डॉ.पंजाबराव देशमुख आयएएस अकादमीने श्री तुकाराम मुंढे हे आयएएस झाले तेव्हा त्यांचा सत्कार अमरावती येथे आयोजित केला होता. या कार्यक्रमाच्या प्रचंड उपस्थितीत एक लहान शालेय मुलगी उपस्थित होती. तिचे नाव पल्लवी चिंचखेडे. या कार्यक्रमातून प्रेरणा घेऊन तसेच वडिलांच्या प्रबळ इच्छाशक्तीने पल्लवीने समाजशास्त्र हा विषय घेऊन स्पर्धा परीक्षेचा अभ्यास प्रारंभ केला.
केंद्रीय लोकसेवा आयोगाने 2021 साली घेतलेल्या स्पर्धा परीक्षेचा निकाल जाहीर झाला होता. पण काही उमेदवारांचे निकाल राखून ठेवले होते. त्यात पल्लवी ही होती. नुकतेच हे निकाल जाहीर करण्यात आले असून त्यात पल्लवीचाही समावेश आहे. मात्र तिला निश्चित कोणती सेवा मिळेल, हे अद्याप कळले नाही.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे, पल्लवी अमरावतीच्या सर्वसामान्य भागात राहणारी आहे. हा परिसर बिच्छू टेकडी या नावाने ओळखला जातो. तसे पाहिलं तर हा पूर्ण परिसर म्हणजे गरीब वस्ती. आजूबाजूला वीटभट्ट्या. इथे विंचू खूप निघतात म्हणून बिच्छू टेकडी असे नामकरण झालेला. पण आज अमरावती शहरातील प्रतिष्ठित नगरांना मागे टाकून एका सर्वसामान्य गरीब परिस्थितीतील पल्लवी यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण झाली आहे ही खरोखरच अभिमानाची बाब आहे.
पल्लवीचे वडील पेंटरचा व्यवसाय करतात. तर आई शिवणकाम करते. पल्लवीचा निकाल कळाला तेव्हा मी दिल्लीला होतो.तेथून अमरावतीला पोहोचताच पल्लवीचे घर गाठून तिला सांगितले ज्या तुकाराम मुंढेंसाहेबांच्या कार्यक्रमास तू आली होतीस त्या कार्यक्रमाचा मी आयोजक होतो. मी काही बोलायच्या आतच तिने वाकून मला नमस्कार केला. मलाही कृतार्थ झाल्यासारखे वाटले. माझी मुलगी पल्लवी जरी कलेक्टर झाली नाही तरी माझ्या कार्यक्रमातून प्रेरणा घेऊन पल्लवी चिंचखेडे यशस्वी झाली हे काही कमी नाही.
पल्लवीशी तसेच तिच्या परिवारातील सदस्यांशी चर्चा करताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती ही की तिचे वडील सजग आहेत. अनेक सनदी व राजपत्रित अधिकाऱ्यांच्या घरी रंग देताना आपलीही मुलगी यांच्यासारखी अधिकारी व्हावी असे त्यांना मनोमन वाटत होते. या आंतरिक इच्छेने त्यांनी वर्तमानपत्रातील कात्रणे काढायला सुरुवात केली. आयएएसच्या संदर्भात काही कात्रण दिसले तर ते कात्रण कापायचे आणि पल्लवीला दाखवायचे व जपून ठेवायचे.
आयएएसच्या परीक्षेमध्ये वर्तमानपत्राचे किती अनन्यसाधारण महत्त्व आहे हे आम्ही विद्यार्थ्यांना वारंवार समजावून सांगत असतो. पण त्याची दखल एका सर्वसामान्य व्यवसाय करणाऱ्या माणसाने घेतली व आपल्या मुलीस केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी जीवाचे रान केले हे महत्त्वाचे आहे. एका गरीब माणसाला हे कळलं आणि तो पेटून उठला.
पल्लवी ही अमरावती शहरातील कुठल्याही हाय फाय शाळेमध्ये शिकलेली मुलगी नाही आहे. त्याच परिसरामध्ये राहणाऱ्या आनंद प्राथमिक शाळेमध्ये तिचे शिक्षण झाले आहे. या शाळेचे नाव अमरावतीच्या चांगल्या पहिल्या पंचवीस शाळांमध्येही नाही. परंतु “कौन कहता है की आसमान मे सुराग नही होता ? एक पत्थर तबियत से उछालो यारो” या प्रेरणेने तिने जे परिश्रम घेतले ते निश्चितच जगावेगळे आहेत.
पल्लवी जिथे राहते तो परिसर अमरावती शहराला परिचित असा आहे. परंतु अजूनही त्या परिसराचा विकास झालेला नाही. पल्लवीच्या घरापर्यंत अजूनही डांबरी रस्ता नाही. आम्हाला तिच्या घरापर्यंत चिखलातूनच जावे लागले. बाहेर पाऊस सुरू होता . पल्लवीच्या घराला कमट्यांचे कुंपण घातलेले आहे. त्यावर हिरवी नेट चढवलेली आहे.
आता पल्लवी अधिकारी झालेली आहे आणि ही वार्ता प्रसार माध्यमांनी आणि सोशल मिडियाने इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पसरवली की, पल्लवीच्या छोट्याशा घरात अक्षरशः पुष्पगुच्छांचे ढीग लागले आहेत. आई वडील तर गहिवरून गेलेले आहेत. शहराच्या कानाकोपऱ्यातून लोक भेटावयास येत आहेत. योगायोगाने मी जेव्हा गेलो तेव्हा तिच्या प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका पण भेटायला आल्या होत्या. त्यांचा आनंद मावत नव्हता.
फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री कुरळकर हे देखील आपल्या स्टाफ सह तिचे अभिनंदन करायला आले होते.
पल्लवी जेव्हा अमरावतीला अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये शिकत होती तेव्हा तिने एका स्पर्धा परीक्षा कार्यशाळेसाठी मला बोलावले होते असे ती व तिचे वडील मला सांगत होते. चांगल्या पगाराची नोकरी सोडून पल्लवीने बार्टीच्या सहकार्याने यूपीएससीचे प्रशिक्षण दिल्लीला घेतले आणि ती परीक्षा तिने उत्तीर्ण करून दाखवली.
खरं म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राला भूषण ठरावी अशी ही घटना आहे. कारण अमरावती शहरातील बिच्छूटेकडी हा भाग झोपडपट्टीमध्ये मोडतो. एका झोपडपट्टीमध्ये राहणारी मुलगी आयएएसची परीक्षा पास होऊ शकते ही खरोखरच इतिहासामध्ये नमूद करण्यासारखी गोष्ट आहे. पल्लवीचे जुने घर चाळीसारखे आहे. घराला लागूनच बारमाही नाला आहे आजूबाजूला सगळी गरीब वस्ती. परंतु जितनेवाले कोई अलग काम नही करते व हर काम अलग ढंग से करते है या न्यायाने पल्लवीने परिश्रम केलेले आहेत. पल्लवीच्या आईने लोकांचे कपडे शिवता शिवता आपल्या मुलीचे आयुष्य शिवून टाकलेले आहे. आणि ते इतके सुंदर शिवले की की संपूर्ण महाराष्ट्राने तिची दखल घेतलेली आहे.
पल्लवी, तू अमरावती शहराची मान उंचावली आहेस. आज तुझ्यामुळे अमरावती शहराचे नाव सर्वत्र होत आहे. तू सर्व समाजासमोर एक आदर्श ठेवला आहेस. गरीब परिस्थितीवर मात करून गरीब परिवारात राहून गरीब परिसरात राहून तु जे यश संपादन केलेले आहे ते निश्चितच मोलाचे आहे. पल्लवी, तुझ्या भावी यशासाठी हार्दिक शुभेच्छा.

– लेखन : प्रा डॉ.नरेशचंद्र काठोळे.
संचालक. डॉ. पंजाबराव देशमुख अकादमी, अमरावती
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800