Thursday, September 11, 2025
Homeलेखकृष्णाला वाचवणा-या फारूकला मानाचा मुज़रा !

कृष्णाला वाचवणा-या फारूकला मानाचा मुज़रा !

मुंबईत नुकताच एका रात्री भुरभुरता पाऊस सुरू होता. अधून मधून एखादी जोराची सरही येऊन जात होती. छत्री उघडेस्तोवर पाऊस भिजवूनही जात होता.

मुंबईत पावसात पायी भटकण्याचा आनंद वेगळाच. चालून चालून पाय थकले की मग बस किंवा लोकल पकडायची हा आमचा नेहमीचा शिरस्ता.

असंच रात्री पायी – पायी चालून थकल्यावर रात्री उशिरा ‘सांताक्रुज़’ स्टेशनवरून पश्चिम रेल्वेची लोकल पकडली. रात्रीची वेळ असल्याने गर्दी थोडी कमी होती आणि त्यामुळे छान खिडकीजवळची जागा मिळाली. लोकलमध्ये बसल्यावर शक्यतो मोबाईल मध्ये डोकं खूप न बसता आजूबाजूला बघणं, खिडकीतून बाहेर बघणं ही माझी नेहमीची सवय. माझ्या आजूबाजूला बऱ्याच सीट्स रिकाम्या होत्या.
मात्र तरीही एक-दोन जण दरवाज्याजवळच उभे होते. “दरवाज्याजवळ उभे राहू नका”, असं रेल्वेने कितीही वेळा सांगितलं. तरी काही लोकांना दरवाज्यात उभं राहून वारा अंगावर घेत प्रवास करायला आवडतं !

सांताक्रुजनंतर खार, बांद्रा, माहीम, माटुंगा अशी चार स्टेशने मागे पडली‌. मुंबईच्या दक्षिणेला जाणाऱ्या लोकलमध्ये दादर आलं की उतरणाऱ्यांची गर्दी जास्त आणि चढणाऱ्यांची कमी हे नेहमीचंच ! त्यामुळेच पुढील स्टेशन ‘दादर’ अशी घोषणा झाली आणि नेहमीप्रमाणे ‘दादर’चा आदर करत मानवंदना देण्यासाठी डब्यातली जवळजवळ अर्धी माणसं आपापल्या जागी उभी झाली. दररोज अक्षरशः लाखो लोकल प्रवासी ‘दादर’ हे नाव ऐकताच मानवंदना देण्यासाठी याच पद्धतीने उभे राहतात. हा असा मान मुंबईतल्या इतर कुठल्याही मधल्या स्टेशनला मिळत नाही !

दादर स्टेशनवर गाडी थांबताच उतरणाऱ्यांची लगबग सुरू झाली. इतक्या उशिरा लोकलमध्ये चढणारे लोक तसे कमीच. गाडीने सुटायचा भोंगा दिला, तरीही लोक उतरतच होते. त्यामुळे दादरहून चढणारी जी काही चार-पाच डोकी होती त्यांनी रेटारेटी करत आत मध्ये घुसायचा प्रयत्न केला. त्या आरडाओरडीमुळे डब्यातल्या अनेकांचे लक्षं दरवाजाकडे गेलं. या सगळ्या गडबडीत एक पाच-सहा वर्षाचा लहानगाही डब्यात शिरला. मात्र त्याच वेळी गाडी सुरू झाली. त्या लहानग्याने मागे बघितलं आणि त्याचे आई-बाबा खालीच राहिल्याचं त्याच्या लक्षात आलं. त्याने पटकन मागे वळून गाडीतून उडी मारायचा प्रयत्न केला. पावसामुळे आधीच ओली झालेली ती लोकल. त्यामुळे त्याचा पाय दरवाजा जवळ निसटला. त्या अर्ध्या क्षणासाठी तो लहान मुलगा अर्धा डब्याच्या बाहेर आणि अर्धा आत असा होत प्लॅटफॉर्म आणि गाडीच्या गॅपमध्ये पडणारच होता. दरवाज्याकडे बघत असलेल्या डब्यातील सर्वांच्याच काळजाचा ठोका क्षणभर चुकला. मात्र त्याच क्षणी त्या दरवाज्याजवळ उभ्या असलेल्या एका तरुणाने अत्यंत चपळाईने त्या लहानग्याच्या पाठीवर असणारी ‘सॅक’ पकडून त्या लहान मुलाला डब्याच्या आत खेचलं. त्याने अगदी अर्धा सेकंद जरी उशीर केला असता, तर काय घडलं असतं ? त्याचा विचारही करवत नाही.

अक्षरशः थरथरत असलेल्या आणि आईच्या नावाने रडत असलेल्या त्या लहान मुलाला माझ्यासह डब्यातल्या काही लोकांनी शांत करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्या मुलाला घेऊन पुढच्या ‘प्रभादेवी’ स्टेशनवर उतरून रेल्वे पोलिसांकडे जाऊया, असं मी त्या तरुणाला म्हणालो. मात्र त्यावर तो तरुण जरा घाबरलेला वाटला. त्याच्या चेहऱ्यावरचे ते भाव बघून “आपने इस बच्चे की जान बचाई, अच्छा काम किया है ! अब इस बच्चे को इसके मां-बाप तक पहुंचाकर इस अच्छे काम को पूरा करना है ! इस बच्चे के साथ और एक दो लोग प्रभादेवी स्टेशन पर उतरेंगे, तो अच्छा होगा”! असं आर्जवाने म्हटल्यावर तो तरुण पुढच्या स्टेशनवर उतरायला तयार झाला. सोबत डब्यातली आणखी एक व्यक्ती “चलो मैं भी आता हूं” असं म्हणत आमच्या सोबत आली.

त्या लहान मुलाचं नाव ‘कृष्णा’ असल्याचं त्याने सांगितलं. मात्र त्या पलीकडे त्याला कोणतीही माहिती सांगता येत नव्हती. ना पत्ता सांगता येत होता, ना गावाचे नाव त्याला सांगता येत होते. घरातल्या कोणाचाही मोबाईल नंबर त्याला सांगता येत नव्हता. फक्त आज सकाळी ‘यूपी’हुन आलो एवढंच तो सांगू शकत होता.

कृष्णाला वाचवणाऱ्या त्या तरुणाला मी त्याचं नाव विचारलं. त्याने फारूक शेख असं नाव सांगितलं. नाम साधर्म्यामुळे क्षणभर का होईना, चित्रपट अभिनेता फारूक शेखची क्षणभर आठवण झाली !

प्रभादेवी स्टेशनला उतरल्यावर लगेचच आम्ही स्टेशन सुप्रिंटेंडटचं ऑफिस गाठलं. तिथल्या श्रीवास्तव साहेबांना सगळी कहाणी सांगितली. त्या लहान मुलाला फक्त त्याचं नाव ‘कृष्णा सरोज’ एवढेच सांगता येत होतं. श्रीवास्तव साहेबांनी लगेचच दादर स्टेशनला फोन करून कृष्णाबद्दल इन्फॉर्म केलं. त्या दरम्यान मी देखील पश्चिम रेल्वेच्या जनसंपर्क अधिकारी महोदयांशी संपर्क साधला. त्यानंतर थोड्याच वेळात वेगवेगळ्या स्टेशनवरून कृष्णा सरोजच्या नावाचा पुकारा चालू झाला आणि त्याच्या पालकांना तातडीने प्रभादेवी स्टेशनवर पोहोचण्याचे आवाहन देखील !

हे सगळं सुरू असताना लहानगा कृष्णा मात्र सतत रडत होता. आईची आठवण काढत होता. आम्ही त्याला चॉकलेट, कोल्ड्रिंक अशी वेगवेगळी आमिषं दाखवत शांत करण्याचा प्रयत्न केला. पण त्याला फक्त आई हवी होती. त्याचवेळी फारूक शेख त्याच्या मोबाईलवर वेगवेगळे कार्टून दाखवत लहानग्या कृष्णाला शांत करण्याचा प्रयत्न करत होता. छोटा भीम, ऑगी अँड कॉकरोच, डोरेमोन, शीनशॅन, मिनियनस असे वेगवेगळे कार्टून मोबाईलवर दाखवून झाले. पण त्याच्या डोळ्यातलं पाणी काही थांबत नव्हतं.

रात्री बाराच्या सुमारास दादर स्टेशन वरून त्याचे पालक सापडल्याचा आणि त्यांना चर्चगेटच्या गाडीत बसवून दिल्याचा फोन आला आणि आमचा जीव भांड्यात पडला. हे सगळे सुरू असतानाच शेजारी उभी असलेली एक व्यक्ती त्याच्या आई-वडिलांची ओळख पटवूनच त्याला आई-वडिलांकडे द्या असं वारंवार सांगत होती.

