Thursday, July 3, 2025
Homeकलाचित्र सफर ( १८ )

चित्र सफर ( १८ )

महानायक
सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचा ८० वा वाढदिवस नुकताच साजरा झाला. त्या निमित्ताने अबू धाबी येथील श्री प्रशांत कुलकर्णी यांनी अमिताभ बच्चन यांच्या वर लिहिलेला लेख “चित्रसफर” मध्ये प्रसिध्द करीत आहे. श्री कुलकर्णी यांचे न्यूज स्टोरी टुडे परिवारात हार्दिक स्वागत आहे.
– संपादक

“आता मी श्री.अमिताभ बच्चन यांना विनंती करतो की, त्यांनी दोन शब्द बोलावे” सूत्रधार हरिष भिमानी यांनी जाहीर केले अन त्याक्षणी त्या मंडपात बसलेले दहा हजार प्रेक्षक एकदम सावरून बसले.

रंगमंचावर लता मंगेशकर यांच्याशी हितगुज करण्यात गुंतलेला “तो” एकदम उठला. चालत चालत हरिष भिमानी जिथून कार्यक्रम संचालित करत होते तिथे आला. समोरचा माईक आणखीन एक फूट वर ओढला. मंडपात जमलेल्या प्रेक्षकांकडे एक नजर टाकली आणि आपल्या नेहमीच्या खर्जातील आवाजात म्हणाला, “आदरणीय लता मंगेशकर जी…….

अन एकदम मंडपात टाळ्यांचा कडकडाट झाला. शिट्या वाजू लागल्या.इतका वेळ शांत बसलेले प्रेक्षक उसळले. हाच तो आवाज जो गेली चार दशकाहून अधिक काळ आपल्या मनावर राज्य करतो आहे. तो आवाज आज आपल्याला प्रत्यक्ष ऐकायला मिळतो आहे या कल्पनेनेच सुखावले. या सुखावलेल्या प्रेक्षकांत मी पण होतो.
स्थळ होते दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, पुणे. कार्यक्रम होता विमल लालचंद मुथा कर्करोग उपचार केंद्राच्या उदघाटनाचा. तारीख ३० जुलै २००५ व प्रमुख उदघाटक होता अमिताभ बच्चन !

स्टेजवर राहुल बजाज, लता-हृदयनाथ मंगेशकर ही नावाजलेली मंडळी उपस्थित होती व त्यांच्या मध्यभागी हा बसलेला. केवळ याला पाहण्यासाठी चाहत्यांनी रुग्णालयाच्या आसपास तुडुंब गर्दी केली होती. तो गाडीतून उतरताना, रुग्णालयात जाताना वा बाहेर पडताना त्याचे दर्शन व्हावे म्हणून चाहत्यांची एकच धडपड सुरू होती. या धडपडीत मी सुध्दा होतो. ही गर्दी आवरणं पोलीस व खाजगी सुरक्षा रक्षकांना कठीण जात होते. कार्यक्रम फक्त आमंत्रितांसाठीच असल्याने आमंत्रण पत्रिका बघितल्या शिवाय कोणालाही आत सोडत नव्हते. सुरक्षा रक्षकांची नजर चुकवून, तीन चार कडी तोडून मी जेव्हा स्टेज जवळ फक्त सहा फुटांवर पोहोचलो तेव्हा माझाच स्वतःवर विश्वास बसत नव्हता.

माझ्यासारखे हजारो चाहते रस्त्याच्या कडेला, दिनानाथच्या आसपास, आजूबाजूच्या इमारती मधून त्याची एक झलक बघण्यासाठी ताटकळत उभे होते. माझा डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता की कालपर्यंत ज्याला आपण फक्त रुपेरी पडद्यावरच पाहात आलोय, तो आज आपल्यापासून फक्त सहा फुटांच्या अंतरावर उभा होता.

अमिताभ बच्चन ! नक्की कधी हे नाव कानावर पडले आपल्या ? नक्की कधी पडद्यावर पाहिला याला ? त्याचा चाळीस वर्षाचा (आता पन्नास वर्षाचा) पडद्यावर चा प्रवास झरकन डोळ्यासमोरून तरळून गेला. मुंबईच्या मराठा मंदिर ला मॅटिनीला ‘सात हिंदुस्थानी’ पाहिला तेव्हा की भायखळा च्या पॅलेस मध्ये रात्रीचा ‘आनंद’ पाहून आलो तेव्हा ? तेव्हाही तो फार आवडला अशातला भाग नव्हता. कारण तेव्हाच्या आमच्या शाळकरी वयात राजेश खन्ना नावाचा सुपरस्टार राज्य करत होता. अन या लंबूचे अलंकार ला बन्सी बिरजू, नॉव्हेल्टी ला एक नजर, प्यार की कहानी, ड्रीमलॅन्ड ला बंधे हाथ या सारखे चित्रपट एका नंतर एक आपटत होते.

मग एक दिवस इंपिरियल ला याचा जंजीर लागला. आपल्या येऊ घातलेल्या साम्राज्याची पहिली शिडी तो व्यवस्थित चढला होता. मग दिवार मध्ये दुसरी शिडी, शोले त तिसरी असे करत करत भराभर यशाच्या शिड्या चढतच गेला. अमिताभ बच्चन नावाच्या वावटळात राजेश खन्ना नावाचे गलबत कधी बुडाले हे समजलेच नाही.

एके दिवशी तो या हिंदी चित्रपटसृष्टीचा अनभिषिक्त सम्राट झाला. बीबीसी च्या पत्रकाराने त्याला One Man Industry असे संबोधित केले. त्या नंतर त्याची नंबर एकची जागा घ्यायला पुढील 10-15 वर्षात कोणी माय का लाल पैदा झालाच नाही. सर्वजण त्याच्या आसपास घोटाळत होते. पण त्याची नंबर एकची जागा घ्यायला खान मंडळीला 2000 सालाची वाट पाहावी लागली.

मधल्या काळात त्याला ‘कुली’च्या सेटवर जीवघेणा गंभीर अपघात झाला. तेव्हा सारा भारत त्याच्यासाठी प्रार्थना करत होता. मित्राच्या हाकेला ओ देऊन तो राजकारणात शिरला पण तिथे त्याचा निभाव लागला नाही.

तो परत फिल्म इंडस्ट्री कडे परतला. स्वतःची ABCL कंपनी काढून चित्रपट ही निर्माण केले. त्यातही अपयश आले. करोडो रुपयांचे कर्ज डोक्यावर चढले. एक दिवस अशा परिस्थितीत यश चोप्रा कडे ‘मोहोब्बते’ मधील रोल मागायला गेला, जो आधी अमरीश पुरी करणार होता. त्यांनीही मोठया मनाने अमिताभ साठी तो रोल सोडला.

मग याच्या आयुष्यातील दुसरी इंनिंग सुरू झाली. त्याच वेळी ‘कौन बनेगा करोडपती’ द्वारे तो घराघरात पोहोचला. जाहिराती द्वारे पैसे मिळण्याची शक्यता निर्माण झाल्यावर मिळेल त्या जाहिराती घेत सुटला. यातून त्याने सर्व कर्ज फेडले. त्या काळात जाहिराती ने दिलेला आर्थिक आधार आठवून आजही तो कुठलीही जाहिरात नाकारत नाही.

त्यानंतर मात्र त्याने मागे वळून पाहिलेच नाही. प्रत्येक पाउल जपून टाकत गेला.

असे काय आहे या अभिनेत्यात की ज्याच्या वागण्याने आपल्याला अजूनही भुरळ पडते ? त्याचा आवाज ऐकल्यावर सरकन काटा उभा राहतो. प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक कार्यक्रमात त्याचे भारदस्त व्यक्तिमत्त्व, आत्मविश्वास पूर्ण तरीही अदबशीर, सुसंस्कृत वागणे व वावर याचा आपल्यावर प्रभाव पडतोच.

हा बदल त्याने स्वतःमध्ये जाणीवपूर्वक घडवून आणलाय. सुरुवातीच्या संघर्षाच्या काळातील अमिताभ वेगळा होता. ओळीने चौदा चित्रपट आपटल्या नंतरही त्याच्यातील जिद्द कायम होती. त्या काळात निर्मात्याकडून झालेले अपमान, त्या वेळच्या मोठया हेरॉइन्सनी त्याच्यासमवेत काम करण्यास दिलेले नकार हे सर्व पचवून जंजीर पर्यंत यशाची वाट बघायला लावणाऱ्या काळात त्याचे सतत निरीक्षण चाललेले असे.

राजेश खन्ना च्या चलतीच्या काळात राजेश बरोबर आनंद, नमक हराम मध्ये काम करताना त्याचे राजेश खन्ना च्या सवयीवर बारीक लक्ष असे. राजेश चा अहंकार, त्याचे सकाळी सात च्या शिफ्टला दुपारी दोन वाजता उगवणे, रात्रंदिवस चमच्यांच्या गोतावळ्यात रमणे, रात्री उशिरापर्यंत ओल्या पार्ट्यात रंगून जाणे या राजेशच्या सवयी त्याला यशाच्या शिखरावरून रसातळाला घेऊन गेल्या. हे अगदी जवळून पाहिलेल्या अमिताभने यश मिळाल्यावर एकच गोष्ट केली. राजेशच्या या सवयींना आपल्यापासून कोसभर दूर ठेवले. कुठल्याही शिफ्ट ला वेळेवर पोहोचण्याचा वक्तशीरपणा त्याने जपला. चमच्याना जवळपास फिरकू दिले नाही. यशाची नशा मद्यासमवेत चाखली नाही. आई वडिलांच्या संस्कारामुळे अहंकार हा अलंकार मानला नाही.

यशाच्या शिखरावर असताना त्याच्या हातूनही चुका झाल्या, नाही असे नाही. पण त्या चुकातून बोध घेण्या इतपत तो शहाणा निघाला.वयोपरत्वे वयाला साजेशा आणि शोभेलशा भूमिका करत राहिला. नायक आणि चरित्र भूमिका यातील फरक ओळखून घेण्या इतपत तो समजूतदार निघाला.

अनेक गंभीर आजारांना सामोरे जात त्याचा खंबीरपणे मुकाबला केला.आज वयाच्या ८० व्या वर्षी त्याच्या काळातील जवळपास सर्व नायक निवृत्त जीवन जगत असताना हा मात्र 3-4 सिनेमा च्या शूटिंग मध्ये, जाहिरातीत, दरवर्षी च्या करोडपती मध्ये व्यस्त आहे. निवृत्तीचा विचारही त्याच्या मनाला शिवत नाही. शरीर, मन आणि विचार यांना त्याने मरगळ येऊ दिली नाही. नवीन पिढीच्या, नवीन युगाच्या संपर्कात राहायचे तर ट्विटर सारख्या सोशल माध्यमातून राहायला हवे हे कौशल्य त्याला जमलंय. सामाजिक घटनांची नोंद घेत तो नेहमी संवेदना व्यक्त करतो.त्यामुळे त्याच्या चाहत्यात तरुण, तरुणी, आबालवृद्ध यांची भर पडतच राहते. (इथे त्याचा अरे तुरे उल्लेख हा केवळ प्रेमपोटीच ! कितीही वय झाले तरी आम्ही लता ला आम्ही आमची लता, आमचा सुनील, आमचा सचिन असा एकेरीच उल्लेख करणार. त्यांच्या अफाट कर्तृत्वाला एकेरी उल्लेख केल्याने बाधा येत नाही आणि आमच्या मनातील आदरभाव कमी होणार नाही !)

काही वर्षांपूर्वी त्याला मानाच्या दादासाहेब फाळके या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.पण आपल्यासारख्या रसिकांच्या मनात त्याने जे सर्वोच्च स्थान कमावले आहे ते मात्र ध्रुव ताऱ्या सारखे कायम अढळ राहणार आहे. आज अमिताभ ऐंशीवा वाढदिवस साजरा करत आहे. त्याच्या बरोबर काम केलेले सुनील, शशी, शम्मी, ऋषी केव्हाच अनंताच्या प्रवासाला निघून गेलेत. प्रकाश मेहरा, हृषीदा, मनमोहन देसाई सारखे दिग्दर्शक ही आता राहिलेले नाहीत. पण हा नवीन कलाकार -दिग्दर्शक यांच्या बरोबर तेवढ्याच उत्साहात काम करतोय. KBC द्वारे स्वतःची एक छबी तयार करतोय. प्रत्येक participant बरोबर अदबीने वागताना स्वतःचे मी पण कटाक्षाने दूर ठेवतोय. म्हणूनच त्याच्यावर प्रेम करणारे आपण आज ह्या मनोरंजन विश्वातून आम्हाला स्वप्ने दाखवणाऱ्या या सदी च्या विश्वनायकाला एवढेच म्हणून शकतो की “अमिताभ तुम्ही शतायु बरोबरच चिरायू व्हा.”

प्रशांत कुळकर्णी

– लेखन : प्रशांत कुळकर्णी. अबुधाबी
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments