश्न येऊन गेला .
आता आपण तिघेच घरात असल्याने जास्त लोकांची सवय नाही राहिली का मला !!! अस उगाचच तिला वाटून गेलं . पण पोटचे गोळे आल्यावर अस कोणत्या आईला नको वाटेल !!! काहीतरीच , मी पण ना काहीही विचार करते !!! तिची विचार चक्र चालूच होती…..एरवी एकटेपणा खायला उठतो , वयाच्या पन्नाशीच्या टप्प्यावर आपली मुलं आपल्या आजूबाजूला असावी , घरात त्यांची किलबिल कानावर पडावी असच वाटत , पण ही चिडचिड त्या कारणासाठी नव्हती हे तिला पक्क कळलं …….. मग अस का होतंय ? …..मग तिची विचारचक्र चालू झाली आणि त्यावेळी अचानक तिची ट्यूब पेटली की दोन महिने झाले तिची मासिक पाळी आली नव्हती . ही त्याचीच तर लक्षणं नसावीत ना !!!! मनात विचार चमकून गेला .आता तिची मासिक पाळी वेळीअवेळी यायला लागली होती . पन्नाशीच्या या टप्प्यावर वाढलेली चिडचिड , मधेच कधीतरी वाटणारी अस्वस्थता , कधीतरी उगाचच रडू येणं , छातीवर प्रेशर येण , पाठदुखी , कम्बरदुखी , शरीरात जडपणा, असले प्रकार आता तिला अनुभवायला मिळत होते. आणि हा त्याचाच परिणाम हे तिला जाणवलं…….
तसं तर गौरी गणपतीचा सण म्हणजे तिच्या खास आवडीचा .महिनाभर आधीपासूनच तिच्या डोक्यात विचार चालू असायचे….यंदा काय डेकोरेशन करायचं , गौरी कशा सजवायच्या , फराळ काय करायचा ,घराची स्वच्छता , काय हवं नको , सगळं साहित्य आणायचं , गणपती ची मूर्ती ठरवायची ही सगळी तयारी करतांना ती कधीही थकत नसे . स्वयंपाक घरातलं आटोपून पुन्हा हॉल सजवण्यासाठी ती तितक्याच उत्साहाने सज्ज असायची…. पण हल्ली तिची तिलाच जाणीव होत होती…..पहिल्या सारख आता दोन्हीकडे उभं राहणं तिला जमेना अस वाटत होतं…..शरीर हळूहळू आपले रंग दाखवायला लागलं होतं . पण तरीही ती आनंदाने करत होती .
गौरी गणपती येणार म्हनलं की नेहमीच तिला काय करू आणि काय नको अस व्हायचं .या वेळी ही गोष्ट लक्षात येताच तिने झपाटल्यासारखी सगळी कामं आटोपून घेतली , गौरी साठी लाडू चिवडा, चकली , करंजी , चोरोटे , चौडे , लडगी , सगळा फराळ लगबगीने केला . बाजारातून डेकोरेशन साठी लागणार साहित्य आणलं , सगळी सजावट झाली , गणेशाचं आगमन पण झालं . मनातून वाटत होतं असं काही होणार नाही , आपली अडचण नाही येणार , दोन महिने झाले आली नाही आता कशाला येईल !! पण दुसऱ्या मनात शंकेची पाल चुकचुकत होती. आतून थोडं टेन्शन आलंच होत तिला. आणि व्हायचं तेच झालं , रात्री कॉलनीच्या गणेशोत्सव मंडळात रोज सगळेजण दांडिया खेळतात , दांडिया म्हणजे आवडीचा .
दरवर्षी या भीतीपोटी खेळायचं टाळायची ती पण या वर्षी विचार केला जाऊदे दोन महिने एवढ्या उड्या मारल्या तेंव्हा नाही आली आणि एका राउंडने काय येती म्हणून उत्साहाने एक राउंड खेळला आणि सकाळी उठल्या उठल्या दोन महिन्यांनी पाळीने आपलं तोंड दाखवलं . झालं , पतिच्या सगळ्या उत्साहावर पाणी पडलं. आणखी जरा चिडचिड वाढली . एवढं सगळं केलं आणि अस काय हे , गेल्या वर्षी पण असच झालं!!! , किती करते मी गौरी गणपतीच !!!, त्या गणपतीला गौरीला दिसत नाही का? , तीस वर्षात कधी आडवी आली नाही आणि दोन वर्षे झाली अस का होतंय !!!, माझं काही चुकतंय का गजानना गौराई!!!…. एक ना दोन किती तरी विचारांचं काहूर मनात सुरू होतं.
एका सर्वसामान्य स्त्रीच्या मनात अशा वेळी जे जे विचार यायला हवे ते तिच्या मनात त्या वेळी येऊन गेले .चेहऱ्यावरची नाराजी पाहून नवऱ्यानं तिला समजावलं. एवढं का मनाला लावून घेतेस !! , कधीतरी होणार की अस!! , बर माझं ,आईच काहीच म्हणणं नाही!!! ,आम्हाला त्याच काही नाही !! मग तू का मनाला लावून घेतेस .झाली तर झाली !!! , तीन दिवस आम्ही कसही करू!! , तू निवांत रहा!! शेवटी आपल्या हातात काही नसतं हे , ते नैसर्गिक आहे !!!! त्यांचं हे बोलणं ऐकून आज तिला पतीमध्ये पिता दिसला .
आपल्या बापानं लेकीला अशा वेळी जे आधाराचे शब्द बोलायला हवे ते त्याने बोलले .तिला पण आधार वाटला ,कधीतरी नवऱ्यांन अस बायकोचा बाप व्हावं !!!! हो ना!!! निदान या वयात तरी पतीच्या ऐवजी पिता या नात्याची एका स्त्रीला खूप गरज असते जी आज तिच्या नवऱ्यानं पूर्ण केली अस तिला मनोमन वाटून गेलं. सासूबाई देखील खूप समजुतीन बोलल्या , हे बघ वर्षभर तू आमच्यासाठी करतेसच की !!!त्या देवाला पण वाटलं तुला जरा विश्रांती देऊ म्हणून तो अस करतो !!! त्याशिवाय तू एक जागेला बसणार नाही हे त्याला पण कळलं . मनात अजिबात काही वाटून घेऊ नकोस , मला जस होईल तसं मी करते !!!निःसंकोचपणे आणि आनंदाने आयत बसून खा तीन दिवस !!!! झालं आईची कसर पण सासूने भरून काढली……
आज तिने नवऱ्याच्या हातचा आयता चहा घेतला सकाळी सासूबाईंनी गरम नाश्ता पुढ्यात आणून दिला. आयत जेवायला मिळालं , मुलानं संध्याकाळी चहा बनवून दिला. सगळं छान चाललं होतं , पण स्त्रीमनच ते , मनातले विचार काही केल्या थांबत नव्हते . गणपतीसमोर बसून मनातल्या मनात तीच त्याच्याशी द्वंद्व चालूच होतं. रात्री अंथरुणावर पडली तरी मनातली उदासीनता काही जाईना . या अंगावरून त्या अंगावर करत रात्र कासवाच्या गतीने सरत होती . आणि अचानक आवाज तिच्या कानावर आला , पोरी झोप लागत नाही का ?? किती विचार करशील !!! सोडून दे की !!! तिनं दचकून मग वळून पाहिलं . कोण ? तिने विचारलं . आग ओळखलं नाहीस का ? मी गौराई !!! आई म्हणतेस आणि आईला ओळखत नाहीस !!!!
ती पटकन उठून बसली , पाहते तो काय ….समोर साक्षात गौराई .हिरवीगार साडी , खणाची चोळी , कपाळावर ठसठशीत ,लालभडक कुंकू , हातभरून हिरव्या गार बांगड्या ,गळाभरून दागिने, चेहऱ्यावर कमालीची तृप्तता . एक अलौकिक तेजस्वी ,देखणं रूप समोर उभं होतं .तिला बघूनच मन शांत झालं तीच . तिच्या सहवासात कमाल प्रसन्नतेची अनुभूती जाणवली . तिनं पटकन उठून तिच्या पायावर डोकं ठेवलं .डोळ्यात साठवून ठेवावं अस ते जाज्वल्य रूप पाहून ती देहभान विसरून गेली .डोळ्यातून अखंड अश्रूंच्या धारा वाहू लागल्या .गौराईच्या दिव्य रुपाशिवाय ती काहीच पाहू शकत नव्हती.