चर्चगेटला जाणारी पुढची लोकल थोड्याच वेळात प्रभादेवी स्टेशनवर येणार अशी घोषणा झाली. काही क्षणातच लोकल स्टेशनवर येऊ लागली आणि फारूकने कृष्णाला “इस गाडी से आपकी मां आ रही है”, असं सांगताच, कृष्णाने डोळे पुसत प्रत्येक डब्याकडे निरखून बघायला सुरुवात केली. गाडी थांबली पण एकाही डब्यात त्याला आई दिसली नाही. काही सेकंद थांबल्यावर गाडी रवाना झाली आणि तो आणखीनच रडायला लागला. त्यानंतर श्रीवास्तव साहेबही ‘मैं फिर से एक बार, दादर फोन करता हूं’ असं म्हणत त्यांच्या केबिन कडे वळले. मात्र त्याचवेळी आमच्या जवळ बसलेला कृष्णा अचानक उठला आणि धावत धावत समोरून चालत येत असलेल्या एका महिलेला बिलगला. थोड्या वेळापूर्वी पालकांची ओळख पटवून पालकांकडे द्या असं सांगणाऱ्या व्यक्तीकडे बघत एक रेल्वे कर्मचारी म्हणाला, ‘देखा अपने कृष्णा के यशोदा को और किसी पहचान पत्रकी ज़रुरत नही !’

कृष्णाची आई आमच्या सगळ्यांचे आभार मानत होती. मात्र खरे आभार मानायचे असतील, तर फारूकचे माना ! कारण त्यानेच तुमच्या कृष्णाचा जीव वाचवलाय, असं तिला कुणीतरी सांगितलं. ते ऐकून त्या माऊलीचे डोळे भरून आले आणि त्यांनी हात जोडून फारूकचे आभार मानले.

कृष्णाच्या आईसोबत कृष्णाचे काकाही होते. कृष्णा त्याच्या आईसोबत आजच सकाळी रायबरेलीहून आलाय, असं त्या काकांनी सांगितलं. कृष्णाचे वडील आणि काका दोघेही मुंबईत वाहन चालकाचे काम करतात. कृष्णाचे वडील नालासोपारा मध्ये राहतात ही माहिती देखील काकांनी सांगितली.

त्यानंतर “कृष्णाकडून घरच्या कुणाचा तरी मोबाईल नंबर पाठ करून घ्या. त्याचं नाव गाव पत्ता दिलेली चिठ्ठी त्याच्या नेहमी खिशात ठेवत जा” असं त्याच्या आईला आणि काकांना जवळजवळ आम्ही सगळ्यांनीच सांगितलं.

‘फारूक भाई आपने बच्चेकी जान बचाई है, खुदा आपको बरकत दे !’ असं म्हणत मी फारूकचा निरोप घेतला. सोबतच रेल्वेचे श्रीवास्तव साहेब, कृष्णा आणि त्याचे आई – काका यांनाही बाय करून मी निघालो.

एव्हाना रात्रीचे साडेबारा वाजून गेले होते. पाऊस सुरूच होता. त्यावेळी राहुन राहुन मला फारुक शेख वर चित्रित झालेल्या शहरयार यांच्या २ गज़ल आठवत होत्या. मुंबईचं वैशिष्ट्य उलगडवून दाखवणारी “सीने में जलन आंखों में तूफ़ान सा क्यों है इस शहर में हर शख्स परेशान सा क्यों है” ही एक गज़ल. आणि त्या पाठोपाठ “जिंदगी जब भी तेरी बज्म में लाती है हमें, जिंदगी चांद से बेहतर नज़र आती है हमें !”, ही दुसरी गज़लही आठवत होती.

माणसांचा अत्यंत कोलाहल असणा-या या मुंबईच्या ‘बज्म ए परेशां’ ला नेहमीच ‘बेहतर’ बनवतात, ते मदतीला धावून येणारे ‘गुमनाम’ मुंबईकर ! कृष्णाचा जीव वाचवणारा फारूक शेखही असाच एक ‘गुमनाम’ आणि ‘बेहतर’ मुंबईकर ! मदतीला धावून येणाऱ्या अशा अनेक मुंबईकरांमुळेच आपली ‘बज्म ए मुंबई’ ही नेहमीच ‘चांदसी बेहतर नज़र आती है !’

लहानग्या कृष्णाला वाचवणा-या फारूकला आणि त्याच्या त्या चपळाईला पुन्हा एकदा मानाचा मुज़रा !

– लेखन : गणेश पुराणिक. सहायक जनसंपर्क अधिकारी, मुंबई महानगर पालिका.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on अमेरिकन भारतीयांनो “रजा” घ्या !
Shashikant Oak on व्यंग कथा
सौ. सुनीता नितीन फडणीस on व्यंग कथा
मितल सुहास वावेकर on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
जयश्री चौधरी मुंबई on व्यंग कथा
सचिन जगन्नाथ कांबळे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
नामदेव लक्ष्मण वनगुले तळा - सोनसडे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !