सब कुछ सिखा हमने ….
गीत : सब कुछ सिखा हमने
चित्रपट : अनाड़ी (१९५९)
दिग्दर्शन : हृषिकेश मुखर्जी
गीतकार : शैलेंद्रB
संगीतकार : शंकर, जयकिशन
कलाकार : राज कपूर, नूतन
गायक : मुकेश
सब कुछ सीखा हमने ना सीखी होशियारी
सच है दुनिया वालों कि हम हैं अनाड़ी
ज्या गाण्यासाठी मुकेश यांना फिल्मफेअरचे सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक आणि शैलेंद्र यांना सर्वोत्कृष्ट गीतकार हे पारितोषिक मिळाले होते, त्या गाण्याबद्दल आज मी लिहायचे ठरवले आहे. हे गाणे माझ्या एका मामाने केलेली फरमाईश आहे.
खरं सांगू, या लेखमालेच्या माध्यमातून नातेवाईक, मित्र – मैत्रिणी यांना मी नव्याने ओळखत जात आहे, याची जाणीव होऊ लागली आहे. मला आवडणारी आणि भावणारी गाणी त्यांनाही तितकीच आवडत आहेत हे जाणण्यात एक वेगळीच गंमत आहे ! तेच नाते आपल्याला नव्याने उलगडते आहे, यात वेगळाच आनंद असतो !
जसे माझा मामा, ज्येष्ठ कवी, श्री.अरुण तुळजापूरकर यांनी म्हटले आहे, “या गाण्याच्या अर्थ बघितला तर आपल्यालाच उद्देशून लिहिले आहे की काय असे वाटते.” हे गाणे ऐकणाऱ्या असंख्य श्रोत्यांना आणि मलाही तसेच वाटते.
या गाण्याबद्दल बोलताना न्यूजस्टोरीटुडे चे संपादक, श्री. देवेंद्र भुजबळ यांनी थोडे सविस्तर पण प्रांजळ मत मांडले. “सब कुछ सीखा हमने” या गाण्याबद्दल मला नेहमी असे वाटत आले आहे की, हे गाणे तंतोतंत मला लागू पडते. त्यामुळे माझे ते अतिशय आवडते गाणे आहे. पदोपदी आलेल्या/येणाऱ्या अनुभवांमुळे हे गाणे माझ्या मनात सतत घोळत असते. पूर्वीपेक्षाही आता या मतलबी, स्वार्थी जगात, नातीगोती, मैत्री यांना क्षुद्र व्यावहारिक फायद्यापुढे पायदळी तुडविणाऱ्या आजच्या जगात तर ते अधिकच चपखलपणे बसते. हे गाणे खरोखर कालातीत आहे. ते गीतकार, त्यांचे बोल इतक्या प्रभावीपणे पोहोचविणारे गायक, संगीतकार, वादक खरोखरच सर्वच महान आहेत.”
राज कपूर आणि मुकेश या जोडीने अनेकानेक हिट गाणी दिली. या गाण्याचे गायक मुकेश चंद माथूर
(२२ जुलै १९२३ – २७ ऑगस्ट १९७६), मुकेश या नावाने प्रसिद्ध झाले. ब्रिटिश इंडियाच्या दिल्ली संस्थानात जन्मलेले मुकेशजी तरुणपणी सेहगल यांच्या आवाजाने प्रभावित होऊन त्यांच्या सारखेच गाऊ लागले होते. दहा भवांडातले सहाव्या नंबरवर ते होते. मोठ्या बहिणीची संगीत शिकवणी शेजारच्या खोलीतून ऐकत ते संगीत शिकत गेले.
मुकेशने लक्षाधीश रायचंद त्रिवेदी यांची मुलगी सरल त्रिवेदीशी २२ जुलै १९४६ रोजी, मोतीलाल यांच्या मदतीने, पळून जाऊन लग्न केले. या जोडप्याला पाच मुले होती – रिटा, गायक नितीन, नलिनी (मृत्यू – १९७८), मोहनीश आणि नम्रता (अमृता). अभिनेता नील नितीन मुकेश हा मुकेश (नितीनचा मुलगा) यांचा नातू आहे.
१९४० च्या दशकात, ते बहिणीच्या लग्नात गाणे गात असताना त्यांचे एक नातेवाईक आणि प्रख्यात अभिनेते, मोतीलाल जी, यांनी त्यांचे गाणे ऐकून त्यांना मुंबईला आणून संगीताची तालीम दिली. लवकरच मुकेशजीनी स्वतः गायन करून अभिनय करायला सुरुवात केली. एका चित्रपटाचे निर्माता देखील झाले. मग हळूहळू त्यांनी पार्श्वगायनावर लक्ष केंद्रित केले. १९५० ते १९६० च्या सुवर्ण काळात मुकेश आणि राज कपूर हे समीकरण बनून गेले. या गाण्याने त्यांना पहिले फिल्मफेअर अवॉर्ड मिळाले. त्यांच्या दर्दभऱ्या आवाजामुळे “ट्रॅजेडी किंग”, “मिलेनियमचा आवाज”, अशी बिरुदे त्यांना मिळाली.
कभी कभी मेरे दिल में खयाल आता है, हे त्यांचे शेवटचे प्रसिद्ध गाणे. त्यानंतर एका संगीत मैफिलीसाठी अमेरिकेत डेट्रॉईट येथे गेलेले असताना त्यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूबद्दल ऐकून त्यांच्याशी घनिष्ठ संबंध असलेले राज कपूर यांनी “माझा आवाज गेला !” असे उद्गार काढले. हेच त्यांच्या नात्याचे द्योतक होते.
हिंदी चित्रपट सृष्टीत कपूर घराण्याचे नाव रोशन करणारा अभिनेता, चित्रपट निर्माता आणि चित्रपट दिग्दर्शक राज कपूर (जन्मनाव सृष्टीनाथ कपूर) यांना रणबीर राज कपूर म्हणूनही ओळखले जाते. (१४ डिसेंबर १९२४ – २ जून १९८८) ब्रिटिश इंडियाच्या फ्राँटियर प्रोविन्स मध्ये पेशावर येथे त्यांचा जन्म झाला. त्यांचे आई-वडील पृथ्वीराज कपूर आणि रामसरणी देवी कपूर होते. शम्मी कपूर आणि शशी कपूर त्यांचे भाऊ होते. १२ मे १९४६ रोजी राज कपूर यांनी कृष्णा मल्होत्रासोबत लग्न केले. त्यांना ३ मुले (रणधीर, ऋषी, राजीव) आणि २ मुली (रितू नंदा, रीमा जैन) होत्या. त्यांना तीन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि ११ फिल्मफेअर पुरस्कारांसह अनेक पुरस्कार मिळाले. फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार कपूर यांच्या नावावर आहे. त्यांनी आवारा (१९५१) आणि बूट पॉलिश (१९५) या दोन चित्रपटांची निर्मिती केली, जे कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये पोचले होते. आवारा मधील त्यांच्या कामगिरीला टाइम मासिकाने “टॉप-टेन ग्रेटेस्ट परफॉर्मन्स ऑफ ऑल टाइम इन वर्ल्ड सिनेमा” म्हणून स्थान दिले. त्यांना पद्म भूषण (१९७१) आणि दादासाहेब फाळके पुरस्कार (१९८७) प्रदान करण्यात आले. त्यांचा मृत्यू, दादासाहेब फाळके पुरस्कार समारंभात प्रकृती बिघडून अस्थमा संबंधी आजाराने झाला.
आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध असलेला हा अभिनेता (रशिया मध्ये तर अक्षरशः आजही त्यांना दैवत मानले जाते !) आपल्या सुवर्णमय कारकीर्दीत सगळे काही शिकला, पण या गाण्यातल्या सारखा आपले हृदय मात्र सांभाळण्यात अनाडी ठरला, हेच खरे !
नूतन समर्थ बहल (४ जून १९३६ – २१ फेब्रुवारी १९९१), चित्रपट निर्माते कुमारसेन समर्थ आणि चित्रपट अभिनेत्री शोभना समर्थ यांच्या पोटी मुंबईत जन्मली. नूतनने वयाच्या १४ व्या वर्षी तिच्या आईने दिग्दर्शित केलेल्या “हमारी बेटी” या चित्रपटातून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली.
सुमारे चार दशकांच्या कारकिर्दीत, ७० हून अधिक चित्रपटांमध्ये मुख्यतः एक नायक म्हणून रुपेरी पडद्यावर झळकलेली ही अभिनेत्री, भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखली जाते. त्यांनी १९५१ साली “मिस इंडिया” टायटल जिंकले होते. त्यांच्या आईने त्यांना स्वित्झर्लंडला एक वर्ष फिनिशिंग स्कूल मध्ये शिक्षणासाठी पाठवले होते. त्या एक प्रशिक्षित गायिका पण होत्या. त्यांनी पेईंग गेस्ट या चित्रपटात स्वतःसाठी पार्श्वगायन केले होते. राज कपूर, देव आनंद, धर्मेंद्र, दिलीप कुमार सारख्या दिग्गज अभिनेत्यांसोबत काम करायला मिळाले.
सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी विक्रमी पाच फिल्मफेअर पुरस्कार आणि १९७४ मध्ये भारत सरकारने दिलेले पद्मश्री यांचा समावेश आहे. “मेरी जंग” मधील अभिनयासाठी त्यांना सहावा आणि शेवटचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला, यावेळी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री श्रेणीत.
नूतनने १९५९ नौदल लेफ्टनंट-कमांडर रजनीश बहल यांच्याशी लग्न केले होते. त्यांचा एकुलता एक मुलगा, मोहनीश बहल, चित्रपट आणि टेलिव्हिजन अभिनेता आहे. १९९१ मध्ये स्तनाच्या कर्करोगाने नूतन यांचा मृत्यू झाला. पण आपल्याला कॅन्सर झाला आहे हे समजल्यावर त्या म्हणाल्या की, यातूनही काहीतरी चांगले होणार असेल ! हा दुर्दम्य आशावाद आणि ही सकारात्मकता आपण सगळ्यांनीच शिकली पाहिजे.
नूतनजींना रायफल चालवायला त्यांच्या पतीने शिकवले होते आणि त्यांचे चित्रीकरण नसले की दोघेही शिकारीवर जात असत. पण हे ही तितकेच खरे की नूतनजीना प्राणी खूप आवडायचे. त्यांच्याकडे एके काळी २२ पाळीव कुत्री होती.
या गाण्यातल्या शेवटच्या कडव्यातल्याप्रमाणे असली चेहरा कोणता ते कळणे खरेच अवघड !
“अनाड़ी” हा १६ जानेवारी १९५९ चा हृषिकेश मुखर्जी दिग्दर्शित बॉलीवूड कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटात राज कपूर, नूतन, मोतीलाल आणि ललिता पवार यांच्या भूमिका आहेत. संगीत शंकर जयकिशन यांचे होते आणि हसरत जयपुरी तसेच शैलेंद्र यांचे गीत होते. हा एक चित्रपट होता ज्यात ललिता पवार यांनी सकारात्मक भूमिका केली होती आणि मोतीलाल यांनी थोड्या ग्रे शेड्स् असलेली भूमिका केली होती. हा चित्रपट तमिळमध्ये “पासमुम नेसामुम” आणि तुर्कीमध्ये “एनाय” म्हणून पुनर्निर्मित करण्यात आला.
आमच्या किंवा आमच्या मागच्या पिढीमधील कोणालाही “अनाड़ी” या चित्रपटाबद्दल किंवा या गाण्याबद्दल माहीत नसेल असे शक्यच नाही. तरी पुढच्या पिढीसाठी आणि आपल्या उजळणीसाठी या चित्रपटाची कथा थोडक्यात देते.
राज कुमार (राज कपूर) हा एक प्रामाणिक, देखणा आणि हुशार तरुण असतो. केवळ एक चित्रकार म्हणून काम करून, तो घरभाडे देऊन उदरनिर्वाह करू शकत नसतो. एके दिवशी, राजला पैसे असलेले पाकीट सापडते आणि त्याचे मालक श्री. रामनाथ (मोतीलाल) यांना परत करतो. रामनाथ राजचे कौतुक करतात. त्याच्या प्रामाणिकपणामुळे ते राजला त्यांच्या कार्यालयात कारकून म्हणून घेतात. राज रामनाथ यांच्याकडे काम करणाऱ्या आशाला (नूतन) भेटतो आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडतात. जेव्हा राजला कळते की आशा खरे तर आरती आहे, जी रामलाल यांची भाची आहे, तेव्हा आशाने आपल्याला फसवले असे त्याला वाटते.
दुर्दैवाने, त्याची घरमालकिण श्रीमती डिसा (ललिता पवार) यांचा श्री रामनाथ यांनी उत्पादन केलेले औषध खाल्ल्याने अचानक मृत्यू होतो. पोलिस शवविच्छेदन करतात आणि परिणामी, मिसेस डिसा यांना कोणीतरी विष दिले असा निष्कर्ष काढतात. पोलीस मुख्य संशयित म्हणून राजला चौकशीसाठी घेतात, अटक केली जाते आणि तुरुंगात ठेवले जाते. तथापि खटल्यात रामनाथ संपूर्ण जबाबदारी स्वीकारतो आणि राजची निर्दोष मुक्तता होते. शेवटी आरती राजला सांगते की तिने मिसेस डिसा यांना वचन दिले की ती त्याची काळजी घेईल. म्हणजे ते लग्न करतील असा आपल्याला संकेत मिळतो !
ललिता पवार या हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीत आपल्या नकारात्मक भूमिकांसाठी प्रसिद्ध आहेत. पण या चित्रपटात त्यांची अतिशय सकारात्मक, मायाळू मिसेस डिसा ची भूमिका आहे, ज्यासाठी त्यांना फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार प्राप्त झाला.
शुभा खोटे यांनी आरतीची मैत्रीण आशाची भूमिका अतिशय उत्तम रित्या पार पाडली आहे. घराची नोकर आणि आरतीची मैत्रीण या दुहेरी भूमिकेच्या सीमा त्यांनी छान सांभाळल्या आहेत.
इंदर राज आनंद यांनी कथा, पटकथा आणि संवाद यात कमाल केली आहे. किती तरी संवाद लोकांना तोंडपाठ आहेत. जसे की: मिसेस डिसा त्याला मदत केल्यावर उगीच त्याला लटक्या रागाने बोलतात, “हमने बहुत देखा तुम्हारे माफिक.” त्यावर राज म्हणतो, “हमने तो एक भी तुम्हारे माफिक नहीं देखा !” मदत करून आपण नामानिराळे राहणे कोणी त्यांच्याकडून शिकावे आणि रागावण्या मागची काळजी बघणे कोणी राज कडून शिकावे ! किंवा आरतीचे काका जेव्हा म्हणतात, “गरीब क्लार्क में कोई बुराई नही, बुराई गरीबी में हैं। गरीबी ने तुम्हारे मां बाप को मुझसे छीना था। और अब लाख रूपये देकर भी मैं वह वक्त वापिस नहीं ला सकता।” परिस्थिती खराब असते, माणूस नाही, हा केवढा मोठा उपदेश एका छोट्या संवादातून देतो हा चित्रपट !
आणि आरतीच्या वाढदिवसाला जेव्हा राजला सत्य समजते तेव्हा शेजारी उभा असलेला एक माणूस म्हणतो, “रामनाथजी भी कितने मजाकिया हैं ! केक भी लाए हैं तो दिल के शकल का !” यावर राज म्हणतो, “जी हां ! और देखिए ना कोई दिल पर छुरी चला रहा है !” इतका साधा संवाद ! राज कपूरचा संयत अभिनय फसवल्याची भावना किती सहजपणे दाखवली गेली याही संवादातून.
याच प्रसंगानंतर आरतीच्या काकांच्या आग्रहास्तव आणि आरतीच्या खुशीसाठी राज हे गाणे म्हणतो. या गाण्यातून तो आपल्या सगळ्या भावना तिच्यासमोर मांडतो. त्याचे तिच्यावर असलेले जीवापाड प्रेम, पैशाच्या खेळात तेच प्रेम हरल्याची वैफल्याची भावना, फसगत झाल्यावर तुटून पडलेले हृदय, आपला भोळेपणा, आणि त्याचा घेतलेला दूनियेकडून फायदा, सगळेच काही मिनिटात तिच्यासमोर मांडतो. जणू काही दुःखाच्या ताटात वेगवेगळ्या दुःखाच्या अनुभव रुपी चवींचे पदार्थ मांडावेत !
सब कुछ सीखा हमने ना सीखी होशियारी
सच है दुनिया वालों कि हम हैं अनाड़ी
सगळे काही शिकलो बुआ, पण हुशारीने, चलाखीने या जगात कसे वावरावे हे मात्र शिकलो नाही मी. खरंच लोक म्हणतात तसा मी अडाणी आहे अगदी! साधा, सरळ, सहज प्रत्येकावर विश्वास ठेवतो, जे आहे ते खरे बोलतो आणि वागतो. सगळ्यांवर पटकन विश्वास ठेवतो आणि सगळे चांगलेच आहेत असेच समजतो.
दुनिया ने कितना समझाया, कौन है अपना कौन पराया
फिर भी दिल की चोट छुपा कर, हमने आपका दिल बहलाया
खुद ही मर मिटने की ये ज़िद है हमारी, सच है दुनिया वालों…
या जगाने मला खूप समजावले, कोण आपले आहे, कोण परके आहे, पण मला काही समजले नाही. म्हणून तर मी इतरांकडून दुखावला जात राहिलो. पण मला हसून आपल्या हृदयावरची जखम चांगली लपवता येते. माझे अश्रू लपवून मी तुला आनंद मिळावा म्हणून सोंगे रचत राहिलो. किती वेडा आहे ना मी? स्वतःलाच फसवून, स्वत्व घालवून जगण्याचा कसला हट्ट घेऊन बसलोय कोण जाणे ? बरोबर आहे लोकांचे की मी अगदी अडाणी, अज्ञानी आहे.
दिल का चमन उजड़ते देखा, प्यार का रंग उतरते देखा
हमने हर जीने वाले को, धन दौलत पे मरते देखा
दिल पे मरने वाले मरेंगे भिखारी, सच है दुनिया वालों…
माझ्या हृदयाची फुललेली बाग उजाड झालेली बघितली आहे मी. प्रेमाचे रंग उतरलेले बघितले आहेत मी. प्रत्येक जिवंत माणसाला संपत्तीसाठी तडफडताना पाहिले आहे. पण जे हृदय जाणून, प्रेमासाठी आपले आयुष्य अर्पण करतील ते मात्र कफल्लक, भिकारी बनून मरतील. कारण पैशालाच किंमत देणाऱ्या जगात प्रेमाला किंमत देणाऱ्या माणसाची किंमत शून्यच असते, नाही का ?
असली नकली चेहरे देखे, दिल पे सौ सौ पहरे देखे
मेरे दुखते दिल से पूछो, क्या क्या ख्वाब सुनहरे देखे
टूटा जिस तारे पे नज़र थी हमारी
सच है दुनिया वालों…
खरे खोटे सगळे चेहरे बघितले आहेत मी. मला फसवणाऱ्या लोकांची कमी थोडीच आहे ? भोळा भाबडा सरळ माणूस दिसला की त्याला या निर्दयी दूनियेने ओरबाडलेच म्हणून समजा. माझ्या दुःखी मनाला विचारा ना, कोणकोणती सोनेरी स्वप्ने बघितली आणि कशी ती मातीमोल झाली ? कळेल सगळे तुम्हाला. अहो, शेवटी हे होणारच होते. मला कुठे माहीत होते की ज्याच्यावर माझे हृदय भाळले आहे, तो तर एक आसमानी तारा आहे ? एक असा तारा जो जणू एक मृगजळ होता. त्याच्यावर नजर पडताच मायेचा पटल दूर झाला आणि तो तारा बघता बघता नजरेसमोर गळून पडला. प्रेम करणे हे एक मृगजळ आहे आणि जिच्यावर मी प्रेम केले तो एक तारा. सगळेच संपले आता. आधीच कळायला हवे होते. खरं बोलतात लोक की मलाच काही समजत नाही.
साधेच कथानक, पण इतके सुंदर लिहिले आहे! राज कपूर यांचा सहज सुंदर रोमँटिक अंदाज, नूतन यांची उत्तम प्रतिभा आणि सोज्वळ सौंदर्य! ललिता पवार यांचा जबरदस्त अभिनय आणि नूतनच्या मैत्रिणीच्या भूमिकेत उत्तम साथ शुभा खोटे यांची ! सुंदर गीते आणि रेंगाळणारे संगीत असलेली गाणी. हृषीदा यांना त्यांच्या अप्रतिम दिग्दर्शनासाठी सलाम. साधी सोपी कथा प्रभावीपणे सादर करण्यात त्यांचा हातखंडा! एकुणात सगळीच भट्टी उत्तम जमल्याने हे गाणे आणि हा चित्रपट साठ वर्षांहून अधिक काळ जाऊनही जनमानसात आजही तेच स्थान टिकवून आहे ! Classics will be classics after all !

– लेखन : तनुजा प्रधान. अमेरिका.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ +919869484800

खूपच छान 👌👌👌👌
खूप खूप धन्यवाद संगीता ताई!🙏🌺🌿