भुजबळ सरांचा मेसेज पाहिला आणि मन एकदम खुश झालं. इचलकरंजीत “कुटुंब रंगलंय काव्यात” हा कार्यक्रम होणार होता त्याची ती पत्रिका होती. बघता क्षणीच आपण कार्यक्रम पाहण्यासाठी जायचं अस ठरवलंच होतं. तितक्यात भुजबळ सरांचा पुन्हा मेसेज आला की विसुभाऊंची भेट घ्याल का ? म्हणजे तशी मी त्यांना पूर्वकल्पना देतो. ते माझे खूप चांगले मित्र आहेत . तुम्हाला त्यांच्या भेटण्याचा खूपच फायदा होईल . मी क्षणभर स्तब्धच झाले ! आपण स्वप्नात आहोत की काय ? असे वाटून चिमटा पण काढला आणि भानावर आले. क्षणाचाही विलंब न लावता मी भुजबळ सरांना त्यांना नक्की भेटेन असे कळवले .
आतून आनंदाच्या उकळ्या फुटणे कशाला म्हणतात ते आज कळलं .सरांनी भाऊंचा नंबर पाठवला. आठवेल तेवढ्या देवांची नावं मनातल्या मनात घेत भाऊंना फोन लावला . फोनवर नाव सांगताच हो भुजबळांनी सांगितलं की इचलकरंजीत आमच्या एक लेखिका आहेत आणि त्यांना तुम्ही अवश्य भेटा , त्यामुळे तुमच्याकडे नक्की येणार असं त्यांनी सांगितलं.
फोनवर बोलतानाच जाणवलं की आपण एखाद्या अनोळखी व्यक्तीशी बोलतोय अस वाटलंच नाही . किंवा प्रथम बोलतोय असेही जाणवलं नाही . अगदी खूप जुनी ओळख असल्यासारख वाटलं. तसं भुजबळ सरांनी आधीच सांगितलंच होतं .भाऊंना जेवणाचं निमंत्रण दिलं. पण आयोजकांनी काय ठरवलंय हे पाहून त्या दिवशी इचलकरंजी त आल्यावर तुम्हाला फोन करतो असं त्यांनी सांगितलं. अस बोलणं झाल्यावर फोन ठेवला.
त्याक्षणी पंख फुटावे आणि आकाशात उंच उंच उडावं अस झालं .म्हणतात ना जास्त सुख पण बोचत माणसाला तसच झालं माझं , मनात कितीतरी विचार येऊन गेले , एवढा मोठा माणूस !!! , मला कशाला फोन करतील ते पुन्हा ? खरंच येतील का ते आपल्या घरी ?मोठया लोकांचं काही सांगता येत नाही ! असले काय काय विचार मनाला स्पर्शून गेले !
दुसरं मन पण सज्ज होतंच. दोन मनं असतात ना आपल्याला ? दुसरं म्हणे, छे भुजबळ सरांनी सांगितलं, मग ते येणारच . मग खुश . कसं असत ना या मनाचं ? तरी न राहून मी आयोजकांना फोन केलाच आणि भाऊंचा कार्यक्रम काय ठरलाय असं विचारलं . त्यांनी सांगितलं, अभय चौगुले डेरीवाले आहेत त्यांच्याकडे जेवणाची व्यवस्था केली आहे.
मन पुन्हा खट्टू झालं. मी त्यांना सांगितले, तरीही काही बदल झाला तर सांगा. माझ्याकडे मी जेवणाची व्यवस्था करण्यासाठी उत्सुक आहे . मी आनंदाने हे करेन .संध्याकाळी मिटींग झाल्यावर कळवतो असं ते बोलले खूप वाट पाहिली पण काही फोन आला नाही. शेवटी भाऊंशी बोलून काय ते ठरवू अस मनात म्हणाली आणि गप्प बसले.
कार्यक्रमाचा दिवस उगवला .सकाळी मुरली क्लासला जाऊन आले आणि रोजच्या कामाला लागले. डोक्यात काहीही विचार नव्हते आणि अचानक अकरा वाजता भाऊंचा फोन आला. हातातलं काम बाजूला ठेऊन मी फोन उचलला ,
“हॅलो सर नमस्कार , बोला !!”, “काही नाही सकाळी पोहचलो , तुम्हाला म्हणालो होतो फोन करेन ,आता आवरलं म्हटलं आता फोन करू या. कसं करू या ? सांगा. कधी भेटायचं ? मी भाऊंना आयोजकांशी झालेलं बोलणं सांगितलं , “मग जेवण झाल्यावर मी ताक प्यायला तुमच्याकडे येईन !!” अस भाऊंनी सांगितलं .
मनात आलं किती मोठा माणूस पण आपल्या सारख्या सर्वसामान्य माणसांना लक्षात ठेऊन आठवणीने फोन केला यातच भाऊंच्या स्वभावातला मनाचा मोठेपणा कळला. मनातली भीती पण थोडी मोडली .
अचानक येणार अस कळल्यावर माझी पुरती धांदल उडाली .काय करू नि काय नको अस झालं . साधू संत येती घरा असं झालं . नाही म्हटलं तरी एवढी मोठी व्यक्ती आपल्या घरी येणार म्हटल्यावर एका सर्वसामान्य गृहिणीची जी अवस्था व्हायला पाहिजे तीच माझी झाली . जेव्हढे कुतूहल , तेवढीच ओढ. तेवढेच दडपण. तेवढाच मनस्वी आनंद .आज माझी पुरती तारांबळ उडाली. सगळं आवरलं आणि दुपारी आयोजकांनी कळवलं की आज खूप जणांकडे जायचे असल्यामुळे आज काही जमणार नाही आणि उद्या सकाळी काहीच काम नाही तर उद्या सकाळी भाऊ तुमच्याकडे येतील.
थोडं मन खट्टू झालं . पण मग विचार केला , बरं झालं आज गडबड झाली असती आणि उद्या सगळं निवांत होईल , छान गप्पासाठी वेळ पण मिळेल .जे होतं ते चांगल्या साठीच होतं असा विचार केला आणि संध्याकाळची आतुरतेने वाट पाहू लागले.
संध्याकाळी कार्यक्रमाच्या ठिकाणी गेल्यावर आमचे समाजाध्यक्ष पोते भाऊजी मला ऑफिसमध्ये भाऊंकडे घेऊन गेले. कालपासून चाललेला लपंडाव सम्पला एकदाचा अस वाटलं .मनात जितकं औत्सुक्य होत तितकीच अनामिक भीती पण होती आणि तितकीच ओढ पण . मी आत गेले तर भाऊ खुर्चीत बसले होते . नमस्कार करून मी शेजारी जाऊन बसले . त्याक्षणी मनाची जी काही अवस्था होती ती शब्दात मांडण कठीण आहे.पण भाऊंना बघून अक्षरशः निस्तब्ध झाले एक अतिशय सुंदर , देखणं , गोरंपान आणि सात्विक समाधानानं ओतप्रोत भरलेलं व्यक्तिमत्त्व समोर होतं. पाहताक्षणीच कोणीही आकर्षित व्हावं असं ते व्यक्तिमत्त्व पाहून खूप पॉझिटिव्ह एनर्जी ने भरपूर झाल्यासारखं वाटलं. मनातली भीती पण गेली.खूप दिवसांची जुनी ओळख आहे असं वाटलं. प्रसन्न हास्याने भाऊंनी स्वागत केलं. मी नाव सांगितलं. नमस्कार चमत्कार झाला आणि उद्या सकाळी नाश्त्यालाच घरी या अस सांगितलं. मी उद्या घरी येणारच आहे पण तुम्ही माझ्यासाठी दोन तीन कविता लिहून ठेवा, अशी मागणी भाऊंनी केली. कार्यक्रमाची वेळ झाली होती. त्यामुळे लगेच निरोप घेऊन आम्ही हॉल मध्ये येऊन बसलो.
थोडी प्रास्ताविकं झाली आणि कार्यक्रमाला सुरुवात झाली . टाळ्यांच्या गजरात कार्यक्रमाची सुरुवात झाली, आणि तोंडात बोट घालावं अस भाऊंच सादरीकरण पाहून मी तर अक्षरशः मंत्रमुग्ध झाले. परमेश्वर एकाच वेळी एकाच व्यक्तीमध्ये इतक्या विशेषता कश्या काय भरू शकतो ? असा प्रश्न मनात येऊन गेला. एकच व्यक्ती एका वेळी अनेक भाषा, अनेक प्रकारचे काव्य , लावण्या ,बडबडगीते, वेगवेगळ्या आवाजात, वेगवेगळ्या ढंगात , अभिनय करत आणि तेही तोंडपाठ कसं काय सादर करू शकतो ? असं वाटलं.थोडेही न थांबता एका वेळी बहिणाबाई , जगदीश खेबुडकर, मंगेश पाडगावकर , शांता शेळके सगळं पुढं मांडलं भाऊंनी.मराठी गाणं, इंग्रजी कविता , एकदा सुलट म्हणायचं पुन्हा तेच गाणं उलट म्हणायचं ,वेगवेगळ्या आवाजात, चेहऱ्यावर हावभाव , वेगवेगळ्या भाषा , वेगवेगळे आवाज एक ना दोन . आणि हे सगळं करत असताना प्रेक्षकांना जागेला खिळवून ठेवायचं हे अलौकिक सामर्थ्य एखाद्या व्यक्तीत असणं म्हणजे त्या विधात्याची कृपाच म्हणावी लागेल.
भाऊंच्या मुखातून अक्षरशः सरस्वतीच बोलतेय अस वाटलं. एक फार मोठी दैवी देणगी घेऊन जन्माला आलेत भाऊ. एका वेळी पंधरा तास रसिकांना खिळवून ठेवणे हे सामान्य माणसाचे कामच नव्हे. त्यासाठी दैवी शक्तीच पाठीशी हवी, जी भाऊंच्या मागे आहे असं वाटलं. मराठीविषयी कमालीचं प्रेम आणि इंग्रजीचा तिटकारा असलेले भाऊ एक प्रतिभावंत कलाकार भासले. आपल्या मुलांमध्ये भारतीय संस्कृती रुजवा ,त्यांना आपल्या मराठी संस्कारात घडवा अस भाऊंनी कळकळीने सांगितलं .मधेच मिस्कीलपणे कोकीळ वहिनी ऐकताय ना ? असे म्हणल्यावर मन हरकून गेलं .
सादरीकरणा दरम्यान भाऊंनी जितक्या सहजतेने रसिकांना हसवले तितक्याच सहजतेने डोळ्यात पाणी देखील आणलं. बारा हजारांवर कविता तोंडपाठ, सत्तर प्रकारच्या काव्य प्रकारचे संग्रह , सलग पंधरा तास कार्यक्रम , असे वेगवेगळ्या प्रकारचे रेकॉर्ड भाऊंच्या नावावर आहेत. आणि आता विश्वविक्रम करण्याचा मानस आहे हेही त्यांनी बोलून दाखवले.
तरुणवर्गाला ही खिळवून ठेवण्याचं सामर्थ्य भाऊंच्या कवितेत आहे .देशात, परदेशात सर्व ठिकाणी भाऊंनी यशस्वीरित्या कार्यक्रम केलेत. इतक्या प्रतिभावान हरहुन्नरी आणि कवितेच्या गाढ्या अभ्यासकाचे माझ्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तीशी इतक्या आत्मीयतेने बोलणं किती भाग्यवान आहे मी याची मला मनोमन जाणीव झाली.
आज भुजबळ सरांमुळेच इतका भाग्याचा दिवस माझ्या वाट्याला आला. कसे दोन अडीच तास सरले कळलं पण नाही. कार्यक्रमानंतर पुन्हा एकदा भेट घेऊन रात्री घरी आलो.
अंथरूणावर पडले होते पण काही केल्या झोप लागेना. विचार आला भाऊंनी पहिल्या भेटीतच आपल्याला काहीतरी मागितलं . काय करावं ? मी लेख भरपूर लिहिले पण काव्य जास्त केलं नाही. मग काय लिहू ? शेवटी भाऊंवरच एक काव्य रचले , “पहिल्या भेटीत मला उमगलेले भाऊ” . ते ही रात्री दीड वाजता आणि मग शांत झोपले. कवितेच्या एका गाढ्या अभ्यासकाला कवितेशिवाय अनमोल भेट काय असणार ? या विचारातून एक कविता भाऊंना भेट म्हणून लिहिली . सकाळी उठल्यावर एकदा सासूबाईंना, एकदा ह्यांना म्हणून दाखवली. आज खूप प्रसन्न वाटत होतं. अश्या लोकांचे पाय आपल्या घराला लागायचे म्हणजे किती तो भाग्याचा क्षण माझ्यासाठी ! “आज मै उपर आसमा नीचे” असेच झालं माझं.
सकाळी दहा साडेदहाच्या सुमारास यजमान आणि पोते भाऊजी भाऊंना घेऊन आले. दोन दिवस ज्या क्षणाची मी आतुरतेने वाट पहात होते तो क्षण आला. माझ्या आनंदाला पारावार नव्हता. “आजी म्या ब्रम्ह पाहिले”.अशी माझी अवस्था झाली. गप्पागोष्टी करत नाष्टा झाला आवडीने सगळं खाल्लं भाऊंनी. तीन तास काव्यमय गप्पांची मैफल मस्त रंगली . किती आणि काय काय ऐकू असे झालं. कव्यांच्या या बरसातीत मी चिंबचिंब भिजून गेले. कवितेच्या अभ्यासक, निसर्गप्रेमी आणि खूप काही विशेषता अंगी असलेल्या माझ्या इचलकरंजीतल्या जवळच्या मैत्रीण ,गुरू चित्कला ताई आणि भाऊ यांचे चांगलेच सूर जुळले .मैफिल आणखीनच सप्तरंगी झाली .आज माझी झोळी ओसंडून वहात होती आणि भाऊ त्यात भरभरून देत होते. रंगात आलेल्या या मैफिलीचा एक भाग्यवान रसिक श्रोता असल्याचा अनुभव मला येत होता.
स्वर्गीय सुखाचा हा अलौकिक सोहळा कधीच सम्पू नये असं वाटलं. आज मी धन्य झाले अशा महान व्यक्तीच्या सहवासात. असे सुखाचे चांदणे कधी वाट्याला येईल असं वाटलं नव्हतं. पण भुजबळ सरांनी हे क्षण माझ्या ओटीत घातले. कधीही न विसरणारी ही भेट मनाच्या मखमली कोपऱ्यात आयुष्यभर हळुवारपणे जपून ठेवणारेय मी तिला.
सगळं आटोपल्यावर भाऊ तुमच्यासाठी कविता केली ती सादर करते ,असे मी सांगितलं. कविता सादर केली. ती भाऊंना देखील खूप आवडली . मला व्हाट्स अप ला पाठवा असे त्यांनी सांगितलं .कागदावर लिहिलेल्या कवितेवर भाऊंची सही आणि छोटासा अभिप्राय भाऊंनी दिला. आज खरंच मी धन्य धन्य झाले.भरून पावले….
जीवनात इतके सौख्यदाई क्षण वाट्याला येतील असं कधी वाटलं नव्हतं , इतक्या मोठ्या मनाच्या व्यक्तीचा सहवास आज खूप काही देऊन गेला. भाऊंना भेटून एक जाणवलं की माणसानं प्रसिद्धीची कितीही उंची गाठली तरी त्याचे पाय मात्र जमिनीवरच असावे जे भाऊंचे आहेत . म्हणूनच तर परमेश्वर त्यांना भरभरून देतोय. त्यांची विश्वविक्रम करण्याची मनोकामना लवकरच पूर्ण होवो हीच त्या परमेश्वराकडे हात जोडून प्रार्थना. प्रेमळ , मनमिळाऊ , दिलखुलास, कसलाही गर्व नसलेल्या देवमाणसाला पुन्हा पुन्हा भेटण्याचा योग येवो हीच त्या परमेश्वराकडे मनापासून आर्जव ………

– लेखन : सविता कोकीळ. इचलकरंजी
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800