सिनेमाचे गारूड
सिनेमा या नावाचे गारुड आपल्या प्रत्येकाच्या मनावर ठसले आहे. एकशे दहा वर्षे होतील या सिनेमाला आपल्या जीवनात येऊन. आपल्या कित्येक पिढ्यानवर या सिनेमातील नायक-नायिकांनी अधिराज्य गाजवले आहे. सुरुवातीला मुकपट नंतर बोलपट, नंतर के एल सैगल चा जमाना, त्यानंतर राज- दिलीप -देव आनंद, मग जुबिली स्टार राजेंद्र कुमार, शम्मी-शशी कपूर, धर्मेंद्र, जितेंद्र त्यानंतर सुपरस्टार राजेश खन्ना चा उदय, angry young man अमिताभ चे राज्य, तो अस्ताला जात असताना शाहरुख, सलमान, अमीर या खानावळी चा धुमाकूळ असे ढोबळ मानाने टप्पे घेता येतील.
मात्र आमच्या पिढीला ज्या वयात सिनेमाची चटक लागली, आवड निर्माण झाली तो काळ मात्र राजेश खन्ना आणि अमिताभ चा होता. मुंबईच्या ज्या प्रमुख थिएटर्स मध्ये यांचे सिनेमे लागायचे आणि त्यांच्या करिअर चे भवितव्य ठरायचे. त्या सिनेमागृहाच्या इर्दगीर्द माझे बालपण गेले. मुंबई सेंट्रल मराठा मंदिर सिनेमाच्या पाठीमागे आम्ही राहायचो आणि गिरगावात शाळेत जायचो.
शाळेत जाता येता या थिएटर्स वरून जाताना त्या थिएटर्स च्या बंद काचेच्या मागे लावलेली सिनेमाची पोस्टर्स बघणे. पुढचा कुठला सिनेमा येतोय हे उत्सुकतेने पाहणे असले उद्योग आम्ही करत असू. तर त्या थिएटर्स च्या आठवणीची ही एक झलक. हा काही इतिहास नव्हे. सत्तर ते ऐंशी दशकातल्या आठवणी एवढे साधे याचे स्वरूप आहे. त्या Down Memory Lane मधून तुम्हाला फिरवून आणणे एवढाच माफक उद्देश.
तर सुरवात मराठा मंदिर पासूनच करूया. 1960 साली मुघल ए आझम हा सिनेमा मराठा मंदिर ला लागला तेव्हा प्रीमिअर ला अवघी सिनेमा सृष्टी लोटली होती. असे म्हणतात की त्यावेळी हत्ती वरून मुघल ए आझम च्या प्रिंट्स आणल्या गेल्या होत्या. त्यानंतर आम्ही या MM ला खूप सिनेमे बघितले. मीना कुमारीचा ‘पाकिझा’ जेव्हा लागला तेव्हा सिनेमा सणकून आपटला होता. पहिले तीन चार आठवडे प्रेक्षकविना चालणारा सिनेमा. अचानक मीना कुमारी चे निधन झाले आणि दुसऱ्या दिवसापासून मराठा मंदिर ला ऍडव्हान्स बुकिंग ला प्रेक्षकांनी जी लाईन लावली, त्यामुळे पुढील तीन वर्षे Housefull चा बोर्ड थिएटर बाहेर कायम झळकत होता.
सतत पंचवीस वर्षे एकाच थिएटर ला चालण्याचा विक्रम DDLJ ने याच थिएटर मध्ये केला. 1000 प्रेक्षकांची क्षमता असलेले हे सिंगल थिएटर सध्याच्या मल्टिप्लेक्स च्या जमान्यात अजूनही सुरु आहे. देव आनंद च्या जॉनी मेरा नाम चा प्रीमिअर आम्ही इथेच बघितला. अनेक जुने ब्लॅक अँड व्हाईट सिनेमे इथेच बघायला मिळाले.
मराठा मंदिर वरून गिरगावात चालत जायला निघालं की lamington road वर उजवीकडे पहिले थिएटर लागायचे ते Minerwa आणि डाविकडे अप्सरा. 70 च्या सुमारास जुने मिनर्वा थिएटर पाडून नवे बांधल्या गेले आणि पहिला सिनेमा लागला तो राजकुमार हेमा मालिनी चा लाल पत्थर. हे थिएटर शम्मी कपूर आणि एफ सि मेहरा यांच्या मालकीचे होते. लाल पत्थर जास्त चालला नाही. पण नंतर आलेला दाग, सीता और गीता, दिवार यांनी मात्र तिथे सिल्वर जुबिली साजरी केली.
पण 15 ऑगस्ट 1975 ला आलेल्या शोले ने पुढची तीन वर्षे तिथे मुक्काम ठेवला.मिनर्वा च्या गल्लीत शोले ची तिकिटं ब्लॅक ने विकून अनेक ब्लॅक चा धंदा करणाऱ्या लोकांनी स्वतःची घरे बांधली. लोवर स्टॉल 2.20,अप्पर स्टॉल 3.30 आणि बाल्कनी 4.40 अशी तिकीट दर असणाऱ्या मिनर्वात एकदा आम्हीही लोवर स्टॉल चा Z म्हणजे सर्वात पुढचा रो मिळाल्याने घाबरत घाबरत दोन चे तिकीट पाच रुपयात विकून वाहत्या गंगेत हात धुवून घेतले. अर्थात आम्ही त्यावर घर वगैरे बांधले नाही. पण ही गोष्ट घरी न कळण्याची काळजी मात्र जरूर घेतली.
अप्सरा मध्ये राज कपूर चा ‘संगम’ तुफान चालला. मग ओ पी रल्हन ने ‘एक करोड की तलाश’ अशी ‘तलाश’ या सिनेमाची जाहिरात करत राजेंद्र कुमार -शर्मिला चा ‘तलाश’ हिट करून दाखवला. शशी कपूर चा ‘शर्मिली’, फिरोझ खान चा ‘कुर्बानी’, राज कपूर चा ‘प्रेमरोग’ इथेच जुबिली झाले. त्यावेळेस सिनेमा जुबिली होणे हे हिट चित्रपटांचे लक्षण मानले जात होते. बासु चटर्जी चा ‘छोटीसी बात’ इथेच मॅटिनी ला बघून मनमुराद हसलो होतो.
अप्सरा सिनेमाच्या बाहेर रस्त्यावर सिनेमाच्या गाण्याची दोनतीन पानी पुस्तके विकणारा बसायचा. सिनेमा बघून आल्यावर पाच दहा पैशात ती पुस्तकं विकत घेतानाचा आनंद अवर्णनीय असायचा. मग रेडिओ वर ते गाणे लागले की पुस्तक घेऊन रेडिओ समोर उभे राहात ते गाणे म्हणणे ओघाने आलेच. नसेल पुस्तिका तर गाण्याची वही होतीच. पण भरभर गाणे लिहिताना अनेक शब्द सुटायचे मग पुढे परत जेव्हा ते गाणे रेडिओवर लागेल तेव्हा रिकाम्या जागा भरायच्या. अप्सरा नंतर पुढे चालत गेले की डाविकडे नोव्हेल्टी, सुपर शालिमार ही थिएटर्स लागायची.
त्याकाळी राजेश खन्ना चा जमाना असल्याने हाथी मेरे साथी Novelty ला आबाल वृद्धाची गर्दी खेचत होता. दोन तीन रुपयात सिनेमा आणि सर्कस एकत्र बघायला मिळते आहे तर कोण सोडतंय ? त्यानंतर तिथे मजबूर, मिली, नमक हराम, सगिना, हरेराम हरेकृष्ण असे अनेक चित्रपट हिट झाले. याच Novelty मध्ये राज कपूर चा महत्वाकांक्षी दोन इंटरवलं असलेला चार तासाचा मेरा नाम जोकर सणकून आपटला. सुपर सिनेमा मात्र यथातथाच होते. मेरा गाव मेरा देश, भाई हो तो ऐसा, हाथ की सफाई सारखे सिनेमे हिट झाले. पण मध्यमवर्गीय फॅमिली तिकडे अभावानेच फिरकायची. सुपर च्या समोरचे शालिमार मात्र नूतनीकरण करून झकपक स्वरूपात तयार झाले तेव्हा देव आनंद चा प्रेमपूजारी बघून प्रेक्षकांनी खुर्च्या फाडल्या होत्या. त्याच देव आनंद चा वॉरंट इथेच सुपरहिट ठरला होता. शिवाय रणधीर चा रामपूर का लक्ष्मण देखील.
शालिमार च्या पुढच्या चौकात ताज, गुलशन, न्यू रोशन सारखी तिथल्या फोरास road या लोकवस्ती साठी साजेशी थिएटर्स होती. मेन थिएटर मधून सिनेमा उतरला की इकडे लागायचा. परत U टर्न मारून lamington road वर आलात की स्वस्तिक, नाझ, इंपिरियल ही थिएटर्स एका मागोमाग लागायची. राजेश चा आनंद, सचिन चा ‘गीत गाता चल’ इथेच रौप्य महोत्सवी झाले. अमिताभ च्या ‘आनंद मरा नही, आनंद मरते नही ‘या वाक्या नंतर आनंद बघून डोळे पुसत बाहेर न पडणारा प्रेक्षक विरळाच. इंपिरियल ला अमिताभ चा पहिला सुपरहिट जंजीर इथेच लागला.
चारी बाजूला त्या त्या सिनेमाची भली मोठी पोस्टर्स लावून इंपिरियल लक्ष वेधून घ्यायचे. पण त्याही पेक्षा स्वस्तिक आणि इंपिरियल या दोन थिएटर्स च्या मधल्या गल्लीत नाझ या थिएटर ची बिल्डिंग उठून दिसायची. याच नाझ मध्ये राजेश चा मर्यादा, अंदाज, आप की कसम जुबिली होऊन गेले. अंदाज मध्ये इंटरवलच्या सुमारास राजेश मरतो तेव्हा अख्ख थिएटर हळहळायचे.
यादों की बारात, हम किसीसे कम नही, कॉलेज ला दांडी मारून विनोद खन्ना चा इम्तिहान आराडा ओरडा करत इथेच बघितला. पंचाहत्तर साली आणीबाणी जाहीर झाल्यावर संजय गांधी नी तत्कालीन नभोवाणी मंत्री विद्याचरण शुक्ला यांना सांगून गुलझार च्या आंधी सारख्या क्लासिक सिनेमावर बंदी आणली. पण आणीबाणी उठल्यावर त्यावरील बंदी उठली आणि नाझ ला मॅटिनी ला ‘आंधी’ लागल्यावर तो बघण्यासाठी रांगा लागल्या. याच मंत्र्यांनी किशोर कुमार ने सरकारी कार्यक्रमात फुकट गायला नकार दिल्यावर त्याची गाणी रेडिओ वरून वाजवायला बंदी आणली होती. नाझ ची बिल्डिंग ही फिल्म इंडस्ट्री मध्ये तशी फेमस आहे.
कारण हे नुसते थिएटर नव्हते तर डाविकडे उभ्या असलेल्या चार पाच मजली इमारतीत अनेक फिल्म डिस्ट्रिब्युशन कंपन्याची ऑफिसेस होती. त्यामुळे अनेक निर्माते, कलाकारांचे इथे येणे जाणे असायचे. आपल्या दादा कोंडके यांनी देखील सदिच्छा चित्र चे कार्यालय इथेच थाटले होते. एकदा मी उत्सुकतेने या बिल्डिंग मध्ये शिरलो आणि जी.पी. सिप्पी यांच्या ऑफिस मध्येच शिरलो. तिथे केशव नावाचा एक कर्मचारी भेटला. त्याच्याशी ओळख झाली. मग त्याने मला ‘अंदाज’ चे कॅटलॉग वजा पुस्तक दिले. त्यात राजेश हेमा चे फोटो बघून स्वारी एकदम खुश. नंतर मी अधून मधून केशव ला भेटायला जाऊ लागलो. तोही जमेल तसें फिल्म शी संबंधित फोटो, कॅटलॉग देत राहिला.
या तीन थिएटर च्या मागे ड्रीमलँड नावाचे थिएटर होते. खिलोना, प्रेमनगर, गोलमाल सारखे असंख्य हिट इथे लागून गेले. त्यामागे च खेतवाडी मधे मनमोहन देसाई राहायचे. इंपिरियल वरून पुढे गेले की उजवीकडे ऑपेरा हाऊस आणि डाविकडे रॉक्सी सिनेमागृह होते. ऑपेरा हाऊस ला ऐतिहासिक परंपरा होती. स्वातंत्र्य पुर्व काळात इथे मराठी संगीत नाटके पहाटे पहाटे पर्यंत चालायची. मूळचे नाट्यगृह मग सिनेमा मध्ये कन्व्हर्ट केल्या गेले. पण आतली प्रेक्षकांची बसायची व्यवस्था मात्र पूर्वी सारखीच ठेवली होती. त्यामुळे मेन हॉल आणि बाल्कनी बरोबर प्रेक्षकांच्या डाव्या आणि उजव्या बाजूला गॅलरी मध्ये देखील प्रेक्षक बसायचे. तिथून नाटक छान दिसत असेल पण सिनेमा बघताना मात्र पडद्यावरील सर्वच पात्रे लांबच लांब दिसायची.
अमिताभ ही उंच आणि जया ही तेवढीच उंच. इथेच राजेश चा छोटी बहु, खामोशी सारखे चित्रपट लागले होते. जया चा पहिला सुपरहिट उपहार इथेच लागला आणि पंचविस आठवडे चालूनही सिलसिला इथेच फ्लॉप ठरला. मनोज चा शोर, रोटी, कपडा और मकान इथे मुक्कामाला आले की तळ ठोकूनच बसायचे. तसाच काहीसा प्रकार राजेश च्या सिनेमाच्या बाबतीत रॉक्सी मध्ये घडायचा. आराधना गोल्डन जुबिली झाला की त्याची जागा घ्यायला कटी पतंग तयार असायचा. मग अमर प्रेम टिकून राहायचा. मध्ये हेमा चा नया जमाना हजेरी लावून जायचा. रॉक्सी च्या बाल्कनी समोर मोठी गॅलरी होती. प्रीमियर ला सगळे कलाकार झाडून त्या गॅलरीतून खाली वाट पाहात असलेल्या चाहत्यांना दर्शन द्यायचे.
रॉक्सी च्या मागेच राहणाऱ्या गिरगावकरांसाठी मॅजेस्टिक आणि सेंट्रल हे मराठमोळी सिनेमागृहे होती. सेंट्रल अधून मधून हिंदी सिनेमाही लागायचे. पण सेंट्रल ला त्याकाळात गाजलेला मराठी सिनेमा म्हणजे शांताराम बापूंचा पिंजरा. याच सेंट्रल ला मॅटिनी शो ला इंटरवल नंतर तिकीट चेक करत नाहीत असा शोध कोणीतरी लावला आणि त्या संशोधका बरोबर 2-4 सिनेमे फक्त इंटरवल नंतर बघून घेतले.
दक्षिण मुंबईतील Metro, Eros, Sterling, New Empire, Excelsior, Reagal, Strand ही थिएटर्स मात्र केवळ इंग्लिश सिनेमा साठी राखीव होती. इंग्लिश सिनेमा चे शौकीन तिथल्या वाऱ्या करायचे. त्यावेळी इंग्लिश सिनेमाच्या बाबतीत एक विनोद प्रचलित होता. सिनेमात एखादा विनोद झाला की प्रेक्षकात तीनदा हशा यायचा. पहिला ज्यांना तो विनोद खरंच समजला त्यांचा. दुसरा हशा जे नवरा बायको सिनेमाला आलेले असायचे त्यातल्या उगाचच आपल्याला इंग्लिश मधून विनोद समजला नाही असे बायकोला वाटायला नको म्हणून नवऱ्याचा असायचा आणि तिसरा इकडून हसणं झालं म्हणजे नक्कीच काहीतरी विनोद झाला असणार म्हणून बरोबरच्या ‘मंडळी’चा असायचा.
जे जे हॉस्पिटल च्या जवळ Alexandra नावाचे थिएटर होते. त्याच्या आसपासची वस्ती ही तशी गरीब, कष्टकरी कामगार वर्गाचीच टिपिकल कामाठीपुरा वस्ती होती.अशा वस्तीत Alexandra ला बी किंवा सी ग्रेड चे इंग्लिश सिनेमे लागत. ते बघायला तिथल्या प्रेक्षकांना ओढून आणण्यासाठी बाहेरच्या पोस्टर वर इंग्लिश सिनेमाच्या नावाचा आकर्षक हिंदीमध्ये अनुवाद केला जाई. तो बघून हा सिनेमा कसा असेल हे ठरवून प्रेक्षक आत घुसत. एकदा Blow hot blow cold नावाचा सिनेमा लागल्यावर पोस्टर वर लिहिले होते “कभी गरम कभी नरम “! काय बिशाद सिनेमा हाऊसफ़ुल्ल न होण्याची. Rider on the rain चा ‘बरसात मे ताक धीनाधीन’ हा अनुवाद तेच करोत जाणे. L.S.D. चे हिंदीकरण ‘गोली अंदर दम बाहर ‘असे तर हिचकाॅकच्या ‘द 39 स्टेप्स’ या चित्रपटाचे हिंदीत नामांतरण केले होते ‘एक कम चालीस लंबे’.! ‘ब्रूस द लिजंड्स’चे ‘दादो का दादा ब्रूसली’ असे काहीही भाषांतर करून प्रेक्षकांना खेचून आणायचे.
मेट्रो मध्ये A ग्रेड चे इंग्लिश सिनेमे लागत पण अधून मधून हिंदी, मराठी सिनेमेही लागायचे. अपराध, लक्ष्मण रेखा हे मराठी तर बॉबी, ज्युली, कभी कभी मेट्रो च्या आलिशान हॉल मध्ये बघण्यात मजा होती.
एकदा मेट्रो ला मॅटिनी ला गाईड चे पोस्टर बघितले. गाईड मधली एकसे एक गाणी आठवत आत मध्ये शिरलो आणि अरे देवा ! हा इंग्लिश गाईड होता. यात गाणी असणार नव्हती. गाणी नाहीतर गाईड बघण्यात काय मजा ? असे म्हणत बाहेर पडलो. देव आनंद ने गाईड हिंदी इंग्लिश मध्ये काढला होता हे बऱ्याच वर्षानंतर समजले. याच मेट्रो मध्ये बॉबी लागल्यावर तो बघून राजेश खन्ना रागाने बाहेर पडल्याची बातमी मुंबईत हा हा म्हणता पसरली होती. मेट्रो च्या मागे असलेले लिबर्टी म्हणजे डिट्टो आतमधून मराठा मंदिर ची कॉपी. याच लिबर्टी मध्ये Mother India च्या प्रीमिअर ला त्याकाळच्या फिल्म इंडस्ट्री मधले दिग्गज पोहोचले होते आणि त्यांना बघायला चाहत्यांची
ही ss गर्दी लोटली होती. याचा खुबीने वापर करत विजय आनंद ने कालाबाजार मध्ये देव आनंद तिथे ब्लॅक नी तिकीट विकतो असा प्रसंग चित्रित केला होता.
हम आप के है कौन च्या वेळेस लिबर्टी नूतनीकरण करून सज्ज झाले तेव्हा त्याला एखाद्या wedding hall सारखे सजवण्यात आले होते.
याच दशकात ट्वीन थिएटर्स ची कल्पना रुजली आणि ताडदेव ला गंगा जमना ही जुळी थिएटर्स उभी राहिली. तर वरळी मध्ये पासपोर्ट ऑफिस च्या मागे सत्यम, शिवम, सुंदरम ही तिळी थिएटर्स बांधल्या गेली. याचा कित्ता गिरवत दादर माटुंगा ला बादल, बिजली, बरखा तर बांद्रा ला Gaiety ,Galaxy, Gemini आणि अंधेरी ला अंबर, ऑस्कर, मायनॉर अशी तीळ्यांची मालिकाच चालू झाली. यात ट्रेन मधून जाताना बांद्रा च्या कलानगर मधील ड्राईव्ह इन् या नव्याने सुरु झालेल्या थिएटर मधे सुरु असलेल्या सिनेमा ची धावती झलक दिसायची.
भारतमाता, प्लाझा, कोहिनूर ही मराठी सिनेमा साठी हक्काची सिनेमागृहे होती. तर दीपक, सूर्या, हिंदमाता, Brodway, चित्रा हे लालबाग-गिरणगावातील प्रेक्षकांची मनोरंजनाची तहान भागवत होते. वरळी चे लोटस, गीता हे ही यात मागे नव्हते. पिरियड बंक करून आलेले कॉलेज स्टुडंट्स लोटस ला हमखास सापडायचे.
गंगा मध्ये संजय दत्त च्या रॉकी चा प्रीमिअर झाला तेव्हा दत्त फॅमिलीने बाल्कनीतील एक सीट रिकामी ठेवली होती. कारण त्या हक्काच्या सीट वर बसायला संजय ची आई नर्गिस दत्त काही दिवसापूर्वीच हे जग सोडून गेली होती.
एकदा माटुंगा च्या बिजली मध्ये जितेंद्र चा परिचय कुटुंबासह बघण्यासाठी म्हणून बस नी जाऊन ऍडव्हान्स मध्ये मी तिकिटं काढून आणली आणि त्या दिवशी इकडे तिकडे न पहाता सर्वजण थिएटर मध्ये जाऊन परिचय सुरु होण्याची वाट बघत बसलो. जाहिराती संपल्या आणि इंडियन news नंतर चित्रपटाची टायटल्स सुरु झाली आणि काय ? तो सिनेमा परिचय नव्हताच. सबसे बडा सुख नावाचा हृषीकेश मुखर्जी चा सिनेमा शुक्रवारी बदलला होता. आधीच्या आठवडयातील परिचय थिएटर मधून गुरुवारीच उतरला होता. पण मी त्याआधीच जाऊन ऍडव्हान्स बुकिंग केल्याने अस्मादिकांनी रविवारी परिचय असेल का नाही हे विचारण्याची तसदी घेतली नव्हती. तरीही घरच्यांच्या नजरा चुकवत सबसे बडा सुख असे म्हणत याही सिनेमाचा आम्ही आनंद घेतलाच.
असाच काहीसा प्रकार मराठा मंदिर ला मॅटिनी ला आई मिलन की बेला च्या वेळेस झाला होता. बहिणीच्या सांगण्यावरून मी रविवारची दोन तिकिटं ऍडव्हान्स मध्ये काढून आणली आणि रविवारी थिएटर मध्ये जाऊन बसलो तर सुरु झाला शम्मी -शर्मिला चा An Evening in paris ! आई मिलन ची प्रिंट न मिळाल्याने त्यांनी सिनेमा बदलला होता. बाहेर पोस्टर ही लावले होते. पण लक्षात कोण घेतो.!
तर अशा या ऐंशी च्या दशकातल्या मुंबतील सिनेमा आणि सिनेमा गृहाच्या आठवणी. या सर्व परिपूर्ण असूच शकत नाही. तसा माझा दावाही नाही. ‘अरोरा’ इंग्रजी चित्रपटासाठी, सायन चे रुपम, जुहूचे ‘लिडो’, माहिमचे ‘सिटीलाईट’, नायगाव चे ‘शारदा’ पण होते. उपनगरातील असंख्य थिएटर्स सिनेमा नावाच्या मनोरंजनाच्या गुहेतील आठवणी आपल्या मनात साठवून आहेत.त्या काळात मुंबईच्या मुख्य थिएटर्स ला शुक्रवारी लागलेल्या सिनेमाच्या यश-अपयशा वरून कलाकारांचे भवितव्य ठरायचे हे मात्र नक्की.
आज या पैकी अनेक सिनेमा थिएटर्स बंद पडली आहेत. जी सुरु आहेत ती कशीबशी तग धरून उभी आहेत. आजच्या मल्टिफ्लेक्स च्या जमान्यात यांची अस्तित्वाची लढाई सुरु आहे. आज सिनेमा बघायला जाताना हजाराची नोट देऊनही तो आनंद मिळत नाही जो त्या काळात या थिएटर्स मध्ये एक रुपयाच्या तिकिटात लोवर स्टॉल ने दिला होता. या निमित्ताने down memory lane मध्ये परत एकदा फिरून यायचा चान्स मिळाला. भूतकाळातील आठवणी वर्तमानात तुमच्या भोवती फेर धरून नाचायला लागल्या की त्याला एक Nostalgic फील येतो. असाच काहीसा फील तुमच्यापैकी मुंबईत राहलेल्या आणि या सिनेमागृहाची वारी केलेल्या प्रत्येक सिनेभक्ता ला येवो.

– लेखन : प्रशांत कुळकर्णी. अबुधाबी
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ +919869484800
ऐंशीच्या दशकातली अप्रतिम सिनेमाच्या आठवणी ताज्या केल्या दोन अडिच रुपये तिकीट सुद्धा परवडत नव्हते पण पोस्टर्स,त्याबद्दलचा लेख,त्या सिनेमातली गाजलेली गाणी, त्यावेळीचे हिरो हिरॉईन एक जमाना वेगळाच होता.
अगदी मुश्किल होत खुपच आगाऊ तिकीट काढून कमल हसनचा एक दर्जेदार सिनेमा एक दूजे के लिए पाहिला कित्ती दिवस तो मनावर अधिराज्य करत होता तसाच मुकंदर का सिकंदर हा हा हा अमिताभ रेखा लाजवाब.
तो भव्य पडद्यावरचा काळ डोळ्यांसमोर ताजा केलात. धन्यवाद……
छान केले लेखन मुंबई दर्शन केल्यासारखे वाटले
मुंबईतील सिनेमागृहे, अप्रतिम खूप छान आढावा घेतला.अलेकझांड्रा बद्दल खूप छान माहिती दिली.कारण इंग्रजी चे हिंदी भाषांतर खूप मनोरंजक असायचं.लेख वाचताना पन्नास वर्षे मागे गेलो.आम्हीं चित्रपटांचे शौकीन असल्याने शाळेला दांडी मारायची आणि मुंबई भर फिरायचे.
ताज, गुलशन जवळच -निशांत,प्ले हाऊस (पिला हाऊस), पुढे सिल्व्हर आणि मोती या सिनेमागृहे चा उल्लेख आला असता तर बरं झालं असतं.
🙏🙏