आज मराठी रंगभूमी दिन आहे. त्या निमित्ताने हा विचार प्रवर्तक लेख…..
– संपादक
सामान्यपणे ५ नोव्हेंबर १८४३ हा दिवस मराठी रंगभूमीचा स्थापना दिवस मानला जातो. सांगलीचे खालसा संस्थानिक श्रीमंत आप्पासाहेब पटवर्धन यांच्या आदेशानुसार त्यांच्या दरबारात मुलाजीम असलेल्या सरदाराचे सुपुत्र विष्णुदास भावे यांनी ‘सीतास्वयंवराख्यान’ लिहिले. या आख्यानाचा प्रयोग याच दिवशी श्रीमंतांच्या दरबारात सादर केला होता. त्यामुळे मराठी रंगभूमीच्या जनकत्वाचा मान विष्णुदास भावे आणि आद्य नाटककार म्हणून आख्यानाचा खेळ असलेल्या ‘सीतास्वयंवराख्यान’चा उल्लेख केला जातो.

या घटनेपूर्वी ३०० वर्षांपूर्वी तंजावुर (तामिळनाडू) मध्ये शिवाजी महाराज यांचे सावत्र बंधू व्यंकोजी राजे भोसले यांच्या वारसदारांनी तेथे मराठी रंगभूमीची मुहूर्तमेढ रोवली होती आणि समृद्ध अशी नाट्य परंपरा महाराष्ट्राबाहेर विकसित केली होती.
अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथेही १८२९-३० च्या काळात नाटके होत होती. ही सुमारे १९० वर्षांची परंपरा आजही सुरू आहे. ‘बावीशी’ ‘बावणएक्का’ या परंपरेला महाराष्ट्रात तोड नाही.
दुसरीकडे ख-या अर्थाने महात्मा जोतीराव फुले यांनी १८५५ साली ‘नाटक’ या संकल्पनेत बसणारे ‘तृतीय रत्न’ हे नाटक लिहिले. तेव्हा तेच मराठी नाटकाचे आद्य जनक आहेत आणि ‘तृतीय रत्न’ नाटक हेच मराठीचे आद्य नाटक आहे, अशी अभ्यासपूर्ण भूमिका मांडणारा एक विचार प्रवाह महाराष्ट्रात आहे.
या चार उदाहरणाच्या इतिहासात जाण्याचे सध्या तरी कारण नाही. केवळ मराठी रंगभूमीची परंपरा किती जुनी आणि समृद्ध होती हे सांगण्याचा हा प्रयत्न आहे.
सामान्यपणे महाराष्ट्राचा विचार करता पावणे दोनशे वर्षांचा मराठी रंगभूमीचा इतिहास हा उल्लेखनीय असाच आहे. या रंगभूमी विकासाच्या कालक्रमात अनेक स्थित्यंतरे मराठी रंग भूमीने अनुभवली आहेत.
१८४३ ते १८६० आख्यान खेळांचा काळ, १८६० ते १८८० बुकीश रंगभूमीचा काळ, १८८० ते १९३० हा संगीत रंगभूमीचा काळ, १९३० नंतरचा आधुनिक रंगभूमीचा काळ, स्वाधीनता संग्राम तसेच युद्धकालीन रंगभूमीचा काळ, स्वातंत्र्योत्तर आणि नंतर साठोत्तरी प्रायोगिक रंगभूमीचा काळ, १९९० नंतरचा जागतिकीकरणाच्या, उत्तर आधुनिकतेच्या पार्श्वभूमीवर वाटचाल करणा-या मराठी रंगभूमीचा काळ अशा विविध टप्प्यातून मार्गक्रमण करणा-या मराठी रंगभूमीचा वर्तमान काळ आपल्या पुढे आहे.
प्रत्येक टप्प्यावर तत्कालीन आव्हाने होतीच. चित्रपटयुग आल्यावर आपल्या अस्तित्वासाठी मराठी रंगभूमीला झगडावे लागले होतेच.
नंतर आलेला दूरदर्शन, दूरचित्रवाणीचा काळ, केबल नेटवर्कचा काळ, अलीकडे असलेला सोशल मिडिया, नेटफ्लीक्स, अमेझॉन व्हिडीयो, ओटीटी प्लॅटफॉर्मचा काळ मराठी रंगभूमी अनुभवते आहे. गेल्या दोन-अडीच वर्षात आलेली कोरोनाची लाट व जागतिकीकरणाचा प्रभाव यातही मराठी रंगभूमी होरपळते आहे. अनेक लोककला, विधी नाट्ये, लोकनाट्ये, पारंपरिक नाटके, ‘डाईंग आर्ट फॉर्म’ अर्थात लुप्तप्राय किंवा मरणासन्न होत असलेले कला प्रकारांच्या यादीत समाविष्ट होत आहे.
आदिवासी क्षेत्रात धार्मिक मिशनरी मुळे मूळ आदिवासी कला ही आपली मूळ शैली, आकृतिबंध आणि आपले मूळ रूप – स्वरूप बदलवित आहे.
‘मराठी रंगभूमी आणि महाराष्ट्राचे मानस’ यावर विचार होणे ही काळाची गरज आहे. मराठी माणूस बदलत चालला आहे का ? मराठी माणसाच्या अभिरूचीवर अतिक्रमण होते आहे का ? जागतिकीकरणाच्या प्रभावाखाली मराठी रंगभूमी बदलते आहे का ? चित्रपट, दूरचित्रवाणी वाहिन्या अत्याधुनिक मनोरंजनाची माध्यमे यांच्या उपलब्धतेमुळे मराठी प्रेक्षक मराठी रंगभूमीपासून दूर जातो आहे का ? वर्तमानातील सर्वांगीण आव्हानांमुळे मराठी संस्कृती लोप पावत चालली आहे का ? सेन्सॉरशीपचा काही अनिष्ट परिणाम होतो आहे का ? नाट्य स्पर्धांच्या गदारोळात प्रायोगिकतेची कास सुटते आहे का ?
आजच्या शिक्षण पद्धतीचा आणि कार्पोरेट संस्कृतीच्या प्रभावात मराठी भाषा भ्रष्ट होऊन हायब्रीड अथवा पिडगीन भाषेचे अतिक्रमण त्यावर होत आहे का ? नव्या कार्पोरेट आणि कॉन्व्हेंट शिक्षण प्रणालीत शालेय अथवा बालरंगभूमीला घरघर लागली आहे का ? कामगार मराठी रंगभूमी संपली आहे का ? दलित रंगभूमीवरील अस्मिता, तिचा आत्मस्वर, तिचे आत्मस्वत्व आणि सत्व संपले आहे का ? असे किती तरी प्रश्न आपल्या समोर उभे आहेत.
या प्रश्नांना सामोरे जाण्याची आज खरी गरज आहे. त्यावर चर्चा होणे, त्यासंबंधीचे चिंतन होणेही गरजेचे आहे. या शिवाय सांस्कृतिक धोरण, स्त्रियांचे नाट्यलेखन, शेती प्रश्नावरील नाट्यलेखन, प्रसार माध्यमे, लोकनागर रंगभूमी, बहुभाषिकता, प्रायोगिक रंगभूमी, कामगार रंगभूमी, व्यावसायिक रंगभूमी, नवे नाट्यलेखन, वर्तमान काळातील विविध प्रभावांची चिकित्सा, नव्या प्रवाहांचा शोध, इतिहास लेखन, नाट्यसमीक्षा, नाट्य संस्थांचे प्रश्न अशाही विविध विषयावरील संशोधन लेख आदी विषय या चर्चा आणि चिंतनासाठी महत्वाचे ठरणार आहे.
वर्तमानाचा वेध घेऊन भविष्याकडे वाटचाल करायची आहे. या प्रक्रियेत होणा-या चर्चेतून आणि चिंतनातून
मराठी रंगभूमीच्या उत्कर्षाचा मार्ग मोकळा व्हावा, अशी अपेक्षा आहे.
‘मराठी रंगभूमी’ हा शब्द वापरताना त्याची व्याप्ती आपण लक्षात घेतली पाहिजे. शिवाय या मराठी रंगभूमीचा विचार आपण ‘वर्तमाना’च्या परिप्रेक्ष्यात करणार आहोत. तेव्हा ही संकल्पना येथे मांडत असताना मराठी रंगभूमीसाठी केले जाणारे लेखन, नाटकांची निर्मिती, नाटकांचे प्रयोग, मराठी रंगभूमीचे अर्थकारण, ग्रामीण, नागर, महाविद्यालयीन-शालेय प्रायोगिक, नाट्यस्पर्धा, नाट्यसमीक्षा, नाट्य-शिक्षण-प्रशिक्षण, मराठी प्रेक्षकांची अभिरूची, नाटकांचे विषय, नवे संशोधन, जागतिकीकरण, अत्याधुनिक प्रसार माध्यमे, शासनाची भूमिका या सर्वांचा साकल्याने आणि गंभीरपणे विचार होईल, अशी अपेक्षा आहे. नव्या सामाजिक आणि सांस्कृतिक पर्यावरणात मराठी रंगभूमीचे भवितव्य याचाही वेध या चर्चा आणि चिंतनातून घेतला जावा, ही अपेक्षा आहे.
भाषांतर-रूपांतर, बदलत चाललेली नाट्यभाषा, तिचे व्याकरण, नाट्यात्मक घटकांचा-तत्वांचा आजच्या बाजारासाठी उपयोग, एलीट सोसायटीकेंद्री नाट्यलेखन, नाटकांतून हरवत चाललेला सामान्य माणूस, त्याचे प्रश्न, नव्याने घडणारा कार्पोरेट गुलाम बनत जाणारा समाज, ग्रीडस् आणि नीडस् यात लोंबकळत चाललेला मराठी माणूस, आत्महत्यांच्या चक्रव्यूहात अडकलेला शेतकरी, शेत मजुरांचे, स्थलातंरित मजूर, अपंग आणि स्त्रियांचे विविध प्रश्न याकडे किती नाटककार लक्ष पुरवितात, हा महत्वाचा प्रश्न आहे.
२०१४ नंतर देशात ज्या पद्धतीची राजकीय व्यवस्था आणि त्याचे सर्वांगीण आणि सखोल परिणाम होत आहेत, यात होरपळणारा समाज आपण नजरेआड कसा करू शकतो ? धर्मनिरपेक्षता, सेक्युलरीजम आज मोठा अपराध झाला आहे. ‘हिंदू-मुस्लिम’ एजेंडा सर्वात मोठी प्रायोरिटी ठरत आहे. ट्रोलिंग आणि ट्रेंडिंग व्यवस्था व्यावसायिक रुप धारण करीत आहेत. नव्या धर्मकारणाने धर्म आणि अध्यात्माची जातकुळी बदलून टाकली आहे. आदिवासींचे प्रश्न, त्यांच्या समस्या तर आज मराठी रंगभूमीच्या परिघाबाहेरच आहेत.
या सर्व पातळ्यांवर आजच्या विचार प्रणालीचा, समाज घडविणा-या महामानवांच्या शिकवणुकीचा, नैतिकतेच्या प्रश्नांचा, सामाजिक-सांस्कृतिक स्वमान्यतेच्या (Socio- cultural Hegemony) मानसिकतेचा, राजकीय वैचारिक शुचितेचा, नव्याने येऊ पाहात असलेल्या विसंगतीचा, एब्सर्डीटीचा, मतदारांच्या होत असलेल्या ध्रुवीकरणाचा, एकूणच अदृश्य अशी पोखरण होत चाललेल्या आजच्या समाजाचा आपण, आपली मराठी रंगभूमी विचार करणार की नाही ? हा प्रश्न या चर्चा आणि चिंतनाच्या माध्यमातून ऐरणीवर यावा, अशी अपेक्षा आहे.
आज पथनाट्य चळवळ जवळ-जवळ संपलेली आहे. आज जी पथनाट्ये होतात ती कार्पोरेट कंपन्यासाठी कंत्राटी पद्धतीने होत आहेत. ‘बिझनेस प्रमोशन’चे ते एक डिवाईस किंवा टूल झालेले आहे.
विद्यापीठीय नाट्य संशोधनाचा उपयोग व्यावहारिकदृष्ट्या होणे कठीण झाले आहे. एकूणच मराठी रंगभूमी आज स्पर्धाकेंद्री झाली आहे.
प्रायोगिक रंगभूमी अपवाद वगळता संपल्यात जमा आहे. नाट्य प्रशिक्षण शिबीरे व्यवसायकेंद्री झाली आहेत. नाटकांच्या प्रयोगासाठी नाट्यगृहे मिळत नाहीत. त्यांची भाडी भरमसाठ आहेत. आश्रयदात्यांची वाणवा आहे.
मुंबई-पुणे वगळता तिकीट घेऊन तर सोडाच पण फ्री पासेस देऊनही नाटक पाहायला प्रेक्षक येईनासे झाले आहेत. ‘इव्हेंट ओरिएंटेड’ मनोरंजनाच्या धडाकेबाज कार्यक्रमात मराठी रंगभूमीला घरघर लागली आहे. नवी नाटकारांची पिढी चित्रपट लेखन, कमर्शियल रायटींग, सिरीयल रायटींग, इव्हेंट रायटींग, कॉपी रायटिंग, कार्पोरेट रायटींगकडे मोठ्या प्रमाणावर वळली आहे. नव्या नाटककारांचा, नव्या दिग्दर्शकांचा, उदार मनाच्या नाट्य निर्मात्यांचा आज अभाव जाणवत आहे. मराठी रंगभूमी मिशन मानून कार्य करणारी (यात काही सन्मान्य अपवाद आहेत) माणसं नाहीत. रंगभूमीला सामाजिक, सांस्कृतिक चळवळ मानण्याचे दिवस संपले आहेत. असे एकूणच आजचे भीषण वास्तव आहे.
हे प्रश्न, वास्तव उभे करणे हाच आजच्या या लेखाचा मुख्य उद्देश आहे.
माझा सूर सकृतदर्शनी निराशेचा वाटत असला तरी मी निराशावादी नाही. मी फक्त आजचे एक वास्तव आपणापुढे मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. याही स्थितीत आशेचा दीप तेवत ठेवणारी मंडळी या महाराष्ट्रात आहे.
बोधी रंगभूमीची संकल्पना साकारण्यासाठी नाटककार प्रेमानंद गज्वी गेली दोन दशके अविरत, अखंड, अविश्रांतपणे कार्यरत आहेत. दलित बहुजन रंगभूमीची धुरा समर्थपणे सांभाळणारा नव्या पिढीचा विरेंद्र गणवीर आहे, कणकवलीचे वामन पंडित आहेत. कोल्हापूर-सांगली-साता-या कडचे शरद भुताडिया आहेत. बालरंगभूमी जगवत ठेवणारे संजय हळदीकर आहेत. झाडीपट्टी रंगभूमीला राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर नेणारे प्राचार्य सदानंद बोरकर, अनिरुद्ध वनकर आहेत. नाट्य प्रशिक्षक म्हणून काम करणारे शिवदास घोडके आहेत. नव्या पिढीला प्रशिक्षित करणारे प्रविण भोळे आहेत.
ग्रामीण भागात नाटकाचे शिक्षण-प्रशिक्षण देणारे संजय पाटील देवळाणकर, संपदा कुलकर्णी आहेत. वयाची पंच्याहत्तरी ओलांडली तरी तेवढ्याच तरुणाईच्या उर्जेने कार्यरत असणारे अचलपुरचे अशोक बोंडे आहेत. आदिवासी रंगभूमीचा शोध घेणारे काशिनाथ ब-हाटे आहेत. रंगभूमी, नाटक, लोकनाट्य आणि चित्रपट यात समतोल साधून आपली अविरत सेवा देणारे पुरुषोत्तम बेर्डे, विजय कदम आहेत. अदम्य साहस, जिद्द, चिकाटीने रंगभूमीसाठी कार्य करणारा अतुल पेठे, अंध-अपंगांसाठी रंगभूमीचा अप्रतिम उपयोग करणारा स्वागत थोरात आहे.
विशेषत: महाविद्यालयीन आणि विद्यापीठीय तरुणींसाठी एक आदर्श असलेल्या संयुक्ता थोरात आहेत. विद्यापीठ पातळीवर बुद्धिस्ट थिएटरवर संशोधन करणारा सुरेंद्र वानखेडे आहे. मध्य प्रदेशातील इंदूर येथे राहून गेली ४५ वर्षे मराठी रंगभूमीची अविरत साधना करणारे श्रीराम जोग आहेत. किस्सागोई करणारा अक्षय शिंपी, लोककलांचा प्रशिक्षक प्रा डॉ गणेश चंदनशिवे, सामाजिक नाट्यसृष्टीसाठी धडपडणारा मंगेश बन्सोड, अचाट संघटन कौशल्य असलेले सुरेश मेश्राम, नव्या नाट्यलेखनाच्या दिशा प्रशस्त करणारे भगवान हिरे, एग्रो थिएटर संकल्पना राबविणारे हरिश इथापे, या शिवाय संभाजी सावंत, श्रीनिवास नार्वेकर, विजयकुमार नाईक, अशोक हांडोरे, राजू वेंगुर्लकर, संजय जीवने (ही यादी खूप मोठी आहे. अनेकांची नावे सुटली असू शकतात. त्यासाठी मी क्षमा प्रार्थी आहे. सूटलेली अशी नावे आपण सूचविली तर तिचा समावेश पुन्हा करता येईल.) आदी अशी बरीचशी नावे घेता येतील.
ही सर्व मंडळी तुफानातही दिशा देणारे दिवे आहेत. त्यांचे योगदान मोठेच आहे, पण त्यामुळे मराठी रंगभूमीचे जे प्रश्न या आधी मी उभे केले ते सारेच सुटतील असे नाही. अर्थात काळ सर्व प्रश्नांची उत्तरे देतो, असे एक आदर्श वाक्य आहे. पण आता फक्त काळाचीच वाट बघत बसायचे की या तुफानातल्या दिव्यांना मदत करायची, नवे अपेक्षित घडण्यासाठी आणखी काही प्रयत्न करायचे हे महत्वाचे आहे असे मला वाटते.
नाट्यलेखन, अभिनय, दिग्दर्शन, नाट्यतंत्र, बाल रंगभूमी, शालेय रंगभूमी, महाविद्यालयीन रंगभूमी या संबधीच्या कार्यशाळा मोठ्या प्रमाणात व्हायला हाव्यात. प्रेक्षक सभासद योजना, प्रेक्षक एप्रिसीएशन कार्यक्रम अधिक व्हायला हवेत. मराठी रंगभूमी समोरील ही समकालीन आव्हाने पेलण्यासाठी ही चर्चा महत्वाची आणि दिशादर्शक ठरू शकेल, असा विश्वास वाटतो.

– लेखन : डॉ. सतीश पावडे. प्रादर्शिक कला विभाग, महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ, वर्धा.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800