तीन ऑक्टोबरला सकाळी दहा ते एक अशी आम्हा
साहित्यप्रेमी मैत्रिणींची साहित्यिक बैठक झाली. शब्दांची माला वाहून दीपप्रज्वलन सुनंदाताई, सुषमाताई आणि पाहुण्या कुमुद ताई यांनी केले. साहित्य, सौहार्द आणि संवाद ह्या त्रिसूत्रीचे दीप लावून प्रज्वलन झाले.
मेधाने ‘उत्खनन’ विषय घेऊन प्रास्ताविक केले. साहित्याचे, अनुभवांचे आठवणींचे, केलेला प्रवास, वैवाहिक जीवन यांचे उत्खनन केले पाहिजे, असे तिने सांगितले.
यावेळी शारदीय नवरात्रीचा उत्सव म्हणून मेधा आणि अनुराधाने साहित्यातील नवदुर्गा म्हणजे नऊ कवयित्रींच्या कविता आम्हाला पाठवल्या होत्या, त्या वाचून दाखविण्याचे ठरविण्यात आले. यानंतर अनुराधाने आपल्या सुस्वरात ‘आनंदाचे गीत’ गायले.
मेघाने मांगल्याचा, निर्भयतेचा, ज्ञान भांडाराचा, सुख शांतीचा जोगवा मागितला. “तू विश्व शक्ती, तू नारी शक्ती”. विचारांच्या सीमोल्लंघनाने आमची पहिली फेरी लेखांच्या वाचनाने सुरू झाली.
सुनंदाताईंनी त्यांच्या माणसांनी भरलेल्या घरात, ज्यांनी त्या घराला घरपण दिले, तिथेच त्यांना त्यांचा स्वर्ग सापडतो असे सांगितले.
दीपाली ने तिच्या मैत्रिणीच्या वडिलांच्या आठवणी सांगितल्या. ज्या सत्पुरुषाने -पप्पांनी- तिला घडवलं, साहित्याची दृष्टी दिली.
राधिकाने तिच्या आठवणीतील ‘दिवाळी पहाट’ आम्हाला अनुभवास आणून दिली. फटाक्यांच्या गमती जमती सांगत लेखाचाही ‘फटाका’ उडवला.
शुभदा लेखणी या विषयावर बोलली. त्यात तिने लेखणीचा इतिहास, लेखणीचे विविध प्रकार सांगितले.
अपर्णाताई ‘माहेर’ या जिव्हाळ्याच्या विषयावर बोलल्या. त्यांचे आणि सुनेचे असलेले अनामिक सुंदर नाते, त्यामुळे सुनेला त्यांचं घरंच आपलं माहेर कसं वाटतं, हे छान सांगितलं.
अनुराधाने ‘देवा तुम्हीसुद्धा’ हा मिश्किल पण अंतर्मुख करणारा लेख वाचला. आकाशातले देवही तिला सुखी वाटले नाहीत, म्हणून तिने देवांनाच शुभेच्छा दिल्या.
दुसऱ्या फेरीत नवदुर्गेच्या, नऊ कवयित्रींच्या नऊ कविता प्रत्येकीने एकेक अशी वाचली. शेवटी शुभदाने पसायदान मागितले.
दीपालीने बैठकीचा थोडक्यात आढावा घेत समारोप केला. साहित्याचा कलश भरून घेतला आणि सर्व मैत्रिणी घरी परतल्या पुढच्या बैठकीच्या ओढीने !

– लेखन : शुभदा दीक्षित
– संपादन : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800