नागपूरला सौ.ललिता पाटणकर या सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका आहेत. त्यांनी त्यांच्या महिला मंडळाच्या वतीने ‘कुटुंब रंगलंय काव्यात’ हा माझा एकपात्री कार्यक्रम आयोजित केला होता.
महाल भागातील शुक्रवारी तलावाच्या समोर असलेला ‘लेकव्ह्यू लॉजचा’ हॉल त्या मंडळाच्या महिलांनी भरला होता. स्टेजवर मी व माझे तबला वादक असे दोघेच फक्त पुरूष होतो. श्री सरस्वतीचे पूजन, दीपप्रज्वलन झाल्यावर स्वतः ललिताजी माझा परिचय करून देण्यासाठी उभ्या राहिल्या आणि एक पुरूष व्यक्ती हॉलमध्ये आली आणि हळूच मागच्या खुर्चीवर येऊन बसली. हॉलमध्ये आलेला तिसरा पुरूष पाहून मलाही जरा बरे वाटले. ललिताजींनी माझा परिचय करून दिला आणि स्टेज माझ्याकडे सुपूर्द केले.
मी माझा एकपात्री कार्यक्रम सुरू केला आणि “या कुंन्देन्दु तुषारहार धवला” सरस्वती स्तोत्राची मराठीतील समश्लोकी सादर करताच सर्वांनी टाळ्या वाजवून दाद दिली, आजचा कार्यक्रम रंगणार,हे लक्षात आले. ऊन ऊन खिचडी, साजुक तूप, आत्मा म्हणतो, बाल कविता, माहेरची ओढ, पाणी इथंच मुरतंय गं, वात्रटिका, प्राचीन व अर्वाचीन कविता, मुक्त छंद, अभंग अशा सर्वच कविता मी सादर करीत गेलो, आणि भरभरून दाद मिळत गेली. उत्तरोत्तर कार्यक्रम रंगत गेला, आणि टाळ्यांच्या कडकडाटात तो प्रयोग संपन्न झाला.
कार्यक्रम संपला, मागे बसलेली पुरूष व्यक्ती मला भेटायला समोर आली. ललिताजींनी मला त्यांचा परिचय करून दिला. “हे माझे मोठे दीर, सुधीर पाटणकर. नागपूर दूरदर्शनवर निर्माते आहेत.” परिचय होताच सुधीरभाऊ मला म्हणाले, “येथील दूरदर्शनवर तुमचा कार्यक्रम आयोजित केला तर तुम्ही याल कां?” मी तात्काळ होकार देताच माझा लॉजचा पत्ता व फोन नंबर घेऊन ते निघून गेले. कांही दिवसांनी ते मला भेटायला आले, आणि म्हणाले, “याकूब सईद, हे नागपूर दूरदर्शनचे डायरेक्टर आहेत. ‘कुटुंब रंगलंय काव्यात’ हा तुमचा एकपात्री कार्यक्रम दूरदर्शनवर सादर व्हावा म्हणून मी त्यांना प्रस्ताव दिला, तर कवींची लेखी परवानगी असल्याशिवाय हा कार्यक्रम घेता येणार नाही, असे त्यांनी सांगितले.
त्या-त्या कवींच्या कविता विसुभाऊंनी त्या कवींच्या हस्ताक्षरात संकलित केलेल्या आहेत व तीच कवींची परवानगी आहे, असे सांगितल्यावरही त्यांनी नकारच दिला आहे. पण मी तुमचा शालेय कार्यक्रम “बालचित्रवाणी’ मध्ये घेतो आहे, कारण बालभारतीच्या पाठ्यपुस्तकातील कविता सादर करण्यासाठी परवानगीची आवश्यकता नाही.”
नागपूरच्या महाल परिसरातील नवयुग विद्यालयात, इयत्ता नववी-दहावीच्या विद्यार्थ्यां समोर महाशब्दे मॅडमच्या सहकार्याने माझा ‘ओंकार काव्य दर्शन’ हा शालेय आयोजित केला, आणि त्या संपूर्ण कार्यक्रमाचे शूटिंग सुधीर भाऊंनी करून घेतले. ‘नागपूर दूरदर्शनची निर्मिती’ म्हणून दुपारच्या सत्रातील ‘बालचित्रवाणी’मध्ये हा कार्यक्रम मुंबई दूरदर्शन वरून प्रसारित करण्यात आला, कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचला.
त्यानंतर बरेच दिवस सुधीर पाटणकर यांच्याशी माझा कांहीही संपर्क झाला नाही, कारण त्यांची बदली मुंबई दूरदर्शन केंद्रात झाल्याचे समजले. कांहीच दिवसांत लॉजवर फोन करून त्यांनी मला मुंबईत बोलावून घेतले. सुधीरजीना मुंबई ‘दूरदर्शनवरील चांगला निर्माता’ म्हणून प्रसिद्धी मिळाली होती. नागपूरचे चित्रपट निर्माते सुरेश देशपांडे ‘विदर्भ विकास मंडळाचे ट्रस्टी होते. त्यांचे पत्र घेऊन दादर येथील मंडळाच्या रेस्ट हाऊसवर माझी मुंबईत राहण्याची सोय करून घेतली. मुंबई दूरदर्शनवर माझ्या ‘कुटुंब रंगलंय काव्यात’ एकपात्री कार्यक्रमाचे पन्नास मिनिटांचे शूटिंग झाले आणि जुलै १९८६ ला एका संध्याकाळी, प्राईम टाईमला माझा एकपात्री कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रातील रसिकांनी अनुभवला आणि कार्यक्रम महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील रसिकांपर्यंत पोहोचला, तो रसिकांना प्रचंड आवडला आणि मला भरपूर नांव मिळाले. नंतर मी मुंबईत स्थिर झालो.
१९८१ सुरू केलेला माझा एकपात्री कार्यक्रम रसिकप्रिय झाला आणि आजपर्यंत मी ३०६० प्रयोग सादर केले आहेत व प्रयोग सादर करतो आहे. मराठी रसिकांच्या उदंड प्रतिसाद मिळतो आहे.

– लेखन : प्रा.विसुभाऊ बापट. मुंबई
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
आदरणीय सर, १९८१ ते २०२२ अशी गेली ४१ वर्षे यशस्वी घोडदौड करणाऱ्या कार्यक्रमासाठी खूप खूप अभिनंदन आणि हा प्रयोग असाच अखंडपणे मराठी प्रेमींपर्यंत पोहोचत राहो, या शुभेच्छा!