गणपतीची कुशाग्र बुद्धी, लक्ष्मीची ऐश्वर्य संपन्नता व सरस्वतीची वाणी यांचा सुरेख संगम म्हणजे अमेरिकेत वास्तव करीत असलेल्या सौ. ऋतुजा दिनेशराव इंदापुरे-कोरडे होत.
सौ. ऋतुजाताई यांच्या भेटीचा योग माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे निवृत्त संचालक तथा न्युजस्टोरीटुडे पोर्टलचे संपादक श्री देवेंद्र भुजबळ यांच्या नवी मुंबईतील घरी अनपेक्षित पणे घडून आला.
सौ. ऋतुजाताई या गेल्या पंधरा दिवसांपासून भारतात त्यांच्या नातेवाईकांच्या भेटीगाठी घेण्यासाठी आल्या होत्या. काल त्या अमेरिकेला जाण्यासाठी नवी मुंबई मार्गे मुंबईला जाताजाता वेळात वेळ काढून सानपाडा येथे श्री देवेंद्रजी भुजबळ यांनी विनंतीवजा आग्रह केल्याने त्यांच्या घरी आल्या. ऋतुजाताई यांचे सोबत त्यांचे चिरंजीव तनुष व त्यांचे दोन चुलत भाऊ पण होते.

श्री देवेंद्र व सौ. अलकाताई भुजबळ यांच्याशिवाय याप्रसंगी श्री प्रकाशराव व त्यांच्या पत्नी सौ. शमाताई मांगले, श्री अवधुत व सौ. शोभाताई तिवाटणे, श्री लक्ष्मीकांत तांबट, डाॅ. सौ. जयश्रीताई लोखंडे व त्यांची दोन मुले आणि मी स्वतः म्हणजे लक्ष्मीकांत विभुते उपस्थित होतो.
नवी मुंबई कासार समाजातर्फे सौ. ऋतुजाताईंचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच श्री देवेंद्र व सौ. अलकाताई भुजबळ चालवित असलेल्या न्युजस्टोरीटुडे पोर्टलतर्फे एक छानसा ‘मग’ त्यांना भेट दिला.
सौ. ऋतुजाताईंचा आजवरचा संपूर्ण प्रवास थक्क करणारा आहे. त्यांचे माहेर पुण्यात तर सासर नागपूरला आहे. त्यांचे वडील श्री शिवाजीराव व आई सौ. विमलताई इंदापुरे हे दोघेही महाविद्यालयात प्राध्यापक होते. अशा या बुद्धिजीवी परिवारातील सौ. ऋतुजाताईना लहानपणापासूनच खेळाची विशेषतः बॅडमिंटनची खुप आवड होती. त्यासाठी पहाटे उठून धावणे व इतर व्यायाम करणे या गोष्टी त्या कटाक्षाने करीत होत्या.
आईच्या नोकरीमुळे सौ. ॠतुजाताईंचे बालपण नागपूर येथे गेले. त्यांनी हायस्कूलपर्य॔तचे शिक्षण तिथेच
घेतले. तर त्यापुढील महाविद्यालयीन शिक्षण पुणे येथे घेतले. त्यानंतर त्यांनी इंग्लंड मधून वकिलीतील मास्टर्स पदवी सुवर्ण पदकासह प्राप्त केली. त्यांनी एक वर्ष मुंबईला वकील म्हणून काम केले.
अशा या हरहुन्नरी व्यक्तिमत्त्वाला साजेशा जोडीदाराची साथ लाभली ती मुळचे नागपूर येथील रहिवासी पण अमेरिकेत स्थायिक श्री दिनेशराव कोरडे यांची. ते सध्या अमेरिकेत ॲमेझान कंपनीत उच्च पदावर कार्यरत आहेत. यांना एक मुलगी (इशा) व एक मुलगा (तनुष) अशी दोन अपत्ये आहेत.
सौ. ऋतुजाताई या अमेरिकेतील वॉशिंग्टन स्टेट मधील सम्मानीश सीटीच्या नवनिर्वाचित नगरसेविका आहेत . तसेच सियाटेल सन्मान योजनेच्या वॉशिंग्टन स्टेटच्या वूमेन कमिशनर असून काॅस्को या अमेरिकेतील आयटी क्षेत्रातील नामांकित कंपनीच्या त्या मॅनेजर देखिल आहेत. त्या उत्कृष्ट राष्ट्रीय बॅडमिंटन पटू असून बॅडमिंटन क्षेत्रात त्यांनी सुवर्णपदके प्राप्त करुन आपला वेगळाच ठसा उमटविला आहे. आणि विशेष म्हणजे त्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पीकर पण आहेत.
काही माणसं साधीच असतात पण त्यांच्या साधेपणात एक मोठेपणा असतो… विचारात एक तेज असते… बोलण्यात नम्रता असते.. वागण्यात सौजन्य असते.. आणि ह्रदयात असतो स्नेहाचा झरा..अशा माणसांपैकीच या ऋतुजाताई आहेत असे आम्हाला त्यांच्याशी गप्पागोष्टी करतांना प्रकर्षाने जाणवले.
अशा सर्वव्यापी चतुरस्र नेतृत्वाची काल ओळख झाली. अमेरिकेतील सामाजिक कार्य, निवडणूक प्रक्रिया, विविध देशांतील नोकरी निमित्ताने आलेले व स्थानिक अमेरीकन यांच्यातील संबंध अशा विविध विषयांवर भरपूर गप्पा रंगल्या.
त्यांना भारतातील आपल्या समाजाबद्दल काय वाटते हे जाणून घेतांना समाजाचे अध्यक्ष मा. शरदराव भांडेकर यांचे कारकीर्दीत सुरू असलेली कामे तसेच “मिशन प्रशासन” चे कार्य खुप चांगले असून आपल्या समाजातील होतकरू तरुणांनी याचा निश्चित लाभ करून घ्यावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
भेटीतील चर्चेत गप्पा एवढ्या रंगल्या की दोन तास कसे निघून गेले कळलेच नाही. सौ. ऋतुजाताईंना मुंबईहून अमेरिकेला जायचे असल्याने रंगलेल्या गप्पा आटोपत्या घेऊन परत एकदा त्यांना शुभेच्छा देऊन सर्वांनी निरोप दिला.
खरोखरच ऋतुजाताईंचे जीवन, कार्य सर्वांसाठी विशेषत: तरुण पिढी साठी खूपच अनुकरणीय आहे, हे निश्चितच जाणवले.

– लेखन : लक्ष्मीकांत विभुते. नवी मुंबई
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
ॠतुजाताई आपणास मनःपूर्वक शुभेच्छा.
आपण अशीच उत्तरोत्तर यशाची शिखरे सर करा, माझ्या सदभावना आपल्या सोबत कायम आहेत. ईश्वर आपणास उदंड आयुष्य देवो व आपले जीवन निरोगी तसेच सुख व समृद्धीमय होवो हिच गणपती बाप्पा चरणी प्रार्थना….
💐💐💐💐💐💐💐💐
खूपच छान…!
ऋतुजाताईंचं मनापासून अभिनंदन…!
छान माहिती दिल्याबद्दल लेखकांना धन्यवाद…!!
… प्रशान्त थोरात, पुणे कार्यवाह, गुरुकृपा संस्था.
9921447007
🌹हार्दिक अभिनंदन 🙏🙏🌹