पाणिनी प्रकाशित ‘अवकाश‘ या समूह कथासंग्रहाचे प्रकाशन सुप्रसिद्ध लेखिका, कवयित्री डॉ.सिसिलिया कार्व्हालो आणि सुवर्णकमळ विजेत्या ‘श्वास‘ चित्रपटाच्या लेखिका माधवी घारपुरे यांच्या हस्ते नुकतेच दिमाखात ठाणे येथे झाले.
या कथासंग्रहात प्रा. मानसी जोशी, मंगल कातकर, अस्मिता चौधरी, प्रतिभा चांदूरकर, अश्विनी चौधरी, वर्षा फाटक व अलका दुर्गे या सात लेखिकांच्या कथा आहेत. तर डॉ.सिसिलिया कार्व्हालो यांची उत्कृष्ठ प्रस्तावना पुस्तकास लाभली आहे.
प्रा. पद्मा हुशिंग यांनी ‘अवकाश’ कथासंग्रहातील कथांचा आढावा सादर करून प्रत्येक लेखिकेची लेखन वैशिष्ट्ये सांगितली. प्रा. मेधा सोमण यांनी सप्ततारकांना शुभेच्छा देऊन आपल्या नम्रवाणीने मार्गदर्शन केले.
निवेदिका वासंती वर्तक यांनी सातही लेखिकांच्या स्वभावाविषयी सांगत त्यांच्या लेखन शैलीशी सांगड आपल्या मिश्किल भाषा शैलीत मांडली.
अजेय संस्थेचे संस्थापक डॉ.क्षितीज कुलकर्णी यांनी स्त्री लेखिकांनी पटकथा लेखनाकडे वळावे असा मौलिक विचार मांडून स्त्रिया कथालेखनात कुठेही कमी नाहीत, उलट त्या जास्त ताकदीने लिहू शकतात असा विश्वास व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा माधवी घारपुरे यांनी मानसी, मंगल, अस्मिता, प्रतिभा, अश्विनी, वर्षा व अलका या सात लेखिकांच्या नावांचे अर्थ स्पष्ट करत कथालेखन करताना कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी हे आपल्या गोड शब्दांत मांडले.
डॉ.सिसिलिया कार्व्हालो यांनी स्त्रीवादी लिखाणाचं महत्त्व अधोरेखित करताना मानव निर्मित इमारती पेक्षा निसर्गनिर्मित किंवा देवाने निर्माण केलेल्या माणसांवर प्रेम करा, जीवनातले सात सूर कसे एकत्र आल्यानंतर संगीत निर्माण होतं तसं सात लेखिकांनी काढलेला संग्रह अनेकांच्या जीवनाचं दर्शन घडविणारा कसा आहे हे सांगितले. साहित्य क्षेत्रात या सप्त तारकांच्या प्रेरणेने शत तारका लेखिका तयार होतील असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे निवेदन मंगल कातकर व वर्षा फाटक यांनी तर आभार प्रदर्शन अश्विनी चौधरी यांनी केले. कार्यक्रमाची सांगता वर्षा जोशी मधुर स्वरात सादर केलेल्या पसायदानाने झाली.
– लेखन : सौ.मानसी जोशी
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ +919869484800
खूप खूप आभार …