Wednesday, July 2, 2025
Homeसंस्कृतीनवरात्रौत्सव

नवरात्रौत्सव

“सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्रंबके गौरी नारायणी नमोस्तुते”

चैत्र आणि अश्विन या पवित्र महिन्यात भक्तिपूर्वक देवीची आराधना केली जाते. अश्विन मासातील शारदीय नवरात्र उत्सव प्रारंभ होतो. त्याला अकालबोधन नवरात्र असेही म्हंटले जात. हा सण भारतभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

प्रतिपदेपासून ते नवमीपर्यंत हा उत्सव साजरा करतात. महालक्ष्मी, महासरस्वती, महाकाली, या तीन देवींच्या नऊ रूपांची पूजा आणि उपासना केली जाते. नवरात्र हा सण फार प्राचीन काळापासून चालत आला आहे. पावसाळ्यात पेरलेले पहिले पीक घरात आल्यावर शेतकरी हा उत्सव करत असत. म्हणूनच नवरात्रात घटस्थापनेच्या दिवशी घटाखालच्या स्थंडिलावर नऊ धान्याची पेरणी करतात व दसऱ्याच्या दिवशी ते धान्यांचे वाढलेले अंकुर उपटून देवाला वाहतात.

पुढे याच सणाला धार्मिक महत्व प्राप्त झाले व नवरात्रात भगवती देवीची उपासना करू लागले. तसेच श्रीरामांनी नऊ दिवस भगवतीचे पूजन केले व तिने प्रसन्न होऊन त्यांना विजयाचा आशीर्वाद दिला. तसेच महिषासुर दैत्याचा वध करण्यासाठी ब्रम्हा-विष्णू-महेश या त्रीदेवांनी व इतर सर्व देवांनी दुर्गा देवीची पुजा करुन आवाहन केले. देवीच्या शक्ती रूपाचे महिषासूर राक्षसांचा बरोबर नऊ दिवस युद्ध झाले. दहाव्या दिवशी महिषासुराचा वध केला. म्हणून वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून नवरात्र साजरे केले जाते.

अश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापना होते व मटक्यामध्ये धान्य पेरले जाते. त्यावर अखंड नंदादीप लावला जातो. रोज फुलांची माळ सकाळ-संध्याकाळ आरती केली जाते. सार्वजनिक उत्सवही साजरे केले जातात .
वाघावर आरूढ झालेली, हातात तलवार, खड्ग आदी शस्त्रे धारण केलेली देवीची मूर्ती नवरात्रात पुजली जाते स्थापिली जाते.

या देवी सर्वभूतेषु शक्ती रुपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यैनमो नमः

तसेच या दिवसात महाराष्ट्रात भोंडला, हातगा, भुलाबाई खेळतात. तर गुजरात मध्ये गरबा, दांडिया रास खेळतात. कलकत्त्यामध्ये दुर्गा पूजेला खूप महत्त्व आहे. ते दशभूजा काली मातेची पूजा करतात. तिथे बायका पारंपरिक वेषात एकमेकींच्या चेहऱ्यावर सिंदूर लावून साजरा करतात. षष्ठी ते दसरा ह्या दिवसात तिथे पूजा करतात.

कोकणात अष्टमीच्या दिवशी उकडीचा मुखवटा करून देवी उभी करतात. संध्याकाळी सहा ते रात्री बारापर्यंत घागरी फुंकल्या जातात. उत्तर भारतात नवरात्र उत्सव प्रभुरामचंद्रांचा विजय म्हणून साजरा करतात. गुजरात मध्ये गरबा आणि दांडिया रास नृत्याच्या माध्यमातून साजरा करतात. दक्षिण भारतात नवरात्रीमध्ये मित्र नातेवाईक आणि शेजाऱ्यांना घरी वेगवेगळ्या बाहुल्या आणि छोटे पुतळे यांचे प्रदर्शन असलेल्या कोलु बघायला आमंत्रित करतात. कन्नड मध्ये याला गोंबे हब्बा, तामिळमध्ये बोम्माई कोलू, तेलगू मध्ये बोम्माल कोलुवू असे म्हणतात.

कर्नाटक मध्ये नवरात्र म्हणजे म्हैसूर दसरा. तिथे नवरात्रीच्या नऊ रात्रीत महाकाव्याचे “यक्षगान” सादर केले जाते. केरळमध्ये या दिवशी विद्यारंभम् च्या मुहूर्तावर लहान मुलांना शिकवायला सुरुवात करतात.
नवरात्र हे पर्व विशाल चेतनेशी जोडणारे पर्व आहे. त्यानिमित्ताने रूढी परंपरा जोपासल्या जातात. हे नऊ दिवस विश्रांतीसाठी, ऊर्जेने भरभरून घेण्यासाठी आणि आपल्या स्व सोबत एकरूप होण्यासाठी दिलेले आहेत.

तसेच ललिता पंचमीला कुमारिका पूजन ,अष्टमीला उपवास आणि नवमीला नवचंडी होम केला जातो आणि नऊ दिवसांचे पारणे फेडले जाते. दसऱ्याला रावण दहन केले जाते. नऊ दिवस भजन, पूजन, कीर्तन, सप्तशती पाठ, देवी महात्म्य, कुंकूमार्चन, मंत्रोच्चार, अश्या सात्विकतेने देवी तत्वाला प्रसन्न केले जाते.

नवरात्रीत दर दिवशी वेगवेगळ्या रंगांची महती सांगितली जाते. त्याप्रमाणे देवीला सजवले जाते. हल्ली तर बायका पुरुष लहान मुलेसुद्धा प्रत्येक रंगात रंगताना दिसतात. असा हा उत्साहाचा चैतन्याचा मांगल्याचा भक्तीने ओतप्रोत भरलेला नवरात्रोत्सव
आता तर जगभरात साजरा केला जातो.
|| उदे गं अंबे उदे ||

मानिनी महाजन

– लेखन : सौ.मानिनी महाजन. मुंबई
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. अप्रतिम लेखन.. नवरात्रीची आणि देवीची सुरेख माहिती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Dr.Satish Shirsath on कृषीदिन
Swati Chavan, मायबोली मराठी साहित्य रसिक on ठाणे : ‘बोलीभाषेची फोडणी’
Dr.Satish Shirsath on अणिबाणी
सौ. सुनीता फडणीस on अष्टपैलू सुचिता पाटील
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on माझी जडण घडण : ५४