नमस्कार,मंडळी. 🙏 “ओठावरलं गाणं” या सदरात सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत. राजा बढे, कवी अनिल, मंगेश पाडगांवकर, शांता शेळके, ग दि माडगूळकर, जगदीश खेबूडकर यांनी लिहिलेल्या प्रत्येक गाण्याला (मग ते चित्रपटासाठी लिहिलेलं गाणं असलं किंवा भावगीत वा भक्तीगीत असो, देशभक्ती पर असो वा लावणी असू दे) ही गाणी लागली की अजूनही मन काही दशकं मागे जातं. आज पाहू या ज्येष्ठ कवी जगदीश खेबूडकर यांनी लिहिलेली एक लावणी जिचे शब्द आहेत –
गुलजार गुलछडी नटून मी खडी खडी
नाचते मी घडी घडी करते नखरा नखरा
बाई माझ्या पायाला बांधलाय भवरा
या नर्तिकेच्या नृत्यावर फिदा झालेल्या लोकांना ती सावध करतेय. ती सांगते आहे की नाजूक गुलछडी जरी तुमच्यासमोर तुम्हाला दिसत असली आणि बिजलीच्या चपळाईने माझे पाय थिरकत असले तरी तुम्ही भाळून जाऊ नका. एवढ्या सहजासहजी ही नाजूक नार तुमच्या हाताला लागणार नाही. मासोळी जशी सुळsकन हातातून निसटून जाते तशीच मी ही तुमच्या गराड्यातून सहजपणे स्वतः ची सुटका करून घेईन. पावणं, तुम्ही एक विसरताय कि तुम्हाला जरी मी नाजूक नार वाटत असले आणि मी सहज तुमच्या हातात येईन असं जर तुम्हाला वाटत असेल तर मी बारा गावचं पाणी प्यायली आहे आणि माझ्या पायात घुंगरू बांधले असले तरी नजरेच्या एका दृष्टिक्षेपात माणसं ओळखण्याचं सहावं इंद्रिय आम्हा बायकांना मिळालेलं असतं. तेंव्हा जर काही वेडावाकडा विचार केलात तर गाठ माझ्याशी आहे एवढं लक्षात ठेवा.हवं तर हा सावधगिरीचा इषारा समजा.
सडसडीत बांधा उभा सुरत गोरटी
भिरीभिरी शोधते कुणा नजर चोरटी
चोळी माझी चंदनी तंग तंग पैठणी
चुणीवर चुणी चुणी उडवी पदरा पदरा
माझ्या रुपाचा, सुंदर चेहऱ्याचा आणि सडसडीत बांध्याचा मला स्वतःला अतिशय अभिमान आहे. नृत्य करताना देखील कुणाच्याही लक्षात येणार नाही अशा त-हेने माझी भिरभिरती नजर कुठे धोका नाही ना हे शोधत असते मात्र चेहेऱ्यावर भाव असतात की मी तुमच्यापैकी कोणला तरी शोधते आहे. अर्थातच चापून चोपून नेसलेली पैठणी, तंग चोळी, वाऱ्यावर उडणाऱ्या पदराकडे आणि माझ्या मादक हावभावांमुळे कुणाच्याही ही गोष्ट लक्षात येत नाही.
डाळींब फुटे ओठात गालांमध्ये लाज
मी तरूणपणाचा जपून घेते अंदाज
छुमछुम बोले चाळ नागमोडी माझी चाल
भवतीनं सूरताल मारती चकरा चकरा
गाणं गाण्यासाठी मा़झे ओठ जेंव्हा विलग होतात तेंव्हा किती जण वेड्यासारखं माझ्याकडे चेहऱ्याकडे अनिमिष नेत्रांनी पहात असतात. कारण जणू काही डाळींब फुटल्याचा भास माझ्यासाठी वेडं झालेल्या या मैफलीत आलेल्या रसिकांना होतात. त्यांच्या नजरा पाहून माझे गालही लज्जेनं आरक्त होतात. ही तारूण्य सुलभ भावना असली तरी ज्वानीच्या या लाटेचा मी जपूनच अंदाज घेते आणि नृत्य करताना देखील हाच विचार माझ्या मनात घोळत असतो. माझं लक्ष ढोलकीच्या तालावर केंद्रित होतं. छुमछुम वाजणाऱ्या पैंजणांमुळे आणि नागमोडी चालीमुळे बहारदार नृत्य सादर करताना माझ्या अदाकारीवर तुमच्यासारखे रसिक खूष होतात, त्याचवेळेस ताल सुरांच्या या दुनियेत मी रममाण झालेली असते.
बेभान नाचते रूपगुणाची राणी
ऊर होतो खालीवर बाई पारव्यावाणी
अडवुनी जागोजाग बळजोरी नगं नगं
जाते बाई लगबग सख्याच्या नगरा नगरा
गाणं, संगीत आणि नृत्य या तीन गोष्टी म्हणजे माझा जीव की प्राण आहेत. म्हणून तर ही बारी घेऊन मी गावोगावी नृत्याचे कार्यक्रम करत हिंडत असते. जरी मी कितीही सावध राहिले तरी तुमच्यासारखे रसिक श्रोते जसे माझा कार्यक्रम पहायला येतात तसेच काही वासनेचे डोमकावळे देखील माझी कला पहायला न येता फक्त माझ्यावर बळजबरी करून माझ्या शरीराचा उपभोग कसा घेता येईल हाच विचार मनात धरून येतात. त्यामुळे खरंतर हृदय अनामिक भीतीने धडधडत असतं. कोणावरही आरोप न करता मग मी मोठ्या खुबीने गाण्यातून असा बहाणा करते की पुढच्या मुक्कामाला माझा प्रियकर माझी वाट पहातो आहे. त्याला भेटायला मी देखील तेवढीच उत्सुक आहे त्यामुळे आता कुणीही जबरदस्तीने मला अडवू नका नाहीतर माझ्यातली वाघीण चवताळून उठेल आणि मग काही तुमची खैर नाही…. अशी बतावणी करून मी माझ्या शीलाचं रक्षण करते.
“धन्य ते संताजी धनाजी” या चित्रपटासाठी लिहिलेली ही लावणी ज्येष्ठ संगीतदिग्दर्शक वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केली असून आशा भोसले यांनी आपल्या उच्छृंखल आवाजाने ही लावणी आणखी बहारदार केली आहे.

– लेखन : विकास मधुसूदन भावे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
खूप छान रसग्रहण👌👌👌
सुरेख रसग्रहण.
जगदीश खेबुडकर यांच्या अनेक गाण्यांपैकी हे एक गाजलेलं गाणं ज्याला संगीत दिला आहे वसंतराव देसाई यांनी व गायलं आहे आशा भोसले यांनी. या गाण्याचे आपण केलेले रसग्रहण उत्तम झाले आहे.
छानच