Friday, December 26, 2025
Homeकलाचित्रसफर ( १४ )

चित्रसफर ( १४ )

सिलसिला
खूप गाजलेला “सिलसिला” हा चित्रपट रिलीज झाला होता, तारीख होती १४ ऑगस्ट १९८१. दिग्गज चित्रपट निर्माते दिग्दर्शक राज कपूर सिलसिलाच्या प्रीमियरमधून बाहेर आले आणि यश चोप्रा यांना म्हणाले, “प्रेम रोगमध्ये मी प्रणय चित्रित करत आहे, पण सिलसिलामध्ये तू कविता चित्रित केली आहेस”! दिग्दर्शक यश चोप्रा यांच्यासाठी ही सर्वात मोठी प्रशंसा होती.

या कलाकृतीची प्रत्येक फ्रेम रोमान्सच्या शैलीतील शेवटचा शब्द आहे. जेव्हा तुमच्याकडे अनुभवी दिग्दर्शक यश चोप्रा, सागर सरहर्दी यांचे लेखन, डॉ. हरिवंशराय बच्चन आणि जावेद अख्तर यांचे गीत, शिव-हरी यांचे संगीत आणि या चित्रपटासाठी सर्वोत्तम कलाकार असतील तेव्हाच हे साध्य होऊ शकते.

अमिताभ बच्चन, जया बच्चन, रेखा, संजीव कुमार, देवन वर्मा आणि खुलभूषण खरबंदा. एकाहून एक दिगग्ज कलाकार आणि त्यावर कळस म्हणजे शशी कपूर यांची छोटी पण कायम आठवणीत राहील अशी भूमिका. शशी कपूर छोट्या भूमिकेत चमकले. कथा न ऐकताच त्यांनी हा चित्रपट करण्यास होकार दिला, हीच त्यांची यश चोप्रावरची श्रद्धा होती.

असे म्हणतात की शुटिंगच्या पहिल्याच दिवशी शशी कपूर ने शूटिंगला जाताना ही गोष्ट ऐकली. ह्या चित्रपटात संजीव कुमारने त्याच्या सर्वोत्तम कामगिरीपैकी एक दिली आहे. रेखाचा नवरा म्हणून त्याने जी संवेदनशीलता दाखवली ती फक्त त्यालाच करता आली असती. दुसऱ्या कुठल्याही अभिनेत्याला ती भूमिका जमलीच नसती.

माझ्या माहिती प्रमाणे जया आणि रेखा या दोघींना सुरुवातीला कास्ट करण्यात आले नव्हते आणि शूटिंग सुरु झाले. यश पहिल्या दिवसाच्या शूटिंगवर अजिबात खूश नव्हते. त्यांना त्या दोघींची गरज आहे हे त्याना माहीत होते. आणि पुढे चित्रपट दाखवतो की त्या दोघींशिवाय कथेला न्याय मिळणारच नव्हता.

अमिताभ ने तर उत्कट अभिनयाची त्याची किती रेंज आहे ते प्रभावी पणे दाखवून दिलं. वेदना, ओझे, मूक राग त्याच्या अप्रतिम डायलॉग डिलीव्हरीने आंतरिक आणि बाह्य दोन्ही बाहेर येतो. तो रोमँटिक नायक म्हणून उत्कृष्ट आहे. चित्रपटाच्या पहिल्या भागात तो जीवनाने भरलेला आहे आणि दुसऱ्या भागात तो त्याच्या त्यागाने भरभरून उरला आहे.

हा चित्रपट अमिताभसाठी होम प्रोडक्शनसारखा होता. ट्यूलिप्सच्या बागेतील गाण्याची ठिकाणे सुचवणे, कथा, संगीत या सारख्या चित्रपटाच्या महत्वाच्या प्रत्येक पैलूमध्ये त्याचा सहभाग होता. ‘नीला अस्मान’ हे गाणे त्याच्यातील अभिनेत्या साठी सर्वोत्कृष्ट गाणे आहे. हे रात्री आश्चर्यकारकपणे चित्रित करण्यात आले आणि अमिताभ आणि रेखा एकत्र खूपच सुंदर दिसले. ‘रंग बरसे’ हे आयकॉनिक होळीचे गाणे ठरले आहे. मी तर असे म्हणेन की पिक्चर मधलं प्रत्येक गाणे एक रत्न आहे.

सिलसिला हा मानवी भावना आणि प्रेमावर आधारित चित्रपट आहे. तो लग्नाच्या पावित्र्याबद्दल देखील आहे. 2 कोटींच्या बजेटमधून 8 कोटींची कमाई करत बॉक्स ऑफिसवर त्याने मिळवलेले हे एक मोठे यश होते. परदेशात तर त्याने अक्षरशः धुमाकूळ घातला होता.

आज यशजी पण नाहीत आणि संजीव कुमार, शशी कपूर, देवेन वर्मा पण नाहीत. शिव -हरी ह्या जोडगोळीतील शिव कुमारजीचें नुकतच निधन झाले. लेखक सागर सरहद्दी पण आपल्यात नाहीत.

एकूणच हा चित्रपट आता परत बघताना ह्या सर्व कलावंतांची उणीव भासते आणि त्याच बरोबर एक श्रेष्ठ कलाकृती बघितल्याचे समाधान मिळते. शेवटी आपण ह्या ओळीत स्वतःला शोधत चित्रपट गृहाच्या बाहेर पडलो होतो हे बहुतेक लोकांना आठवत असेल-
मैं और मेरी तन्हाई
अक्सर ये बाते करते हैं
तुम होती तो कैसा होता
तुम ये कहती तुम वो कहती
तुम इस बात पे हैरान होती
तुम उस बात पे कितनी हंसती
तुम होती तो ऐसा होता
तुम होती तो वैसा होता
मैं और मेरी तन्हाई
अक्सर ये बाते करते हैं.

– लेखन : दीपक ठाकूर. नाशिक
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

अलका वढावकर ठाणे on माझी जडणघडण : ७८
पुष्पा कोल्हे on “अनोखी स्नेह भेट”