क्रिकेटवीर सचिनच्या प्रभावामुळे आजकाल प्रत्येक मुलाला सचिन सारखे क्रिकेटवीर व्हावेसे वाटते. मुलीसुद्धा सचिनच्या खेळाच्या खुप फॅन आहेत. मैदाने तर क्रिकेटच्या खेळानेच भरलेली दिसतात. क्वचितच कुठे फुटबॉल, व्हॉलीबॉल हे खेळ खेळताना मुले दिसतात.
हे पाहून असे वाटते क्रिकेट, फुटबॉल, व्हॉलीबॉल एव्हढेच खेळ आजच्या तरुण पिढीला माहिती आहेत
का ? तर याचे उत्तर होय असेच आहे, असे म्हणावे लागेल. आपल्या लहानपणीचे आपले खेळ आजच्या पिढीला ऐकून तरी माहित आहेत की नाही ? याची शंकाच वाटते.
मला आठवते आम्ही लगोरी, विटीदांडू, गोट्या, भोवरा, टिपऱ्या, लंगडी, गाडा चालवणे, तीनचाकी स्कूटर (उभे राहून) चालवणे, झाडावर कोण पहिला चढतो, बेचकीने/ गुल्लेरने कैऱ्या पाडणे, चोर पोलीस असे सर्वांगिण व्यायाम असणारे खेळ खेळायचो. तर कवड्या झेलणे, सापशिडी, कॅरम, बुद्धिबळ, पत्ते, आईचे पत्र हरविले असे साधे पण डोक्याला चालना देणारे बैठे खेळ होते. बरं या खेळांसाठी ग्राउंडची सुद्धा गरज नव्हती. अगदी चाळीसमोर किंवा एखाद्या शाळेच्या मैदानात हे खेळ खेळले जायचे. तेव्हा काही आजच्या सारखे शाळा नसताना मैदानात यायला बंदी नव्हती.
त्या काळी आजच्या एव्हढी रस्त्यावर ट्राफिकसुद्धा नव्हती. म्हणुन गाडा म्हणजेच लोखंडाची मोठी गोल जाड रिंग आणि ती रिंग यू आकाराच्या मोठया आकड्यात अडकवून धावत धावत चालवायची. खुप रनींग व्हायचं त्यामुळे. तसंच तीन चाकी स्कूटर पण. एक पाय स्कूटर वर आणि दुसऱ्या पायाने त्याला जोर देत, जोरजोरात आम्ही कॉलनीभर फिरत असू. अगदी आईचे छोटे छोटे सामान आणायला सुद्धा मदत व्हायची.
आम्ही विटीदांडू, बेचकी/गुल्लेर ने अनेकांच्या खिडक्यांच्या काचासुद्धा फोडल्या. आणि त्यामुळे भरपूर मार देखील खाल्ला. लंगडी, टिपऱ्या या खेळात दोघी/तिघी मुली असल्या तरी पुरे. खुप मजेचे होते ते दिवस.
दुपारी एकटी किंवा एक दोघींना घेऊन कवड्या खेळायचो. सापशिडीच्या खेळात तर, साप कोणाला गिळतोय आणि कोण शिडीचा आधार घेत लवकर सुटतोय याच्यात खुप मजा यायची. सापशिडी, कॅरम सारख्या खेळात तर घरातले सगळेच सामील होऊन खेळायचे.
पत्त्याच्या खेळाचे कित्ती प्रकार. पाच तीन दोन, सात आठ, बदाम सात, अमीर गरीब, गद्दा जब्बू वगैरे. पत्त्याचे खुप खेळ काळाच्या पडद्याआड गेलेत.
आईचे पत्र हरविले या खेळात, सगळे जण अलर्ट असायचे.भोवरा खेळताना तर खुप मजा यायची. ज्याला हातावर भोवरा फिरवता यायचा त्याचा त्याला खुप अभिमान वाटायचा.
बुद्धिबळ या खेळामुळे तर बुद्धी तल्लख होतेच आणि अचूक निर्णय घ्यायची सवय लागते.
बैठे खेळ कोणाच्या तरी अंगणात किंवा घरासमोरच्या पायरीवर सुद्धा खेळू शकत होतो. पण मज्जा म्हणजे, एखाद्या घरातून एकदा तरी आरोळी यायचीच, ‘पोरांनो दंगा कमी करा रे ! जा आपापल्या घरी झोपायला’. कोणाच्या ना कोणाच्या पाठीत धपाटा पडायचाच. मग तो/ती, गेला/गेली की परत काही वेळ हळू आवाजात खेळायचो किंवा जिन्याच्या खाली लपून जायचो. खुप मजा यायची. सोन्यासारखे दिवस होते ते.
क्रिकेटबद्दल म्हणाल तर आता सारखे घरोघरी टी.व्ही. नव्हते. ज्याच्याकडे टी.व्ही. असायचा त्याच्याकडे जमायचो आणि क्रिकेट मॅच एन्जॉय करायचो. एकत्र मॅच बघायची मज्जा काही औरच होती. चुकून कोणी बोलला फोर… आणि ४ रन मिळाले तर बोलणारा लक्की ठरायचा. मग ‘अरे त्या राजू ला बोलाव तो फोर म्हणाला की फोर रन मिळतातच’ असे अनेक किस्से. एकदा आमचा एक मित्र चुकून ‘आउट’ असे म्हणाला, आणि आपला भारतीय प्लेअर खरंच आउट झाला, तर तो म्हणणारा कायमचा ‘नरटी’ ठरला. अशी मज्जाच मज्जा चालायची.
चोर पोलीस, लपा छप्पी खेळताना अनेक शक्कल लढवल्या जायच्या. कोणी पाण्याच्या रिकाम्या ड्रममध्ये लपायचे तर कोणी आईची साडी गुंडाळून समोरून जायचे तरी कळायचे नाहीं. खुप खुप धमाल केली. आता आठवण आली तर हसायला येतं.
हे खेळ खेळतच आपण मोठे झालो. पण पूर्वीच्या या खेळांची मज्जा आजच्या मोबाईलच्या खेळांना नक्कीच नाहीं. आजच्या मुलामुलींना तेव्हढा वेळ सुद्धा मिळत नाही. कारण अभ्यासाचे ओझे, इतर क्लासेस यामध्येच एव्हढा वेळ जातो की फक्त सायकलिंग, बॅडमिंटन, क्रिकेट हेच खेळ जास्त खेळले जातात किंवा मोबाईल गेम खेळत बसतात. यामुळे डोळ्यांवर परिणाम तर होतोच आणि वजनावर सुद्धा.
काय गेलात की नाही भूतकाळात ? आठवतात का ते क्षण ? तर भूतकाळात न रमता चला, आपले जुने खेळ मुलांना शिकवू या आणि आपणही पुन्हा त्याची मजा लुटू या !

– लेखन : सौ अलका भुजबळ.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800.
बालपणीचा काळ सुखाचा….. मस्त स्मरण.
हो हो भूतकाळात गेलो ना,ते निरागस खेळ खेळत कधी मोठे झालो कळलेच नाही. तेव्हा हे खेळ इतके स्वस्त होते. संपूर्ण शारिरीक व मानसिक व्यायाम होत असे. असे हे खेळ पुढे इतके दुर्मीळ होत आपण ई ( इलेकट्रोनिक ) विळख्यात कधी पडलो ते कळलेच नाही. पण तेव्हाचा तो खेळाचा आनंद अजूनही मन ताजेतवाने करतो. आपली पिढी नक्कीच नशीबवान आहे.
शंभर टक्के सहमत.