सध्या सुरू असलेल्या ‘पितृपक्ष’ निमित्ताने एक हलकी फुलकी कविता….
दोन कावळे झाडावर
बोलत होते मजेने
पुसत होते एकमेकां
काय खाल्ले चवीने
एक म्हणाला कंटाळलो
तेचतेच रोज खाऊन
खीरपुरी गवार भोपळा
कडू कारलं नि कढी पिऊन
आपल्या रंगाला शोभणारी
आंबट गोड चटणी काय
खुसखुशीत खमंग ऐसा
भाजणीचा वडा नि काय
माणसंसुध्दा लबाड अशी
खीर ओरपतात गोडशी
पण कडू भाजी कारल्याची
लावत नाहीत तोंडाशी
खरंच बाबा ती कडू भाजी
मलासुध्दां नाही आवडत
चोचसुध्दां अशा पदार्था
चुकुनही मी नाही लावत
अरे पण अशान तूं
करतो आहेस ना विश्र्वासघात
आत्मे राहतील उपाशी
त्यांना कां तू देतोस ताप?
अरे बाबा आपण खाल्ले की
आत्मे होतात तृप्त
हा माणसांना होतो आभास
पण प्रत्यक्षात तर ते होतात तृप्त
घेऊन नुसताच वास
पण आता मला एक सांग
या दिवसात हेच पदार्थ
याचा कोणी लावला शोध ?
कां मेलेल्यांच्या आत्म्यांनी
स्वप्नात येऊन केलाय बोध ?
पूर्वीच एक ठीक होतं
फास्टफूडचा नव्हता जमाना
त्यांनी कधी चाखलंच नव्हतं
रगडा पॅटीस चाट मसाला
पण आमच्यासुध्दां बदलल्या चवी
बदलला आहे खानाखजाना
मग पितृपक्षातसुध्दां आता
थोडा बदल करून पहा ना
खीरपुरी ऐवजी
पावभाजी कां नाही
कां वाढत नाही कुणी
चायनीज नि फ्राईडराईस?
अरे, एकदांच वाढून बघा
आजी आजोबा होतील खूष
तोंडाला त्यांच्या सुटेल पाणी
नि आशिर्वाद देतील खूप खूप

– रचना : स्वाती दामले.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

हलकी फुलकी कविता
Swatitai kharach vichar karnya sarkha.