चिनुचा छंद
नमस्कार, वाचक हो.
गेल्यावेळी आपण माझ्या एका मैत्रिणीच्या घरी मेजवानी घेतली. आज आपण माझ्या आत्येबहिणीच्या घरी भेट देत आहोत. तेही तिच्या बागेतून किंवा घरातून बागेत जाणार आहोत.. आता तुम्ही म्हणाल हे काय वेगळंच ?
होय !! आजचा विषय जरा वेगळाच आहे.
बागेतील फुलांचे आपण नेहमी काय करतो तर देवाला वाहणे, गुच्छ, माळा, गजरे किंवा फुलदाणीत सजवणे पण याच फुलांना वेगळ्या रूपात घेवून आली आहे आजची आपली कलाकार कु.भाग्यश्री शशिकांत मगर, जिला घरी चिनू म्हणतात.जे कलाकार पाहतो ते आपण सर्व जण पाहू शकत नाही त्यामुळे कलाकार हा नशिबाने जन्माला आलेला असतो असे वाटते. काहीही करायचे म्हणले तर कारणं सांगणारे बरीच कारणं सांगतात. पण उपलब्ध असणाऱ्या कोणत्याही सामग्रीपासून अतुलनीय नवनिर्मिती होऊ शकते हे आपल्याला चिनूच्या कलाकारीतून दिसते.
विविध फुला पानांपासून ती सुंदर कलाकृती निर्मिती करते. सौंदर्य पाहण्याची नजर प्रत्येकालाच असते असं नाही आणि हाच फरक तिला खास बनवतो.
शाळेत असताना ‘फुलांची सजावट करणे’ या स्पर्धेत नेहमी ती भाग घ्यायची आणि प्रथम क्रमांकही पटकवायची. नंतर कॉलेजमध्ये नवीन वर्ष आणि संक्रांत असे मिळून एक फुलांपासून कलाकृती केली होती. त्या कलाकृतीस ठरलेले मानांकन सोडून “Best creative art” म्हणून मानांकन दिले होते. ही कौतुकाची थाप, या प्रवासाची सुरुवात होती. २०१८ पासून सुरु झालेला हा सुखद प्रवास आज या कलाकाराच्या कलाकारीची ओळख करून देण्यास प्रवृत्त करतो.
आपल्या सर्व मराठी सणांची प्रतिकृती, महिला दिन विशेष, जन्मदिन शुभेच्छा, छत्रपती शिवाजी महाराज, गणेश उत्सव साठी किंवा चतुर्थीसाठी विविध गणेश, गौराईची पावले, शिवशंकर, विठ्ठल रखुमाई, आपला तिरंगा, कोजागिरीसाठी चांदोमामा, जिजामाता,आजी आजोबा, श्री कृष्णा, पाटील, आई… आणि अजून इतर कितीतरी निर्मिती तिने केल्या आहेत.
आंतरराष्ट्रीय चहा दिवसासाठी चहा – किटलीही तयार केली होती. अशा अनेक अभिनव कल्पना साकार करत भाग्यश्री आपल्याला नेहमी नवनिर्मितीचा आनंद देत राहील.
या कलाकृतींवर मी चारोळ्या किंवा कविता लिहिण्याचा प्रयत्न करत असते. ज्या दिवशी सण वगैरे असेल तेव्हा उत्सुकता असते आज काय भाग्यश्री पाठवणार ? कलाकृतीचे चित्र आल्यावर मात्र मन खुश होते. लिहिण्यास चालना मिळते.
वातावरण चांगले असेल तर भरपूर फुले मिळतात. तरीही जितके गरजेचे आहे तितकेच ती घेते..एक पान लागणार असले तर ती एकच तोडते उगाच आहे म्हणून जास्त घेत नाही, वायाही घालवत नाही . यावरून तिचे निसर्ग प्रेम दिसून येते. बऱ्याचदा काही अडचणीही येतात.. धुके, पाऊस किंवा कडक उन्हामुळे पाहिजे तेवढी फुले मिळत नाहीत. अशा वेळी मिळतील तशी फुले शीतकपाटात साठवून मग त्यांचा वापर करते.
जेव्हा ‘पाटील’ निर्मिती केली होती तेव्हा मा. खासदार श्रीनिवास पाटील यांनी घरात प्रवेश करताना ते पाहुन तिथेच भाग्यश्रीचे कौतुक केले होते. त्यांच्या सहाय्यकांना चित्र काढून घ्यायला सांगितले आणि घरी गेल्यावर आवर्जून त्यांच्या सौभाग्यवतींना दाखवलेही होते. अविस्मरणीय असा हा अनुभव आहे.
@bhagyashrism_714 या दुव्यावर जाऊन आपण या कलाकृती पाहू शकता.
भाग्यश्रीच्या मैत्रिणीही तिच्याकडून प्रेरणा घेवून आता या कलाकृती निर्माण करायला शिकत आहेत.
यापुढेही जाऊन याचे छोट्या व्यवसायात रूपांतर करण्याचा तिचा मानस आहे. थोड्याच दिवसात आपणास याचे स्वरूप कळेल. त्यासाठी भाग्यश्रीला मनःपूर्वक शुभेच्छा.
आपण कल्पनाही करू शकत नाही अशा गोष्टी फक्त एक कलाकारच करू शकतो. अजून बऱ्याच कल्पनांना प्रत्यक्षात उतरावयाचे आहे तरीही या चार वर्षाचा हा प्रवास नक्कीच तिचे अस्तिव सिद्ध करतो.
कला, वाणी, ज्ञान, विद्या, संगीताची अधिष्ठात्री देवी सरस्वतीच्या उत्सवाच्यावेळी भाग्यश्रीच्या कलेस आपणा समोर मांडतांना अभिमान वाटत आहे. शारदादेवीचा आशीर्वाद सदैव तिला मिळत राहो हीच मनीची आशा.

– लेखन : सौ. मनिषा दिपक पाटील. केरळ
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
खूपच सुंदर लेख आहे मनीषा असंच लिहित जा भाग्यश्री चे कौतुक करावे तितके कमी खूप सुंदर कलाकारी असेच पुढे चालू राहू दे खूप खूप अभिनंदन धन्यवाद
Thank you so much!!😊🙏