Friday, December 26, 2025
Homeकलामाझी बाग ( २ )

माझी बाग ( २ )

वाघ दाताची कोरफड
कोरफडीचा हा प्रकार साधारण सात ते आठ महिन्यापूर्वी घरी आणला. आल्यापासून आहे तसाच दिसत होता. पण बाजूला एक छोटासा कोंब डोकावत होता. याच्याच मुळ्यांपासून नवीन रोप झाले होते.
संकेत स्थळावर माहिती शोधली तर समजले की याची वाढ कसलीही गडबड न करता हळू हळू होत असते. त्यामुळे या वाघाच्या दाताच्या कोरफडीत काही बदल दिसत नव्हता बहुतेक.

Tiger tooth aloe असे इंग्रजी नाव असलेल्या या कोरफडीस आपण आपल्या पुरते वाघाच्या दातांची कोरफड म्हणू या. जाणकारांना मराठी नाव माहिती असेल तर ते त्यांनी कृपया सांगावे.

हा प्रकार रसाळ वनस्पतीचा (succulent) असल्यामुळे यालाही पाणी जास्त चालत नाही. पण दुर्लक्ष करनेही योग्य नाही. आवश्यक ती काळजी घ्यावीच लागते.
तीन महिन्यापूर्वी मी याचे घर बदलले (repotting). आधी पेक्षा जराशा मोठ्या कुंडीत व्यवस्थित रोपण केले. आणि आठ ते दहा दिवसातच या रोपात वेगळी हालचाल जाणवली.लक्ष देवून पाहिले तर ती एक नवीन सुरुवात होती. कळीच्या रुपात ! फुलाची येण्याची तयारी.. हा प्रवास उत्कंठा वाढविणारा होणार होता हे मात्र तेव्हा माहिती नव्हते.

मला वाटत होते की माझ्या फुलांच्या पाचशेव्या चारोळीला हे फुल फुलावे पण माझी ही अपेक्षा चुकीची होती. कदाचित माझ्या अपेक्षेमुळे मला
“कळी ते फुल” हा प्रवास लांबचा वाटला. निसर्गच तो.. त्याच्या वेळेनुसारच त्या त्या गोष्टी होणार !!
तो देठ उंच जात होता. देठाच्या टोकाला अगदी नाजूक कळ्यांचा तुरा येत होता. हा देठ वाढत वाढत एका फूटापर्यंत गेला. नाजूक अबोली रंगाच्या नरसाळ्यासारख्या कलिका रोज वाढत होत्या.

एके दिवशी माझी प्रतीक्षा संपवून मला सुप्रभात म्हणायला सकाळसकाळी ही फुले फुलली. प्रभात प्रसन्न झाली ! आधी खालच्या बाजूची फुले फुलली. नंतर वरची फुलत गेली. नाजूक कळ्यांच्या नाजूक पाकळ्यांनी मनोहर मनोरा सजून गेला होता. हळू हळू फुले सुकतील तशी त्यांचे तोंड वरच्या दिशेला होत होती.

निसर्गाचे देणे कोणत्याही रूपात असो काहीतरी शिकवून जाते. कोणतीही चांगली गोष्ट हवी असेल तर त्याला वेळ द्यावा लागतो, संयम बाळगावा लागतो.. याची प्रचिती आली.

मनीषा पाटील

– लेखन : सौ. मनिषा दिपक पाटील. पालकाड, केरळ
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

अलका वढावकर ठाणे on माझी जडणघडण : ७८
पुष्पा कोल्हे on “अनोखी स्नेह भेट”