उधारीचे गोकुळ – ४
मुलं का घाबरतात ? का अशी अवघडून वावरतात ? का त्यांना सारखं बोलतं करावं लागतं ? आज काहीही वेगळं घडलं नसतं तरी मुलं आताच काहीतरी भयानक घडलय अशी का वागतायात ?
या सगळ्या प्रश्नांची उत्तर शोधण्यासाठी त्यांच्या भूतकाळात जावं लागणार. बालपणी कुठला एखादा आघात किंवा घटना त्यांच्या आजच्या या वागणुकीला कारणीभूत आहे याची माहिती मिळाल्यास आपण त्याला समजून घेऊ शकतो. आणि त्यावर उपाय पण शोधू शकतो.
आरतीचं ताट बघून कान्हा आणखी आणखी घाबरु लागला. अस्वस्थ होऊ लागला. मी त्याला मागे थांबायला सांगितलं. आरती झाल्यावर सगळ्यांनी पुढे येऊन आरती घेतली. पण कान्हा पुढे आला नाही म्हणून बाई आरती घेऊन कान्हा जवळ जाऊ लागल्या. त्यावेळी कान्हा दारामागे जाऊन लपला. कान्हाच्या वागण्याचं सगळ्यांना आश्चर्य वाटलं. काही मुलं कान्हा वर हसू लागली. बाईंनी आरतीचं ताट दुसऱ्या मुलाच्या हातात दिलं. आणि कान्हा ला घाबरु नको असं सांगून खाली बसायला सांगितलं. सगळी मुलं खाली बसली. सगळ्यांना प्रसाद वाटण्यात आला. कान्हाने सगळा प्रसाद एका कागदाची पुडी करून आपल्या खिश्यात ठेवला. थोडा देखील खाल्ला नाही.
गणपती स्थापनेचा कार्यक्रम संपल्या नंतर मी कान्हाला सांगितलं की, मी वस्तीतच जात आहे त्याला पण सोडून देईल त्याच्या आई कडे. कान्हा लगेच तयार झाला. शाळे समोरचा रस्ता ओलांडताना कान्हा ने माझा हात घट्ट धरला होता. रस्ता ओलांडून झाल्यावर मी त्याच्या हातावराचे डाग लक्षपूर्वक बघत होते. कान्हाच्या ते लक्षात येत होतं. त्या फुला सारख्या हातावर इतक्या निर्दयीपणे जखमा करणं क्रुरतेची सीमा होती. मी त्याच्या हाताकडे बघत असताना कान्हा ने आपला हात सोडवून घेतला नाही. मी कान्हा ला विचारलं, “दुखतं का आता ?” कान्हा म्हणाला, “नाही दुखत. तेंव्हा खूप आग होत होती. बाबा हातावर सिगारेट घासायचे तेंव्हा.” कान्हा पुढे काही बोलला नाही. मी पण शांत होते थोडा वेळ.
मग कान्हाला म्हणाले, “शाळेत रोज जायचं. शाळा पूर्ण केली तर, तुझं छान होईल सगळं. मग कोणी तुला कसला त्रास देणार नाही. या वस्तीत पण राहावं लागणार नाही.” माझ्या शेवटच्या वाक्यावर कान्हाने भुवया वर करून मला विचारलं, “इथे नाही राहावं लागणार ?” मी कान्हा ला नाही असं सांगितलं.
मग तो कसल्या विचारात गुंग झाला माहिती नाही. आम्ही त्याच्या खोली पर्यंत पोहोचलो. पण दाराला कुलूप होतं. कुलूप बघून कान्हा म्हणाला, “आई पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या भरायला गेली असणार. आजीच्या वस्तीत. “मग आम्ही विहारात गेलो. तिथे कान्हा ने मुलासोबत बसून चित्र काढली. रंग आणि चित्रात कान्हा रमला होता. तो इतर मुलांशी फारसा बोलत नसे.
कान्हा ची आई समोरून पाण्याच्या बाटल्या घेऊन येताना दिसली. कान्हा लगेच धावत गेला आणि आईच्या हातातल्या दोन बाटल्या आपल्या हातात घेतल्या. दोघे परत माझ्याकडे आले आणि पाण्याच्या बाटल्या रांगेत लावून बसले. मी कान्हा ने काढलेली चित्र एकत्र केली आणि त्याच्या आईला दाखवली आणि त्याचं कौतुक केलं. त्याच्या सगळ्या चित्रात एक गोष्ट सारखी होती…….
क्रमशः

– लेखन : डॉ राणी दुष्यंत खेडीकर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800