पिंक
“पिंक” एक विचारप्रवर्तक चित्रपट. बरोबर ६ वर्षे झाली. तारीख होती १६ सप्टेंबर२०१६, ह्या दिवशी पिंक रिलीज झाला.
मी तर म्हणेन की बघितलाच पाहिजे असा दमदार चित्रपट ! “नाही म्हणजे नाही”, इतके सांगणारे तीन शब्द ! No means No.
शूजित सरकार यांनी जागतिक दर्जाचा हा चित्रपट सादर केला जो विश्व स्तरावर यशस्वी झाला. दिग्दर्शक होते अनिरुद्ध रॉय चौधरी. त्याला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. युनायटेड नेशन्स आणि राजस्थान पोलिसांना महिलांच्या हक्कांची संवेदनशीलता आणि प्रतिष्ठा याविषयी प्रशिक्षण देण्यासाठी त्याचे प्रदर्शन करण्यात आले.
अमिताभ बच्चन पुन्हा एकदा आणखी एक आयकॉनिक परफॉर्मन्स घेऊन आले होते. त्यांचे भेदक डोळे टक लावून जणू समोरच्या च्या आरपार पाहत असतात. जेव्हा ते बोलतात तेव्हा प्रत्येक शब्दाला प्रचंड वजन असते ! त्या वर कळस चढवला आहे अभिक मुखोपाध्याय ह्याच्या अफलातून कॅमेरा वर्क ने. अमिताभच्या चेहऱ्यावरची रेष अन रेष त्याने कमालीची टिपली आहे. तापसी पण एका जबरदस्त भूमिकेत भाव खाऊन गेली आले.”
हा चित्रपट शेवटच्या क्षणापर्यंत, सांगितलेल्या घटनेचे दृष्य वर्णन देखील करत नाही. पार्श्वभूमीच्या हळूवार स्कोअरने, शांततेचे क्षण आणि संवाद, तणाव निर्माण करून, प्रेक्षकांना आश्चर्यचकित करतात की खरोखर काय घडले असेल त्या एका दुर्दैवी रात्री जेव्हा तीन मुली सुरजकुंड रिसॉर्टमध्ये तीन मुलांसह आढळल्या ? हा एक सर्वोत्कृष्ट कोर्टरूम ड्रामा आहे जो तुम्हाला शेवटपर्यंत खुर्चीला खिळवून ठेवतो !
व्यावसायिक दृष्टीने या चित्रपटाने 157 कोटी कमावले. त्याचे दोन दक्षिण भाषांमध्ये रिमेक करण्यात आले. आणि अर्थातच त्याला समीक्षकांकडून एकमताने प्रशंसा देखील मिळाली. मी तर म्हणेन प्रत्येक पालकांनी आपल्या वाढत्या वयाच्या मुलांना हा चित्रपट जरुर दाखवावा.

– लेखन : दीपक ठाकूर. नाशिक
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
🌹खूप छान वर्णन 🌹