Thursday, September 11, 2025
Homeयशकथाअष्टपैलू तृप्ती ढवण

अष्टपैलू तृप्ती ढवण

नाशिकच्या सौ तृप्ती सागर ढवण म्हणजे नाविन्याचा ध्यास, अथक प्रयत्नांची कास, जोडीला प्रचंड आत्मविश्वास, जणू कर्तबगार महिला, स्त्री शक्तीचे ज्वलंत उदाहरण ! तर जाणून घेऊ अशा हरहुन्नरी स्त्रीचा जीवन प्रवास जो निश्चितच महिलांसाठी अतिशय प्रेरणादायी आहे….

तृप्ती यांचा जन्म लोणावळा येथे २१, ऑक्टोबर १९८२ रोजी झाला. आई शिल्पा व वडील विजय प्रल्हाद तांबट अतिशय हौशी, हसतमुख व प्रसन्न दांपत्य असल्याने हेच सर्व गुण तृप्ती मध्ये देखील दिसतात.

तृप्ती यांचे शालेय शिक्षण बिटको गर्ल्स स्कूल मध्ये तर एम.कॉम. पर्यंतचे शिक्षण बी.वाय.के. कॉलेज मध्ये झाले. पुढे त्यांनी ट्रॅव्हल टुरिजम कोर्स देखील केला. शिक्षण चालू असताना त्या नोकरी देखील करत. तसेच ज्वेलरी डिझाइन करून विक्री ही करत असे.

तृप्ती यांचा श्री सागर सुरेश ढवण यांच्याशी २००८ साली विवाह झाला. सागर हे इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहेत .ते गोवा येथील सिमेन्स कंपनीत अनेक वर्षे कार्यरत होते. आता ते पुण्यातील नामांकित कंपनीत नोकरी करीत आहेत.

लग्न झाल्यावर स्वस्थ न बसता, तृप्ती यांनी एम.बी.ए. देखील पूर्ण केले. पुणे येथे असताना दोन वर्षे त्यांनी नोकरी केली. पुढे पतीची बदली झाल्यामुळे ढवण कुटुंब नोकरी निमित्ताने गोवा येथे आले. तृप्ती यांचे कॅम्पस सिलेशन होऊन नामांकित कंपनीत नोकरी मिळाली. परंतु कौटूंबिक जबाबदारी मुळे त्यांना नोकरी करता आली नाही.

पण गप्प बसेल त्या तृप्तीताई कसल्या ? तृप्तीताईं बचत गटातील महिलांकडून विविध प्रकारचे पापड तयार करून घेऊ लागल्या. त्यांची त्या पुढे विक्री करत. या गृहउद्योगामुळे अनेक महिलांना काम मिळाले. त्या स्वावलंबी झाल्या. चविष्ट, स्वच्छ व उत्तम दर्जा असल्याने दिवसेंदिवस मागणी वाढत गेली. यामुळे महिलांना रोजगार मिळून त्यांच्यातील आत्मविश्वास वाढला. कुटुंबाला आर्थिक स्थैर्य मिळाले असे त्या महिला आवर्जून सांगतात व त्याबद्दल त्या तृप्ती ताईंचे मनापासून आभार मानतात.

तृप्ती ताई ज्वेलरी, तोरण तसेच ताटाभोवतीची रांगोळी देखील बनवु लागल्या. कल्पकता असल्याने तेथेही चांगली मागणी आहे. मेहंदी, मेकअप, फॅशन शो, नृत्य, गायन व क्रीडा क्षेत्रात देखील त्यांचा उल्लेखनीय सहभाग असतो.

सर्व गुण संपन्न व्यक्ती म्हणजे काय असते ? हे तृप्तिकडे बघून म्हणता येईल. त्यांनी मॅरेथॉन मध्ये सहभागी होऊन अनेक बक्षीसे जिंकली आहेत. मेहंदी, रांगोळी, फॅशन शो, टाकाऊ पासून टिकाऊ, व्हेजिटेबल कारविंग, नृत्य, नाट्य स्पर्धा, दांडिया, विविध गुण दर्शन अशा एक न अनेक स्पर्धांमध्ये त्या हिंमतीने सहभागी होऊन, पूर्ण तयारी करून अनेक वेळा सर्वप्रथम आल्या आहेत.

लहान वयापासूनच अनेक स्पर्धात भाग घेऊन त्यांनी बक्षिसे पटकावली आहेत. आजपर्यंत ३५० पेक्षा जास्त बक्षीसांच्या त्या मानकरी आहेत. ही खरच खूप कौतुकास्पद व अभिमानास्पद गोष्ट आहे.

तृप्ती ताईना सतत काही तरी नवीन करायला खूप आवडतं. झाडांच्या पानांपासून त्यांनी स्कर्ट टॉप तयार करून तो स्वतः परिधान करून रॅम वॉक केला. या आगळ्या वेगळ्या पेहरावासाठी त्यांना प्रथम पारितोषिक तर मिळालेच व ते इको फ्रेंडली वस्त्र म्हणून अनेक देशात पब्लिश झाले.

तृप्तीताई या पैठणीच्या देखील अनेक वेळा मानकरी ठरल्या आहेत. अनेक वेळा प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या तृप्तीताई अतिशय बोलक्या स्वभावाच्या, हुशार व दिलखुलास व्यक्तीमत्व आहेत.

अतिशय उत्साही, सकारात्मक विचारसरणी असलेल्या तृप्तीताई कधीच हार मानत नाही. कितीही संकटे आली तरी त्यांच्यावर हिंमतीने मात करून त्या यशस्वी होतात. आपल्यातील कला कौशल्य सादर करण्यासाठी जेव्हा जेव्हा संधी मिळते तेव्हा त्या संधीचे त्या सोने करतात.

तृप्तीताई २०१० सालापासून सोमेश्वर मसाला या व्यवसायात असोसिएट पार्टनर म्हणून देखील कार्यरत आहेत. सोमेश्वर प्रॉडक्ट्स मध्ये मिरची पावडर, धना पावडर, हळद, गव्हाचे पीठ, नूडल्स, तसेच पावभाजी मसाला, छोले मसाला, गरम मसाला, पाणीपुरी मसाला, कोल्हापुरी मसाला, मिसळ मसाला असे अनेक प्रकारचे मसाले अगदी छोट्या पॅक पासून ते थेट किलो मध्ये उपलब्ध आहेत.

गोवा, पुणे, औरंगाबाद, नगर, नाशिक अशा मोठ्या शहरातच नव्हे तर गावोगावी त्यांच्या उत्पादनाची विक्री केली जाते. प्रत्येक जिल्ह्यात त्यांचे वितरक आहेत. कोरोनाच्या बिकट परिस्थितीत देखील त्यांच्या व्यवसायाची अविरत सेवा चालू होती. मात्र त्या वेळी सर्वांचीच आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने मागणी कमी होती. पण आज सर्व टीम अतिशय मेहनत घेऊन व्यवसाय पूर्व पदावर आणण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहे व बऱ्यापैकी यशस्वी होत आहेत.

तृप्तीताई व्यवसायासाठी स्वतः बाहेर जाऊन मार्केट सर्वे करतात. कोणत्या गोष्टीची मागणी जास्त आहे याचा स्वतः अभ्यास करून तशा गोष्टी त्या पुरवतात.

पहिल्यावेळी तृप्तीताई गरोदर राहिल्या तेव्हा सर्व मंडळींनी त्यांची खूप काळजी घेतली. अतिशय थाटात त्यांचे डोहाळजेवण केले. मात्र नियतीला त्यांचे हे सुख मान्य नव्हते. आठव्या महिन्यात माहेरी आल्यावर त्यांना त्रास होऊ लागला. परिस्थिती खूप बिकट झाली. त्या स्वतः १५ दिवस आय.सी.यु.मध्ये होत्या. बाळ देखील २४ दिवस आय.सी.यु. मध्ये होते. डॉक्टरांनी खूप प्रयत्न केले मात्र परिस्थिती हाताबाहेर गेली. त्यांचे ते पहिले मुलं गेले, हे आताही सांगताना त्या खूप भावुक होतात. हा प्रसंग त्या आजही विसरू शकत नाही. त्यावेळी खूप मानसिक त्रास झाला. हे सत्य पचवणे खूप कठीण जात होते.

पण म्हणतात ना वेळ व काळ हेच सर्व गोष्टी वर रामबाण उपाय असते. दुसऱ्या वर्षी त्यांना पहिली मुलगी झाली. बाळ व बाळंतीण सुखरूप होत्या. परमेश्वराने पुन्हा मातृत्वाचा आनंद त्यांच्या पदरी दिला. त्यामुळे त्या बऱ्यापैकी सावरल्या. आता मागे वळून पहायचे नाही, असा जणू निश्चय करून त्या पुन्हा पहिल्या सारखे जोमाने कामाला लागल्या.
मुलगी थोडी मोठी झाल्यावर त्यांनी त्याच उत्साहाने कामाला सुरुवात केली.

महिला दिन निमित्ताने लोकमत सखी मंच आयोजित फॅन्सी ड्रेस स्पर्धेत तृत्प्तीताईना प्रथम पारितोषिक मिळाले. गोवा येथील सहा महिलांमध्ये त्यांचा सहभाग होता. जॉर्जीअस मॉम्स ऑफ इंडिया या पुणे येथील होणाऱ्या अंतिम फेरीत त्या सहभागी झाल्या. तो किताब देखील त्यांनी पटकावला.

पुण्यात झालेल्या सुपर मॉम या स्पर्धेत देखील त्यांना प्रथम क्रमांक मिळाला. कासार समाजाचा सर्व गुण संपन्न पुरस्कार देखील तृप्ती ताई यांना मिळाला आहे. गोवा व मुंबई सह्याद्री वरील पाककला स्पर्धेतही त्यांचा मोठा सहभाग असतो.

मुंबई येथे राष्ट्रीय स्तरावर ‘जॉर्जिअस मॉम’ ही विशेष स्पर्धा आयोजित केली होती. विविध चाचणी फेरीत उत्तम सादरीकरण करून तृप्ती ढवण यांनी अव्वल स्थान प्राप्त केले.
बंगलोर येथील श्रीकी फॅशन क्रिएशनच्या वतीने आयोजित स्पर्धेत ‘मिसेस ब्युटी बेस्ट कॉन्फिडन्स’ किताबाने तृप्ती ढवण यांचा गौरव करण्यात आला.

दोन लेकीची आई, पत्नी, यशस्वी उद्योजिका अशा सर्व भूमिका पार पाडत त्यांनी मॉडेलिंग व फॅशनच्या जगातही पाऊल ठेवले आहे. विविध फॅशन शो, स्पर्धां मध्ये सहभागी होऊन त्यांना अनेक वेळा मानाचा मुकुट मिळाला आहे.

तृप्तीताई अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यातील प्रमुख पुरस्कार पुढील प्रमाणे आहेत:-

*कर्तृत्ववान महिला रत्न पुरस्कार

*इंटरनॅशनल प्राऊड वुमेनिया अवॉर्ड.

*कोरोना योद्धा राष्ट्रीय पुरस्कार.

*कर्तृत्ववान महिला नारी रत्न पुरस्कार – मनुष्यबळ विकास लोकसेवा.

*द रिअल सुपर वुमन.

*गौरव कलेचा अवॉर्ड.

*ग्लॅमरस फेस ऑफ महाराष्ट्र.

*राज्यस्तरीय महिला रत्न पुरस्कार.

*इंडिया वुमन टॅलेंट अवॉर्ड

*ग्लोबल वुमन प्राईड अवॉर्ड

*स्त्री कर्तृत्ववान आदिशक्ती पुरस्कार

*मर्दानी महाराष्ट्राची……

बक्षीस हे नुसते बक्षीस नसते तर ती आपल्या कामाची पोचपावती असते. एक कौतुकाची थाप असते, जी पुढील कार्यासाठी प्रेरणा देते. रोज नवनवीन गोष्टी आत्मसात करून पुढे जाण्याचे बळ देते असे तृप्ती ताईंचे मत आहे.

प्रत्येक क्षेत्रात तृप्ती ताईंनी उंच भरारी घेतली आहे. नाट्यछटा सादरीकरण यात कमालीची कल्पकता व तत्परता आहे. नृत्य, वेशभूषा, अभिनय अशा कलेतून त्यांनी आपली वेगळी प्रतिमा निर्माण केली आहे. चाळ नावाची वाचाळ वस्ती, तळ्यात मळ्यात, दर्शन, ती फुलराणी, मी सावित्री, बेटी बचाव बेटी पढाव अशा नाटकातून त्यांनी भूमिका देखील केल्या आहे.

तृप्तीताईं कविता देखील करतात. त्या अनेक ठिकाणी प्रकाशित झाल्या आहेत. स्टोरी मिरर या वेब पोर्टलच्या त्या नाशिक प्रतिनिधी आहेत.

या बरोबर अनेक पदांवर त्या कार्यरत आहे
१) उत्तर महाराष्ट्र महिला अध्यक्ष – राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ, भारत.
२) नाशिक जिल्हा महिला अध्यक्ष –
पोलीस मित्र संघटना, नवी दिल्ली.
३) नाशिक प्रेसिडेंट – फॅशन मॅगझीन.
४) ब्रँड ॲम्बेसेडर, युनिटी ट्युन ऑफ इंडिया.
५) ब्रँड ॲम्बेसेडर, रॉयल क्वीन अँड किंग.

तृप्ती ताई यांना दोन मुली असून मोठी मुलगी लारण्या ही चौथीत आहे तर धाकटी अर्नि ही दुसरीत आहे. मुली अतिशय हुशार व समजूतदार असून त्या देखील आई सोबत फॅशन शो मध्ये सहभागी होतात. स्टेज डेरिंग ही जन्मताच मुलींना आईकडून प्राप्त झालेली देणगी आहे. दोन्ही मुली स्वावलंबी आहेत व आईला प्रत्येक कामात मदत करतात. लहान वयातील त्यांची समज खूप कौतुकास्पद आहे.

तृप्ती ताईंच्या घरात कोणत्याही कामाला बाई नाही, हे विशेष. त्या स्वतः सर्व काम करून स्वतःच्या आवडीनिवडींना वेळ देतात. वेळेचे ऊत्तम नियोजन करीत असल्याने त्या नेहमीच उत्साही असतात.

तुम्ही कोणते एनर्जी ड्रिंक घेता ? असे मिश्किलपणे विचारल्यावर त्या म्हणतात, “माझ्या परिवाराची भक्कम साथ, माझ्या मुली, माझ्या मैत्रिणींच्या शुभेच्छा व मोठ्यांचे आशीर्वाद यातूनच मला खूप प्रेरणा मिळते. हीच सर्व मंडळी माझ्या यशाचे रहस्य आहेत. यांच्याकडून मला खूप सकारात्मक ऊर्जा मिळते. ज्यामुळे सतत कार्यरत राहण्यासाठी बळ येते”.

तृप्तीताईंना फिरायला, निसर्गाच्या सानिध्यात रहायला खूप आवडते. निसर्गच आपल्याला भरभरून देत असतो तसे आपणही दुसऱ्यांना निसर्गासारखे कोणतीही अपेक्षा न करता दिले पाहिजे, लोकांना कठीण प्रसंगात मदत केली पाहिजे, माणुसकी जपली पाहिजे असे त्या म्हणतात. सामाजिक कार्य करताना अथवा दान देताना या हाताचेही त्या हाताला कळता कामा नये असे तृप्ती ताईंचे प्रामाणिक मत आहे.

लोकांचे आशीर्वाद हेच लाख मोलाचे असतात जे आपल्याला जीवनात कधीही हरु देत नाही व लढण्याला बळ देतात असे त्यांना मनापासून वाटते. आज मी जे काही करत आहे ते या लोकांच्या आपलेपणामुळे, त्यांनी मला दिलेल्या प्रेमामुळे, त्यांच्या विश्वासामुळे व आशीर्वादामुळे असून ही एक अदृश्य शक्ती असते जी कायम मला सोबत करते संकटाचा सामना करायला बळ देते, असे त्या म्हणतात. असे हे आगळेवेगळे व्यक्तिमत्व लाभलेल्या तृप्तीताईंना पुढील नाविन्यपूर्ण योजनांसाठी अनेक अनेक शुभेच्छा.

रश्मी हेडे.

– लेखन : रश्मी हेडे.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800.

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. Hi,
    Pleased to hear your success. I have been knowing you since last 5 yrs. But it seem that we know each other from a long time. Being with u seem like a best friend and a mentor for me. A very tough women who has fought like a brave and over come all the difficulty. There’s lot more to say about u but the word will be less to explain

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on अमेरिकन भारतीयांनो “रजा” घ्या !
यश चंद्रकांत करकरे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
Shashikant Oak on व्यंग कथा
सौ. सुनीता नितीन फडणीस on व्यंग कथा
मितल सुहास वावेकर on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
जयश्री चौधरी मुंबई on व्यंग कथा
सचिन जगन्नाथ कांबळे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
नामदेव लक्ष्मण वनगुले तळा - सोनसडे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !