अशोक घैसास एक पुस्तकांवर प्रेम करणारा, त्यांचे वाचन करणारा संवेदनशील माणूस. रिझर्व्ह बँकेतून रिटायर झाल्यावर नाशिकला स्थायिक झाला. पुस्तके वाचता वाचता इतरांशी पुस्तकांविषयी भरभरून बोलायचा. कुणी त्याविषयी आस्था दाखवली तर त्यांना पुस्तके आणून द्यायचा. त्यातून मग त्याचा घरपोच पुस्तकांचा व्यवसायच सुरू झाला.
मी सुध्दा त्याच्या शिफारशी वरून कांही पुस्तके घेतली होती. मध्यंतरी वर्ष दीड वर्ष गाठभेटच झाली नव्हती.
परवा अचानक फोन आला “देशपांडे, मी घैसास बोलतोय” चटकन रेफरन्स लागला नाही. माझा फोन बदलल्यामुळे फोनही सेव्ह नव्हता. पण बोलता बोलता रेफरन्स लागला. अन मी कम्फर्टेबली बोलू लागलो.
“बोला घैसास इतक्या दिवसांनी कशी काय आठवण काढलीत ?”
“देशपांडे तुम्ही अवयवदान या विषयावर एक पुस्तिका प्रकाशित केलीय
‘अजूनही जगायचंय….,’ व ती मी पहिलीय.
ती तुम्ही केवढ्याला विकता ? ,”
“मी त्या पुस्तकावर लिहिलंय देणगीदार व कार्यकर्त्यांसाठी मोफत. १०० रु देणगी देणारा देणगीदार व अवयवदानाचे ५० भरलेले फॉर्म देणारा कार्यकर्ता अशांना तसेच विविध संस्थाना मी या पुस्तिका मोफत देतो. पण तुम्हाला पाहिजे का ?”
“होय मला पाहिजे पण मोफत नको. मला शंभर प्रति विकत घ्यायच्यात. “
“शंभर ?”
“ होय, शंभर. माझी पत्नी १७ वर्षा पूर्वी किडन्या खराब झाल्याने वारली. त्यावेळी किडनी ट्रान्सप्लांट साठीची पद्धत व रक्कम खूपच जास्त व न परवडणारी होती. डायलिसिसची जीवघेणी ट्रीटमेंट व तिचा दुःखद मृत्यू हे दोन्ही दुर्दैवी प्रकार माझ्या वाट्याला आले त्यामुळे आपल्या कार्याची व त्या विषयीच्या प्रचाराची गरज मी ओळखून आहे. म्हणूनच माझ्या पत्नीचे श्राद्ध पारंपारिक पद्धतीने न करता आपली १०० पुस्तके विकत घेऊन ती लोकांना मोफत वाटून माझ्या पत्नीचे श्राद्ध करण्याची माझी इच्छा आहे.“
मलाही गदगदून आले. काय बोलावे हे सुचेना. एक आवंढा गिळून मी म्हणालो, “घैसास तुम्ही १०० पुस्तके घेऊन जा. आणि द्यायचे तेवढे पैसे द्या. कारण मी फुकट दिली तरी तुम्ही घेणार नाही.”
कालच येऊन घैसास, ५०००/- रुपये रोख देऊन पुस्तके घेऊन गेले.
या मुलखावेगळ्या श्राद्धाला आपण दाद द्याल याची खात्री आहे. घैसास यांच्या कृतीला सलाम !!!

– लेखन : सुनील देशपांडे. ज्येष्ठ कार्यकर्ते,
अवयवदान चळवळ, नाशिक
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

देशपांडे जी, आपण फार मोठे कार्य करीत आहात. घैसास जी, कालानुरूप प्रथा बदलून पाळलीत, खूप कौतुक!
काय बोलावे ! शब्दच नाहीत. घैसास यांनी आपल्या सहचारिणीचे रचलेले श्राद्ध साऱ्यांना प्रेरणादायी ठरेल ! 🙏🌹
सौ.वर्षा भाबल.
निशब्द