मुंबई दूरदर्शन केंद्राचा २ ऑक्टोबर २०२२ रोजी सुवर्ण महोत्सव साजरा झाला. ज्या काही व्यक्तींच्या आठवणी जागवल्या गेल्या, त्यात एक नाव ठळकपणे घेतल्या गेलं, ते म्हणजे आधी दूरदर्शनची वृत्त निवेदिका राहिलेली आणि नंतर संवेदनशील अभिनयाने सर्वांच्या मनात कायमची घर करून राहिलेली अभिनेत्री म्हणजे स्मिता पाटील ! १७ ऑक्टोबर १९५५ रोजी जन्मलेल्या आणि अवघ्या ३१ व्या वर्षी, १३ डिसेंबर १९८६ रोजी या जगाचा निरोप घेतलेल्या स्मिता पाटील यांच्या आठवणी जागवल्या आहेत प्रशांत कुळकर्णी यांनी.
स्मिता पाटील यांना आपल्या वेबपोर्टल तर्फे भावांजली.
– संपादक
1983 सालची गोष्ट. पण अगदी काल परवा घडल्यासारखी वाटते. डिसेंबरचा महिना, मुंबईत गुलाबी नव्हे पण बऱ्यापैकी सुखद गारवा होता. मुंबईत एवढा जरी गारवा आला तरी भराभर ठेवणीतले स्वेटर्स, शाली लगेच बाहेर पडतात. न जाणो कल थंडी हो न हो ! सकाळी वर्तमानपत्र चाळताना साहित्य संघ, गिरगाव मध्ये पत्रकार रेखा देशपांडे यांच्या सिनेमा वरील एका पुस्तकाचा प्रकाशन समारंभ होता आणि प्रमुख पाव्हणी म्हणून स्मिता पाटील येणार होती.
नलिनी जयवंत, केदार शर्मा, के.वैकुंठ येऊन बसले होते. पण सर्वांचे डोळे स्मिता च्या आगमनाकडे लागले होते. स्मिता आली, स्मिता आली, अशी कुजबुज कानावर आली आणि सर्वांच्या माना प्रवेशद्वाराकडे वळल्या. पांढऱ्या शुभ्र साडीत, काळया-सावळया स्मिताने प्रवेश केला. नुकतेच राज बब्बरशी लग्न झाल्याने ती अधिकच खुलून दिसत होती.
आपली स्मिता ! हिंदी सिने सृष्टीत अभिनयाच्या जोरावर स्वतःचे स्थान निर्माण करणाऱ्या मराठी अभिनेत्री तेव्हा अशाच आपल्या वाटायच्या. शिल्पा शिरोडकर, ममता कुलकर्णी, किमी काटकर अशा अभिनयाव्यतिरिक्त इतर कारणांनी गाजलेल्या मराठी नायिकांचा जमाना अजून यायचा होता. माधुरी दीक्षित चा उदय व्हायचा होता. हिंदी नायिकांना तोडीस तोड टक्कर देऊ शकेल अशी मराठी अभिनेत्री आम्हाला सापडली होती. त्या पूर्वी पण मराठी अभिनेत्री बॉलीवूड च्या तारांगणात चमकल्या होत्या नाही असे नाही. पण नूतन वगळता कोणीही आपल्या एकटीच्या अभिनयाच्या जोरावर बॉक्स ऑफिस वर आपला करिष्मा प्रस्थापित करू शकले नव्हते.
त्यासाठी त्यांना तत्कालीन लोकप्रिय हिरो चा सहारा घ्यावा लागला होता. लीला चिटणीस, नलिनी जयवंत, उषा किरण सारख्या हाताच्या बोटावर मोजणाऱ्या मराठी अभिनेत्री ह्या मर्यादित यश संपादून गेल्या. दुर्गा खोटे, ललिता पवार, सीमा, सुलोचना यांनी लवकर चरित्र भूमिकांची वाट धरली होती. अशा वेळी स्मिता चे आगमन हे आश्वासक होते. अरुण खोपकर च्या FTI साठी “तीव्र मध्यम” मध्ये ती सर्व प्रथम चमकली. नंतर शाम बेनेगलच्या चरण दास चोर मध्ये. दूरदर्शन वर मराठी बातम्या देत असताना तिला ही भूमिका मिळाली होती. त्यानंतर मात्र मंथन, निशांत, कोंडुरा करत असताना शाम बेनेगल नी तिच्यातल्या अभिनेत्री ची जाणीव तिला करून दिली.
मराठीत ती सुरवातीला “सामना” मध्ये कुणी तरी अशी पटापट गम्मत आम्हा सांगील काय ? या गाण्यात ती ‘अप्पा, तुम्ही फसलात, साखर, साखर, साखर असे म्हणत दोन मिनिटं दर्शन देऊन गेली होती. मग जब्बार पटेल यांनी तिला “जैत रे जैत” मध्ये घेतले आणि ‘चिंधी’ जिंकून गेली.
मग सुरू झाली हिंदीतील त्यावेळच्या समांतर सिनेमातून काम करण्याची सुरुवात. तिथे शबाना हेरॉईन म्हणून स्थिरस्थावर होत होती, आणि ही दुय्यम भूमिकेत तिच्या स्थानाला धक्का देण्याच्या तयारीत. तिला जास्त वेळ वाट पाहावी लागली नाही. शाम बेनेगल यांनी मराठीतल्या हंसा वाडकर यांच्या सांगते ऐका वर हिंदीत सिनेमा करायचे ठरवले. त्यातील प्रमुख ‘भूमिका’ करण्यासाठी निवड केली ती स्मिताची.
‘भूमिका’ हा चित्रपट तिला संवेदनशील अभिनेत्री म्हणून नाव देऊन गेला. तर महेश भट च्या अर्थ ने तिने शबानाला टक्करका मुकाबला करून सशक्त अभिनेत्री म्हणून आपले स्थान पक्के केले. हिंदी सिनेमात दोन अभिनेत्री मध्ये पडद्यावर असे टक्करके द्वंद्व फार कमी वेळा बघायला मिळाले आहे.शबाना सरस की स्मिता ? अशा चर्चा तेव्हा ‘अर्थ’च्या वेळी रंगल्या.

मग “चक्र” ने त्यावर कळस चढवला आणि तिला भूमिका नंतर दुसरे राष्ट्रीय अवॉर्ड मिळवून दिले. याच वेळेस कधीही व्यावसायिक सिनेमात काम करणार नाही असे म्हणणाऱ्या स्मिता ने व्यावसायिक सिनेमे स्वीकारायला सुरुवात केली होती. नमक हलाल, बदले की आग, घुंगरू, चटपटी, शक्ती, दर्द का रिस्ता या सारखे अनेक सिनेमा तिचे हिट झाले.
पण या व्यावसायिक सिनेमाकडे तिने वळायला कारणही तसेच घडले. शबाना आझमी च्या सिनेमात सुरुवातीला दुय्यम भूमिका करणारी स्मिता, स्वतंत्र नायिकेच्या भूमिका करायला लागल्यावर या दोघीनमध्ये सुप्त संघर्षाला सुरुवात झाली होती. त्यातच स्पर्श या सिनेमात काम करण्यासाठी आधी स्मिता ला विचारल्या नंतर सई परांजपे यांनी शबाना ची मार्केट व्हॅल्यू जास्त असल्याने स्मिता ला डावलून शबाना ला घेतलं. यामुळे स्मिता खूप दुखावली गेली. केवळ मार्केट व्हॅल्यू नसल्याने आपल्या हातून स्पर्श गेला याचे तिला वाईट वाटले आणि मग तिने
व्यावसायिक सिनेमे स्वीकारायला सुरुवात केली. या प्रकरणा मुळे मात्र स्मिता आणि शबाना यांच्या मधली दरी वाढत गेली.
त्याच काळात स्मिता ने राजबब्बर बरोबर अनेक सिनेमात काम केले. ही जवळीक प्रेमात आणि प्रेमाची परिणिती विवाहात झाली. सिनेसृष्टी तील अनेक बऱ्या वाईट गोष्टीत मार्गदर्शन करण्यासाठी तिला राज ची मदत व्हायची. तसे बॉलीवूड मध्ये तिचे मित्र मौत्रिणी फार थोडे होते. दीप्ती नवल, पुनम धिल्लो, यांच्याशी मैत्री होतीच. रेखा च्या गूढ व्यक्तीमत्वाचे तिला आकर्षण होते व तिच्याशी मैत्री करायचा पण तिने खूप प्रयत्न केला. पण सुरुवातीला रेखा ने तिला जरा दूरच ठेवले. पण कालांतराने ह्या मैत्रीमधील जवळीक वाढायला लागली तेव्हा खूप उशीर झाला होता.
स्मिता आई होणार होती तेव्हाची गोष्ट. ८६ साली बी आर डबिंग स्टुडिओ मध्ये स्मिता ‘वारीस’ या सिनेमाचे डबिंग करायला गेली होती. तिथे रेखा ‘सदा सुहागन’ मधील तिच्या शेवटच्या मरणाच्या सिनमाचं डबिंग करत होती. स्मिताने रेखा बरोबर बसून संपूर्ण सिनेमा पाहिला. गमतीत रेखा ने म्हंटले, करतेस का माझ्या सिनेमाचे डबिंग ? स्मिता चटकन म्हणाली, ‘छे रे बाबा, तूच कर. असे मरणाच्या सिन मध्ये श्वास लागल्यासारखे आता या परिस्थितीत मला नाही बोलता येणार. एकतर मीच मरून जाईन नाहीतर माझं बाळंतपण इथेच होईल. दोघी खळाळून हसल्या.
याच डबिंग थिएटर मध्ये काही महिन्यानंतर रेखा ‘वारीस’ या सिनेमात स्मिताच्या आवाज डबिंग करण्यासाठी सुन्नपणे बसली. कारण तेव्हा स्मिता या जगात नव्हती.
मिस यु स्मिता !

– लेखन : प्रशांत कुलकर्णी. अबुधाबी
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️+91 9869484800
स्मिता पाटील वरील लेख आवडला