अमिताभ बच्चन म्हणजे चिवट, चिकाट भूतंच..
कधी मानगुटीवर बसलं ते कळलंच नाही..
अजून तसंच….
मी तसा वर्गात इतरांच्या मानानं जरा उंचच.. शाळेत पोरं मला हाडका बच्चन म्हणायची..
सुरुवातीला राग यायचा.. म्हणणाऱ्याची आई बहीण काढायचो..
पुढे बच्चनना पडदा भरून पाहिला आणि तेव्हापासून डोळ्यात न् काळजात भरून घेतला तो कायमचाच…
पोरं चेष्टेनं म्हणायची पण मला गार गार वाटायचं..
1978 साली मी चड्डीतून पॅन्टीत गेलो.. पहिली पॅन्ट भावाच्या लग्नात शिवली.. तेंव्हा चौदा वर्षांचा होतो..
पॅंटीची लई अपुर्वाई…. मला अजून आठवतं, तेव्हा बच्चन सारख्या ढांगा टाकत नगरपालिका शाळा नंबर सहाच्या ग्राउंड वर मी स्टायलिश चालायची प्रॅक्टिस केली ती.. बरोबर चूक सांगायला शफया नायकवडी….
आपण बच्चनच झालोय असं वाटायचं…
हे खूळ एवढ वाटलं की रेखा नाव आवडलं म्हणून आमच्या गल्लीतल्या रेखा चव्हाण नावाच्या पोरीच्या पुढंपुढं मी तसाच लांब लांब ढांगा टाकत फिरलेलो… (इथं लिहिताना तिचं आडनाव बदलण्याचं स्वातंत्र्य मी घेतलं आहे)
अमिताभ बच्चन यांच्यासारखी केस वाढवायची माझी खूप खूप ईच्छा होती.. एकदा केस कापले की दोन महिन्यानंतरच पुन्हा दुकानात जायचं अशी घरातून तंबी असल्यानं, नळ भागातला काळे नावाचा नाभिक, जमीन धरून खुरपणी करायचा.. एवढे बारीक ठेवायचा की पहिले पंधरा दिवस केसं उभीच राहायची.. कितीही कंगवा फिरवला तरी सप्पय म्हणून व्हायची नाहीत..
त्यामुळे ज्यांच्या डोक्यावर बच्चन स्टाईल असायची, त्यांचा द्वेषच करायचो…
सदासुखला, सरस्वतीला बच्चनचा पिक्चर आला की पहिले दोन दिवस नुसते फिरून रेकी करायचो.. मी आणि सोन्या आणि शिरक्या आणि रफया…
भित्ताडाला कान लावून डायलॉग ऐकायचो..
तिकिटाच्या पैशाची जुळणी झाली की थेटर गाठायचं..(शक्यतो प्रताप टाळायचो… तिथं ढेकणं मांडी फोडायची..)
कधी एकदा खिडकी उघडते असं व्हायचं…
खिडकीत हात घालून मनगटावर एक रुपये पाच पैशाचा पुढं बसायचा शिक्का मारून घेतला की तो चार-पाच दिवस पुसू नये असंच वाटायचं..
नंतर आंघोळीला गेलो की हात वर करूनच अंघोळ.. मनगट भिजलं न् शिक्का विरघळला तर काय घ्या ?
समोरच्याला शिक्का दिसावा म्हणून मुद्दाम त्याच्यासमोर सहज वाटावा असा हात पालथा धरायचो.. पिक्चर पाहिलास काय म्हणून विचारावं हीच इच्छा..
“हो बच्चनचा” असं म्हणटल्यावर, मोठं डोळं करून त्यांनं आश्चर्य दाखवल्यावर काळीज निवायचंच..
बच्चन साहेबांमुळं असं, किती आणिक कसं काळीज निवायचं ते मलाच ठाऊक..
(बच्चनना काय त्याचं ?…)
पिक्चर बघून आलो की दोन-चार दिवस नशा उतरायचीच नाही.. गारुडच घातलेलं..
दिवसा पण नट्या डोळ्यापुढं दिसायच्या…
(बच्चनना काय त्याचं ?…)
मी पहिली बियर पिली ती “शराबी” पिक्चर पाहिला त्या रात्री.. कुणी बघू नये म्हणून सरकारी घाटावर कार्यक्रम उरकलेला.. तशी सर परत कधीच आली नाही. ना तशी कधी तार जुळली…
मधी शूटिंग च्या वेळेला गड्याच्या पोटात गुच्ची बसली आणि दवाखाना मागं लागला त्यावेळी आमची काय हालंत झालती, ते आमचं आम्हालाच ठाऊक…
आकाशवाणीची आवाज चाचणी नापास झाल्याचं ऐकल्यावर वाटतंय, जरा मी आधी असतो तर ऑडिशनचं टेक्निक सांगितलं असतं त्यांना..
झटक्यात बी हाय ग्रेडनं पास झाले असते..
पण योग नव्हता !
असा जबर्या आवाजाचा माणूस पडद्यावर हळवं बोलायला लागला की काळजाचं पाणी पाणी होतं..
कानात प्राण येतो..जीवाला आट्टी लागते..
सुधरायचं बंदच होतं..
असो..
असं बच्चनचं आणि आमचं जरा भावनिक बिवनिक झेंगाट आहे म्हणाना..
या भाद्दराबद्दल काय आणि किती सांगावं ?… उतू जातय…
म्हणून थोडंच लिहिलं..
या चित्रपट सृष्टीत त्यांच्या इतकं दुसरं कोणी आपलं आहे असं आजवर वाटलंच नाही..
काय भानगड आहे कळत नाही…
बऱ्याच वर्षांपूर्वी मुंबईला गोरेगावला आर.ए. कॉलनीत झालेल्या एका शिबिराला मी आणि विक्या नाईक गेलेलो.. तिथं रस्त्यावरून चालत जात असताना अमिताभ बच्चन एका पॉश गाडीतून भर्रकन निघून जाताना आम्ही बघितले..
आम्हाला खूळ लागल्या वाणी झालं.. उड्या मारून हाळ्या घालत आम्ही त्यांना हात केला..
काय सांगू राव, त्यानीही हसून माझ्याकडे पहात मला हात केलाता..
(आता त्यांना कसं कळणार की आपण सांगलीच्या संजय पाटलाला हात केलाय म्हणून !)
न का कळेना —
अजूनही ते चित्र माझ्या डोळ्यासमोर ताजंताजं आहे….
मला हात केल्याचं, त्यांनाही ते आठवत असेल का ?.. असंही मला वाटत राहतं….
आपल्याला वाटतंना मग बस्स झालं की..
नाही का ?
(बच्चनना काय त्याचं ?)

– लेखन : संजय जगन्नाथ पाटील.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800