राग मालकंस
राग मालकंस हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे. मालकंस रागाला सर्व रागांचा राजा मानले जाते. हा राग काही ठिकाणी मालकौश नावानेही ओळखला जातो. कर्नाटकी गायकीत याच सारखा हिंदोलम हा राग असू शकतो.
मालकंस तीन ही सप्तकात विस्तारक्षम असा हा राग आहे. या रागात सर्व स्वर कोमल असले तरी राग स्वरूप हे शुद्ध आहे. कुठल्याही रागाची छाया यावर नाही.
मालकौश हे नाव माला आणि कौशिक यांच्या संयोगातून आले आहे. याचा अर्थ असा आहे की, जो नागांचा हार घालतो – तो म्हणजे भगवान शिवशंकर.
इतिहास
हा सर्वात पुरातन रागांपैकी एक राग आहे. एक वर्ग असे मानतो की या रागाची रचना भगवान शिव यांनी केली आहे. तर काही लोक मानतात की याची रचना पार्वतीने केली. भगवान शिव तांडव करत असताना बेभान झाले. त्यांना शांत करण्यासाठी हा मालकंस राग पार्वतीने गायला.
भारतीय शास्त्रीय गायक पंडित जसराज यांच्या मते, मालकंस रागासाठी सर्वोत्तम वेळ रात्री उशिरा आहे. हा राग गायची वेळ रात्री १२ ते ३ ची आहे.
या रागाचा सुखदायक आणि मादक प्रभाव आहे. गंभीर प्रकृतीचा राग आहे, म्हणुन हा राग लगेचच गंभीर, शांत वातावरण निर्माण करतो.
मालकंस राग भैरवी थाटातील आहे. सा, कोमल ग, शुद्ध मा, कोमल धा आणि कोमल नी या त्याच्या नोट्स आहेत. या रागात ऋषभ आणि पंचम
(पा – परिपूर्ण पाचवा) पूर्णपणे वगळले आहेत. म्हणुन त्याची जात औडव-औडव आहे.
मालकंस राग मुख्यतः खालच्या सप्तकात
(मंद्र सप्तक) आणि मंद गतीमध्ये
(विलांबित लया) विकसित केला जातो.
या रागात मुख्यतः मुरकी आणि खटका या हलक्या दागिन्यांपेक्षा मींड, गमक आणि आंदोलन यांसारखे दागिने वापरले जातात. मालकंसमधील कोमल नी भीमपलासीमधील कोमल नीपेक्षा वेगळी आहे.
मालकंस रागातील काही मराठी गीते
1) उगवला चंद्र पुनवेचा, मम हृदयी दरिया! उसळला प्रीतिचा! (नाट्यगीत: नाटक : पाणिग्रहण)
2) अणुरेणियां थोकडा, तुका आकाशाएवढा (कवी – संत तुकाराम, गायक – भीमसेन जोशी, संगीत – राम फाटक)
3) विठ्ठल आवडी प्रेमभावो (कवी – संत नामदेव, गायक – सुरेश वाडकर)
4) सावळे सुंदर रूप मनोहर (कवी – संत तुकाराम, गायक – भीमसेन जोशी, संगीत – श्रीनिवास खळे)
5) धुंद मधुमती रात रे (चित्रपट: किचकवध)
6) नको देवराया, अंत आता पाहू ( संत-कवयित्री कान्होपात्रा)
7) दिव्य स्वातंत्र्य रवी (पं. जितेंद्र अभिषेकी )
8) सुरत पिया की न छिन बिसराये (तराणा, नाटक-कट्यार काळजात घुसली )
9) त्या तरूतळी विसरलें गीत
मालकंस रागावर आधारित हिंदी गाणी
1) आधा है चंद्रमा
2) मन तरपत हरि दर्शन को
3) छम छम घुंगरू बोले
4) ये वक्त की हेरा फेरी
5) अखियाँ संग अखियाँ लागी आज
6) जाने बहार हुस्न तेरा बेमिसाल है
7) रंग-रलियां करत सौतन
8) एक लडकी थी कितनी शर्मिली

– संकलन : प्रिया मोडक
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800