आज हा क्षण असाच थांबावा अस वाटलं तिला .ती डोळ्यात गौराईच रूप साठवून घेत होती आणि त्याक्षणी गौराईन क्षणात तिला आपल्या बाहुपाशात घेतलं आणि तिच्या मनात चाललेली घालमेल शांत केली……किती विचार करतेस !!!! तुझी मनाची तळमळ पोहचली हो माझ्यापर्यंत !! म्हणून धावत आले लेकीचं सैरभैर झालेलं मन शांत करायला !!! मला सांग असा विचार का करतेस!! आग तुम्ही लेकीच आहात सगळ्या माझ्या !! आईला आपल्या मुलाचं चांगलं व्हावं असच वाटणार ना ग !! आपल्या लेकराला कशामुळे बर वाटेल हे आईलाच कळत ना!!! तुम्ही लेकी वर्षभर किती करता!! कुटूंबासाठी , आल्या गेल्यासाठी , घरच्या जबाबदाऱ्या , बाहेरच्या जबाबदाऱ्या , मुलाबाळांचं , सणवार , सगळ्या रीती , परंपरा , कोणी नोकरी करून तर कोणी घर सांभाळून ह्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडता.किती संकट आली सुख असो व दुःख त्याचा लवलेशही चेहऱ्यावर न दाखवता आल्यागेल्याच आनंदाने सगळं करणं आपल्या कुटुंबाला आनंदात ठेवण , अगत्याने नातेवाईकांच स्वागत करणं, सगळ्यांना आनंद देणं , समाधानानं खाऊ पिऊ घालन , कोणाला दुःख न देणं , हे सगळं तर करताच ना !! मग मला यातच तर आनंद आहे !! मी तर नेहमीच तुमच्या घरातच असते ग !!कधी पाहुण्याच्या रुपात , कधी तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या रुपात , कधी तुमच्या मित्रपरिवाराच्या रुपात !!! मग या सगळ्याच तुम्ही ज्या आपलेपणाने करता ना त्यातच तर मी खुश आहे !!!त्यांच्या रुपात तुम्ही मला सुख ,समाधान देत असता !!!आणि हे सगळं करत असताना तुम्ही कधी थकत नाही!!अविश्रांतपणेपण तुमचं कर्तव्य पार पाडत असता आणि हे सगळं करत असताना आपल्या शरीराला पण विश्रांती हवी ना !!! म्हणून लेकिना सक्तीची विश्रांती मिळावी म्हणून मीच ही युक्ती करते !!! जेणेकरून तुम्ही मुली जरा निवांत दोन दिवस तरी शांत बसावं तुम्हांला थोडी विश्रांती मिळावी हाच त्यामागचा शुद्ध उद्देश!!
भुकेल्याला अन्न देणं, तहानलेल्या पाणी देणं , मोठयांचा आदर करणं , दुसऱ्याच्या सुखात जेवढ्या आपलेपनाणं सहभागी होता तेवढ्याच आपलेपणाने दुःखात पण त्यांना साथ देणं , अंतःकरण शुद्ध हेतूने भरलेलं असणं , सुखात ,दुःखात आपला समतोल ढळू न देणं ,सत्याच्या मार्गावर अविरत चालत राहणं, निरपेक्ष भावनेनं प्रत्येकाला प्रेम देत राहणं,जे आहे त्यात समाधानी राहणं हेच तर हवं असत मला . आणि अशा घरात माझं कायम वास्तव्य असत!!! . त्यामुळे मनात कोणतीही शंका आणू नको .आता मनातले सगळे विचार काढून टाक आणि शांतपणे झोप बरं !!!
आज गौराईच हे बोलणं ऐकून तिचं मन आपोआपच शांत झालं . आपण उगाचच असले विचार करत बसलो परमेश्वर जे करतो त्यातच तर आपलं कल्याण असत हे ती क्षणभर विसरली होती . तिने गौराईला गच्च मीठी मारली . गौराईन प्रेमानं तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवला आणि आपल्या मांडीवर डोकं घेऊन तिला कमालीच्या शांत झोपेच्या आधीन केलं …….
सकाळी उठल्यावर एक वेगळ्याच उत्साहात तिनं आपल्या दिवसाची पुन्हा नव्याने सुरुवात केली पुन्हा नव्याने पुढची वाटचाल करण्यासाठी आज गौराईन आपल्या लेकीला एक मोलाचा सल्ला आणि आशिर्वाद देऊ केला होता ………

– लेखन : सविता कोकीळ. इचलकरंजी
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
छान लेख सविताजी 👌👌👌
प्रसंग कोणताही असो आपल्या सकारात्मक विचारांनी त्याच्यावर मात करून आनंदी रहात आल पाहिजे, हे नक्की !!! सोच बदलो जीवन बदलेगा 👍👍