नमस्कार, वाचक हो. शिसपेन्सिलच्या टोकावर (Pencil carving) केलेल्या कलाकृतीसाठी
१) Vajra world record in May 2016
२) India book of records in 2018
असे दोन जागतिक विक्रम जिच्या नावावर स्वर्ण अक्षरात कोरले गेलेत, त्या कलाकाराची
म्हणजेच कु. ऐश्वर्या दिनकर पाटील, ऐशू
हिची आज आपण ओळख करून घेणार आहोत.
ऐशू माझ्याच गावात म्हणजेच पालघाट केरळमध्ये राहणारी. व्यवसायामुळे इथेच स्थायिक झालेल्या मराठमोळ्या कुटुंबातील एक गोड मुलगी. ऐशूला हिंदी, मराठी, तामिळ, इंग्रजी आणि मलयाळम भाषा येतात. तिने स्थापत्यकलेचे (architecture) शिक्षण घेतले असून त्यातच ती कारकीर्द करत आहे. याशिवाय ती एक उत्कृष्ट कलाकार आहे.
शिसपेन्सिलला साधे टोक करायचे म्हटले तरी बऱ्याच जणांना जमत नाही. पण याच पेन्सिलच्या टोकावर कलाकृती ( Pencil carving ) निर्मिती करणे म्हणजे किती नाजूक काम असेल याची कल्पना करा ! आणि त्यात परत यामध्ये विक्रम निर्माण करणे म्हणजे अभिमानाची बाब आहेच पण त्यासाठी एकाग्रता, समर्पण, संयम या गोष्टीही गरजेच्या आहेत.
२०१५ मध्ये जवळच्या मैत्रिणीला स्वतः तयार केलेले काहीतरी भेट द्यायचे असा विचार ऐशूच्या मनात आला आणि हाच विचार तिच्यासाठी निर्णायक ठरला. इथून तिच्या आगळ्या वेगळ्या प्रवासाची सुरुवात झाली. महाविद्यालयातील एक सिनियर विद्यार्थी, मिथुन आर आर याच्याकडून प्रवृत्त होऊन तिने या निर्मितीस सुरुवात केली. त्याचवेळी महाविद्यालयात मिथुनने घेतलेल्या कार्यशाळेत तिने भाग घेतला. त्यामुळे या कलेतील तिची आवड, कुतूहल वाढत गेले.
या कार्यशाळेनंतर कोणती साधने वापरायची, कशी वापरायची याची तिला पूर्ण माहिती मिळाली. असं नाही की अगदी सहजरित्या ऐशूच्या कल्पना प्रत्यक्षात उतरल्या. तयार झालेली कलाकृती अगदी शेवटच्या क्षणीही मोडून पडायची. पण जिद्द, चिकाटी, मेहनतीने अनेक अप्रतिम निर्मिती तयार झाल्या. महत्वाचे म्हणजे या गोष्टीचा अभ्यासावरती अजिबात फरक पडला नाही, बरं का ! शिक्षणासोबत कला जपणे – हे दोन्हीही समांतर चालू होते.
आवड असेल तर सवड मिळते याचे उत्तम उदाहरण म्हणजे ऐशू.
आपले स्वर अ, आ, इ, ई…तिने पेन्सिलवरती कोरली आहेत. एकाच प्रयत्नात तिला हे यश मिळाले का ? याचे उत्तर आहे, नाही ! काही मधली अक्षरे तुटायची. पुन्हा तिला अ..पासून सुरुवात करावी लागायची. पुन्हा एखादे अक्षर तुटायचे. पुन्हा नव्याने सुरुवात. हे होत राहिले पण तिने हार मानली नाही. तिच्यातला संयम वाखाणण्याजोगा आहे. अ ते अः पर्यंत संपूर्ण स्वर कोरून झाल्यावरच तिचे समाधान झाले आणि या कष्टाचेच फळ म्हणजे तिच्या नावावर असणारे जागतिक विक्रम होय.
काहीजण खरेच दर्दी असतात. ते हे विकतही घेतात. त्यांच्यासाठी ही कलाकारी अनमोल, अतुलनीय असते.
आपण खालील दुव्यावरती ऐशूच्या कलाकृती आपण पाहू शकतो.
१) Facebook Profile: www.facebook.com/aiswaryadpatil
२) Instagram Profile: instagram.com/wonders_on_graphite
३) YouTube Channel: AP Art Studio (Aiswarya Patil) – www.youtube.com/channel/UClezEsE-Ybex0fGmYaMOuSA
४) Linkedin – www.linkedin.com/in/aiswarya-patil-94049317a
याशिवाय Pencil carving, Paper cuttings, Nail arts, Hair arts, Thread arts याप्रकारच्या कलेतही ऐशू छान निर्मिती करते. याबरोबरच गाणी ऐकणे, बागेत काम करणे, विविध पदार्थ तयार करणे, दूरध्वनीवर खेळ खेळणे हे सुद्धा छंद ती जोपासते.
ऐशू, एक कलाकार, हुशार विद्यार्थिनी तर आहेच सोबत आदर्श मुलगी, बहीण, मैत्रीणही आहे. परिस्थिती कशीही असो प्रत्येक क्षण आनंदाने जगणे हा
व नम्रता हे गुण तिच्याकडे आहेत. ती सकारात्मकतेने परिपूर्ण आहे. तिचा स्वभावच असा आहे की तिच्याशी आपले ऋणानुबंध घट्टच होतात.
प्रत्येकालाच काही काही ना अडचणी येत असतात. सगळे दिवस सारखे नसतात. पण रडत बसायचं की त्यातून मार्ग काढायचा हे आपल्या हातात असते.
ऐशूचा एक संदेश मी तिच्याच शब्दात आपणासमोर मांडत आहे, जो आपल्याला नक्कीच मार्गदर्शक ठरेल. तो म्हणजे
“TRY TRY TRY AND NEVER GIVE UP. BE PATIENT IN WHATEVER YOU DO. JUST DO THINGS WHAT YOU LOVE .NO ONE IS FORCING YOU. ALWAYS TRUST YOURSELF AND REPEAT THIS IN YOUR MIND, THAT “YES, I CAN DO IT AND I WILL SUCCEED ONE DAY”.
उटी, कन्नूर, कोचीन, कोळीकोड इथे तिने तिच्या कलाकृतींची प्रदर्शने भरवली आहेत. तसेच ती कार्यशाळाही घेत असते. तिच्या मुलाखती घेतल्या गेल्या आहेत. वर्तमानपत्रातून तिचे कौतुकही होत असते. तरीही एका मराठी मुलीची कर्तृत्व गाथा सर्वांनाच माहिती व्हावी म्हणून हा शब्द प्रपंच.

– लेखन : सौ. मनिषा दिपक पाटील. पालकाड, केरळ.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
Excellent 👌