Wednesday, September 10, 2025
Homeलेखलोकोत्तर कर्मवीर भाऊराव पाटील

लोकोत्तर कर्मवीर भाऊराव पाटील

महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात शिक्षणाची गंगा नेण्याचे लोकोत्तर कार्य केलेले पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांची  २२ सप्टेंबर रोजी १३५ वी जयंती आहे. त्यानिमित्त ही शब्द पुष्पांजली…..

शिक्षण हीच बहुजन समाजाच्या उद्धाराची नाडी आहे हे ओळखून कर्मवीर भाऊराव पाटील यांनी अतिशय निष्ठेने, त्यागाने, ध्येयवादाने आपलं सारं आयुष्य शैक्षणिक कार्यासाठी वेचलं. शिक्षण आणि समाज परिवर्तन या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून परस्पर पूरक आहेत. शिक्षणानेच समाज परिवर्तन होणार आणि शिक्षणानेच अज्ञान, दारिद्र्य, अंधश्रद्धा, विषमता दूर होणार यावर त्यांचा ठाम विश्वास होता.

जनतेला अज्ञानाच्या गरजेतून बाहेर काढण्याच्या निर्धाराने कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शंभर वर्षांपूर्वी एका दलित विद्यार्थ्याच्या शिक्षणाची जोखीम शिरावर घेऊन आपल्या शैक्षणिक कार्याची मुहूर्तमेढ रोवली. या आपल्या कामाच्या प्रारंभाला अधिक ठोस रूप देण्यासाठी कर्मवीरांनी १९१९ मध्ये रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली.

महात्मा फुले, शाहू महाराज व विठ्ठल रामजी शिंदे यांच्याकडून प्रेरणा घेऊन कर्मवीरांनी पुढे एक दलित व इतर तीन अशा चार विद्यार्थ्यांनिशी एक वसतिगृह सुरू केले. या वसतिगृहाचे नामकरण राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हस्ते सातारा येथे झाले (१९२७). यावेळी कर्मवीरांच्या या क्रांतिकारी प्रयोगाला गांधीजींनी मनापासून दाद दिली.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी १९२८ मध्ये संस्थेला भेट देऊन ही एक अद्वितीय संस्था आहे असे गौरवोद्गार काढले होते.
“ख्रिस्त महंमद मांग ब्राह्मणाशी l
धरावे पोटाशी lबंधुपरी l”
हा महात्मा फुल्यांचा विचार या बोर्डिंगच्या रूपाने प्रत्यक्ष कृतीत आणला. अठरापगड जाती आणि धर्माच्या विद्यार्थ्यांना एकाच छताखाली, एकाच स्वयंपाक गृहात एकत्र नांदण्याची दीक्षा देणाऱ्या अण्णांनी एक नवा माणूस घडवण्याची मूस संस्थेच्या रूपाने निर्माण केली.

अण्णा खेडोपाडी अनवणी जायचे. कार्यकर्ते मिळायचे, शाखा निघायची पण यापेक्षा चुणचुणीत मुलं दिसली की त्याना खांद्यावर घेऊन साताऱ्यात बोर्डिंगमध्ये आणून दाखल करण्यातला आनंद त्यांना मोठा वाटे. हे सारं आज दंतकथेसारखं वाटावं असं आहे.

‘कमवा आणि शिका’ हे त्यांच्या बोर्डिंगचे सूत्र होते. ‘स्वावलंबी शिक्षण’ हे संस्थेचे ब्रीद. ते निरंतर आचरणात आणणारी ही एकमेव शिक्षण संस्था असावी. शिक्षणासाठी मुलांनी दोन-तीन तास शारीरिक काम करावं यातूनच श्रमाची प्रतिष्ठा विद्यार्थ्यांवर बिंबवायची होती.

काही वर्षांपूर्वीपर्यंत अमेरिकेत शिक्षणासाठी गेलेल्या मुलांना वेटर सारखी छोटीमोठी कामे करून पैशाची जुळवा जुळव करावी लागत असे. पण हे केवळ पैशासाठीच म्हणायला हवे. पण कर्मवीरांना या स्वावलंबनाबरोबरच स्वाभिमान आणि कणखरपणाही त्यांच्यात रुजवायचा होता.
सुरुवात वसतिगृहाने, नंतर शाळा सुरु केल्या. शिक्षकांची वाणवा बघून अध्यापक विद्यालय सुरू केले. प्राथमिक, नंतर माध्यमिक आणि त्यानंतर शेवटी महाविद्यालये सुरू केली.पण हे सगळं ग्रामीण भागातच. हे त्यांनी केलेले टप्पे अतिशय महत्त्वाचे आहेत.

त्या काळाची पहिली गरज ही प्राथमिक शिक्षणाची होती हे त्यांनी हे पक्के जाणले होते. या आधी अनेक संस्था (उदा.पुण्यात) शिक्षणाचं काम करीत होत्या. पण त्यांनी शहराची तटबंदी ओलांडली नाही. खेड्यापाड्यातली गोरगरिबांची मुलं उच्चशिक्षित होऊ शकतात, मुंबई विद्यापीठात इंग्रजी विषय घेऊन सर्व प्रथम येवून गोल्ड मेडल मिळवू शकतात, इंग्लंडला जाऊन बॅरिस्टर होऊ शकतात हे कर्मवीरांनी उभ्या महाराष्ट्राला दाखवून दिलं. आमटी- भाकरी वर राहणारी, गोणपाटावर झोपणारी शाहू बोर्डिंग मधील एकेकाळची तीन मुलं एकाच वेळी महाराष्ट्रातल्या तीन विद्यापीठांची कुलगुरूपदं भूषवित होती.

कै.वसंतदादा पाटील हे संस्थेचे काही काळ अध्यक्ष होते. ते मुख्यमंत्री असताना त्यांनी खाजगी अभियांत्रिकी आणि वैद्यकीय महाविद्यालयांना परवाना देण्याचा निर्णय घेतला. रयत शिक्षण संस्थेला अनेक अभियांत्रिकी, वैद्यकीय महाविद्यालये सुरू करता आली असती. नव्हे अनेकांनी तशी मागणीही केली होती. पण अजूनही जिथे शाळा नाही त्या अतिदुर्गम भागात, आदिवासी पाड्यात शाळा काढणे यालाच प्राधान्य संस्था देत आली आहे. यातच संस्थेचे मोठेपण आहे. प्रत्येक गावात शाळा हे कर्मवीरांचे धोरण होतं. संस्थेचं नाव रयत आणि बोधचिन्ह वड ही दोन्ही बाबी काना मात्रा वेलांटी नसलेली अक्षरे गाव खेड्यातल्या माणसांचा सरळ आणि साधेपणा प्रतिबिंबित करणारी आहेत.

‘स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद’ यामधील ‘आमचे’ हा शब्दही अनेकवचनी म्हणजेच ही संबंध समाजाची संस्था, सर्वसमावेशकता त्यातून अभिप्रेत होते. म्हणूनच सर्व समाजाने त्यांच्या पश्चात या संस्थेचं पालकत्व निभावलेलं आहे.वडाच्या पारंब्याप्रमाणं शाखा वाढत गेल्या.

कर्मवीरांनी १९३८ साली ६१ शाळा काढल्या. १९५० पर्यंत शाळांची संख्या झाली ५७८. इतका त्यांच्या कार्याचा झपाटा होता. आज रयत शिक्षण संस्थेच्या ७७२ शाखा, १३२०७ सेवक असून ४३२६२१ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

या संस्थेत शिकलेल्या प्रत्येकाला आपल्या मागे असलेल्या समाजाचं आपण काही देणं लागतो याचं बाळकडू दिलं जातं. सामान्य जनतेवर कर्मवीरांची गाढ निष्ठा होती. त्यांचं निखळ पाठबळ हीच त्यांची प्रेरणा. रयत पाठीशी असल्याने कोणाच्या पाठी लागण्याची त्यांच्यावर कधीच वेळ आली नाही. कुठल्याही ग्रँटसाठी सरकार पुढे त्यांनी मान तुकवली नाही.
शरीर आणि मन यांचा यांचा संवाद विकास करणारे ज्ञान मिळवणे आणि मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी करण्याचे असिधाराव्रत अण्णांनी निर्धाराने चालविले.

शिक्षण कोणासाठी कसे आणि का असावे याचा स्वच्छ विचार घेऊन अविरत काम करणाऱ्या कर्मवीर अण्णांनी रयत शिक्षण संस्थेचे एक प्रतिमान (मॉडेल) महाराष्ट्राला दिले.त्यामुळे दिव्याने दिवा लावावा तशा रयतचा विचार घेऊन काम करणाऱ्या अनेक शिक्षण संस्था महाराष्ट्रात उदयास आल्या. कर्मवीर आणि त्यांची रयत शिक्षण संस्था हाच या सर्वांचा आदर्श होता. तो त्यांनी आपल्या त्यागाने, निस्वार्थीपणाने, परिश्रमाने आणि स्वाभिमानातून उभा केला होता.

त्यांनी आपल्या मागे निष्ठावंत कर्त्या माणसांचा एक ताटवा फुलविला म्हणूनच ग्रामीण भागात रयत शिक्षण संस्थेचे काम आजही अविरत विस्तारत आहे. शाखांची, विद्यार्थ्यांची संख्या वाढली म्हणून गुणवत्ता घसरली असे कधीच झाले नाही. उलट आज रयत म्हणजे गुणवत्तेचा मानबिंदू म्हणून एक प्रतिमा निर्माण झाली आहे. ज्ञान विज्ञानाच्या सर्वच शाखांमध्ये रयतचे विद्यार्थी वरच्या क्रमांकावर आहेत हे चित्र आहे. कारण कर्मवीरांच्या ‘रयत’ मध्ये आहोत ही जाणीवच शिक्षकाला किंवा कर्मचाऱ्याला केवळ पाट्या टाकण्यापासून रोखत असते हेच खरे. म्हणूनच संस्थेत नोकरी करणारे सगळेच ‘रयत सेवक’ हे बिरुद सार्थपणे आपल्या छातीवर मिरवतात.

समाजातील लोकांचे दुरवस्थेचे व दुःखाचे मूळ बहुतांशी त्यांच्या अज्ञानात आहे हे ओळखून भाऊरावांनी त्या काळातला कोणताही महत्त्वाचा सामाजिक प्रश्न आपल्या नजरेतून सुटू दिला नाही. कर्मवीर भेटायला येणाऱ्या लोकांना सांगत – “मुला बाळांना शिक्षण द्या. जातीभेद गाडून टाका, गावच्या देवळाकडे जादा लक्ष न देता विद्या मंदिराकडे लक्ष द्या, साधी राहणी उच्च विचारसरणी ठेवावी. मतभेद विचार विनिमय करून मिटवावेत. घरी दारी स्वच्छता ठेवावी. स्वाभिमानाने राहावे. कष्टाची लाज वाटू देऊ नये. देशावर निष्ठा ठेवावी.”

आज शिक्षणाच्या खाजगीकरणाच्या वाढत्या रेट्यांमुळे गोरं गरिबांना शिक्षणाची दारे बंद होत आहेत. महात्मा फुले, कर्मवीर अण्णा यांच्या सक्तीचं आणि मोफत शिक्षणाची मागणी मान्य करण्यासाठी स्वातंत्र्यानंतर ६३ वर्षे जावी लागली.
रंजल्या गांजलेल्यांना शिक्षणाची समान संधी, स्वावलंबन, श्रमप्रतिष्ठा, लोकाभिमुखता, जात -संप्रदाय निरपेक्षता, संस्थात्मक आत्मनिर्भरता या कर्मवीरांच्या शैक्षणिक तत्त्वांची प्रस्तुतता आजच्या काळात नि:संशय अधिक तीव्रतेने जाणवते.खरे म्हणजे यातच कर्मवीरांच्या दृष्टेपणाचे मर्म सामावलं आहे.

पुरोगामी समाज परिवर्तनाचे सत्ता निरपेक्ष विधायक केंद्र म्हणून रयत शिक्षण संस्था महाराष्ट्राच्या लोक जीवनात काम करीत आली आहे कर्मवीरांच्या विधायक, जीवनोपयोगी शैक्षणिक कार्यात निरपेक्ष सहभाग देत त्याला गती देणे हे आपल्या सर्वांचे नैतिक कर्तव्यच नाही का असे म्हणावेसे वाटते.
त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन !

प्रा डॉ अजित मगदूम

– लेखन : प्रा डॉ अजित मगदूम. नवी मुंबई
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. कर्मवीर डाॅ.भाऊराव पाटील यांच्या थोर सामाजिक व शैक्षणिक कार्यावरील एक अतिशय उत्कृष्ट व वाचनिय लेख !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Shashikant Oak on व्यंग कथा
सौ. सुनीता नितीन फडणीस on व्यंग कथा
मितल सुहास वावेकर on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
जयश्री चौधरी मुंबई on व्यंग कथा
सचिन जगन्नाथ कांबळे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
नामदेव लक्ष्मण वनगुले तळा - सोनसडे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
श्री. समीर मारुती शिर्के on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !