वृत्त – मंदारमाला
अक्षरगणवृत्त
अक्षरे – २२, मात्रा – ३७
लगावली –
गागाल गागाल गागाल गागाल गागाल गागाल गागाल गा
शृंगार लाजोन पाहे तुला तू अशी रूपसी सुंदरी मृण्मयी
आकाश तारे नि हे विश्व सारे तुला वंदिती दिव्य ज्योतिर्मयी
धुंदीत होती फुले बावरी आज आलीत भानावरी रागिणी
तेजाळलेले तुझे रूप पाहोन चंद्रासवे लोपली यामिनी
गंधाळलेले तुझे गात्र हुंगोन वारा कसा आज खेदावला
हे चारुगात्री ! तुझ्या मस्तश्या मंद गंधात तो आज वेडावला
हास्यात जेव्हा दिसे एक आभा दिवा देवळातील खाली बघे
ह्या दंतपंक्तीस देखोन व्देषात येऊन मोती रुसोनी बसे
आच्छादलेले नभी मेघ गुर्मीत होते तरी आज काळोखले
हे चारुकेशी ! तुझ्या कुंतलांना तयांनीच होते हळू माळले
भूमी मरूची तुझ्या चालण्याने फुलांनी कशी आज आच्छादली
हे कोमलांगी ! तनू स्पर्शण्याला तुझा हा, तरू, वेल आसावली
सौंदर्य गाथा तुझी गात आहे निसर्गातली पाखरे पाखरे
कोठून येऊन दैवीय नारी अशी ह्या धरेला करी बावरे

– रचना : राधा गर्दे. कोल्हापूर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800