Saturday, March 15, 2025
Homeसेवासुवर्ण सह्याद्री

सुवर्ण सह्याद्री

मुंबई दूरदर्शन केंद्रास उद्या २ ऑक्टोबर २०२२ रोजी ५० वर्षे पूर्ण होत आहेत. २ ऑक्टोबर १९७२ रोजी हे केंद्र सुरू झाले. त्याच्या आधी दिल्ली दूरदर्शन केंद्र सुरू झाले होते. भारतीय चित्रपट सृष्टीची मुहूर्तमेढ मुंबईत रोवली गेल्याने मुंबईत चित्रपट सृष्टी बहरत गेली. त्यामुळे रंगभूमी, साहित्य, संस्कृतीची समृध्द परंपरा लाभलेल्या मुंबईस आपसूकच भारताच्या मनोरंजनाची राजधानी असा दर्जा प्राप्त झाला.

म्हणूनच मुंबई दूरदर्शन केंद्र सुरुवातीपासून अतोनात महत्वाचे ठरले. एकंदरीतच भारतातील दूरदर्शन आणि पुढे खाजगी वाहिन्यांच्या वाढीत मुंबई दूरदर्शन केंद्राची महत्वाची भूमिका राहिली आहे. पुढे कालौघात मुंबई दूरदर्शन केंद्र हे नाव बदलून “सह्याद्री वाहिनी” असे नामकरण करण्यात आले. तरी अजूनही जुन्या लोकांच्या तोंडी मुंबई दूरदर्शन केंद्र हेच नाव रुळलेले आहे.

माझे सुदैव की, या दूरदर्शन केंद्रात मला १ मार्च १९८६ ते २१ ऑक्टोबर १९९१ अशी पावणेसहा वर्षे सेवा करण्याची संधी मिळाली. सुरुवातीला मी ६ महिन्यांच्या करारावर स्टाफ आर्टिस्ट (प्रॉडक्शन प्रॉड असिस्टंट) म्हणून लागलो होतो. पुढे हा करार ३ वर्षांपर्यंत वाढविला गेला. त्यानंतर वयाची ५८ वर्षेपर्यंत तो वाढला. दरम्यान स्टाफ आर्टिस्ट राहायचे की नियमित सरकारी नोकर राहायचे ? अशी सरकारतर्फे विचारणा करण्यात आली. स्टाफ आर्टिस्ट आणि सरकारी नोकर या दोन्ही चे काही फायदे, तोटे होते. परंतु सरकारी नोकरीचे फायदे जास्त ठरत असल्याने बहुतांशी अधिकारी, कर्मचारी यांच्याप्रमाणे मी ही सरकारी नोकर होण्याचा पर्याय निवडला.

दूरदर्शन मध्ये असताना, मला कमर्शियल सेक्शन, प्रेझेंटेशन युनिट, न्यूज सेक्शन, प्रोग्राम सेक्शन
(कोर्टाची पायरी, तुफानातील दिवे, किलबिल, युवदर्शन, आमची माती-आमची माणसं, ग्रामदर्पण, विविध दूरदर्शन वृत्तान्त, मुलाखती, ज्ञानदीप, क्रीडांगण वगैरे) काम करण्याची संधी मिळाली. यामुळे माझे विचार आणि अनुभव विश्व समृध्द होत गेले.

दूरदर्शन मध्ये असताना पुणे येथील जग प्रसिध्द फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट मध्ये मला मिळालेले ट्रेनिंग तर आयुष्य भर उपयोगी पडत आले आहे.

पुढे सेवा जेष्ठतेनुसार पदोन्नतीला होणारा विलंब, रोजचा डोंबिवली ते वरळी व्हाया दादर हा जीवघेणा प्रवास याला कंटाळून मी चांगले जीवन, चांगल्या संधी मिळण्यासाठी विविध स्पर्धा परीक्षांची झटून तयारी करू लागलो.

दरम्यान युपीएससीची प्रोग्राम एक्झिक्युटिव्ह पदांसाठी जाहिरात आली होती. मी तीन वेगवेगळ्या संवर्गासाठी अर्ज केले. विशेष म्हणजे माझी तिन्ही पदांसाठी मुलाखत होऊन, तिन्ही पदांसाठी माझी निवड झाली. त्यापैकी एका पदासाठी आकाशवाणी व दोन पदांसाठी दूरदर्शन मध्ये नेमणूक झाली. मी मुंबई दूरदर्शन केंद्रातच कार्यरत होतो. त्यामुळे साहजिकच तेथेच प्रोग्राम एक्झिक्युटिव्ह म्हणून रुजू झालो.

काही काळानंतर माझी सिनियर ग्रेड – इंडीयन इन्फॉर्मेशन सर्व्हिस, जर्नालिझम लेक्चरर, आणि महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात जिल्हा माहिती अधिकारी म्हणूनही निवड झाली. सर्व बाबींचा साधकबाधक विचार करून मी जिल्हा माहिती अधिकारी, वर्ग १ या पदावर २२ ऑक्टोबर १९९१ रोजी अलिबाग येथे रुजू झालो.

मी दूरदर्शन मधली नोकरी जरी सोडली होती, तरी दूरदर्शनशी असलेले माझे नाते कधी तुटले नाही. जिल्हा माहिती अधिकारी, माहिती उपसंचालक  (कोकण, वृत्त विभाग नाशिक विभाग) नंतर माहिती संचालक झालो तरी, काही ना काही कारणाने माझा दूरदर्शन केंद्राशी सतत संपर्क येत राहिला. दूरदर्शनच्या विविध कार्यक्रम निर्मितीत मी योगदान देत आलो आहे.

मुंबई दंगलींच्या वेळी मा. मुख्यमंत्री यांच्या बैठका, कार्यक्रम, भेटी गाठी असे सर्व दूरदर्शन वर वेळच्या वेळी प्रसारित होण्यासाठी मला अलिबाग येथून मंत्रालयात बोलावून घेण्यात आले. त्यावेळी दूरदर्शन ही एकमेव वाहिनी होती. त्यामुळे दूरदर्शन चे महत्व अनन्य साधारण होते.

पुढे अलिबाग येथून माझी मंत्रालयात रितसर बदलीच करण्यात आली. माहिती खात्याच्या सेवेत, माझा दूरदर्शन मधील अनुभव पाहून मला वेळोवेळी दूरदर्शन विषयक जबाब दाऱ्या सोपविण्यात येत असत. यातील काही उदाहरणे येथे देत आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतराच्या वेळी, अनुकूल जनमत निर्माण होण्यासाठी दररोज विविध मान्यवरांचे संदेश दूरदर्शन वर प्रसारित करण्यात आले. त्या सर्व संदेशांच्या निर्मितीची जबाबदारी माझ्यावर सोपविण्यात आली.

पुढे राज्यात सत्तांतर झाले. १९९५-९६ च्या महाराष्ट्र शासनाची दूरदर्शन वर “शिवशाही आपल्या दारी” ही मा. मंत्री आणि नागरिक यांचा सहभाग असलेली मालिका सुरू करण्याचे ठरले. या मालिकेच्या निर्मिती समन्वयाची जबाबदारी माझ्यावरच आली. या मालिकेचे २५ भाग प्रसारित झाले. त्यावेळच्या युती शासनाचे एक वचन होते, ते म्हणजे “माय मराठी वाहिनी” सुरू करण्याचे. पण भारत सरकारच्या धोरणांमुळे अशी वाहिनी सुरू करता येत नव्हती. त्यावर उपाय म्हणून वाहिनी शब्द वगळून “माय मराठी” असा कार्यक्रम दूरदर्शन वर प्रसारित करण्याचे ठरले. १ मे १९९७ पासून दररोज अर्धा तास असा हा कार्यक्रम दूरदर्शन वर प्रसारित होऊ लागला. काही कारणांनी तो दिड दोन वर्षांपेक्षा जास्त काळ चालू शकला नाही. पण सुरुवातीच्या एकदिड वर्षे या कार्यक्रमाच्या समन्वयाची जबाबदारी माझ्यावर होती.

पुढे दूरदर्शनवरील गाजलेल्या “महाचर्चा” कार्यक्रमाच्या २०० भागांसाठी, म्हणजे जवळपास ४ वर्षे मी “रिसर्च आणि रिसोर्स पर्ससन” म्हणून काम केले. नंतर माहिती खात्याने स्वतःचा आकाशवाणी वर दिलखुलास आणि दूरदर्शन वर जय महाराष्ट्र कार्यक्रम सुरू केला. दिलखुलासच्या पहिल्या ५०० भागांचा मी टीम लीडर होतो. तर प्रसंग परत्वे जय महाराष्ट्र कार्यक्रमामुळे
दूरदर्शनशीही माझा संबंध येत असे.

आता मी सरकारी नोकरीतून निवृत्त झालो आहे. पण काही ना काही विषयांमुळे मला मुंबई दूरदर्शन केंद्रात मुलाखती देण्यासाठी बोलाविण्यात येते. त्या प्रत्येक वेळी मला अनोखा आनंद मिळत असतो. ज्या दूरदर्शन केंद्रात मी प्रॉडक्शन असिस्टंट होतो, तिथेच मी मुलाखती देण्यासाठी आलो आहे, या वर बऱ्याचदा विश्वास बसत नाही. पण हा होणारा आनंद आणि वाटणारा अभिमान काही औरच असतो.

आता बदलते तंत्रज्ञान, सरकारची धोरणे यामुळे पूर्वी होती तशी दूरदर्शनची मोनोपॉली राहिली नाही. बदलत्या परिस्थितीनुसार बदलत गेले पाहिजे हे खरेच असले तरी, सरकारने दूरदर्शन ची खाजगी वाहिन्यांशी तुलना करून फक्त फायद्याची अपेक्षा न करता, दूरदर्शन हे समाजमन संस्कारित करण्याचे सशक्त माध्यम आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.
उलट आजच्या खाजगी वाहिन्या आणि समाज माध्यमांच्या भाऊ गर्दित तर दूरदर्शन वर पूर्वी मुलांसाठी असलेल्या किलबिल, महिलांसाठी असलेल्या सुंदर माझे घर, कामगारांसाठी असलेल्या कामगार विश्व, आरोग्य विषयक आरोग्य संपदा, कायदेविषयक कोर्टाची पायरी, नाट्य, संगीत चित्रपट, शिक्षण विषयक सकस कार्यक्रमांची नितांत गरज आहे.

“समाजातील सर्व घटकांसाठी आणि कुटुंबातील सर्वांसाठी” दूरदर्शन काय, कसे योगदान देऊ शकेल ? त्यासाठी काय केले पाहिजे ? याचे सरकारने निश्चितच सिंहावलोकन केले पाहिजे, हे मात्र खरे. असो…

महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासात योगदान देत आलेले मुंबई दूरदर्शन केंद्र यापुढेही आपले योगदान निश्चितच देत राहील, असा विश्वास आहे.

मुंबई दूरदर्शन केंद्राच्या पुढील वाटचालीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा.

देवेंद्र भुजबळ

– लेखन : देवेंद्र भुजबळ. संपादक
www.newsstorytoday.com
माजी दूरदर्शन निर्माता, निवृत्त माहिती संचालक
☎️ 9869484800

RELATED ARTICLES

3 COMMENTS

  1. सोशल मीडियातील तुमची कारकीर्द खूपच मोठी आहे तुम्ही केलेली सेवा वाखाणण्याजोगी आहे. सर्वागीण विकासाच्या योगदानाबद्दल आभार

  2. मुंबई दुरदर्शन च्या यशस्वी अर्धशतकाच्या उभारणीत देवेंद्र भुजबळ साहेब यांचे मौलीक योगदान अजरामर असणार आहे. त्यांनी आपल्या कारकिर्दीत माणसे जोडण्यचे काम केले. सातासमुद्रापार त्यांच्या स्नेहाच्या वलयात आमच्या सारखी असंख्य माणसे ओढली गेली. प्रत्यक्षात भेट झाली नसली तरीही एक जवळचा मित्र किंवा सदस्य असल्याची अनुभूती न्यूज़ स्टोरी टुडे च्या माध्यमातून रोजच येत असते. आज हा कार्य प्रवासाचा लेख वाचून आणखी अभिमान वाटला. इतका मोठा माणुस कोणताही गर्व न ठेवता सर्वांना सोबत घेऊन सामाजिक बांधिलकी जोपासत आहे. दुरदर्शन सोबतच साहेबांना सुद्धा पुढील सेवा कार्यास खुप खुप शुभेच्छा!💯💐👏👏👏👏👏

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments