“भुकेचा सोहळा” संग्रह नुकताच प्रकाशित करण्यात आला. यावेळी बोलताना, यापुढच्या काळात हा संग्रह दिशा देणारा ठरेल असे उदगार गझलकार प्रशांत वैद्य यांनी काढले.
अभिनेत्री मेघा विश्वास यांनी, नितांत सुंदर, दमदार आणि आशयघन शब्दकळा लाभलेला तरुण गझलकार आहे, साहित्य विश्वात संदीपचे आणि या गझल संग्रहाचे जोरदार स्वागत होईल असे कौतुक केले.
तर पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने वैचारिक दिवाळी साजरी होते आहे असे टिव्ही कलाकार सुधाकर वसईकर म्हणाले.
“जन्म अपुल्यांच्या धगीमध्ये जळाला
कोळसा होता, निखारा होत गेला…
घेतले नाही जवळ मजला कुणीही
मग मला माझा सहारा होत गेला…”
या पंक्ती सादर करीत आपल्या मनोगतात भविष्याच्या वाटचालीचा वेध घेताना संदिप कळंबे म्हणाले, भूक लागली म्हणून, भाकरीऐवजी पैसा खाता येत नाही आणि पैसा जास्त आहे म्हणून, भुकेपेक्षा जास्त अन्न खाता येत नाही. म्हणजेच जीवनात पैशाला ठराविक रेषेपर्यंतच स्थान आहे. हृदयातून येत असलेल्या काव्यप्रतिभेच्या भुकेच्या जोरावर मी गावापासून मुंबई पर्यंतच्या प्रवासातली पोटातली भूक मी सहन करू शकलो.
स्वररंग निर्मित “इये मराठीचीये नगरी, आम्हां घरी नित्य दिवाळी !” हा मराठी संस्कृतीची मनोहारी अनुभूती देणारा अनोखा कार्यक्रम सादर झाला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला १०६ हुतात्म्यांच्या स्मारकाच्या प्रतिकृतीला पुष्पांजली अर्पण करण्यात आली.
अवकाळी पावसाने पीडित शेतकऱ्यांसाठी उपस्थित रसिकांनी सढळ हस्ते जमा झालेली रक्कम नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पाठविण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे संयोजक सुधीर चित्ते यांनी प्रास्ताविक केले. या कार्यक्रमास विविध मान्यवर, रसिक उपस्थित होते
– टीम एनएसटी. ☎️ +919869484800

अभिनंदन…!