मुंबईत स्थिर होऊन महाराष्ट्रात ‘कुटुंब रंगलंय काव्यात’ या माझ्या एकपात्री कार्यक्रमाचे प्रयोग व्यवस्थित सुरू झाले, आणि एक दिवस पत्रकार नंदकुमार पाटील यांनी फोन करून मला ‘दै.शिवनेर’च्या कार्यालयात बोलावून घेतले. माझी ओळख करून देत ते मला म्हणाले, “हे दै.शिवनेरचे संपादक नरेंद्र वाबळे, त्यांच्या दैनिकासाठी मला आपली मुलाखत पाहिजे आहे.” त्यानंतर आमच्या गप्पा रंगल्या. तेव्हापासून झालेली आम्हा तिघांची मैत्री आजही तशीच, घट्ट आहे.
मी मुंबईत स्थिर झाल्यानंतर माझी घेतलेली पहिली मुलाखत शिवनेर मध्ये प्रकाशित झाली. ती मुलाखत गिरगाव मधील साहित्य संघाचे सर्वेसर्वा मा. दाजी भाटवडेकर यांच्या वाचनात आल्याने त्यांनी मला साहित्य संघात बोलावले. ‘स्वतः कवी नसताना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरून मी मराठी कविता संकलित केल्या, आणि त्यांच्या साभिनय सादरीकरणाचा एकपात्री कार्यक्रम मी सादर करतो, त्यासाठी मी प्राध्यापकाची नोकरी सोडून कविता सादरीकरणाचा वसा घेतला आहे’ ही गोष्ट दाजींना विशेष भावली आणि त्यांनी माझ्यावर पुत्रवत प्रेम केले.
साहित्य संघ मंदिरात एक दिवस आमच्या गप्पा चालू असताना मी दाजींना म्हणालो, “कवितांचे संकलन करण्यासाठी मी कांहीं साहित्य संमेलनांना तर गेलोच शिवाय एखाद्या जिल्ह्यातील कवींसाठी कविता वाचन स्पर्धा मी स्वखर्चाने आयोजित केल्या आहेत.
भंडारा, चंद्रपूर, नागपूर जिल्ह्यातील कविता वाचन स्पर्धांमधून मी तिथले अनेक कवी माझ्याकडे संकलित केले आहेत, आणि आता मुंबईतील कवींसाठी अशीच एक स्पर्धा आयोजित करण्याची माझी इच्छा आहे, त्यासाठी मला आपल्या सहकार्याची आवश्यकता आहे !” एका क्षणाचाही विलंब न-करता त्यांनी माझ्या प्रस्तावाला मान्यता दिली.
साहित्य संघ मंदिराच्या सहकार्याने मुंबई-ठाण्यातील कवींसाठी स्पर्धा घ्यायचे आम्ही ठरवले. साहित्य संघ मंदिराच्या वरच्या मजल्यावरील डॉ. पुरंदरे सभागृह भाटवडेकर सरांनी मला विनामूल्य उपलब्ध करून दिले, आणि मी स्पर्धेच्या तयारीला लागलो.
या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून दाजी भाटवडेकर तर अध्यक्ष म्हणून यायला थोर कविवर्य मंगेश पाडगावकर यांनी होकार दिला. प्रथम कविता वाचन स्पर्धा व नंतर निमंत्रित कवींचे संमेलन असा संपूर्ण दिवसाचा कार्यक्रम निश्चित झाला. कविता वाचन स्पर्धेच्या बातम्या मुंबईतील सर्व वृत्तपत्रांत प्रसिद्ध झाल्या आणि मुंबईतील अनेक नव्या कवींनी माझ्याकडे आपला सहभाग नोंदवला. अरूण म्हात्रे, अशोक नायगावकर, सौमित्र, रामदास फुटाणे, सर्वोत्तम केतकर, मकरंद वांगणेकर, शिवाजी गावडे, कमलाकर राऊत, इत्यादि नव्या फळीतील नावाजलेल्या कवींना मी ‘निमंत्रितांच्या कवी संमेलनासाठी’ निमंत्रित केले आणि त्यांनी येण्याचे कबूलही केले. माझ्या उमरेडच्या (जि.नागपूर) मानस भगिनी डॉ.लीना रस्तोगी यांनी कवी संमेलनाच्या सूत्र संचालनाची जबाबदारी स्वीकारली.
२६ जानेवारी १९८७ रोजी सकाळी १० वाजता साहित्य संघाचे डॉ.पुरंदरे सभागृह कवी व रसिकांनी भरून गेले, संमेलनाचे अध्यक्ष मंगेश पाडगावकर, मा.दाजी भाटवडेकर, परिक्षक दया पवार, सौ.निर्मला देशपांडे आणि डॉ.प्रभा गणोरकर यांच्या शुभहस्ते गणपती – सरस्वतीचे पूजन व दीपप्रज्वलन झाले, आणि कविता वाचन स्पर्धेची सुरुवात झाली. स्पर्धा, बक्षिस वितरण, निमंत्रिताचे कवी संमेलन अतिशय सुंदररीत्या संपन्न झाले त्यावेळी रात्रीचे नऊ वाजून गेले होते. माझ्या बरोबर दाजींनी सर्वांना निरोप दिला. दाजी भाटवडेकर यांनी माझे कौतुक केले आणि शेवटपर्यंत त्यांची कौतुकाची थाप माझ्या पाठीवर मिळत राहिली, ही विशेष गोष्ट मला इथे नमूद करावीशी वाटते.

माझ्या या प्रयत्नांमुळे मुंबईचे भरपूर कवी माझ्याकडे संकलित झाले. मित्र अरूण म्हात्रे यांनी लिहिलेली बाल कविता आमच्या सर्व रसिक वाचकांसाठी पुढे देत आहे….
“टिंग टिंग टिंग टिंग टिंग टिंग,
झाली तिसरी घंटा.
चला मुलांनो नाटक करुया,
विसरुन भांडण-तंटा
नाटक कसले ही तर शाळा,
शाळेचा येतो कंटाळा,
भिंती तोडुन दूर जाऊ,
रानामधली गंमत पाहू,
नाचू आणि गाऊ,
मिळेल तितके खाऊ,
रानातल्या वाटांवरुनी क्षितीजा पर्यंत जाऊ ।
हवेत मजला कान सशाचे अन् हत्तीचे शिंग….
टिंग टिंग टिंग टिंग टिंग टिंग….।।

– लेखन : प्रा.विसुभाऊ बापट. मुंबई
(सादरकर्ते – कुटुंब रंगलंय काव्यात)
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800