“मुंबईचं ग्रामदैवत” म्हणून ओळखली जाणारी मुंबादेवी ही मुंबईतील आद्य रहिवासी असलेल्या कोळी समाजाचं आराध्य दैवत आहे. हे मंदिर उभ्या असलेल्या काळबादेवी परिसरात आता कोळी समाज फारसा राहिलेला नाही. मात्र आजही मुंबईतील नवविवाहित दांपत्यं, विशेष करून कोळी समाजातील नवविवाहित दंपती, या देवीच्या दर्शनाला येतात.
तथापि, मुंबादेवी आता कुठल्याही एकाच समाजाची देवता राहिलेली नाही. ती संपूर्ण मुंबईची आहे. कुठल्याही सणवाराला तिचा मान पहिला असतो. मुंबईची ग्रामदेवता म्हणून तिचा अधिकार सगळ्यात मोठा आहे.
मात्र हे मंदिर आधी या परिसरात नव्हतं. जुन्या काळात बोरीबंदर मुंबईतलं एक महत्त्वाचं बंदर होतं. त्याच्या मुखावर मुंबादेवी मंदिर होतं. कोळी आणि खलाशी त्यांचं तारू या बंदरात आलं की मुंबादेवीचं दर्शन घेऊन शहरात प्रवेश करीत. हे मंदिर सुमारे १७३७ सालपर्यन्त बोरीबंदराच्या जागेवर होतं. अनेक हिंदू मंदिरांप्रमाणे या मंदिरासही कोणी एक मालक नव्हता. ते सर्व समाजाचं होतं. ब्रिटिशांनी १७३७ मध्ये मुंबईभोवतीच्या किल्ल्याचा विस्तार करताना देवीचं मंदिर हलवलं. मात्र हिंदू समाजाप्रमाणे त्यांना वागता येत नसल्यानं त्यांनी पांडुशेट सोनार या धनिक मुंबईकरावर त्याची जबाबदारी सोपवली. या मंदिरास आताच्या काळबादेवी परिसरात जमीन देण्यात आली आणि मुंबादेवीस कायमस्वरूपी घर लाभलं. मुंबादेवीचं विद्यमान मंदिर पांडुशेट सोनार यानं १७५३ मध्ये बांधलं. अनेक शतकं देवीची पूजाअर्चा आणि मंदिराचा कारभार पांडुशेटच्या वारसांच्या हातात होता. मात्र काही वर्षांपूर्वी न्यायालयाच्या आदेशानुसार मंदिराचा कारभार एका ट्रस्टच्या ताब्यात देण्यात आला आहे.
या मुंबादेवीच्या नावावरूनच मुंबई शहराचं नाव पडलं असावं, हा सिद्धान्त सर्वमान्य झाला आहे. मात्र मुंबई या नावाबद्दल अनेक कथा प्रचलित आहेत. त्यापैकी एका पुरातन कथेनुसार मुबारक नामक राक्षसाचा वध करण्यासाठी ब्रह्मा, विष्णु आणि शिव यांच्या तेजापासून ही देवी प्रकट झाली. या शक्तीनं मुबारक राक्षसाचं निर्दालन केलं. मरण्यापूर्वी शेवटची इच्छा म्हणून मुबारकनं देवीजवळ एक वर मागितला. “या परिसरात माझ्या नावानं वास्तव्य कर” असं त्यानं मातेला विनवलं. हा वर त्याला देऊन आदिमाता इथं मुबारका देवी म्हणून राहिली. मुबारकाचा पुढे उपभ्रंश मुंबा असा झाला असावा. त्यामुळे हे मंदिर ‘मुंबादेवी’ म्हणून प्रसिद्ध झालं.
अन्य एका कथेनुसार मुंबा नावाच्या एका कोळी महिलेनं या देवीची स्थापना केली आणि आपलं नाव तिला दिलं. तेव्हापासून तिला मुंबादेवी असे म्हणू लागले, अशी कहाणीही या मंदिराबाबत सांगितली जाते.
या मंदिरासमोर एक तलाव होता. नागरदास नवलाखा या श्रीमंत व्यापार्यानं तो बांधला होता, असा उल्लेख ‘मुंबईचं वर्णन’ या पुस्तकात गोविंद नारायण माडगावकर करतात. हिंदू मंदिरं आणि जलाशय यांचा संबंध फार पुरातन आहे. कालांतरानं हा तलाव बुजवून टाकण्यात आला. या बेटावर काही काळ मुबारक याचं राज्य होतं. तो हिंदुद्वेष्टा होता. म्हणून त्याचा उल्लेख दैत्य असा आपल्या लोकांनी केला असावा, असा तर्कही ते मांडतात.
मुंबईची ग्रामदेवता मुंबादेवी उग्ररुपी आहे. मुंबादेवीची मूर्ती मातीची असून ती प्राचीन आहे. ती अतिशय रेखीव आहे. मूळ मूर्ती बैठकीवर बसलेली असावी. परंतु आताचं तिचं रूप सिंहारूढ आहे. तिच्या जोडीनं असलेल्या जगदंबा आणि अन्नपूर्णा आदी देवतांच्या मूर्ती मयुरारूढ आहेत. मात्र मुंबादेवीची मूळ मूर्ती सिंहारूढ नसल्यामुळे आणि वाहनाशिवाय ती अपुरी वाटत असल्यामुळे मोत्यांचा व्यापार करणाऱ्या विठ्ठल नावाच्या भक्तानं १८९० साली देवीला चांदीचा सिंह अर्पण केला. हा सिंह आजही तिच्या पुढ्यात पण गाभाऱ्याबाहेर बघायला मिळतो. देवीचं दर्शन घेण्याआधी भक्त या सिंहाचं दर्शन घेतात.
नवरात्रात मुंबादेवीचं रूप पाहण्यासारखं असतं. मुंबादेवी नेहमी मोजके दागिने ल्यायलेली पाहायला मिळते. मात्र नवरात्रात तिचं तेज डोळे दिपवून टाकतं. प्रत्येक दिवशी वेगळ्या रंगाच्या भरजरी साड्या आणि ठेवणीतल्या दागिन्यांचा साज ती ल्यालेली असते. नवरात्रांत देवीला तिचे पारंपरिक दागिने घातले जातात. या रूपात देवीची मूर्ती आपल्याला प्रत्यक्ष आशीर्वाद देत असल्याचा भास होतो. तिचं दर्शन प्रत्येक मुंबईकरास दिलासा देतं. तसं तो रोजच तिचं स्मरण करत असतो. मुंबादेवी म्हणजे त्याच्यासाठी जगन्माता कायमच असते. परंतु नवरात्रीतलं तिचं हे तेजस्वी रूप बघून तो नव्या वर्षाच्या स्वागतास तयार होतो. देवीची आपल्यावर आणि मुंबईवर कृपादृष्टी असल्याची जाणीव हे दर्शन त्याला करून देतं.
मुंबईवर अनेक संकटं येऊन गेली, पण त्या प्रत्येकातून मुंबई सावरली. मुंबई सतत वाढत गेली. तिची भरभराट होतच गेली. कोणत्याही संकटाशी लढण्यासाठी आवश्यक असलेलं बळ मुंबईकरांना ही मुंबादेवीच देते अशी अनेकांची श्रद्धा आहे. कारण मुंबई केवळ महाराष्ट्राची राजधानीच नसून ती देशाची आर्थिक राजधानीही आहे. ही भावना मोजक्या शब्दात व्यक्त केली गगनगिरी महाराज यांनी.
गगनगिरी महाराज नेहमी सांगायचे की मुंबईतील महालक्ष्मी, मुंबादेवी आणि वाळकेश्वर या प्राचीन देवस्थानांच्या दर्शनाला अवश्य जात जा. मुंबापुरीची माया आहे महालक्ष्मी आणि मुंबादेवी या आद्य दैवतांमुळेच. महालक्ष्मीनं या मुंबईला वैभव प्राप्त करून दिलं आहे. महालक्ष्मी आणि मुंबादेवीमुळेच ही मुंबई स्थिर आहे. ते म्हणत, “महालक्ष्मी या मुंबईतून जाऊ इच्छिते. पण मुंबादेवी ध्यानात असल्यामुळे ती महालक्ष्मीची वाट अडवून आहे. तिला निघून जाणे शक्य होत नाही. ज्या दिवशी ही मुंबादेवी ध्यानातून जागी होईल त्या दिवशी ही मुंबईची माया महालक्ष्मी निघून जाईल. मुंबईचे ऐश्वर्य निघून जाईल. ज्या दिवशी मुंबादेवी जागृत होईल त्या दिवसापासून मुंबईचा आलेख, तिची संपन्नता अधोगतीला जाईल, महालक्ष्मी सोबत निघून जाईल.”

म्हणून गगनगिरी महाराज सांगत की आधी महालक्ष्मीचे दर्शन घ्या, त्यानंतर मुंबादेवीचे. या मुळे ती महालक्ष्मी स्थिर होते, मुंबादेवी तिला रोखून धरते. मुंबईचे सर्व आपदांपासून मुंबादेवी रक्षण करत असते. मुंबईतल्या गुजराती-मारवाडी-आगरी-कोळी समाजाला या गोष्टी ज्ञात होत्या. म्हणून यांच्या दर्शनाला ते मोठ्या प्रमाणावर जातात. हे गुपित माहित असल्यामुळेच गुजराती लोकांनी मुंबादेवीच्या आसपास उद्योग व्यवसाय सुरू केले आणि त्यांची भरभराट झाली. सोने हिरे यांचा झवेरी बाजार त्याच परिसरात आहे. मुंबादेवी आणि वाळकेश्वर ही मुंबईतील आगरी-कोळी लोकांची आराध्य दैवतं. वाळकेश्वराला आजही आगरी-कोळी लोक वाळक्या म्हणतात. त्याचा योग्य मानपान ठेवल्यामुळेच त्या परिसराच्या आसपास आगरी-कोळ्यांना मोठ्या प्रमाणावर मासे मिळतात अशी येथील आगरी-कोळी लोकांची श्रद्धा आहे.
मुंबईतील बहुतेक प्रसिद्ध मंदिरं शहरात आहेत. त्या मानानं उपनगरात मंदिरं कमी आहेत. उदाहरण घेता येईल लालबागच्या राजाचं. संपूर्ण महानगरीत हजारो गणेश मंडळं असली तरी लालबागेत होणारी गर्दी दमछाक करणारी असते. आणखी एक उदाहरण म्हणजे अलीकडे प्रसिद्ध झालेलं सिद्धिविनायक मंदिर. काही वर्षांपूर्वी हे अगदीच छोटं देऊळ होतं. मात्र आज ते देशात प्रसिद्ध झालं आहे. पण देवी आणि शिव मंदिरं प्रथमपासूनच प्रसिद्ध आहेत. शंकराची मंदिरं तर मुंबईच्या काना कोपर्यात आहेत. माणकेश्वर, धाकलेश्वर आदींचा उल्लेख या संदर्भात करता येईल. परंतु तेव्हाही मुंबईची शक्तिपीठं प्रसिद्ध होती.
मुंबादेवीच्या नजीक असलेलं, एव्हढं भव्य नसलं तरी काळबादेवी मंदिरातील नवरात्रीचा उत्सव अगदी उत्साहात साजरा करण्यात येतो. या काळबादेवीला मांसाहारी नैवेद्य चालत नाही. नवमीला मार्गशीर्ष कृष्णपक्षात इथं मोठी जत्रा भरते, प्रचंड गर्दी होते. मुंबईतील आणखी एक प्रसिद्ध देवी मंदिर म्हणजे महालक्ष्मी. या मंदिरात लक्ष्मीची स्थापना १७४५ साली झाली अशा नोंदी आढळतात. महालक्ष्मी, महाकाली आणि महासरस्वती अशा तीन देवींच्या मूर्ती इथं आहेत. रोज सकाळी आणि सायंकाळी इथं आरती होत असते. काळबादेवी आणि मुंबादेवी यांच्याजवळ पायधुणी भागात महाकाली मंदिर आहे. मात्र हे मंदिर एव्हढं प्रसिद्ध नाही. त्याला मोठी परंपरा आहे आणि महाकाली असली तरी तिचा नैवेद्य शाकाहारी असतो.
माहीम येथील शितलादेवीचं मंदिर सारस्वत समाजाचं दैवत म्हणून प्रसिद्ध आहे. हे शांतादुर्गा देवीचं मंदिर आहे. लेडी जमशेदजी मार्गावरच्या या मंदिरात इतर अनेक देवता आहेत. त्यातील एक आहे खोकला देवी. तिच्या दर्शनानं खोकला बरा होतो असं मानतात. त्याच्या जवळच मनमाला देवीचं सात आसरा मंदिर म्हणून ओळखलं जातं. प्रभादेवी हे मुंबईचं एक आद्य मंदिर मानलं जातं. प्रभादेवी याच नावानं हा परिसरही प्रसिद्ध आहे. तिथंच जवळ दादर भागात जाखादेवीचं मंदिर आहे. ते फारसं प्रसिद्ध नाही.
गोलफादेवी मंदिर उंच टेकडीवर महालक्ष्मी प्रमाणेच आहे. वरळीमधील या मंदिरात कोळी समाजाचा वावर विशेष असतो. आजही या मंदिरातील देवीला कौल लावण्याची प्रथा आहे. मुंबईत गेल्या काही काळात गणपती आणि हनुमान या मंदिरांना भेट देणार्या श्रद्धाळू भाविकांची संख्या वाढताना दिसत आहे.
मात्र अनेक मंदिरं प्रसिद्धी पावत असली तरी मुंबईचं अधिदैवत असलेल्या मुंबादेवीचं स्थान आजही सर्वोच्च आहे.

– लेखन: दिलीप चावरे. ज्येष्ठ पत्रकार.
-संपादन: देवेंद्र भुजबळ☎️ 9869484800