वडसा-देसाईगंज गावाजवळ विसोरा नावाचं एक खेडेगाव आहे. तेथील सुप्रसिद्ध बांबू-चित्रकार व भारतीय जनता पार्टीचे एक कार्यकर्ते धनंजय नाकाडे यांची-माझी घट्ट मैत्री झाली ती सुरेश देशपांडे यांच्यामुळेच.!
धनंजय यांच्यामुळेच झाडीपट्टी रंगभूमीची सविस्तर माहिती मला मिळाली आणि या झाडीपट्टीचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची इच्छा मी जेंव्हा त्यांना बोलून दाखवली तेंव्हां ते मला म्हणाले, “विसुभाऊ, पुढील महिन्यात आमच्या गावात शंकरपट आहे, त्यावेळी ‘लावणी भुलली अभंगाला’ हे संगीत नाटक करायचे आम्ही ठरवले आहे. त्यातील शाहिराची भूमिका तुम्ही करावी.” या त्यांच्या प्रस्तावाला मी लगेच होकार दिला.
धनंजय नाकाडेंना अनेक गावांतील शंकरपट-नाटकांसाठी उद्घाटक, प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले जायचे. त्यांच्या बरोबर सुरेश आणि मी बऱ्याच गावातील शंकरपट-नाटकांना प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावली, आणि ही रंगभूमी जवळून पाहिली.
सुरेशही पूर्वी झाडीपट्टी रंगभूमीवर नायक म्हणून गाजलेला कलाकार असल्याने त्याच्या कडूनही या रंगभूमीची बरीच माहिती मला मिळाली होती.
या एका महिन्यात मी शाहिराचे संवाद पाठ केले आणि दोन दिवस आधीपासूनच नाकाडेंकडे मुक्कामाला गेलो. नाटकाची तयारी कशी करतात, ते मला प्रत्यक्ष पहायचे होते. एका ठरलेल्या वावरात साधारण तीन-साडेतीन फूट खोल असा मोठा खड्डा तयार करून त्यातील मातीचा बाजूलाच ढीग तयार झाला. सर्व बाजूंनी तो ढीग धोपटून चार कोपऱ्यात खांब रोवले गेले, आणि बाजूला कापड लावून स्टेज तयार झाले. स्टेजच्या मागील बाजूस कनातीचे कापड लावून मेकप व कपडे पटाची जागा सज्ज झाली. स्टेजवर मागे पडदा, दोन्ही बाजूला विंगा, वरच्या बाजूला आवश्यक लाईट व मॅन्युअल फ्रंट डॉप, त्यामागे दोरीवर टांगलेले तीन माईक लावून स्टेज तयार झाले. मोठी कनात लाऊन प्रेक्षकांना बसण्यासाठी जागा तयार झाली. स्टेज पासून मागेपर्यंत मध्यात दोरी बांधून एका बाजूला महिला व दुसऱ्या बाजूला पुरुषांना बसण्यासाठी जागा तयार झाली.आणि विसोऱ्यातील पट-नाटकाचा दिवस उजाडला.
प्रत्येकाच्या घरात पाहुणे मंडळींचा गोतावळा जमा झाला. चूण-भाताच्या भोजनानंतर वर-वधू परिक्षणाच्या बैठका व नंतर बैलगाड्या शर्यतीचा शंकरपट जोरदार पार पडला.
दरम्यान ‘लावणी भुलली अभंगाला’ नाटकातील सर्व कलाकार तयार झाले, मी सुद्धा तयार झालो. स्टेज समोर तयार केलेल्या खड्याच्या पुढील दोन बाजूला पाय पेटी व तबलावादक आणि त्यांच्या मागे खड्यातील खुर्च्यांवर उद्घाटक, प्रमुख पाहुणे व व्हींआयपी पाहुणे विराजमान झाले. कनातीमध्ये सर्व रसिक प्रेक्षक बायका मुलांसह येऊन बसले. कनाती बाहेर ‘हाऊस फुल्लचा’ बोर्ड झळकला. कार्यकर्त्यांनी फ्रंट-डॉप उघडला, आम्ही सर्व कलाकारांनी ‘नांदी’ सादर केल्यानंतर नाटकाची सुरुवात झाली. प्रत्येक अंकातील प्रत्येक गाण्याला दोन तीन वेळा वन्स मोअर मिळत गेले. प्रत्येक अंकानंतर बक्षिस वितरणही झाले आणि नाटक संपायला पहाट झाली.
नाटकातील माझे काम, माझी गाणी सर्वांना आवडली. मित्र सुरेश देशपांडे आणि धनंजय नाकाडे यांच्या सहकार्यामुळे झाडीपट्टी रंगभूमीवर काम करण्याचा विलक्षण अनुभव मी घेऊ शकलो, हा अनुभव मी आयुष्यभर जपून ठेवला आहे. बाबा व विजय धुळधुळे, झाडीपट्टीचा दादा कोंडके म्हणून ओळखला जाणारा डॉ.परशुराम खुणे, गुलाम सूफी व इतर कलाकार आजही माझ्या संपर्कात आहेत.
आज झाडीपट्टी रंगभूमीवर संगीत नाटकांच्या ऐवजी नाच-गाण्यांची कलापथके सादर केली जातात, याचे खूप वाईट वाटते. नवरगाव सारख्या गावांनी जपलेली संगीत नाटकाची परंपरा तिथल्या इतर गावातही पुन्हा जपली जाईल, याची मला खात्री आहे.

– लेखन : प्रा.विसुभाऊ बापट, दादर, मुंबई.
(सादरकर्ते – ‘कुटुंब रंगलंय काव्यात’),
– संपादन :देवेंद्र भुजबळ9869484800