नमस्कार 🙏 “ओठावरलं गाणं” या सदरात सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत. गायक आणि संगीतकार सुधीर फडके उर्फ बाबूजी आणि आशा भोसले यांच्या आवाजातील गाण्यांनी कधी आपली सकाळ तर कधी रात्र देखील सुंदर केली आहे. प्रेमी जनांचा साक्षीदार असलेल्या चंद्राचं त्याच्या पूर्ण स्वरूपात आकाशात होणारं दर्शन मनाला आनंद देतं. आज पाहू या जगदीश खेबूडकर यांनी लिहिलेलं एक गाणं ज्याचे शब्द आहेत –
पान जागे फूल जागे भाव नयनी दाटला
चंद्र आहे साक्षीला… चंद्र आहे साक्षीला
चांदण्यांचा गंध आला पौर्णिमेच्या रातीला
चंद्र आहे साक्षीला… चंद्र आहे साक्षीला
खऱ्याखुऱ्या प्रेमाची खात्री पटलेले हे प्रेमी युगुल एकमेकांच्या सहवासात आणि प्रेमात आकंठ बुडालेले आहेत. पौर्णिमेच्या रात्री रूढार्थाने सारंं जग जरी झोपलेलं असलं तरी यांचं जग मात्र पूर्णतया वेगळं आहे. दोघेही एकमेकांना सांगतायत की आज आपल्या दुनियेत निसर्गाच्या सान्निध्यातला प्रत्येक क्षण जागा आहे. आपण ज्या बागेत बसलो आहोत त्या बागेतल्या नुकत्याच फुललेल्या फुलांचा सुगंध आपल्या भोवती दरवळतोय. पारिजातकाच्या फुलांची रांगोळी आपलं स्वागत करते आहे. या धुंदशा वातावरणात माझ्या मनात तुझ्याबद्दल असणारी प्रितीची भावना व्यक्त करण्यासाठी माझं मनही अधीर झालंय. याचं कारण म्हणजे कोजागिरी पौर्णिमेचा पूर्ण चंद्र त्यांच्या प्रेमाचा साक्षीदार आहे आणि आकाशात पसरलेलं टिपूर चांदणं, या सगळ्या गोष्टींमधून मिळणारा आनंद तिलाही लपवता येत नाहीये.
स्पर्श हा रेशमी हा शहारा बोलतो
सूर हा ताल हा जीव वेडा बोलतो
रातराणीच्या फुलांनी देह माझा चुंबिला
माझ्या सजणा, आज विश्वासाने तुझ्या खांद्यावर डोकं ठेवून मी तुझ्या मिठीत स्वतःला झोकून दिलं आहे. असं वाटतं की काळानं काही क्षणांपुरतं का होईना पण स्तब्ध उभं रहावं म्हणजे तो पुढे सरकणार नाही आणि तुझ्या शरीराचा होणारा हा रेशमी स्पर्श, तनामनावर त्यामुळे उठणारा सुखद शहारा मला अधिक काळ पर्यंत अनुभवता येईल. पानांच्या आडून शीळ घालणारं वाऱ्याचं संगीत ऐकून, आकाशातील टिपूर चांदणं आणि कोजागिरी पौर्णिमेच्या चंद्राचा तुझ्या चेहऱ्यावर पडणारा प्रकाश पाहून माझ्या मनात नकळतपणे आपल्या प्रितीचं संगीत वाजायला लागतं. माझ्याही अंगावर रातराणीच्या फुलांचा वर्षाव होत रहातो आणि मी फक्त तुझा मोहक चेहऱ्याकडे अनिमिष नेत्रांनी पहात रहाते.
लाजरा बावरा हा मुखाचा चंद्रमा
अंग का चोरीसी दो जिवांच्या संगमा
आज प्रितीने सुखाचा मार्ग माझा शिंपिला
प्रिये, तुझ्या चेहऱ्याकडे मी पहात राहिलो याचं आणखीन एक कारण म्हणजे आकाशातला पूर्ण चंद्र जणू काही माझ्या बाहुपाशात विसावला आहे असाच मला क्षणभर भास झाला इतका तुझा चेहरा सुंदर दिसत होता. तुझी बावरलेली नजर, स्त्री सुलभ लज्जा हे सारं काही मला तुझ्या नजरेत दिसत होतं. माझी पसंती, माझं पहिलं प्रेम तूच हे तुला कळल्यावर तुझी मूक पसंती मला या अधोमुख झालेल्या नजरेने सांगितली. एकमेकांच्या पसंतीची पोचपावती हाच आपल्या मिलनाचा अतूट धागा. मीलनाच्या समीप आलेल्या या शुभ घडीचं तू ही खुल्या दिलाने स्वागत कर म्हणजे “सुख म्हणजे नक्की काय असतं” हे सांगणाऱ्या या संगमावर तुझ्याच प्रितीचं शिंपण केलेलं तू पाहशील.
“चंद्र होता साक्षीला” या चित्रपटासाठी संगीतकार सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं हे गाणं आशा भोसले यांच्या तरल आवाजात आपलाही कोमल आवाज मिसळून हे द्वंद्व गीत रेडिओवर ऐकताना कान आणि मन तृप्त होतात.

– लेखन : विकास मधुसूदन भावे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️9869484800
रसग्रहण फारच छान.
धन्यवाद विराग 🙏
एका उत्कृष्ट प्रणय गिताचे उत्कृष्ट असे केलेले रसग्रहण वाचल्यावर खऱ्या अर्थाने गाण्याचा अर्थ उलगडतो.खूप सुंदर रसग्रहण केले आहे आपण सर
खूपच सुरेख रसग्रहण… अर्थात हा तुमचा हातखंडा आहेच…
धन्यवाद मानसी मॅडम 🙏