Saturday, March 15, 2025
Homeसेवापरोपकारी परशराम

परोपकारी परशराम

शेतमजूर, सालगडी असणाऱ्या परशरामने ३० लाख रुपये किंमतीची दोन एकर जमिन जिल्हा परिषदेच्या शाळेला दान करून एक नवा आदर्श निर्माण केला आहे.

पत्नीच्या अंगावर दागिने नाहीत, भरजरी शालू नाही तर साधी साडी आहे. परशराम यांच्या अंगावर अगदी सामान्य कपडे तरीही दानत मात्र कुणालाही लाजवणारी आहे.

पोटच्या चार मुलीनंतर शाळा हेच पाचवे अपत्य समजून दोन एकर जमीन शाळेला दान करणारा महावेडा शेतमजूर परशराम वढाई याने दोन एकर जमीन विकून ३० लाख रुपये म्हातारपणाची सोय म्हणून बँकेत ठेवले असते तर मिळालेल्या व्याजावर उर्वरित जीवन बसून खाल्ले असते, पण वेडेपणा केला व शाळेसाठी जमीन दान केली.

सालगडी, कष्टकरी, शेतमजूर व शेतकरी असणारे परशराम वढाई “जाणता राजाच” आहे.
स्वतः अडाणी, चारही मुली फक्त सातवी पास. मात्र शिक्षणाबद्दल प्रेम, जिव्हाळा व सहानुभूती असल्याने शाळेला काहीतरी द्यावे हे स्वप्न होते. ते चारही मुलींच्या लग्नानंतर पूर्ण केले.
स्वतः शाळेतील मुख्याध्यापक यांचे बरोबर मुख्य कार्यकारी अधिकारी, गट विकास अधिकारी, गट शिक्षण अधिकारी यांना भेटून नोंदणी कार्यालयात जाऊन शेत सर्व्हे गट नंबर १३३ मधील दोन एकर जमिनीचे दानपत्र मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे नावे केले. नोंदणीचे पैसे प्राथमिक शिक्षकांनी वर्गणी काढून भरले.

यवतमाळ जिल्हा घाटंजी तालुक्यातील वाढोणा खुर्द गावात राहणारे परशराम वढाई यांनी आयुष्यभर शेतमजुरी केली. मोलमजुरी केली. सालगडी म्हणून रात्रंदिवस मेहनत केली. पत्नी सावित्रीबाई यांनीही पतीसमवेत काबाडकष्ट केले. काटकसर व कष्टाच्या जोरावर परशराम यांनी चार मुलींचा सांभाळ करत सात एकर जमीन टप्याटप्याने घेतली होती.

शोभा, जेबी, दुर्गा व माला या चार मुलींची लग्ने झाल्यानंतर पत्नी व मुलींची सहमती घेऊन अपुऱ्या जागेत भरणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळेसाठी दोन एकर जागा देण्याचा निर्णय घेतला आणि ३० ऑक्टोबर, २०२१ मध्ये दानपत्र करुन दिले.

परशराम यांना इच्छा असूनही गरिबीमुळे शिक्षण घेता आले नव्हते. शिक्षणाचे महत्व जीवन जगताना पदोपदी जाणवत असल्याने गावातील मुलांना शाळेसाठी प्रशस्त इमारत, खेळासाठी मैदान असावे म्हणून त्यांनी जमीन दान केली.

“गावातील मुले शिक्षण घेऊन मोठी झाली व गावाचे नाव केले तर मला धन्यता वाटेल व मन तृप्त होईल” असं परशराम म्हणतात.

जिल्हा परिषदेच्या शाळेत १ ली ते ८ वी पर्यंत वर्ग आहेत. गरीबांची मुले या शाळेत शिकतात. या मुलांना चांगले वर्ग व खेळण्यासाठी मोठे मैदान मिळाले तर गरिबांच्या मुलांचे कल्याण होईल असे परशराम यांना वाटते.

जोपर्यंत परशराम यांच्यासारखी वेडी माणसे गावोगावी आहेत तोपर्यंत जिल्हा परिषदेच्या शाळेला मरण नाही. गोरगरिबांची मुले, मुली नक्कीच अटकेपार जातील.

परशराम व सौ. सावित्रीबाई आपणास व आपल्या परिवारातील सर्व सदस्यांना आरोग्यदायी दीर्घायुष्य लाभू दे हीच परमेश्वराचे चरणी मनोमन प्रार्थना…

– लेखन : संपत गायकवाड.
निवृत्त सहाय्यक शिक्षण संचालक
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments